नवीन लेखन...

हम सब ‘चोर’ है

साक्षात कृष्ण भगवान देखील लहानपणी ‘माखनचोर’ होते, मग सर्वसामान्य माणूस जर ‘चोर’ असेल तर त्यात नवल ते काय? फक्त चोरीचे प्रकार वेगवेगळे, उद्देश मात्र चोरीचाच. प्रत्येक चोरीला शासन होतंच असं नाही, काही चोऱ्यांकडे कानाडोळा केला जातो. काही चोरीमुळे बदनामी होते तर काही चोरीसाठी तुरुंगाची हवाही खावी लागते.

काही चोऱ्यांचं वैशिष्ट्यपूर्ण नामकरण केलं जातं, जसं घोटाळा, फसवणूक, अफरातफर, भेसळ, बळजबरी, साठेबाजी, सायबर क्राईम, इत्यादी.

माणूस जन्माला आल्यानंतर तो बाळ असताना, लाडाने त्याची आजीच म्हणते, ‘अरे लबाडा, कसा हसतोय माझ्याकडे पाहून.’ यातील लबाडा हा शब्द चोराचं ‘सामान्यरुप’ आहे, हे लक्षात घ्यावं.

मूल मोठं होतं. आईंनं स्वयंपाक घरातील डब्यात ठेवलेला खाऊ, तिच्या पश्चात डबा शोधून ‘गट्टम’ करतं. ही चोरी आई ओळखते, मात्र त्याला प्रेमापोटी शिक्षा देत नाही. ते अजून मोठं होतं. त्याला शाळेत घालताना पूर्वी त्याचे वडील एक वर्ष चोरायचे, म्हणजे जन्मतारीख सांगताना त्यांच्या जन्माच्या पुढच्या वर्षांतील १ जून सांगायचे. मग ते शाळेत जाऊ लागतं. शाळेत परीक्षेच्या वेळी एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर पुढे बसलेल्या मित्राला उत्तर दाखवायला सांगून त्या उत्तराची काॅपी करतं, ही एक प्रकारची ज्ञानाची चोरीच असते. पकडलं गेलं, तर हातात शाळेचा दाखलाच मिळतो.

समाजातील प्रत्येक घटक त्याच्या कुवतीनुसार चोरी करतच असतो. एखादा व्यापारी साखरेचे भाव वाढणार असतील तर आपल्याकडील स्टाॅक संपला आहे असे सांगून, दर वाढल्यानंतर चढ्या दराने विक्री करुन जादा नफा मिळवतो, ही एक प्रकारची चोरीच असते. औषध दुकानदार महत्वाची इंजेक्शनं कृत्रिम तुटवडा भासवून अवाजवी किंमतीला ती विकतो, ही लुबाडणूक देखील एक प्रकारची चोरीच आहे..

आमच्या पावन मारुती चौकात एक रद्दीवाला होता, तो रद्दीचं वजन करताना तागड्याला अंगठा मारायचा, ज्यावेळी आमचं लक्ष तराजूच्या काट्याकडे असायचं. ही एक प्रकारची वजनातली चोरीच असते. मंडईत देखील भाजी देताना भाजीवाले हातचलाखी करतात किंवा त्यांच्याकडील वजन हे कापडात बांधलेलं असतं. आपण त्या वजनावर विश्र्वास ठेवून त्याच्या लबाडीला उत्तेजन देतो.

दूधाचे रतीब घालणारा गवळी दूधात पाणी घातल्याशिवाय दूध विक्री करुच शकत नाही. एकवेळ पाणी घालणे परवडले, मात्र केमिकल्स मिसळून कृत्रिम दूध देत असेल तर अशा चोरीला कठोरच शासन करायला हवे.

मिठाईवाले हलक्या प्रतीचा खवा तयार करुन त्याची मिठाई तयार करुन विकतात. ते खाल्ल्यानंतर विषबाधेच्या बातम्या वर्तमानपत्रात झळकतात. त्यांच्यावर कडक कारवाई न झाल्यास पुन्हा पुन्हा असे गुन्हे घडतच राहतात.

दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची ऐनवेळी चोरी झाल्याचे उघडकीस येते, त्वरीत त्या विषयाची परीक्षा रद्द होते. ज्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केलेला असतो, त्यांना विनाकारण मनस्ताप होतो.

