नवीन लेखन...

इटालियन शिल्पकार आणि चित्रकार मायकेल अँजेलो

इटालियन शिल्पकार आणि चित्रकार मायकेल अँजेलो यांचा जन्म ६ मार्च १४७५ रोजी झाला.

शिल्पकार, चित्रकार, कवी, वास्तुशिल्पी अशा अनेक भूमिकांमध्ये साऱ्या जगावर अमिट ठसा उमटविणाऱ्या ‘मायकेल अँजेलो’ या कलावंताची ही रोमहर्षक कहाणी! डॉ. माधवी मेहेंदळे यांनी लिहिलेल्या आणि अमेय प्रकाशनतर्फे प्रसिद्ध झालेल्या ‘दैवी प्रतिभेचा कलावंत : मायकेल अँजेलो’ या पुस्तकातील हा संपादित अंश!

संगमरवर आपल्याला पारखता आला पाहिजे, त्यातल्या स्फटिकांची दिशा ओळखता आली पाहिजे. त्यावर हातोडी मारल्यावर त्याचा टवका कसा, कोणत्या बाजूनं उडतो त्याप्रमाणे त्या संगमरवरातल्या स्फटिकांची दिशा असते. संगमरवरावर वरून पाणी ओतायचं. त्याचे ओघळ कसे वाहतात त्यावरून त्याच्या आतल्या नसा कशा आहेत ते कळतं. संगमरवरातले छोटे छोटे काळे डाग म्हणजे त्यातले लोहकण असतात. संगमरवराला चुकीच्या दिशेनं हातोडी मारली तर त्यातले स्फटिक चिरडले जातात. चिरडलेल्या स्फटिकात चांगलं शिल्प बनू शकत नाही. त्यानं शिल्प बिघडतं. त्यामुळे स्पटिकांची दिशा बघून त्याप्रमाणे त्यात शिल्प कोरावं लागतं. मायकेल अँजेलो संगमरवराचा रत्नपारखी बनायला शिकत होता. संगमरवरात कधी कधी आतमध्ये पोकळय़ा निर्माण होतात. तिथले स्फटिक नष्ट होतात. तिथे मोकळी जागा निर्माण होते. त्यात हवा अडकली जाऊन हवेचे बुडबुडे तयार होतात. अशा पोकळय़ा बाहेरून दिसत नाहीत पण तरी त्यांचं अस्तित्व आपल्याला बाहेरून ओळखता आलं पाहिजे. संगमरवरात फार पोकळय़ा असतील तर त्यात चांगलं शिल्प होऊ शकत नाही.

रोज सकाळी तो शिल्पशाळेत जाऊन संगमरवराचं निरीक्षण करायचा. त्यावर हातोडीनं वाजवून पाहिलं, की येणाऱ्या आवाजावरून त्याचा दर्जा कळायचा. चांगलं स्फटिक असेल तर चांगला झंकार यायचा. तिथली स्फटिकं नष्ट झालेली असली तर नुसताच ‘थड’ असा बसका आवाज यायचा. पोकळी असेल तर निराळा आवाज यायचा. थंडी, वारा, ऊन, पावसात असलेल्या संगमरवराचा बाहय़ भाग बाहेरून कडक होता. तेवढा बाहेरचा कडक भाग टरफल काढतो तसा छिन्नी-हातोडीनं काढून टाकला की आतमध्ये कोवळा सुरेख संगमरवर असतो. पहाटेची पहिली कोवळी सूर्यकिरणं संगमरवरात कशी प्रवेश करतात त्यावरून संगमरवर आतून कसा आहे ते कळतं. सूर्यकिरणात संगमरवर जवळजवळ पारदर्शक बनतो. किरणांच्या मार्गात स्फटिकं नष्ट झालेला भाग, पोकळय़ा, नसा, त्यांच्या दिशा सर्व काही व्यवस्थित दिसून येतं. काहीच लपलेलं राहू शकत नाही. बाहेरचं कठीण कवच काढून टाकल्यावर आतला पांढराशुभ्र कोवळा संगमरवर म्हणजे जगातला सर्वात शुद्ध पदार्थ. कुठली तरी दैवी शक्तीच एवढी शुद्धता निर्माण करू शकते. मायकेल अँजेलोला तो स्वत:ही त्या दैवी शुद्धतेचा एक भाग आहे असा भास होऊ लागला. तो ज्या पाथरवटांच्या कुटुंबात वाढला, त्यांच्या वस्तीत गेला. तिथे दगड फोडणारे कामगार होते. त्यांची उघडी शरीरं घामानं निथळणारी- चमकदार दिसत होती. संगमरवरासारखी! तिथे सर्व प्रकारच्या हालचाली दिसत होत्या. मायकेल अँजेलो तिथे बसून निरीक्षण करू लागला. कोणती हालचाल करताना कोणता स्नायू कसा दिसतो ते बघू लागला. त्याची भराभरा रेखाटनं करू लागला. हत्यारं वर उचललेला हात, घाव घालताना छातीच्या व पोटाच्या स्नायूंची होणारी हालचाल, त्यावर पडणारा ताण, पीळ- त्याच्या कागदावर सर्व उतरवू लागला. जेवणानंतर काही काळ कामगार तिथेच झोपले. तेव्हा झोपलेली श्रांत शरीरं त्यानं चितारली. मानवी शरीरापासून किती शिकण्यासारखं आहे. त्याचे किती प्रकारचे स्नायू, सांधे, अवयव आहेत. कलाकाराने आयुष्यभर फक्त मानवी शरीराचा अभ्यास केला तरी तो सर्व आत्मसात करू शकणार नाही. त्याची इच्छा पुरी होणार असं दिसू लागलं. रात्री सामसूम झाल्यावर तो शवागारात गेला. किल्लीनं ज्ञानाचे दरवाजे उघडले गेले. रात्रीच्या अंधारात, मेणबत्तीच्या उजेडात तो प्रेतांची चिरफाड करू लागला. त्याच्या ज्ञानात भर पडू लागली. स्नायू कुठे सुरू होतो. कुठे संपतो. हसताना चेहऱ्याच्या कोणत्या स्नायूंची हालचाल होते. छातीच्या पिंजऱ्यात फुफ्फुस व हृदय कसं ठेवलेलं असतं. पोटाच्या पोकळीत आतडी छोटी व मोठी कशी गुंडाळी करून ठेवलेली असतात. मेंदूकडे बघताना त्याला नवल वाटलं. सगळय़ांचा मेंदू दिसायला सारखाच असतो, पण त्यातून काय काय निघतं. बुद्धी, कला, भावना, प्रेम, सत्प्रवृत्ती, दुष्ट खलनायकी विचार, न्यूनगंड, अहंगंड! सगळं आश्चर्य वाटत होतं. रोज रात्री दोन-तीन तास सगळं बारकाईनं निरीक्षण करायचं. देहभान विसरून तो ज्ञान मिळवत होता. सकाळ व्हायच्या आत सगळं जिथल्या तिथे ठेवून त्याला परतायला लागायचं. वेळेचं भान राहायला हवं म्हणून तो बरोबर तीन तासांनी संपेल अशी मेणबत्ती लावायचा. मेणबत्ती विझायला आली की आपली वेळ संपली. मग आवराआवर करायची. घरी आल्यावर जे काही पाहिलं त्याची रेखाटनं काढून ठेवायची. मनुष्यदेहाबद्दल त्याला आत्मीयता होतीच. ती आता अधिक वाटू लागली. हात, पाय, छाती, पोट यांच्या स्नायूंची सखोल माहिती झाली. त्याच्यातला शिल्पकार अधिक परिपक्व झाला.

