भारत इस्राईल सामरिक – संरक्षण सहकार्य अतिमहत्वाचे

दिल्ली आणि आग्य्राला भेट दिल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आपल्या ऐतिहासिक भारत दौर्‍याच्या तिसर्‍या टप्प्यात आज गुजरातची राजधानी गांधीनगरला भेट देत पंतप्रधान मोदी त्यांच्यासोबत भव्य रोड शो केला.शेती, पाणी आणि नव-उद्यमी उद्योजकता हे विषय नेतान्याहूंच्या कार्यक्रम पत्रिकेवर होते. मुंबईत आघाडीच्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या अध्यक्षांसोबत चर्चा, सुमारे १३० इस्रायली आणि २५० भारतीय उद्योजकांसमोर भाषण, आणि शेवटी ‘शालोमबॉलिवूड’ या कार्यक्रमाद्वारे सिनेसृष्टीतील आघाडीच्या कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शकांना एका सांस्कृतिक कार्यक्रमात इस्रायलला यायचे निमंत्रण देऊन ते जेरुसलेमकडे मार्गस्थ होतील.

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यनाहू १४ जानेवारीपासून चार दिवसांच्या भारत आहेत.2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात आपल्या आई-वडिलांना गमावणारा पीडित इस्रायली मुलगा मोशे प्रथमच 15 जानेवारीला  भारतात आला होता.८ दहशतवाद्यांना सैन्याच्या एनएसजी मध्ये असलेल्या कमांडोनी ठार केले होते.त्या करता मेजर उन्नीक्रिष्णन हवालदार गजेन्द्रासिंग यांना मरणोत्तर अशोक चक्र देण्यात आले होते.

इस्राईलशी संबंध सुधारणे खूप महत्त्वाचे

माजी सरकारच्या निष्क़्रिय व भित्र्या धोरणांमुळे इस्राईलशी भारताचे संबंध जवळजवळ संपुष्टात आले होते.इस्राईलशी संबंध सुधारण्याकरिता कधीच पुढाकार घेतला नाही. कारण यामुळे आपले अरब राष्ट्रांशी संबंध खराब होतील असे त्यांना वाटत असे. भारताचे तत्कालीन संरक्षणमंत्री श्री ए.के. अँटोनी हे इस्राईलला जायला निघाले होते. पण भारतातील काही पक्षांनी(मुस्लिम लीग/डावे पक्ष/अरबप्रेमी) त्यावर आपली नापसंती दर्शवल्यामुळे ए. के. अँटोनी यांनी आपली इस्राईल भेट शेवटच्या क्षणी रद्द केली.

भारताच्या सामरिक विकासासाठी इस्राईल हा खूप महत्त्वाचा देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्राईलशी संबध्द विकसित करण्याचा धाडसी निर्णय घेतला. यापुढे भारत इस्राईल संबंध आणखी चांगले करण्याकरिता वर्षातून एक तरी भेट व्हायला हवी. यामुळे वर्षभरात केल्या गेलेल्या करारांवर चांगली अंमलबजावणी होते. इस्राईलशी संबंध सुधारणे खूप महत्त्वाचे आहेत.पहिले कारण सामरिक व संरक्षणविषयक संबंध, दुसरे कारण  आर्थिक संबंध आणि तिसरे कारण  तंत्रज्ञानविषयक संबंध.

गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत भारताच्या पंतप्रधानांनी इस्रायलला पहिल्यांदाच भेट दिली, तर इस्रायलच्या पंतप्रधानांनी केवळ दुसर्‍यांदा वेळा. दोन देशांचे राष्ट्रपती, कृषिमंत्री, भारताच्या विदेश मंत्री आणि इस्रायलचे संरक्षणमंत्री यांच्या जोडीला वरिष्ठ शासकीय अधिकारी, उद्योजक आणि विद्यार्थ्यांच्या भेटी नित्याच्या झाल्या आहेत. आज इस्रायलमधील परदेशी विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक, १० टक्के भारतीय असून आशियात सर्वाधिक पर्यटक भारतातूनच भेट देतात. आज भारत-इस्रायल यांच्या संयुक्त भागीदारीतून उभ्या राहात असलेल्या ३५ कृषी गुणवत्ता केंद्रांपैकी २० पूर्ण कार्यक्षमतेने काम करत असून आघाडीच्या भारतीय कंपन्यांनी इस्रायली संशोधन आणि स्टार्ट अप कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे. भारताच्या ’मेक इन इंडिया’ या धोरणाला इस्रायलने ’मेक विथ इंडिया’ची जोड दिली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून एकत्र काम करताना उद्भवणार्या अडचणींवर मार्ग कसा काढायचा, यावर भर राहिला आहे. थेट विमानसेवा सुरू करण्यामागच्या अडचणी; हिंदी चित्रपट उद्योगाला आकृष्ट करण्यासाठी आवश्यक असलेल्या सवलती असोत,या समस्यांच्या सोडवणुकीमुळे द्विपक्षीय संबंधांना एक नवीन ऊर्जा प्राप्त होऊ शकेल.

