नवीन लेखन...

भारताचा मलेशिया विरुध्द व्यापार युध्दाचा वापर

भारताविरोधात सतत गरळ ओकणारे मलेशियाचे पंतप्रधान महातिर मोहम्मद यांना आता उपरती झाली आहे. भारताने मलेशियाच्या पाम तेलावर टाकलेल्या बहिष्काराला प्रत्युत्तर म्हणून आपण काहीही करू शकत नाही. भारतासारख्या विशाल अर्थव्यवस्थेसमोर मलेशिया कुठेही टिकणार नाही. त्यामुळे आपण प्रत्युतरादाखल कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही. आपल्याला यातून बाहेर येण्याचा मार्ग शोधावा लागेल, असं 2० जानेवारीला ते म्हणाले.

भारत खाद्य तेलाचा सर्वात मोठा आयातदार आहे, तर मलेशिया भारतासाठी खाद्य तेलाचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. पण मलेशियाच्या पंतप्रधानांनी जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर भारतावर टीका केली होती. प्रत्युत्तर म्हणून भारताने मलेशियाकडून आयात होणारं पाम तेल रोखलं होतं. आयात बंद केल्यामुळे मलेशियाच्या अर्थव्यवस्थेलाही हादरा बसला आहे.

मलेशिया हा मुस्लीम बहुल देश आहे. भारतातील नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरही मलेशियाच्या पंतप्रधानांनी टीका केली होती. गेल्या पाच वर्षांपासून भारत मलेशियाचा खाद्य तेलाचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. परिणामी गेल्या आठवड्यात मलेशियन खाद्य तेलाचे भविष्य दर १० टक्क्यांनी घसरले, जी गेल्या ११ वर्षातील सर्वात मोठी घसरण आहे.

मलेशिया फक्त भारताविरोधातील वक्तव्यापुरताच मर्यादित नाही. वादग्रस्त मुस्लीम धर्मगुरू झाकीर नाईकलाही मलेशियाने शरण दिली आहे. झाकीर नाईकचं स्थायी नागरिकत्व मागे घेण्याची विनंती भारताने केली होती, जी मलेशियाने फेटाळून लावली. यामुळेही भारत नाराज आहे. गेल्या तीन वर्षांपासून तो फरार असून मलेशियात स्थायिक आहे.

कलम ३७०च्या रद्दीकरणानंतर पाकिस्तानला साथ

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने ०८ जानेवारीला सूचना जारी करत मलेशियातून केल्या जाणार्‍या रिफाइंड पाम तेलाच्या आयातीला ‘मुक्त’ ऐवजी ‘वर्जित’ श्रेणीत वर्ग केले.केंद्राच्या नव्या निर्णयामुळे मलेशियातून भारतात होणारी पाम तेलाची निर्यात संपूर्णपणे थांबणार आहे. भारताच्या या पावलाने मलेशियन अर्थव्यवस्था आणि तिथल्या पाम तेल उत्पादक व रिफायनरींना मोठा आर्थिक फटका बसेल.

गेल्यावर्षी ५ ऑगस्टला सरकारने कलम ३७० रद्द केले. मलेशियाचे पंतप्रधान महाथिर मोहम्मद भारताविरोधात बोलले.“भारताने काश्मीरवर बेकायदेशीर कब्जा केला, भारताचा काश्मीरवरील हक्क अधिकृत नाही,” असे महाथिर म्हणाले.

भारताची मलेशियाला योग्य शब्दांत समज

भारतीय संसदेने नुकताच पाकिस्तान, अफगाणिस्तान व बांगलादेशातील धर्माच्या आधारे भेदभावाची, शिकार झालेल्या हिंदू व अन्य अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्याचा निर्णय घेतला. लगेचच मलेशियाचे पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांनी काश्मीरप्रमाणे या मुद्द्यावरही तोंड उघडले व भारतातील मुस्लिमांची सुरक्षा धोक्यात आल्याचे ते म्हणाले.

भारताने त्यावरही आक्षेप घेतला. मात्र, त्याचा मलेशियाच्या पंतप्रधानांनावर काही असर झाला नाही.

गेल्या वर्षी मे महिन्यात सत्तांतर होऊन ९४ वर्षांचे महातिर मोहम्मद पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान झाले. महातिर पंतप्रधान झाल्याझाल्या नरेंद्र मोदींनी मलेशियाला धावती भेट देऊन ताणले गेलेले संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले होते.मात्र तरीही मलेशियाने भारतविरुध्द भुमिका घेतली.