संगमरवरात काम सुरू झालं. सात फुटी म्हणजे माणसापेक्षा मोठय़ा आकाराची आकृती हवी. हातात मद्याचा प्याला उंचावलेला, त्यामुळे बॅलन्स जायला नको. त्यासाठी मागचा सेट्र हवा.

मायकेल अँजेलोला वाईट वाटत होतं, की खाण्याच्या वेळात आणि झोपण्याच्या वेळात काम थांबवावं लागत होतं.

शिल्पातला सर्वात उंच व सर्वात खोल भाग मार्क करून झाला. हळूहळू एकएक अवयव जन्म घेऊ लागले. उंच धरलेला हात एकदम सुटा करणं धोकादायक होतं. त्याला आधार म्हणून दगडाचा एक पातळ पापुद्रा शेवटपर्यंत तसाच ठेवला. अगदी शेवटी त्याला ड्रीलनं बारीक भोक करून काढला. चेहरा, डोकं, मान हळूहळू आकाराला येत होतं. द्राक्षं छोटय़ा छोटय़ा गोल आघातानं कोरली जात होती. प्रत्येक द्राक्ष रसरशीत भरलेलं दिसावं म्हणून मायकेल अँजेलो प्रयत्नशील होता. ते तसं झालंही! काय मजेशीर आहे. संगमरवरी दगडातून रसरशीत, पारदर्शक, रसाळ फळांची निर्मिती होत होती. शिल्पकाराला पुराणाबद्दल चांगलं ज्ञान व आध्यात्मिक अधिष्ठान असणं अपेक्षित होतं. त्याला शरीरशास्त्राचं अचूक ज्ञान असणं अपेक्षित होतं. त्याला माध्यमाविषयी म्हणजे संगमरवराविषयी माहिती असणं व त्याची पारख असणं अपेक्षित होतं. त्यासाठी लागणारी हत्यारं कशी हवीत व ती कशी तयार करायची हेही माहिती असणं अपेक्षित होतं. तो चांगला चित्रकार असणं अपेक्षित होतं. मायकेल अँजेलो सर्व कसोटय़ांवर उतरत होता. आता पिएताचा विचार करताना त्याच्या लक्षात येत होतं, की शिल्पकार एक चांगला इंजिनीअर असणं व एक चांगला आर्किटेक्ट असणं अपेक्षित होतं. पिएताची मायकेल अँजेलोची संकल्पना म्हणजे मेरीच्या मांडीवर ख्रिस्ताचं शव अशी होती. स्त्रीच्या मांडीवर एखादं लहान बाळ झोपलेलं दाखवणं ही वेगळी गोष्ट होती. पण स्त्रीच्या मांडीवर पूर्ण वाढ झालेल्या पुरुषाचा देह माववणं ही खूपच कठीण गोष्ट होती. खरं म्हणजे हे एखाद्या स्थापत्यकारासाठी आव्हान होतं. मायकेल अँजेलोमध्ये दडलेला स्थापत्यकार-आर्किटेक्ट यावर विचार करू लागला. शिल्प नीट उभं राहावं, त्यातला बॅलन्स राहावा, ते खचू नये, यासाठी त्याच्या वजनाची विभागणी बरोबर हवी. त्याचा गुरुत्वमध्य बरोबर ठिकाणी हवा म्हणजे ते कुठल्या एका बाजूला झुकणार नाही. यासाठी इंजिनीअरच्या बुद्धीची आवश्यकता होती. मायकेल अँजेलोमध्ये जात्याच हे सगळं सामावलेलं होतं.

मायकेल अँजेलो यांचे १८ फेब्रुवारी १५६४ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..