नवीन लेखन...

कोकणभूमीतील घरगुती व्यवसाय

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुसंख्य जनता मुंबईच्या चाकरमान्यावर अवलंबून असते. सुशिक्षिततेचे प्रमाण वाढल्याने या परिस्थितीत काही प्रमाणात फरक होताना दिसतो आहे. या सर्व परिस्थितीत सुधारणा व्हावी अशी नुसती अपेक्षा न करता त्यासाठी झटून काम करणारी कार्यकर्त्यांची फळी निर्माण झाली पाहिजे.


रत्नगिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आर्थिकविकास हा पर्यटन, फलोत्पादन आणि त्यावर आधारीत प्रक्रिया उद्योग याच्यातून होऊ शकतो असे सातत्याने सांगितले जाते. त्याचा एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन, तर रत्नागिरी जिल्हा फलोत्पादन म्हणून शासनाने जाहीर केलेले आहेत. पण त्या उद्योगांना लागणाऱ्या मूळ पायाभूत सुविधा म्हणाव्या तशा विकसित झालेल्या नाहीत. पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा वेग संथ आहे.  या जोडीला महिला अल्प बचत निर्माण करून ग्रामीण भागात महिला बचत गट स्थापन केले जात आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हे मिळून किमान तीन हजाराचे आसपास अधिकृत-अनधिकृत महिला गट स्थापन झालेले आहेत. त्यापैकी प्रत्यक्षात किती गट कार्यरत आहेत? त्यात महिलांचा सहभागकिती आणि त्याची आर्थिक उन्नती किती झाली याचे सर्वेक्षण होऊन अभ्यास झाला पाहिजे. शासकीय अधिकारी नियमाचे बाहेर जाऊन काही करण्यास तयार नाहीत, तर लोकप्रतिनिधी त्यासाठी फार मोठ्या प्रमाणात काम करताना दिसत नाहीत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुसंख्य जनता मुंबईच्या चाकरमान्यावर अवलंबून असते. सुशिक्षिततेचे प्रमाण वाढल्याने या परिस्थितीत काही प्रमाणात फरक होताना दिसतो आहे. या सर्व परिस्थितीत सुधारणा व्हावी अशी नुसती अपेक्षा न करता त्यासाठी झटून काम करणारी कार्यकर्त्यांची फळी निर्माण झाली पाहिजे.

महिला सबली करणासाठी स्थापन होणारे अल्प बचत गट सर्वसाधारण चकली, कडबोळी, शेंगदाणा लाडू, मेतकूट, कोकम सरबत अशा पदार्थांची प्रामुख्याने उत्पादने केली जातात. पण त्या वस्तूच्या विक्रीसाठी मार्केटिंगची व्यवस्था नाही. तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या अन्न आणि प्रशासन खात्याचे नियम पाळून मालाची विक्री करणे छोट्या व्यावसायिकांना शक्य होत नाही. माल पॅकिंग ही त्यातील मोठी समस्या आहे.

अल्प बचत गटांना लागणारे भाग भांडवल, त्याची उपलब्धता ही समस्या सोडवण्यासाठी विविध बँक वा सहकारी संस्था पुढे येतात. त्या संस्थांची आर्थिकस्थिती लक्षात घेता उपलब्ध निधीच्या प्रमाणात निधी देतात. पण जोपर्यंत उत्पादित मालाची विक्री व्यवस्था सक्षम होत नाही, तोपर्यंत महिला गट सक्षम होण्याची प्रक्रिया संथच रहाणार आहे.

