नवीन लेखन...

हे आकाशवाणीचे रत्नागिरी केंद्र आहे!

४६ वर्षे झाली त्या घटनेला. याच दिवशी (१८ जानेवारी १९७६) आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचा जन्म झाला. आणि कोकणातल्या असंख्य रसिकांच्या मनाला आणि भावनेला नवीन आयाम प्राप्त झाला.

वैविध्यपूर्ण ज्ञान, मनोरंजन, माहितीचा,श्रोत्यांच्या भावभावनांचा विचार करणारा अदृश्य पण कानाशी आणि मनाशी सलगी करणारा एक अखंड स्रोत अव्याहत सुरु झाला. आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र ४६ वर्षाचं झालं. आणि माझ्या लक्षात आलं, १९७७ पासून आपणही रत्नागिरीच्या आकाशवाणी केंद्राशी, लेखणीच्या माध्यमातून जोडले गेलो आहोत. माझ्या वाङ्मयीन कारकिर्दीत आकाशवाणीचं योगदान अमूल्य स्वरूपाचं आहे.

महाविद्यालयीन जीवन सुरु असताना १९७७ पासून कथा, कविता आणि युववाणी चं निवेदन, युववाणीत मान्यवरांच्या मुलाखती अशा धडपडीला आकाशवाणीचं विधायक व्यासपीठ मला उपलब्ध झालं. त्या दरम्यान माझं कथालेखन, ललितलेखन दर्जेदार नियतकालिकांतून प्रसिद्ध होऊ लागलं होतं. प्रसिद्धीच्या वलयाला आकाशवाणीचं माध्यम पूरक ठरू लागलं होतं.

लेखक म्हणून कारकीर्द आकाराला येत असताना आकाशवाणीनं,लेखनातील, (आकाशवाणीसाठी) आवश्यक असणाऱ्या तंत्राचा विचार करायला शिकवलं. कमीतकमी शब्दात,अचूक मांडणी करीत, अदृश्य असणाऱ्या तरीही विचक्षण असणाऱ्या श्रोत्यांना भावेल,रुचेल,पटेल असे लेखन करायला शिकवले. इतरत्र मिळणारे लेखन स्वातंत्र्य आकाशवाणीत नसते,कारण त्यांची एक मर्यादा असते,ती ओळखून लेखन करणे आणि तरीही ते लोकप्रिय होणे ही एक अवघड कसरत असते,ती ज्याला जमते तो लेखनात अनेक ठिकाणी यशस्वी होऊ शकतो, हा माझा स्वानुभव आहे.

आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रासाठी मी खूप लेखन केलं. कथा, कविता, लेख, असंख्य श्रुतिका, जीणे गंगौघाचे पाणी, आंबटगोड सारख्या मालिका, चिंतन,’ कातळ, क्रांतिसूर्य सावरकर ‘ यासारख्या तेरा, तेरा भागांच्या मालिका, संस्कृती दर्शन घडविणारे सांगितिक कार्यक्रमांचे रूपक लेखन, माझ्या कादंबऱ्यांचा परिचय करून देणारे लेखन असे अनेकविध स्वरूपाचे लेखन मी करीत होतो.

दिवाळीच्या दिवसात, सं.शांतिब्रह्म, सं. घन अमृताचा, सं. ऐश्वर्यवती, यासारख्या माझ्या संगीत नाटकांचे, आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून झालेले प्रक्षेपण, केवळ रत्नागिरी केंद्रमुळेच शक्य झाले. आणि माझ्या आयुष्यातील यशाचा परमोच्च बिंदूसुद्धा आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रमुळेच प्राप्त झाला. आकाशवाणीचे त्यावेळचे अधिकारी श्री गोविंद मोकाशी यांच्या आग्रहामुळे मी १९९५ – ९६ च्या अखिल भारतीय नभोनाट्य लेखन स्पर्धेत भाग घेतला आणि संपूर्ण भारतातून माझ्या, डेथ ऑफ कॉमनसेन्स, या नभोनाट्याला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. त्याचे भारतातील १४ भाषांमध्ये भाषांतर झाले. दिल्लीत झालेल्या एका शानदार समारंभात ते पारितोषिक स्वीकारताना मी आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला होता आणि तो अत्यावश्यकच होता असे मला वाटते. लेखक म्हणून माझ्या जडण घडणीतला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचा वाटा मोलाचा वाटतो तो त्यामुळेच.

या सर्व काळातले रत्नागिरी केंद्राचे संचालक, प्रोग्रॅम ऑफिसर, सर्व निवेदक आणि आठवणीने, कार्यक्रम आवडल्याचे पत्राद्वारे कळविणारे रसिक श्रोते यांना धन्यवाद द्यायलाच हवेत. संचालक, प्रोग्राम ऑफिसर आणि निवेदक याना विशेष धन्यवाद द्यायला हवेत ते अशाकरता की त्या त्या वेळी हे सर्वजण आस्थेवाईक पणे मराठी भाषा,विचार, व्याकरण, भाषा शुद्धी आणि कार्यक्रमातील नाविन्य यासाठी आग्रही होते आणि त्यासाठी विधायक चर्चा देखील करीत होते.

आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राच्या वर्धापन दिनानिमित्त आकाशवाणीशी संबंधित अशा सर्वाना शुभेच्छा.

हे केंद्र लेखकाला घडविणारे आणि श्रोत्यांची रसास्वाद वृत्ती जोपासणारे आहे, यावर माझा नितांत विश्वास आहे!

— डॉ.श्रीकृष्ण जोशी,

रत्नागिरी.

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 109 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..