नवीन लेखन...

जगण्याचा आस्वाद घेणारा.. मध्यमवर्गीय!

जगामध्ये, पुणेकर आणि त्यातूनही नारायण, शनवार व सदाशिव पेठेतील रहिवाशांना सर्वदूर विशेष मान्यता आहे. दोन पिढ्यांपूर्वी सदाशिव पेठेत शांतता नांदत होती. नवीन बिल्डींग्ज उभ्या होत राहिल्या तरी काही जुने वाडे व त्यांची संस्कृती शिल्लक होती.
आमच्या जोशी वाड्यातील घाणेकर कुटुंब टिपिकल पुणेरी ‘मध्यमवर्गीय’ होतं. त्यातील कुटुंब प्रमुख दादा, हे काॅर्पोरेशनमध्ये नोकरीला होते. दादा त्यावेळी सायकलवरुन कामाला जात असत. डोक्यावर पांढरी टोपी, अंगात पांढरा फुल सदरा, खाली पांढरा पायजमा, पायात चप्पल. पायंडलमध्ये पायजमा अडकू नये म्हणून पायजम्याला घोट्याजवळ दुमडून स्टीलची गोल क्लीप लावली जात असे. सायकलच्या हॅण्डलला असावी म्हणून निळ्या रंगाची कापडी पिशवी गुंडाळलेली नक्कीच दिसे.
घरामध्ये दादांबरोबरच त्यांची तिन्ही मुले बनियन व पोपटी रंगावर निळ्या रंगांच्या पट्यांची डिझाईनवाल्या कापडाच्या अंडरवेअरमध्ये असत. बनियन ही बिनबाहीचीच असायची. काकू सहावारी साडीत असायच्या.
घरातील सर्वांना नवीन कपडे सणासुदीलाच होतं असत. तेही कापड घेऊन व ठरलेल्या टेलरकडे शिवूनच. रेडीमेड कपड्यांचा अवाजवी शौक त्यांनी कधी केलाच नाही. रविवारी सकाळी भाजी खरेदीसाठी मंडईत जाणं हे ठरलेलं. महिन्यांचं वाणीसामान एकदाच भरलं जायचं.
सणाच्या आदल्या दिवशी खुन्या मुरलीधर मंदिराच्या अलीकडेच असलेल्या चितळेंच्या दुकानात ‘उद्या अर्धा किलो श्रीखंड’ घेणार आहोत, याची नोंद केली जात असे. गणपतीच्या दहा दिवसांत वर्षभराची करमणूक होत असे. मंडळांचे भरपूर कार्यक्रम असत. चित्रपट, मेळे, भावगीतं, जादूचे प्रयोग सर्व काही पहायला मिळायचं. नवरात्रात देवींच्या दर्शनाला रांगा लागत असत. तांबडी जोगेश्वरी, भवानी माता, पद्मावती, चतुःश्रृंगीसाठी घरातले सगळेच बाहेर पडत. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सारसबागेत फुल्ल गर्दी असायची. दिवाळीसाठी आकाशकंदील घरीच केला जात असे. त्यासाठी मंडईच्या मागे बांबूवाले आकाशकंदील करण्यासाठी एकाच मापाच्या काड्या विकायचे. त्या काड्यांचे चार चौकोन तयार करुन एकमेकांशी जोडून, वरखाली दोन दोन चौकोन लावून सांगाडा तयार होत असे. मग त्यावर रंगीत जिलेटीन पेपर गव्हाच्या खळीने लावून आकाशकंदील तयार. सोनेरी कागदाने त्याला सजवून, खाली झिरमळ्या लावल्या की, दिवाळीच्या आदल्या दिवशीच तो टांगला जात असे. फटाक्यांची मर्यादा ठरलेली असे. फराळाचे पदार्थ देखील विचारपूर्वक केले जात.
शाळेचे कपडे वर्षातून एकदाच घेतले जात, तेही वाढीव मापाचे. मोठ्या भावाचा शर्टच काय पुस्तकंही वापरली जात असत. परीक्षा जवळ आली की मित्रांकडे किंवा शनिवार वाड्यात जाऊन अभ्यास केला जात असे.