अशा या पार्श्वभूमीवर माजी आमदार गोविंदराव निकम यांनी महिलांसाठी महिलांनी चालवलेली व महिलाच ती चालवतील असे उद्दिष्ट ठेवून ‘रत्नागिरी जिल्हा महिला सहकारी पतसंस्था’ स्थापन केली. रौप्य महोत्सव साजरी करणारी ही संस्था महिलांचे सबली करणासाठी प्रयत्नशील आहे. रस्त्यावर भाजीविक्री करणाऱ्या महिलांपासून अशिक्षित बेकार  महिलेला आर्थिक पायावर उभे करण्याचे काम करत आहे. रत्नागिरी जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या या संस्थेची सभासदसंख्या 12462 आहे. त्याचे भांग भांडवल दोन कोटीचे आहे. सावर्डा, खेड, दापोली, लांजा आणि रत्नागिरी तालुक्यात कार्यरत आहे. मागणीप्रमाणे कर्ज देत असताना सुरू करण्यात येणारा व्यवसाय त्यांना फायदेशीर होईल का नाही याची तपासणी केली जाते. या पतसंस्थेने सुमारे चार कोटींच्यावर कर्जवाटप करून महिलांना सक्षम  केले आहे. घेतलेले कर्ज फेडण्याची वृत्ती महिलांची असल्याने ही नियंत्रित ठेवण्याचा संस्था प्रयत्न करत आहे. कुटीर उद्योग, लघु उद्योग, दुग्ध व्यवसाय, हॉटेल व्यवसाय, खानावळ, पानपट्टी असे उद्योग सुरू करण्यास प्राधान्य दिले जाते. नर्सरी हा एक व्यवसाय करण्यास महिला पुढे येतात. त्यासाठी त्यांना उत्तम मार्गदर्शन करण्यात येते. नारळाचे झाडापासून झाप तयार करून विक्री करण्याचा प्रयोगही यशस्वी झाला आहे. महिलांचे सबलीकरण करण्यासाठी प्रयत्नशील असलेली ही पतसंस्था आज जिल्ह्यात कार्यरत आहे.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिला मच्छिमार सहकारी संस्था आहेत. मासे खरेदी-विक्री, मासळी सुकवून त्याची विक्री करणे असे या संस्था काम करतात. या व्यवसायासाठी महिलांना भांडवलाची गरज असते. ते भांडवल पुरविण्याचे काम या संस्था करतात. या व्यवसायासाठी लागणारे साहित्य, बर्फ, पुरविण्याचे काम संस्था करते. कोळी समाज, अल्पसंख्याक महिला यामध्ये मोठ्या प्रमाणावर काम करतात. शासनाच्या त्याच्यासाठीच्या योजना आहेत. पण हा व्यवसायात काम करणाऱ्या महिलांचे आरोग्य हा एक प्रश्न आहे. विमा संरक्षणाबरोबर उत्तम आरोग्य सेवा शासनाने त्यांना उपलब्ध करून दिली पाहिजे. कोकणातील सहाही  जिल्ह्यात मच्छिमारी व्यवसायाची वार्षिक उलाढाल 1500  ते 2000 कोटीपर्यंतची आहे. त्यामध्ये कोळंबी प्रक्रिया आणि ती परदेशात पाठवली जाते. परदेशी चलनाचा काही भाग या व्यवसायाच्या विकासासाठी, या व्यवसायात असलेल्यांच्या कल्याणासाठी मिळावा अशी मागणी आहे. पण त्याचा पाठपुरावा या पाच जिल्ह्यातील निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधीनी केला पाहिजे. रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी त्यांच्या कार्यकाळात प्रयत्न केले होते. त्यानंतर प्रयत्न झाले नाहीत.

