नवीन लेखन...

हा छंद जीवाला लावी पिसे !

माणसाला जीवनात आवश्यक असलेले छंद !! .. माझा लेख -आजच्या “नवाकाळ”मध्ये ! माणसाला जीवनात आवश्यक असलेल्या छंदांसंबंधी माझा एक छोटेखानी लेख,आजच्या “नवाकाळ”मध्ये छापून आला आहे. आपल्या सर्वांसाठी हा लेख खाली देत आहे. आपला अभिप्राय जरूर कळवा . तसेच आपलेही काही वेगळे अनुभव आहेत का ?1

असे म्हणतात की शिक्षणावाचून माणूस म्हणजे अर्धाच .. पण अलीकडे असे दिसते की कसलाही छंद नसलेला निवृत्तीनंतरचा माणूसही असा अर्धाच राहतो. अचानक बी पेरून लावलेले झाड जशी लगेच फळे देत नाही तसाच छंदही निवृत्तीनंतर नव्याने लावून घेता येत नाही.
आधीपासून त्याचे पिसे लागलेले असेल तर निवृत्तीनंतरचे आयुष्य खूप छान जाते. तो निवृत्तीच्या आधीही जपला असेल तर रोजच्या नोकरी व्यवसायात असलेल्याचीही मानसिक स्थिती उत्तम राखतो.

गरीब माणसाला अपचनाचा त्रास होत नाही. तसा बहुतेक प्रत्येक संग्राहक हा आपल्या संग्रहाबाबत तरी गरीबच असतो. कधीच संतुष्ट नसतो. आपल्या संग्रहात अजून अमुक नाही–तमुक नाही असे म्हणत तो सदैव शोधातच असतो. त्यामुळे विविध प्रकारचे संग्रह करणाऱ्या, माझ्या बरोबरच्या सुमारे १५ /२० विविध वयाच्या मित्रांना रक्तदाब, मधुमेह, कोलॅस्ट्रॉल असले काहीच त्रास नाहीत. खरोखरच्या गरिबांची क्षमा मागून असे म्हणता येईल की जमविलेल्या वस्तूंच्या बाबतीत तरी तो सदैव दारिद्र्य रेषेच्या खालीच असतो. कुणाचा द्वेष, हेवा, मत्सर करायला मन रिकामंच राहत नाही. हे छंदामुळे घडते काय हा प्रश्न मी एका खूप मोठ्या विद्वान डॉक्टरांना विचारला तेव्हा
त्यांनी होकारात्मक उत्तर दिले.

माझे एक असेच वयाची ८० वर्षे ओलांडलेले छांदिष्ट मित्र एक दिवस खूप खिन्न होते. त्यांना बरं वाटत नव्हतं हे उघड होतं .मी त्यांना विचारले, काय झाले? ..बरं नाही का ? डॉक्टरांकडे जायचंय का? त्यांनी एक दीर्घ सुस्कारा घेऊन सांगितले की तसे नाही हो. एकाने मला ” रशियाचे ३ कोपेकचे दोन्ही बाजूंना छापलेले आणि नाणे म्हणूनही वापरले गेलेले टपाल तिकीट ” देतो म्हणून कबूल केले होते आणि दुसऱ्या कुणी तरी ५० रुपये जास्त दिले म्हणून त्याला विकून टाकले. आता बोला. … म्हणजे ” हे ” त्यांचे आजारपणाचे कारण होते तर ! … मी ही “दुःख:द ” बातमी आमच्या सर्व छांदिष्टांना सांगितली. त्यामुळे ” ते दु:ख ” लगेच वाटले गेले. सर्वच जण कामाला लागले. कुणी मित्रांकडे विचारणा सुरू केली, विदेशात मेल गेले. इ- शोध सुरू झाले. आणि आठवड्याच्या आत ते (तसेच) तिकीट या अतिज्येष्ठ छांदिष्टांपर्यंत पोचले. खुश झालेल्या या गृहस्थांनी आम्हा सर्वांनाच आग्रहाने घरी बोलावून चहा पाजला.आता या एकाच घटनेत किती चांगल्या गोष्टी दडल्या आहेत त्याचा हिशेब न मांडलेला बरा.

छंदांमुळे उच्चनीचतेची भावनाही कमी होते. एका चर्मकाराच्या दुकानातील संत रोहिदासांच्या चित्राशेजारी लावलेल्या एका वेगळ्याच दिव्याची चौकशी मी रस्त्यात त्याच्या शेजारी बसून करत होतो. शेजारून जाणाऱ्या माझ्या ऑफिसातील एका सेवानिवृत्त जनरल मॅनेजरला हे खटकले पण माझ्या ते लक्षातही आले नाही. पितळी ओतकाम, वेल्डिंग, पॉलिशिंग अशा गोष्टींमुळे होणारे कुंभारवाड्यातील प्रचंड प्रदूषण मला जाणवत नाही आणि त्याचा मला कधी त्रासही होत नाही.