पाम तेलाची आयात आता इंडोनेशिया मधुन

जगातील पाम तेलाचे सर्वाधिक उत्पादन घेणार्‍या देशांत इंडोनेशिया आणि मलेशियाचा समावेश होतो. इंडोनेशिया दरवर्षी ४.३ कोटी टन पाम तेल उत्पादित करतो, तर मलेशिया १.९ कोटी टन. मलेशियाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात पाम तेल व्यापाराचा वाटा २.५ टक्के इतका तर निर्यातीतला वाटा ४.५ टक्के इतका आहे. भारताला दरवर्षी ९० लाख टन पाम तेलाची आवश्यकता असते. त्यापैकी ७० टक्के आयात आपण इंडोनेशियाकडून करतो, तर ३० टक्के आयात मलेशियातून. आता मात्र भारत सरकारच्या निर्णयामुळे मलेशियातून पाम तेलाची आयात केली जाणार नाही,  त्याचा विपरित परिणाम मलेशियावरच होईल.  इंडोनेशियादेखील भारताला अधिकाधिक तेलविक्री करू इच्छितो.

मलेशियाला भारताने व्यापारातून दिला झटका

भारत जगामध्ये पाम तेलाची सर्वाधिक खरेदी करणारा देश आहे. भारत मलेशियाऐवजी इंडोनेशिया आणि युक्रेनकडून खाद्यतेलाची खरेदी वाढवणार आहे. एखाद्या देशाच्या न पटणार्‍या राजकीय भूमिकेवर भारताने प्रथमच व्यापाराच्या माध्यमातून आपली नाराजी दाखवून दिली आहे. सध्या अमेरिका आणि चीनमध्येसुद्धा व्यापारयुद्ध सुरू आहे. जिथे व्यापाराचा शस्त्रासारखा वापर होत आहे. पाम तेल हे मलेशियाचे कृषी निर्यातीचे सर्वात मोठे उत्पादन आहे. भारताने जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान मलेशियाकडून ३.९ दशलक्ष टन म्हणजे २ अब्ज डॉलर पाम तेलाची खरेदी केली.

मलेशिया विरुद्ध पर्यटन युद्ध

भारतातून अनेक भारतीय पर्यटक पर्यटनासाठी मलेशिया, सिंगापूर आणि दक्षिण पूर्वेकडील विविध देशात जातात. गेल्या वर्षी तीन कोटींहून अधिक पर्यटक भारतातून परदेशात पर्यटनास गेले होते, जर मलेशियाला धडा शिकवायचा असेल तर भारतीयांनी कुठल्याही इतर देशांत पर्यटनाला जाण्यावेळी मलेशियन एअरलाईन्सने जाऊ नये किंवा मलेशियाच्या क्वालांलपूरच्या विमानतळावरून उड्डाण करू नये.

मलेशियाचे पंतप्रधान महातिर यांनी संयुक्त राष्ट्र परिषदेत भाषण करताना पाकिस्तानची बाजू घेत काश्मीरविषयी जे वक्तव्य केले, त्यानंतर ट्विटर आणि इतर सोशल मीडियावर भारतीयांनी एकमेकांना टॅग करून आवाहन केले की, मलेशिया जोपर्यंत त्यांचे मत बदलत नाही, तोपर्यंत मलेशियात पर्यटनाला किंवा कोणत्याही कारणास्तव भेट देऊ नये.

मलेशियाचे मोठे आर्थिक नुकसान होणार

भारत एक प्रचंड मोठी आर्थिक व्यापारी बाजारपेठ आहे.  त्यामुळे भारताने मलेशियाकडून पाम तेल आयात करणे बंद केले, तर मलेशियाला मोठा धक्का बसणार आहे. भारताला खुश करण्यासाठी मलेशिया असेही म्हटले आहे की, भारताकडून मलेशियात येणार्‍या वस्तूंची आयात वाढावी यासाठी, भारताकडून साखर आणि म्हशीचे मांस विकत घ्यायला मलेशिया तयार आहे, जेणेकरून मलेशिया-भारत यांच्या व्यापारात समतोल निर्माण होईल. याचाच अर्थ असा की, मलेशियन सरकारला काश्मीरविषयी घेतलेल्या भूमिकेमुळे निर्माण झालेल्या वादाची कल्पना आलेली आहे.

अजून काय करावे?

भारताने आपल्या प्रचंड अर्थव्यवस्थेचा वापर अशा राष्ट्रांवर करावा, जे काश्मीरप्रश्नाविषयी भारतविरोधी भूमिका घेतात. गरज पडली तर व्यापारयुद्धाची तीव्रता वाढवावी लागेल. त्यामुळे मलेशियाला काश्मीरविषयी भूमिका बदलून भारताच्या बाजूने बोलावे लागेल, अशाच प्रकारच्या व्यापार अस्त्राचा वापर करून जी राष्ट्रे भारताच्या हिताविरुद्ध वागताहेत, त्यांना वठणीवर आणू शकतो. व्यापार अस्त्राचा वापर भारताने पहिल्यांदाच केलेला आहे. भारत सरकारने उचललेल्या या पावलाचे नक्कीच कौतुक केले पाहिजे.

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..