इस्राईलमुळे भारतीय  संरक्षणसामर्थ वाढेल

सध्या संरक्षणक्षेत्रात इस्राईल खूप पुढे आहे. त्यामुळे इस्राईलकडून संरक्षणाचे आधुनिक तंत्रज्ञान भारताला मिळू शकते. इस्राईलला चारी बाजूंनी अरब राष्ट्रांनी वेढलेले आहे. पण त्यांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्या देशाचे खूप समर्थपणे रक्षण केले आहे. भारतालाही बाह्य/आंतरिक सुरक्षेचे अनेक धोके आहेत. यामध्ये दहशतवाद,बंगलादेशी घुसखोरी, माओवाद इत्यादींचा समावेश होतो. या सर्व धोक्यांना तोंड देण्याकरीता इस्राईलने त्यांच्या देशात रडार, आकाशातून टेहळणी करण्यासाठीची साधने, आधुनिक हेलिकॉप्टर्स इत्यादी तंत्रज्ञान विकसित केले आहे. हे सर्व भारताला इस्राईलकडून मिळाल्यास या टेहळणीच्या साधनांमुळे भारत आपल्या देशाच्या शत्रूंवर लक्ष ठेवू शकतो.

सायबर गुन्ह्यांविरुद्ध आक्रमक कारवाई जरुरी

याशिवाय सायबर सुरक्षेच्या बाबतीत इस्राईल खूप पुढे आहे. आज भारतातील वाढते सायबर आक्रमण/गुन्हे पाहता भारतालाही या सायबर सुरक्षेची खूप गरज आहे. आज अनेक अतिरेकी हे ई-मेल व एसएमएस या तंत्रज्ञानाचा वापर आपल्या काळ्या कारवायांसाठी करतात.सोशल मीडियावरील आणि यूट्युबवर टाकलेल्या अनेक भडकाऊ व्हीडिओ व छायाचित्रांमुळे भारतात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला आहे. आपण इस्राईलची मदत घेऊन या सर्व सायबर गुन्ह्यांवर लक्ष ठेवून यांच्याविरुद्ध आक्रमक कारवाई करू शकतो.

याशिवाय इस्राईलचे सैन्य हे कायम लढत असते, त्यामुळे त्यांच्या लढाईचे प्रशिक्षण देण्याच्या पद्धतीत वेळोवेळी सुधारणा होत जाते.यामुळे भारताला आपले लष्कर, गुप्तचर संघटना, अंतर्गत सुरक्षात्मक संघटना यांचे नुतनीकरण,आधुनिकीकरण व विकास करणे लवकर शक्य होईल.

इस्रायलने लावलेल्या शोधांमध्ये, त्याने विकसित केलेल्या तंत्रज्ञानामध्ये भारतातील अनेक समस्यांची सोडवणूक करण्याची क्षमता आहे.मात्र जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान असले तरी अमेरिका, चीनप्रमाणे इस्रायल आपले तंत्रज्ञान पुढे रेटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक करू शकत नाही. बिग डेटा, रोबोटिक्स आणि ड्रोनचा शेतीसह ग्रामीण आणि शहरी विकासातील वापर, संगणक चलित आणि इंटरनेटने जोडलेले वाहन उद्योग, प्रत्येक गोष्टीत इंटरनेट आणि समाजमाध्यमांनी शिरकाव केल्याने सायबर सुरक्षेची वाढलेली व्याप्ती, ब्लॉक चेनसारख्या तंत्रज्ञानाचा डिजिटल चॅनल ते न्यायव्यवस्थेतील वापर अशा अनेक क्षेत्रांत परस्पर सहकार्याला पर्याय नाही.

