नवीन लेखन...

‘हार्ट’फिल

यमराज आजच्या ‘डिस्पॅच’ यादीवर नजर टाकत होते. त्यांनी नाव वाचलं ‘शुभांगी’, वय पन्नास, घरात सासू-सासरे, नवरा व मुलगा. मृत्यूचं निमित्त. हार्ट ॲ‍टॅक. वेळ. मध्यरात्र.
शुभांगी दिवसभर घरकाम करुन थकलेली होती. तिचे पती शेखर, नुकतेच सरकारी नोकरीतून निवृत्त झाले होते. वयोवृद्ध सासू सासरे, हे तिचे आधारस्तंभ होते. मुलाचं काॅलेज शिक्षण पूर्ण होऊन तो चांगल्या कंपनीत नोकरीला लागला होता.
संध्याकाळी शुभांगी, थोडा दम खायला खुर्चीत बसली, तेव्हा तिच्या छातीत अचानक दुखू लागलं. चमक आली असेल, असं समजून तिने त्या दुखण्याकडे दुर्लक्ष केलं. तेवढ्यात शेखर आले. चौघांसाठी तिने चहा केला. चहा झाल्यावर ती रात्रीच्या स्वयंपाकाला लागली.
तिच्या मुलाच्या, साकेतच्या आवडीची ग्रेव्हीची मटर पनीरची भाजी तिनं करायला घेतली. रात्री साकेत आल्यावर, आठ वाजता सर्वांनी एकत्र जेवण केले. सगळं आटपेपर्यंत, रात्रीचे दहा वाजले. सासूबाईंना औषध व सासरेबुवांना गोळ्या देऊन झाल्या. साकेत त्याच्या रुममध्ये लॅपटाॅप घेऊन बसला. शेखरही झोपी गेले. शुभांगी स्वयंपाकघर आवरुन बेडवर पहुडली.
तासाभराने शुभांगीच्या छातीत, डाव्या बाजूला पुन्हा दुखू लागलं. तिनं शेखरला उठवलं. शेखरने तिला पेनकिलरची गोळी काढून दिली व ती घेऊन झोपायला सांगितले. गोळी घेऊन तिने कसाबसा एक तास काढला. पुन्हा छातीतून तीव्र कळ आल्यावर मात्र शुभांगी घाबरुन गेली. तिला श्र्वास घेतानाही त्रास होऊ लागला. घामाने अंगावरचे कपडे ओलेचिंब झाले. तिला समजून चुकले की, आपल्याला हार्ट ॲ‍टॅक आलेला आहे. आता काही खरं नाही. दरवाजात यमराज उभे होते. त्यांना शुभांगीची मनस्थिती दिसत होती व तिच्या मनातील विचारही कळत होते.
शुभांगीला आपण अचानकपणे या जगातून निघून जाणार ही कल्पनाच सहन होत नव्हती. तिची बरीचशी कामे व्हायची राहिली होती. ती विचार करु लागली. अजून साकेतचं लग्न व्हायचंय. नवीन सूनबाई येणार. तिला घरच्या रूढी, परंपरा समजून द्यायच्या आहेत. कुलदैवताचं दर्शन व नवस फेडायचा आहे. सासू-सासऱ्यांना घेऊन काशी यात्रा करायची आहे. शेखरला एकदा गावी पाठवून, शेतीची कामं पूर्ण करायची आहेत.
शुभांगीला घरातलीही राहून गेलेली कामं आठवायला लागली. सकाळी आणलेली पालक, मेथी निवडायची राहिलेली आहे. मटारच्या शेंगा सोलायच्या राहिलेल्या आहेत. शिवाय फ्रिजमधलं विरजणाचं पातेले भरुन गेलंय. खरंतर आजच ताक करुन लोणी काढून ठेवायला हवं होतं. मी आत्ता गेले तर लोक काय म्हणतील. सगळी कामं अर्धवटच सोडून गेली. शिवाय किराणा आणायचा राहून गेलाय. तांदूळ संपत आलेत.लाईटचं बिल भरायचं राहिलंय. सोसायटीचा मेंटेनन्स द्यायचा राहिलाय.
शुभांगी विचार करीत होती. मी जर अशीच गेले तर माझे दिवस करताना, नातेवाईक मंडळी माझ्या अशा वेंधळेपणाच्या वागण्याला हसतील. मला तर ते कधीच सहन होणार नाही.
यमराजला, त्याच्या वडिलांच्या काळात त्यांनी सांगितलेल्या गृहिणींच्या गोष्टींशी, शुभांगीच्या मनातील गोष्टी जुळत होत्या. अलीकडच्या काळातील शुभांगी ही संस्कारी व गृहकृत्यदक्ष पत्नी, आई व सून होती. तिला असे मधेच घेऊन जाणे, त्याच्या मनाला पटेनासे झाले.
त्याने त्याच्याकडील राखीव कोट्यातील तीस वर्ष, शुभांगीला अनुकंपा तत्त्वावर दिली व तिला शुभेच्छा देऊन, तो आल्या वाटेने निघून गेला.
शुभांगीला, मनातील अनेक विचारांच्या गर्दीत छातीतील दुखणं कमी होऊन, कधी झोप लागली ते कळलं देखील नाही.
सकाळी ती नेहमीप्रमाणे सर्वांच्या आधी उठली. सगळं आवरुन पुजेला बसली. प्रसन्न मनाने तिने पुजा केली व चहाचा कप घेऊन शेखरच्या हातात दिला. शेखरने तिला विचारलं, ‘काल तुला अचानक काय झालं होतं गं?’
शुभांगी उत्तरली, ‘कुठं काय? जरा जादाचं काम केलं की, असं होतं कधी कधी. तुम्हाला काय वाटलं, मी तुम्हाला सोडून वरती जाईन? अहो, अजून खूप कामं व्हायची राहिली आहेत माझी!! ती अर्धवट सोडून, मी बरी जाईन.’
आपल्या कुटुंबाला आत्मियतेने सांभाळणाऱ्या, तमाम गृहिणींना ही ‘फॅन्टसी कथा’ समर्पित.
— सुरेश नावडकर. 
मोबाईल: ९७३००३४२८४
१३-३-२२.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..