नवीन लेखन...

प्रसारमाध्यमांव्दारे जाहिरात करणे फायद्याचेच

प्रत्येक उद्योजकाला आपले उत्पादन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे आणि आपला उद्योग तेजीत वाढावा असे नेहमीच वाटत असते. त्यासाठी तो खूप मेहनत घेवून आपला माल तयार करतो आणि बाजारात पाठवतो. परंतू बऱ्याच उद्योजकांचा उत्पादनाचा खर्चही निघणे जिकरीचे होत असते, कारण त्यांचा माल बाजारात पडून राहतो. योग्य त्या ग्राहकापर्यंत पोहोचतच नाही. मग प्रश्न निर्माण होतो कि, नक्की काय कमी पडतेय? आपले नेमके कोठे चुकतेय? सर्व तऱ्हेचे प्रयत्न करून देखील आपल्याला धंद्यात यश का बरे मिळत नाही? मुळातच लहान उद्योजकाचे व्यावसायिक वर्तुळ खूप लहान असते. त्याच वर्तुळात तो उद्योजक किती काळ खेळत राहणार? म्हणूनच आवश्यकता असते ती ते वर्तुळ वाढवण्याची. व्यावसायिक वर्तुळ वाढले की आपले कार्यक्षेत्र वाढतेच. परंतू ते कसे वाढवावे? हेच लक्षात येत नाही, काहीवेळा समजते पण उमजत नाही. उद्योजक कोणताही असो मग तो उत्पादन क्षेत्रातील असो अथवा सेवा क्षेत्रातील त्याला व्यवसाय करण्यासाठी ग्राहकांची आवश्यकता असतेच. योग्य ग्राहक शोधण्यासाठी त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक असते. अर्थातच त्यासाठी आवश्यकता असते प्रभावी जाहिरातीची.

प्रसार माध्यमांतील जाहिरातींचे महत्व

जाहिरात म्हणजे नक्की काय? ती का करावी? असे प्रश्न प्रत्येक उद्योजकाला पडणे स्वाभाविक असते. अनेकांचे “जाहिरात” ह्या विषयीच खूप गैरसमज असतात, त्यामुळे आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्याच्या बाबत उद्योजक निराशाजनक असतात. खरे तर जाहिरात म्हणजे ग्राहक आणि उत्पादक यांच्यातील सक्षम संवादाचे माध्यम असते. मोजक्या शब्दात पण आकर्षक मांडणीने ग्राहकाला खरेदी करण्यास भाग पाडणारे माध्यम म्हणजे जाहिरात असे म्हणता येईल. आजच्या काळात जाहिरातीसाठी अनेक प्रकारची माध्यम उपलब्ध आहेत. त्याचा योग्य आणि आपल्या उद्योगाचा पोत ओळखून वापर करण्याची आवश्यकता असते. जाहिरात नेमकी का करावी? कोण कोणत्या गोष्टींना डोळ्यासमोर ठेवून जाहिरात करावी? ह्याविषयी अभ्यासपूर्वक विचार करण्याची जरुरी असते.