रत्नागिरी-देवगड भागात आंबा प्रक्रिया उद्योग छोट्या प्रमाणात आहेत. एखाद्या महिलेने तसा उद्योग चालविणे शक्य नाही. पण या उद्योगाला लगणारा मजूर ग्रामीण भागात मिळत असल्याने सिझनल त्यांना रोजगार मिळतो. तांत्रिक कामासाठी लागणाऱ्या कर्माचाऱ्यांमध्ये सुशिक्षित महिला मोठ्या प्रमाणावर आहेत. तसेच मांसाहारी, शाकाहारी भोजन उपलब्ध होण्यासाठी हातगाडीचा व्यवसाय करणाऱ्या महिला आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिलांचे प्रमाण जास्त असले तरी शिक्षणाचा प्रसार झाल्याने ग्रामीण भागातील मुलगी शिक्षण घेते. आपल्या कुवतीप्रमाणे एखादा कोर्स करून त्यातून रोजगार मिळवण्याचा प्रयत्न करते. हे तिचे प्रयत्न वैयक्तिक असतात. तिच्या आईचा पाठिंबा तिला असतो. अशा प्रकारे महिला सबलीकरणाचे प्रयत्न चालू असतात. आज रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक तंत्रज्ञानाचे  शिक्षण घेऊन इंटरनेट सेवा, झेरॉक्स,  मोबाईल सेवा उपलब्ध करून देणाऱ्या मुली आहेत. हे प्रयत्न मोठे नाहीत, पण या क्षेत्रात येणाऱ्या मुलींचे प्रमाण वाढत आहे याची कुठेतरी नोंद घ्यावीच लागेल. आपल्या बहिणीच्या शिक्षणासाठी इंटरनेटची गरज आहे हे लक्षात आल्यावर मालवण तालुक्यातील ग्रामीण भागातील भावाने तिला डोंगगरावर छोटी झोपडी बांधून दिली व ती अभ्यास करताना  जंगली प्राणी वा अन्य त्रास होऊ नये म्हणून तिचे संरक्षणही तो करत होता. यचा अर्थ ग्रामीण भागातही तांत्रिक शिक्षणाचा प्रभाव निर्माण झाला  असून ते घेण्यासाठी धडपड केली जाते. मुलींना सबलीकरणासाठी अशा शिक्षणाची गरज ग्रामीण भागात समजली आहे. त्याप्रमाणे प्रयत्न केले जातात. पर्यटन व्यवसाय वाढत आहे. त्यामुळे अशा सेवांची गरज आहे. अशी सेवा केंद्र ही काळाची गरज आहे. सेवा केंद्र कोणाचे यापेक्षा केंद्रात सेवा देण्यासाठी मुलींचा भरणा अधिक असतो हेही लक्षात घेण्याची गरज आहे. या व्यवसायाच्या वाढीसाठी इंटरनेट सेवा अधिक प्रभावी आणि सक्षम करण्यासाठी टेलिफोन खात्याने उपाय योजना केल्या पाहिजेत.

महिला बचत गटाबरोबर वैयक्तिक छोटे-मोठे (मध्यम) उद्योग करणाऱ्या महिला आहेत. माझ्या माहितीप्रमाणे मेघना करवडे या महिला कोकण रेल्वेच्या स्टॉलना आणि रत्नागिरी शहरातील काही हॉटेल व्यावसायिकांना तिखट शंकर पाळे, चकली असे पदार्थ बनवून विकतात. त्यांनी आपल्या गावातील पाच-सहा महिलांना रोजगार दिला आहे. दिवाळी फराळही त्या करून विकतात. यांत्रिकी नौका, यांत्रिकी छोटी होडी, होडी ने मासेमारी करणाऱ्यांना प्रतिवर्षी  परवाना द्यावा लागतो. त्यासाठी विविध फॉर्म भरून  कागदपत्र सादर करावी लागतात. या व्यावसायिकांची कागदपत्रे तयार करून शासनाच्या मत्स्य व्यवसायाच्या कार्यालयात सादर करण्याचे काम शालिनी मुसळे या महिला करतात. संगणक, ऑनलाईन, इंटरनेट या आधुनिक तंत्रांचा वापर करतात.

या कोकणातील महिला बचत गट, वैयक्तिक व्यवसाय करणाऱ्या महिला आपल्यापरीने सक्षम होण्याचा प्रयत्न करत आहेत.  पण त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. कारण ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत निवडून आलेले लोकप्रतिनिधी मनापासून लक्ष घालत नाहीत. यांच्या सहभागाशिवाय महिला सबलीकरणाचे कामाला गती येणार नाही याची सर्वांनीच नोंद घ्यावी.

–अरविंद कोकजे

(व्यास क्रिएशन्स च्या कोंकण प्रतिभा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..