`मोसाद’शी संबंध वाढवा

इस्राईलची ‘मोसाद ही जगातील सर्वोत्कृष्ट गुप्तहेर संस्थांपैकी एक समजली जाते. भारताच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी ‘इंटेलिजन्स ब्युरो व बाह्य सुरक्षेसाठी ‘रॉ अर्थात ‘रीसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंग  ही गुप्तचर संघटनेवर आहे. भारतीय गुप्तचर संघटना व ‘मोसाद यांच्यातील संबंध वाढले, तर भारतातील गुप्तचर संघटनांचा दर्जा आणखी सुधारू शकतो. यामुळे भारतातील अंतर्गत सुरक्षेचे धोकेही कमी होऊ शकतात. ‘मोसाद इस्राईलच्या शत्रूंवर त्यांच्या राष्ट्रात जाऊनही हल्ले करते. भारताचेही अनेक शत्रू भारताच्या बाहेर अनेक देशांमध्ये पसरले आहेत. इस्राईलची मदत घेऊन अशाप्रकारच्या शत्रूंना शोधून काढणे व त्यांना भारताच्या बाहेरसुध्दा(जसे दाऊद इब्राहिमला पकडणे) नेस्तनाबूत करणे शक्य होईल.

वाळवंटी प्रदेशांमध्ये शेतीविकास

आज इस्राईलमधील शेती तंत्रज्ञानाचा भारताला खूप फायदा होणार आहे. इस्राईलची शेती करण्याची पद्धत खूपच सरस आहे. इस्राईलकडून हे तंत्रज्ञान भारतात आणल्यास भारताला राजस्थान व गुजरातमधील वाळवंटी प्रदेशांमध्येही शेती करता येईल. इस्राईल हा वाळवंटी प्रदेश असल्यामुळे तिथे पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. त्यामुळेच इस्राईलने आपल्या देशात कमीत कमी पाणी वापरून शेती करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. आपल्या देशात वाळवंटी प्रदेशांशिवायही अनेक प्रदेशांमध्ये(मराठवाडा भागातही) पाण्याचा तुटवडा आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून कमीत कमी पाण्यात शेती कशी करावी. कारखान्यांचा पाणी वापर कसा करावा, शहरांमध्ये वापरल्या गेलेल्या पाण्याचा पुनर्वापर कसा करायचा याबद्दलची अमाप माहिती व तंत्रज्ञान इस्राईलकडे आहे. या माहितीचा व तंत्रज्ञानाचा भारतासाठी उपयोग करून घेता येईल.

भारत, इस्राईल यांच्यामधील व्यापार ६ बिलियन डॉलर्स  इतका आहे. हा व्यापार दुप्पट किंवा तिप्पट करता येइल. २०२० पर्यंत हा व्यापार जर १० बिलियन डॉलर्स इतका झाला, तर भारताला आर्थिकदृष्ट्या याचा मोठा फायदा होऊ शकतो.

गेल्या 3 वर्षांत द्विपक्षीय व्यापारात वाढ आणी संरक्षण क्षेत्रातील सहकार्य अधिकाधिक मजबूत झाले आहेत.या संबंधांवर हिरे, ठिबक सिंचन या क्षेत्रांचा प्रचंड प्रभाव आहे. गटशेतीच्या माध्यमातून एकात्मिक प्रादेशिक विकास, पुनर्चक्रीकरण केलेल्या पाण्याचा शेतीसाठी वापर, ग्रीड पद्धतीने पाणीपुरवठा, सायबर सुरक्षा, शिक्षण, स्टार्ट-अप कंपन्या आणि त्यांना भांडवल पुरवठा करणार्या वेंचर फंडांतील सहकार्य, स्मार्ट शहरं, चालकरहित वाहनं, सिनेमा आणि मनोरंजन, स्वच्छ ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता असे नवनवीन आयाम प्राप्त होणार आहेत.

भारताने आपले राष्ट्रहित लक्षात घेऊन येणार्‍या काळात इस्राईलशी चांगले संबंध प्रस्थापित करून देशाचा सामरिक, आर्थिक व तांत्रिक अशा तिन्ही बाजू भक्कम कराव्यात. याकरीता इस्राईल हा भारताचा चांगला मित्र होऊ शकतो व हे सुधारलेले संबंध भारताच्या विकासात खूप हातभार लावतील.

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)

 ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 190 लेख
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

p-2078-IT-policy-300

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...
p-2104-muktagiri-300

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...
p-2060-mahalaxmin-temple-01-300

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...
p-2090-ambejogai-city-300

अंबेजोगाई

अंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...

Loading…