प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा मोठ्या प्रमाणांत वाढली असल्यामुळे बाजारात टिकून राहण्यासाठी “आपण इतरांपेक्षा किती वेगळे आहोत”, हे सिद्धी करण्याची गरज असते. त्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला संदेश सतत पोहोचवणे आवश्यक ठरते. आपल्याविषयी, आपल्या उत्पादनाविषयी लोकांना माहिती देत राहणे जरुरीचे असते. सतत लोकांच्या नजरेसमोर राहणे, त्यांच्या कानावर आपल्या उत्पादनाविषयी, पुरवल्या जात असलेल्या सेवांविषयी काही ना काही पडत राहणे आवश्यक असते. त्यासाठी जाहिरात करणे गरजेचे असते. सतत लोकांच्या नजरेसमोर राहणे किंवा त्यांच्या कानावर आपल्या व्यवसायाविषयी माहिती जात राहणे यामुळे लोकांना आपली ओळख होवू लागते आणि ते आपल्या संपर्कात येऊ लागतात. जेव्हा ग्राहकांच्या मनावर आपले नाव कोरले जाते तेव्हा आपोआप त्यांच्या माध्यमातून आपली प्रसिद्धी होवू लागते आणि ही साखळी वाढत जावून आपले व्यावसायिक वृद्धीचे काम सुरु होऊ लागते. हीच खरी जाहिरातीची ताकद म्हणता येईल. मोठ्या उत्पादकांना देखील करोडो रुपयांचा खर्च हा केवळ जाहिरातींवर करवा लागत असतो. जर यांनी आपली जाहिरात करणे बंद केले, तर लोकांच्या नरजेपासून ते दूर जातील आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी लोकांची बाजारपेठेत मक्तेदारी वाढेल. त्यामुळे प्रसिद्धिसाठी त्यांना स्वत:ची जाहिरात नेहमी करत राहणे अनिवार्य ठरत असते.

काही उद्योजकांना जाहिरात केली म्हणजे लगेच त्यातून व्यवसाय यावा अशी अपेक्षा असते. जाहिरात ही आपल्याला जास्तीत जास्त लोकांसमोर पोहोचण्यासाठी करणे आवश्यक असते हे त्यांना अनेकदा पटत नसते. आपल्या वर्तुळाच्या बाहेरील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचे माध्यम म्हणून जाहिरातीकडे पाहण्याची गरज असते आणि तीच उद्योजक करत नाहीत. उद्योजकांनी ह्या  नजरेतून जाहिरातीकडे पाहिल्यास त्यांनाच त्याचा लाभ होवू शकतो. त्यासाठी जाहिरातीचे मुख्य उद्देश समजून घेतले पाहिजेत.

आपले उत्पादन गि-हाइकाच्या नजरेसमोर ठेवणे

हल्लीच्या स्पर्धेच्या युगात व्यावसायिक पातळीवर टिकून राहायचे असेल तर आपले उत्पादन प्रामुख्याने गिऱ्हाईकाच्या सतत नजरेसमोर राहिले पाहिजे. ज्याची आपला माल विकत घेण्याची इच्छा नसेल त्याच्या देखील गळी उतरविणे शक्य झाले पाहिजे. हे दोन्ही उद्देश महत्त्वाचे असले तरीही दुसरा उद्देश जाहिरातदारांच्या दृष्टीकोनातून अधिक महत्त्वाचा असतो. कारण माल कितीही चांगला असला अथवा लोकांच्या डोळयांत भरला, घ्यावा असे वाटले, तरी देखील प्रत्येकजण तो घेतोच असे नाही. फार झाले तर तो त्या मालाची शिफारस करील; पण नुसत्या तोंडी शिफारसीने त्या मालाचा खप आणि त्यापासून व्यापा-यांना अर्थप्राप्ती मर्यादित होत असते. आपले उत्पादन गिऱ्हाईक विकत घेईल अशा प्रकारची युक्ती अमलांत आणावी लागते. त्यासाठी गि-हाइकाला मोह पडेल अशा प्रकारची जाहिरात देणे हा एक महत्त्वाचा उपाय असतो. ज्याची जाहिरात लोकांना अधिक पसंत पडते त्याचाच माल अधिक खपतो हे आपण सर्वत्र अनुभवत आहोत. कोणती जाहिरात लोकांना पसंत पडेल इकडे उद्योजकाचे लक्ष असणे, त्याचा अभ्यासपूर्वक विचार करणे जरुरीचे असते. प्रसारमाध्यमांव्दारे केलेल्या जाहिरातीचा होणारा परिणाम निश्चितच व्यावसायिकांसाठी फायदेशीर ठरत असतो.