पेट्रोल पंपावर आपण गाडीत पेट्रोल भरायला जातो. आपलं लक्षं लिटरच्या आकड्यांवर केंद्रीत असतं, पेट्रोल भरणारा खटका कमी जास्त दाबून ते टाकीत कसं कमी जाईल हे पाहतो. त्यांनी असे कमी पेट्रोल देऊन मालकाचा फायदा केल्याबद्दल मालक त्याला रोज बक्षिशी देतो. शिवाय पेट्रोलमध्ये भेसळही केलेली असते.

बिल्डरवर विश्र्वास ठेवून आपण फ्लॅट खरेदी करतो. त्या बिल्डींगचे बांधकाम करताना जादा पैसे लाटण्यासाठी मध्यस्थांनी जर सिमेंट, लोखंड, वाळूमध्ये तडजोड केली असेल तर ते बांधकाम टिकू शकत नाही. परिणामी इमारत कोसळून जिवीतहानी होऊ शकते. हेच प्रकार सार्वजनिक पूल बांधतानाही होतात.

चित्रपट निर्मिती क्षेत्रात चित्रपटाच्या मूळ लेखकाच्या कथानकाची चोरी करुन निर्मिती होते, मूळ लेखकाने कोर्टकचेरी केली तरी त्याला न्याय मिळतोच, असं होतं नाही.

पूर्वी चित्रपट प्रदर्शित होण्याआधी त्याची कॅसेट्स किंवा सीडी बाजारात सहज मिळायची. ही पायरसी म्हणजे एक प्रकारची चोरीच आहे. करोडो रुपयांची गुंतवणूक केलेला चित्रपट त्यामुळे कवडीमोल होत असे.

पुस्तकांची देखील पायरसी होते. गाजलेली पुस्तके हलक्या प्रतीची, लाखोंनी छापून बाजारात विकली जातात. त्यांच्यावर कारवाई होऊनही, ही विक्री चालूच असते.

डुप्लिकेट म्हणजे नक्कल! एखादी ओरिजनल वस्तूसारखी सही सही डुप्लिकेट वस्तू मुंबईत उल्हासनगरमध्ये हमखास तयार होते. पूर्वी सोनी कंपनीच्या ऑडियो कॅसेट्स मेड इन जपान ऐवजी ‘उल्हासनगर’च्या मिळत असतं.तसंच पुण्यात पिंपरीच्या मार्केटमध्येही वस्तू मिळतात.

पूर्वी ‘मेड इन दिल्ली’ म्हटलं की, फसवणूक असायची. स्वस्तात फ्रिज म्हणून ‘व्हीपीपी’ने थंडगार पाण्याच्या माठाचे पार्सल दिल्लीवरुन आलेलं होतं. बरं, यांना पत्रव्यवहार करुन त्याचं कधीही उत्तर मिळत नसतं.

पूर्वी पुणे-मुंबईच्या रेल्वे प्रवासात काही रिकामटेकडे जनरल डब्यामध्ये सीट पकडून ठेवायचे व गाडी प्लॅटफॉर्मला लागली की, पाच दहा रुपये घेऊन बसायला सीट द्यायचे. ही देखील एक प्रकारची प्रवाशांच्या सीटच्या हक्काची चोरीच होती.

कधी हायवेवरती मालवाहू ट्रकला अपघात होतो, पोलीसांच्या भीतीने ड्रायव्हर पळून जातो. हायवेच्या शेजारील गावातील जनता ट्रकमधील मालाची चोरी करुन पळून जाते. एकदा असाच पेट्रोलचा ट्रक रस्त्यावर कलंडला होता, गावकऱ्यांनी पेट्रोल हाताशी लागेल त्या भांड्यातून पळवून नेलं. या धावपळीत कुणीतरी काडेपेटी काढून बिडी पेटवली. आख्खं गाव जळून गेलं.

एकूण काय, चोरीचा मोह टाळलेला बरा. जे आहे त्यात समाधान मानावे. ठेविलें अनंते, तैसेचि रहावे.

© सुरेश नावडकर

मोबाईल ९७३००३४२८४

२७-५-२१.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..