नवीन लेखन...

जगण्याला पार्श्वभूमी बनलेला ‘लताचा’ आवाज !

मागील बुधवारी राहुल देशपांडे यांनी त्यांच्या तू-नळी चॅनेल वर ” माई री , मैं कासे कहूँ ” गायले. १० मिनिटात प्रती मदनमोहन नजरेसमोर उभा केला. या गाण्यात मदनमोहनने लताचा पराभव केला आहे,असे माझे व्यक्तिगत मत आहे. स्त्री-वेदनांचे हे गीत एका पुरुषाने इतक्या आर्ततेने गाणे हाच अंगावर काटा आणणारा अनुभव आहे. स्त्रिया खूप सहन करतात आणि ते शक्यतो बंद ओठांआड ठेवतात.

लता कायम या वेदनांचा आवाज बनते. फक्त स्त्रियांच्याच नव्हे तर जगातल्या सगळ्याच वेदनांना बोलता येत असतं /व्यक्त होता येत असतं तर त्या सगळ्यांनी एकमुखाने (!) तिचाच आवाज निवडला असता, इतका तो “संपूर्ण ” आणि “अमर्त्य ” आहे. ( बाय द वे काल मी “लता आणि आशा ” यांच्यातील तुलनात्मक लेख कोठेतरी वाचला. माझ्या मते नातं सोडलं तर त्यांची गायकी स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण आहे. दोघींना मी समोरून ऐकलं आहे,त्यावर आधारीत हे मत आहे.) त्यांच्यात तुलना करण्याच्या फंदात शहाण्याने पडू नये. व्यक्तिशः मला लता जास्त आवडत असली तरीही ! “पिंडे पिंडे मतिर्भिन्ह: ”

गंमत म्हणजे स्वतःच्याच निर्मितीवर नाखूष असलेल्या राहुल देशपांडेंनी शनिवारी याच गाण्यावर सविस्तर व्हिडिओ केला. त्यांत कोण कोणत्या रागांचे (बागेश्री, कोमल ऋषभ, पुरिया धनश्री आणि बरंच काही) बेमालूम मिश्रण आहे हेही त्यांनी उलगडून सांगितले. दोन्ही ऐकल्यावर आवाजातील प्रवाह तर जाणवलाच पण लता,मदनमोहन आणि मजरूह सुलतानपुरी, राहुलजींच्या ऊर्जेने, त्यांच्या माध्यमातून पुन्हा जिवंत झाले. त्यांची प्रतिभा नव्याने भिडली. मन आनंदवन भुवनी गेले.

लागोपाठ दुसऱ्यांदा मन आनंदवन भुवनीं गेले काल !

सकाळी उठल्यावर नातीने १५ ऑगस्ट ची मी तिला केव्हातरी सांगितलेली माझ्या लहानपणीची एक आठवण उलगडली. ” ऐ मेरे वतन के लोगो ” ची.

भुसावळच्या आमच्या न्यू इंग्लिश स्कूल चे मुख्याध्यापक पळणीटकर सरांची ! एका १५ ऑगस्टला सकाळी आम्हीं शाळेत ध्वजवंदनाला जमलो असता राष्ट्रगीत तर झालेच. पण रोजच्या पुनरावृत्तीने त्याचे फारसे काही वेगळेपण जाणवले नाही. पण त्यादिवशी सरांनी अचानक ” ऐ मेरे वतन के लोगो ” ची तबकडी लावायला सांगितली. सरस्वती माऊलीच्या आर्ततेने अंगावर पहिल्यांदा काटा आला आणि मन आतवर खोल थरारले. गाणे संपल्यावर सरांनी आम्हांला त्या गाण्याची कूळकथा सांगितली. पंडितजींचे अश्रू आमच्या डोळ्यांसमोर जिवंत केले. नुकतेच १९६२ सालचे युद्ध संपले होते आणि सरांच्या तोंडून या गाण्याचा किस्सा ऐकल्यावर आम्ही त्या वयातही हललो होतो. गंमत म्हणजे वर्णन संपल्यावर सरांनी ती तबकडी पुन्हा लावायला सांगितली. सुरुवातीला अबोध /अनुभवहीन मनाने ऐकलेले ते गीत, त्यानंतर सरांचे मर्म उलगडून सांगणारे भाष्य आणि त्या ज्ञानानंतरचे, जाणिवेने पुन्हा ऐकलेले ते गीत ! खरा शिक्षक असं जन्मभराचं शिकवून जातो. आजही पन्नास वर्षांनी ” ऐ मेरे वतन के लोगो ” ऐकल्याशिवाय माझा २६ जानेवारी/१५ ऑगस्ट साजरा होत नाही.

तिच्या काळी किती बरं आहे – केव्हाही हे गीत ऐकता येतं. थँक्स टू तंत्रज्ञान ! आमच्या नशिबात वर्षातून दोनदाच ही संधी  असायची.

पटकन तू -नळीवर नातीला ” ऐ मेरे वतन के लोगो ” ऐकवलं आणि (हिंदीत असल्याने) ओळ न ओळ समजावून सांगितली.

माझ्याबरोबर तिच्याही आयुष्याची पार्श्वभूमी होईल बहुधा लताचा आवाज !

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..