प्रत्येक उद्योजकाने आपल्या कक्षा रुंदावण्यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या प्रसारमाध्यमांचा सरसकट वापर करावा हे जरीही खरे असले, तरीही प्रथितयश प्रसारमाध्यमांच्या विश्वासार्हतेच्या कारणाने जाहिरातींच्या माध्यमांतून वाचकांपर्यंत, ग्राहकांना आपलेसे करणे अधिक प्रभावी ठरत असते. आपल्या उद्योगाचा ग्राहक ओळखून त्यासाठी आवश्यक त्या जाहिरांतीच्या प्रकारांचा वापर जरूर करावा.

सोशल मिडीयावरील जाहिरातीची अधिकृतता

हल्लीच्या सोशल मिडीयाच्या डिजीटल युगात अनेक सोशल मिडीयाचे प्लॅटफॉर्मही व्यावसायिकांना, ग्राहकांना आकर्षित करत असतात. ज्यामुळे उद्योजक हजारो लोकांपर्यंत जलद रीतीने पोहोचू शकतात. परंतू आपल्या उद्योगाला त्या प्लॅटफॉर्मचा फायदा आहे का? हे ओळखण्याची ताकद आपण स्वत:मध्ये निर्माण करण्याकडे मात्र अनेकांकडून दुर्लक्ष होत असते. टेलिव्हिजन, रेडिओ, वृत्तपत्र, मासिके, यासोबत आजचे नवे माध्यम इंटरनेट आणि सोशल मिडिया या सगळ्यावरून आपण आपल्या उत्पादनांना जाहिरातीच्या माध्यमातून अधिकृततेच्या दृष्टीने काही महत्वाच्या बाबींचा उद्योजकांनी अभ्यास करून सतत लोकांसमोर ठेवले पाहिजे.

जाहिरात चित्ताकर्षक असली पाहिजे

आकर्षक, मनमोहक, संस्मरणीय, मनोवेधक डिझाईन हे जाहिरातीचे मुलभूत मुलतत्व असते. जाहिरात जर चित्ताकर्षक नसेल तर लोकांचे लक्ष तिकडे वेधले जाणार नाही आणि त्यामुळे जाहिरात देणा-याचा माल फार खपणार नाही. अलीकडच्या काळांत विक्री कौशल्याच्या दृष्टीने जाहिरातींना महत्व प्राप्त झाल्यामुळे वाचक, ग्राहक जाहिरातीची आकर्षकता, समर्पकता बघून आकर्षित होत असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र मोठे, लांबलचक मजकूर वाचण्याचा कंटाळा ग्राहक करतात. अशा वेळी त्यांची इच्छा नसतानाही त्यांचे लक्ष ज्यामुळे वेधले जाईल अशा चित्ताकर्षक त-हेची जाहिरात बनवणे क्रमप्राप्त झाले आहे. सध्याच्या स्पर्धेच्या युगांत ज्याची जाहिरात अधिक भपकेदार त्याच्या वस्तूचा खप अधिक अशी वस्तुस्तिथी आहे. त्यामुळे जाहिरात देणा-या व्यापा-याने, उद्योजकाने आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या जाहिरातीपेक्षा आपली जाहिरात कशी भपकेदार, आकर्षक, मनोवेधक होईल, कोणत्या माध्यमातून अथवा कोठे दिली असता ती लोकांच्या, वाचकांच्या, ग्राहकांच्या चटकन नजरेत भरेल या सर्वांचा काळजीपूर्वक, अभ्यासपूर्वक विचार करून जाहिरात दिली पाहिजे. नवनवीन साधनांच्या आणि सुधारणांच्या वाढीबरोबर जाहिरातीचे क्षेत्र देखील व्यापक झाले आहे. वैविध्यपूर्ण जाहिरातीची साधने अस्तित्वांत आली आहेत. आकर्षक छायाचित्रांची जोड देऊन उत्पादनाची जाहिरात अधिक आकर्षक करता येऊ शकते.

