नवीन लेखन...

हुशार राजू

राजू नावाचा एक छोटा मुलगा. चुणचुणीत आणि गोड स्वभावाचा. सकाळी लवकर उठायचा. आंघोळ करायचा. आई वडील आणि घरातील मोठ्या माणसांच्या पायी डोके ठेवायचा. नम्रपणा हा त्यांचा विशेष गुण होता. अभ्यासातही हुशार होता. मित्रांशी सहकार्याने वागायचा. घरच्या कामाची त्याला खूप आवड होती.

त्यांचे वडील त्याला खूप जीव लावायचे. सकाळी शाळेत सोडायचे.घरी आला की नाही ते पहायचे. घरी दोन एकर जमीन होती. त्यातच हे कुटुंब राबायचे. जगण्याएवढी सालचंदी व्हायची. कष्ट करून , मोलमजुरी करून पोरांचे शिक्षण चालू होते. राजूला थोडेफार समजायला लागले. सुट्टी असली की तो आई-वडिलांना कामात मदत करत असे. वडिलांसाठी रानात भाकरी घेऊन जाई. शेळ्या सोडून चालायला नेई. कधीकधी सरपण, गवर्‍या वेचून आणी. कळशीने घरचे पाणी भरी.जमेल तशी मदत करी.

यासाली भयंकर दुष्काळ पडला. कोणत्याच विहीर, तलावात ,हापशाला पाणी राहीले नाही. पाणी नाही म्हणून शेती पिकेना. त्यामुळे रोजगार मिळेना.ऊसतोड, वीटभट्टी कारखाना अशा ठिकाणी लोक कामाला जाऊ लागली. काही हमालीला जात होती.काही परराज्यात जात होती. राजूच्या वडिलांनी सावकाराकडून काही कर्ज घेतले.जमीन काही पिकेना. कर्ज काही फिटेना.घेतलेले कर्ज परत करावेच लागणार होते. ते परत द्यायला काही मार्ग सापडत नव्हता. तेवढ्यात गाडीवरून पडून त्यांचा हात मोडला. राजूचे वडील अधू झाले होते. काम सुटले. खाणारी तोंडे वाढली. राजूला शाळा सोडावी लागली. परिस्थिती बिकट झाली. गुरूजी घरी यायचे. ‘ पोराला शाळेत पाठवा. हजेरी कमी पडतीय.

परीक्षा जवळ आलीय.’ असं म्हणायचे. पण नाईलाज झाला होता.पोटापाण्याचा प्रश्न होता. एका रात्री आईवडीलांचे भांडण झाले. त्याचा अर्थ राजूला काही समजला नाही . पण वडील रागाने निघुन गेले. त्यांच्या हातात कसलातरी दोर होता. राजूच्या हे लक्षात आले. त्याच्या शाळेत वर्तमानपत्राचे वाचन व्हायचे . त्यात एक बातमी हमखास असायची. ‘कर्जाला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या.’ सर म्हणायचे ” ती नका वाचू. दुसरी वाचा चांगली.” राजूच्या मनात पाल चुकचुकली.

तो ताडकन उठला. अंधारात पळाला. दगडधोंडे बघितले नाही की काट्याकुट्या. बापाला गाठलच. वडीलांसमोर धाय मोकलून रडायला लागला. विनवणी करू लागला. त्यांच्या उरात माया उत्पन्न झाली. तोपर्यंत चारदोन माणसं जमा झाली. राजूच्या वडिलांनी मनातील विचार काढून टाकले. ते घरी आले. राजूला कडकडून मिठी मारली.

विठ्ठल जाधव,शिरूरकासार, जि.बीड
सं.९४२१४४२९९५ (दिव्यमराठी)

Avatar
About विठ्ठल जाधव 57 Articles
श्री विट्ठल जाधव हे अनेक मराठी पुस्तकांचे लेखक आहेत. ते बीड जिल्ह्यातील शिरुरकासार येथील रहिवासी असून पुण्यनगरी आणि इतर वृत्तपत्रांमध्ये नियमित लेखन करत असतात. त्यांना साहित्यविषयक अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..