नवीन लेखन...

इथे ‘रंगतो’ नंदू

चाळीस वर्षांपूर्वी प्रभाशंकर कवडी नावाचे ज्येष्ठ कथाचित्रकार (इलेस्ट्रेटर) फार प्रसिद्ध होते. त्यांनी ‘किशोर’ या बालकुमारांच्या मासिकात पहिल्या अंकापासून कधाचित्र काढलेली होती. तसेच ‘आवाज’ सारख्या अनेक दिवाळी अंकांतून, विनोदी नाटकांच्या जाहिरातींतून त्यांनी काढलेली टिपिकल कौटुंबिक कॅरेक्टर मला फार आवडत असत. अशा चित्रांमधील त्यांनी काढलेल्या ‘ढापण्या’ मुलासारखाच डिट्टो दिसणारा आमचा एक मित्र आहे, त्याचं नाव नंदू पटवर्धन!
आम्ही १९८१ पासून डिझाईनच्या कामाला सुरुवात केली. तात्या ऐतवडेकरांकडे डिझाईनरुन निगेटिव्ह पाॅझिटिव्ह करण्यासाठी असंख्य स्क्रिन प्रिंटर्स यायचे. त्यातील कुणाला व्हिजिटींग कार्डचे डिझाईन करून घ्यायचे असेल तर तात्या त्या व्यक्तीला आमच्या घरी पाठवत असत.
असाच एक वीस वर्षांचा तरुण मुलगा तात्यांच्या सांगण्यावरून आमचा पत्ता शोधत आला. ‘नावडकर इथेच रहातात का?’ या त्याच्या प्रश्नावर मी समोर पाहिले तर एक उंचापुरा, कुरळ्या केसांचा, चौकोनी चेहऱ्यावर बहिर्गोल भिंगांचा चष्मा घातलेला, चौकटी शर्ट व डार्क कलरची पॅन्ट व पायात चपला घातलेला अस्सल सदाशिव पेठी युवक बोलत होता. मी होकार दिल्यावर तो म्हणाला, ‘माझं नाव नंदू पटवर्धन, मला व्हिजिटींग कार्डचे डिझाईन करुन घ्यायचे आहे.’ आम्ही त्याचं काम केलं व तेव्हापासून नंदूशी आमचे ‘रंग’ जुळले.
नंदू रहायचा चिमण्या गणपतीच्या अलीकडील पटवर्धन वाड्यामध्ये. पुण्यातील अनुपम प्राॅडक्ट्सची सुप्रसिद्ध ‘काजूकंद वडी’ याच वाड्यात तयार होत असे. वाड्यात आई वडील, दोन बहिणी व अजून दोन काका व त्यांची मुलं असं त्यांचं मोठ्ठं कुटुंब एकत्र नांदत होतं. वडील आणि काकांचा प्रिंटींग प्रेसचा व्यवसाय होता. शनिपारच्या अलीकडे कोपऱ्यावर त्यांचा ट्रेडल मशीनचा छापखाना होता.
नंदूने बारावी नंतर स्क्रिन प्रिंटींग करणे सुरू केले. जागेचा प्रश्र्न नव्हताच, घरच्यांनी त्याला एका हाॅलमध्ये काम करण्यास परवानगी दिली. त्यांच्याकडे दोन गाई होत्या, त्यांची देखभाल नंदूच करीत असे. याशिवाय त्याला सतार वाजविण्याचा छंद होता. साहजिकच सतारीचा रियाज, गाईंची देखभाल यांतून मिळणाऱ्या वेळेमध्ये तो स्क्रिन प्रिंटींगची कामं करायचा.
‌‌
त्यावेळी आमच्याकडे सर्टिफिकेट, ग्रिटींग्ज, निमंत्रण कार्डचे काम आले की, नंदू आमचा ठरलेला! नंदूला पाॅझिटीव्ह व पेपर दिल्यावर तो दोन दिवस मागून घ्यायचा. डोळ्यांच्या जवळ पाॅझिटीव्ह धरुन त्यावरील टाईप शार्प आहे ना? इमल्शनची बाजू बरोबर आहे ना? याची खात्री करून घ्यायचा. त्यांच्या वाड्याशेजारी असलेल्या चप्पल तयार करणाऱ्या कुटुंबातील एक पंधरा वर्षांचा ‘भावड्या’ हा मुलगा नंदूचा मदतनीस होता. नंदूने स्क्रिन तयार केला की, भावड्यातर्फे आम्हाला निरोप यायचा. आम्ही जायचो. पहिलं इंप्रेशन झालं की, नंदू पुन्हा एकदा पेपर डोळ्यांजवळ धरुन शार्पनेस बघायचा. सिंगल कलर असेल तर काम लवकर पूर्ण होत असे. मात्र दोन रंगी काम असेल तर रजिस्ट्रेशन जुळणं महत्त्वाचं असायचं. त्यात वेळ जात असे. आम्ही फारच चुका काढल्या की, नंदू वैतागून जात असे व आता माझी ‘रियाज’ची वेळ झाली आहे असे सांगून राहिलेले काम उद्यावर ढकलत असे.