दहावीला गेल्यावर वडिलांचं किंवा मोठ्या भावाचं घड्याळ मनगटावर यायचं. घरात वर्तमानपत्र घेण्याची ऐपत नसेल तर सार्वजनिक वाचनालयात जाऊन सर्व पेपर वाचले जायचे.
कधी आजारपण आलंच तर गरम पाणी पिणं सुरु व्हायचं त्यामुळे आजारानं मुक्काम कधी वाढवलाच नाही. परीक्षा संपेपर्यंत उसाचा रस प्यायला बंदी असायची. कोल्ड्रींक कधी अनुभवलेच नाही. वर्षातून फक्त उन्हाळ्यात ‘राजा आईस्क्रीम’ मध्ये दूध आणि साखर देऊन आईस्क्रीम करवून आणले जाई. हाॅटेलमध्ये खाणे चैनीचे समजले जाई.
रविवारी सकाळचा नाष्टा कांदेपोहे हा ठरलेला असे. उपवासाच्या दिवशी रात्री उपवास सोडताना रव्याची खीर ठरलेली. संकष्टी चतुर्थी कधी सोडली नाही. चंद्रोदय झाल्यावरच पानं मांडली जायची.
दादांनी स्वतः निवृत्त होताना आपल्या मोठ्या मुलाला काॅर्पोरेशनमध्ये नोकरीला लावलं. अशी त्यावेळी पद्धतच होती. नशिबाने दुसरा मुलगा देखील काॅर्पोरेशनमध्ये नोकरीला लागला.
आम्ही मोठे झालो, मागची पिढी वयोवृद्ध झाली. मात्र मध्यमवर्गीयांसारखी राहण्याची जी सवय लागली ती अजूनही काही सुटत नाही. अलीकडच्या पिढीला ती सुटणार नाही हे सांगूनही पटत नाही.
सकाळी बाहेर पडल्यावर माझं दूध, पेपर, हार घेऊन येणं घरच्यांना आवडत नाही. त्यांचं म्हणणं पेपरवाल्याला सांगितले तर तो पेपर टाकेल, दूधवाला दूध आणून देईल, हारवाल्याला सांगता येईल, रोज हार देत जा म्हणून. मी नको म्हणतो. मला पेपर घेतल्यावर वाटेतच हेडिंग वाचण्याची सवय आहे.. दूधवाला ठरलेला आहे, तो वाटच पहात असतो… काही न बोलता पैसे घेऊन पिशवीत दूधाची पिशवी टाकतो… हारवाला हाराचा पुडा व्यवस्थित बांधून पिशवीत सोडतो. भाजीवाल्यांकडे एकदा काय काय आहे हे पहात जायचं आणि परतताना हवं ते घ्यायचं अशी माझी प्रभातफेरी असते.
घरामध्ये हाॅटेलातून खाण्याचं पार्सल आणलं की, एवढ्याच रकमेत घरी किती खाणं तयार करता आलं असतं, हा विचार मनात उगीचच डोकावून जातो. बाल्कनीचं तिकीट काढताना चार वेळा विचार करणारी आमची पिढी. त्यामुळे मल्टिप्लेक्सला जाण्याचं धाडस मला होत नाही.
घरात नवीन वस्तू आणताना जुन्या वस्तूंची किंमत नाममात्र होताना पाहून गलबलून येतं. ती वस्तू घेतल्यापासूनच्या आठवणी दाटून येतात. प्रत्येक गोष्टीत भावनिक गुंतवणूक झालेली असते. निर्जीव वस्तूही अशावेळी सजीव भासतात.
अजून पन्नास वर्षांनी ‘मध्यमवर्गीय’ हा शब्द गुगलमध्ये सर्च करायला गेलं तर ‘उत्तर’ मिळण्याची शक्यता फारच कमी असेल हे मात्र नक्की!!!
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१-१०-२०.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..