रात्री झोपतांना , उद्या आपल्याला केवढी कामे करायची आहेत याचा केलेला विचार ,मला जगण्याची उमेद, आत्मविश्वास,सकारात्मक दृष्टी अशा गोष्टी देतोच पण हा विचार करता करता झोप कधी लागते ते कळतही नाही. .. मग कसली गोळी घेताय राव …. आणि कशाला ?
आज १० / १२ वर्षांच्या मुलांनासुद्धा निराशा ग्रासते. या वयाची मुले आत्महत्या करतात. काय भयंकर आहे हे ? पूर्वी दिवसातून एकदा जेवायला मिळणं ही सुद्धा चैन वाटावी अशा परिस्थितीत जगणारी लाखो मुले होती. फाटके कपडे, पडझडीचे घर, घरात वीज-पाणी नाही,
अभ्यासाला वह्या- पुस्तके नाही, अनवाणी / छत्रीशिवाय कित्येक मैल चालत शाळा गाठायची, अभ्यासाला वेळ आणि जागाच नसायची. तरीही मुले आत्महत्या करीत नव्हती. अशा दयनीय परिस्थितीतही त्यांचे आपले असे एक छोटेसे विश्व असे. अशा मुलांकडेही स्वतः:चे असे काहीतरी “जमवलेले” असे. गावाकडची मुले गुंजा , दगड गोटे, पक्ष्यांची पिसे, रंगीबेरंगी दगड, बिट्टी- पारिंगा अशा कुठल्यातरी बिया,सागरगोटे, पिंपळाची जाळीदार पाने तर शहरात मुले बसची तिकिटे,टपाल तिकिटे, चॉकलेटच्या चांद्या, नाणी, पत्ते , बांगडीच्या
रंगीबेरंगी काचा, क्रिकेटपटूंचे पेपरात आलेले फोटो,मोरपिसे, पिंपळाची जाळीदार पाने,शंख-कवड्या ,काड्यापेटीवरील चित्रे,सिगारेटची पाकिटे ( त्यावेळी या पाकिटांवर वैधानिक इशारा नव्हता तरीही केवळ पाकिटे जमवतो म्हणून ही मुले धुम्रपानाकडे वळत नसत.) …… असे काय काय जमवीत असत. अहो तेव्हा त्यांना हा केवढा प्रचंड खजिना वाटत असे. कुठल्याही आर्थिक परिस्थितीतील ही मुले या
आघाडीवर तरी श्रीमंत असत.

आज सामान्य आर्थिक परिस्थितीतील पालकांना सुद्धा मुलांना ८-१० हजारांचा मोबाईल घेऊन द्यावा लागतो. नवे युनिफॉर्म्स, पुस्तके, वह्या, अत्यंत आकर्षक अशी दप्तरे, पेन्सिल-पेन-खोड रबर-वॉटर बॅग – रेनकोट- छत्र्या-बूट- चपला , स्कूल बस, पॉकेट मनी, वाढदिवसाचे खर्च, पिकनिकचे खर्च अशा अनेक खर्चिक गोष्टींसाठी, ऐपत असो नसो, पालक प्रचंड पैसा खर्च करतात. तरीही मुले आणि त्यामुळे पालक सुखी नाहीत. प्रचंड पैसा खर्चूनही ही मुले मनाने श्रीमंत होत नाहीत. कार्यानुभव म्हणून अनेक गोष्टी ही मुले आणि पालक सक्तीने करतात –मार्कांसाठी करतात पण आनंदासाठी नाही. या मुलांना पुन्हा छंदांकडे वळविले तर ?

” हा छंद जीवाला लावी पिसे” असे कुणी म्हटले तरी मी मात्र ” घेई छंद मकरंद” असेच म्हणणार !

–मकरंद करंदीकर. अंधेरी पूर्व, मुंबई.

Avatar
About मकरंद करंदीकर 43 Articles
मकरंद शांताराम करंदीकर यांनी बँक ऑफ इंडियातून सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या अनेक छंदांना पूर्णपणे वाहून घेतले. गेली सुमारे ५० वर्षे ते दिव्यांचा - विशेषत: भारतीय दिव्यांचा संग्रह करीत आहे. त्यांच्याकडील हा संग्रह भारतातील दिव्यांचा सर्वात मोठा संग्रह आहे. या विक्रमासाठी त्यांचे नाव २ वर्षे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आणि एकदा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदले गेले आहे. याचबरोबर भांडी, बैठे खेळ, पत्ते, जुनी प्रसाधने, लेखन साहित्य असे इतर अनेक छंद त्यांनी जोपासले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..