एकदा सर्टिफिकेटचा जाॅब रंगसंगती चुकल्यामुळे रिजेक्ट झाला. साहजिकच नंदू वैतागला. आम्ही पुन्हा पेपर देऊन तो जाॅब एकदाचा पूर्ण करुन घेतला. त्याची डिझाईनचीही कामं आम्ही करुन देत होतो. महिना अखेरीस येणे-देण्याची जी काही वजाबाकी असेल ती देऊन व्यवहार पूर्ण केला जात असे.
त्यावेळी नंदू सायकलवरून आमच्या घरी येत असे. बाहेरच्या बाहेरच काम सांगून जात असे. काम मनासारखं झालं की, नंदू आम्हा दोघांना ‘नर्मदेश्वर’चा चहा पाजत असे. त्याचा गप्पांचा आवडता विषय ‘हिटलर’ हा होता. नाझी, जर्मनी, दुसरं महायुद्ध, बीएमडब्ल्यू अशा विषयावर तो अभ्यासपूर्ण बोलत रहायचा. जर्मनी मोटर सायकल, कार, विमानं याबद्दल त्याचं ज्ञान अगाध होतं. त्याचं हिटलर विषयीची प्रेम त्याच्या व्यवसायाच्या नावातही सामावलेलं होतं, N graphy च्या सिंबॉलमध्ये त्यानं हिटलरच्या ‘स्वस्तिक’ चिन्हाचा खुबीनं वापर केलेला होता.
जवळ जवळ पाच-सात वर्षे आम्ही नंदूकडून काम करुन घेतले. दरम्यान त्यांचा वाडा पाडण्याचे ठरले. साहजिकच नंदूचे स्क्रिन प्रिंटींग बंद झाले. वाडा पाडला, दोन वर्षांनंतर त्याच जागेवर तीन मजली इमारत उभी राहिली. पुढे कमर्शियल दुकानं आणि वरती फ्लॅट झाले. याच कालावधीत नंदूचं लग्न झाले. दुकानांच्या रांगेतील एक गाळा नंदूने स्वतःसाठी राखीव ठेवला. त्याच गाळ्यामध्ये इंडस्ट्रीथल स्क्रिन प्रिंटींगची मोठी कामं नंदू करु लागला. आता त्याला मदतीला एकाच ‘भावड्या’ ऐवजी कुशल पंधरा वीस कामगारांचा स्टाफ आहे. मोठे बॅनर, कापडी बोर्ड, फोम शीट, अॅक्रॅलिक शीट, मेटल शीटवरील मल्टीकलर प्रिंटींगमध्ये आज त्याचा हात धरणारा कोणीही नाहीये.
कधी चिमण्या गणपतीच्या रस्त्याने जाऊ लागलो तर नंदूची हमखास हाक येते, ‘अहो नावडकर बंधू, याऽ इकडं!’ आम्ही दोन पायऱ्या चढून वर जातो. नंदू आता एखाद्या ऑफिसरसारखा टिपटाॅप दिसत असतो. तो आम्हा दोघांनाही बसायला खुर्ची देतो. इकडची तिकडची चौकशी करतो. ऑफिसमधील माणसाला चहा आणायला पाठवतो. दरम्यान त्यानं केलेली कामं दाखवतो. प्रिंटींगची आधुनिक मशिनरी दाखवून मनापासून बोलू लागतो, ‘नावडकर बंधू, या माझ्या सर्व यशाचं श्रेय तुम्हाला आहे. तुम्ही त्यावेळी माझ्या कामातील बारीक सारीक चुका दाखवून द्यायचा, त्याचा मला भयंकर राग येत असे. तरी मी शांत राहून काम करीत असे. त्यामुळेच आज माझी प्रगती झालेली आहे.’ तोपर्यंत चहा आलेला असतो, आम्ही तिघेही चहा घेतो. निघताना नंदू त्यांचे नवीन व्हिजिटींग कार्ड हातात देतो. त्यावरील नाझीचा ‘स्वस्तिक’ नंदूला ‘शुभलाभ’दायी ठरलेला दिसत असतो…
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२४-८-२०.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..