जाहिरात मार्मिक आणि सूचक असणे महत्वाचे

जाहिरात बनवताना अगदी हलके, साधे, सोपे शब्द वापरून केल्यास अधिक उठावदार होते. जाहिरातीतील मजकूर, छायाचित्रे, माहिती ह्यातील सत्यता अधिक महत्वाची असते. जाहिरात चटकदार असली पाहिजे, जाहिरात वाचतांच वस्तूचे फायदे काय आहेत हे ताबडतोब गि-हाइकाच्या लक्षांत आले पाहिजेत. जाहिरात लोकांच्या मनांत कायम घर करून राहील अशा प्रकारची असली पाहिजे. जाहिरातीवरून ग्राहकांना संबंधित उत्पादनाच्या गुणाबद्दल खात्री पटली पाहिजे. जाहिरात लोकांच्या मनोवृत्तींना बरोबर पटेल अशीच असली पाहिजे. जाहिरात जुन्या वस्तूंचा खप वाढविणारी आणि नवीन वस्तू वापरण्याची चटक लावणारी असली पाहिजे.

प्रसारमाध्यमांतील जाहिरात ही गुंतवणूकच

जाहिरातदारांच्या उत्पादनाच्या विक्री वृद्धीसाठी आवश्यक असणारी पहिली गुंतवणूक म्हणजे प्रसारमाध्यमांव्दारे केलेली जाहिरात होय. अनेकदा उद्योजक जाहिरातीवर आर्थिक गुंतवणूक करायला तयार नसतात. मुळातच जाहिरात ही गुंतवणूक न समजता खर्च समजला जातो. त्यामुळेच त्यांचा जाहिरातीवर होणारा खर्च अनेकदा जाहिरात करण्यापासून त्यांना रोखणारा पहिला अडथळा ठरत असतो. प्रत्येक माध्यमात जाहिरात करण्यासाठी वारेमाप पैसे मोजावेच लागतात असे नाही. प्रत्येक माध्यमाचे फायदे तोटे असतातच. उद्योजकाने अंतीम लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्वत:ला, उद्योगाला, उत्पादनाला पोहोचवण्यासाठी आपली ध्येय-धोरणे ठरवणे जरुरीचे असते. जाहिरात करण्याविषयी गैरसमज दूर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी माध्यम म्हणून प्रसारमाध्यमांव्दारे जाहिरात करत राहणे जरुरीचे असल्याचे समजून घेतले पाहिजे. आपल्या उत्पादनाच्या प्रसिद्धीमुळेच व्यावसायिक वृद्धी होणार आहे, हे दुर्लक्षित करून चालणार नाही. त्यामुळे वृत्तपत्रीय जाहिरात ही केवळ गुंतवणूक असल्याने ती आवश्यकच आहे.

विद्यावाचस्पती विद्यानंद

इमेल : vidyavachaspati.vidyanand@gmail.com

Avatar
About विद्यावाचस्पती विद्यानंद 32 Articles
शिक्षण तज्ज्ञ, जेष्ठ पत्रकार, लेखक, साहित्यिक, व्याख्याते, स्तंभ लेखक, कवी, व्याख्याते, अभिनेते, मानसशास्त्रीय समुपदेशक, करिअर आणि आध्यात्मिक मार्गदर्शक. एकूण १८ पुस्तकांचे लेखन (पैकी ६ क्रमिक पाठ्य पुस्तके गेल्या ६ वर्षांपासून विद्यापीठातील अभ्यासक्रमासाठी उपलब्ध), २००० पेक्षा अधिक लेखांना विविध माध्यमांतून प्रसिद्धी, ३० वर्षे शैक्षणिक क्षेत्रांत प्राध्यापक, प्राचार्य आणि संचालक म्हणून योगदान, ३५ वर्षे वैविध्यपूर्ण व्यवसायातील अनुभव, निरनिराळ्या विद्याशाखांमधून एकूण २८ पदवी व पदव्योत्तर शिक्षण तसेच २ विषयांमध्ये पी. एच. डी. (मानसशास्त्र व व्यवस्थापनशास्त्र), सद्यस्थितीत तिसऱ्या पी. एच. डी. चे (आध्यात्म विषयांत) काम सुरु.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..