नवीन लेखन...

गुरू एक जगी त्राता

आमच्या गोपुजकर बाईंना या जगातून जाऊन साडेतीन महिने उलटले. कोरोना येण्याच्या आधी एक वर्षापूर्वी झालेली त्यांची पुनर्भेट अगदी आजही विसरली जात नाही. शाळा सुटली त्यानंतर, म्हणजे जवळजवळ चार दशकं उलटून गेल्यावर झालेली ही पुनर्भेट मनाला खूप आनंद देऊन गेली होती. आज गुरुपौर्णिमेच्या दिनी त्यांची अधिकच आठवण येतेय.
जो लघु नाही तो गुरू, अशी गुरूची व्याख्या विदुषी धनश्री लेले यांनी केली आहे. संत कबीर म्हणतात, माझ्या घरी माझे गुरू आणि परमेश्वर एकत्र आले, तर मी पहिला प्रणिपात गुरूनाच करीन, कारण त्यांच्यामुळे ईश्वर माझ्या घरी आलेयत , अन्यथा माझी एव्हढी योग्यता नाही.

आपल्या विचारांनी, कृतीनी, आदर्शानी आपल्या विद्यार्थ्यांना संस्कारित करतो तो गुरू. विद्यार्थ्यांना फक्त शिकवत नाही तर घडवतो तो गुरू. आणि आमच्या गोपूजकर बाईंनी आयुष्यभर हेच केलं. आपल्या तत्वांना कधी तिलांजली न देता त्या तत्वांशी ठाम राहिल्या, पण त्यांना उराशी कवटाळून बसल्या नाहीत, आपल्या तत्वांना त्यांनी नेहमीच लवचिक ठेवलं. तत्वांसाठी त्यांनी माणुसकीेशी कधीही प्रतारणा केली नाही, किंवा देवपुजेचं फार अवडंबर माजवलं नाही. माणूस जपला पाहिजे हे त्यांचं प्रथम तत्व होतं. आणि या यादीत त्यांच्या विद्यार्थ्यांपासून त्यांचे आप्त, परिचित, सुहृद ते आपल्या जवळपासचे अडले नडलेले, गरीब, रस्त्यावरचे विक्रेते, इमारतीचा वॉचमन, वर्तमानपत्र टाकणारा मुलगा, झाडूवाला आणि असे अनेक येतात. या सगळ्यांसाठीच, आपल्याकडून जे काही शक्य आहे, मग तो खारीचा वाटा का असेना, ते त्यांनी आयुष्यभर केलं. देव देव्हाऱ्यात नसतो तर तो माणसात वसतो, हे त्यांनी कृतीतून नेहमीच दाखवून दिलं. प्रत्येक शिक्षकाने, गुरूने आपल्या विद्यार्थ्यांसमोर आपली प्रतिमा सदैव आदर्शवत ठेवायला हवी ही त्यांची ठाम मानसिकता होती.

आपल्या हयातीत त्यांनी कधीही कुणाचं खोटं कौतुक, तोंडावर एक मागे एक या गोष्टी केल्या नाहीत. ती बाईंची वृत्तीच नव्हती. कुणाला वाईट वाटलं तरी जे असेल ते स्पष्टपणे समोरासमोर. ज्यांचं मन स्वच्छ, नितळ, पारदर्शी असतं ना त्यांनाच हे जमतं. शिकवण्याव्यतिरिक्त आपल्या विद्यार्थ्यांसमोर काही वैयक्तिक अडचण उभी रहात असेल तर गुरूने, शिक्षकाने आपल्या परीने ती सोडवायला हवी हा विचार करून त्या थांबल्या नाहीत तर तो विचार नेहमीच त्यांनी प्रत्यक्षात आणला.

अगदी कोरोना काळातही गरिबांना नियमित अन्न देणाऱ्या सहृदयी व्यक्तींना, बाईंनी शक्य होईल तेव्हढी आर्थिक मदत केली. विषाणूच्या भीतीने घरात स्वतःला कोंडून, कुणाला काहीही मदत न करता बाहेरच्या जगाकडे फक्त पहात बसणाऱ्या आमच्यासारख्याना हा एक धडाच होता. मधूनमधून बाईंशी फोनवर होणाऱ्या बोलण्यातून, मला नेहमीच काही ना काही सकारात्मक विचार मिळत गेले. बाईंच्या बोलण्यात, कधीही एकटेपणाचा कंटाळा, वैताग जाणवत नसे. अगदीच कधी प्रकृती बरी नसेल तर थोडासा डोकवायचा, पण तो ही तेव्हढ्यापुरताच. आकाशवाणीवरून माझ्या लेखाचं पहाटे सहा वाजता प्रसारण होणार आहे, हे त्यांना सांगितल्यावर त्या वेळेआधी सज्ज असायच्या. मला रेकॉर्डिंग नंतर पाठव, मी ऐकेन असं त्या म्हणू शकत होत्या. आणि मी त्यांना पाठवतही होतो. पण live प्रसारण ऐकून, ते संपताच पुढच्या क्षणाला माझा फोन वाजायचा, “प्रसाद छान लिहिलय आणि छानच बोललास.”

माझ्या प्रत्येक लेखावर मनापासून प्रतिक्रिया मिळायची बाईंकडून. कधी एखादा वाचनात आलेला विनोदी किस्सा सांगितला की खळखळून हसायच्या. मिश्कीलपणाची झलक त्यांच्या बोलण्यात मी अनेकदा अनुभवली आहे. ऐन कोरोना काळात, स्वतःची अगदी व्यवस्थित काळजी घेऊनही , त्याने बाईंना गाठलच. शाळा सुटल्यावर इतक्या वर्षांनी पुनर्भेट झाली, ती ही एकदाच. पुढे कोरोना सुरू झाल्यामुळे फोनवरूनच बोलणं. महामारीचा उद्रेक कमी झाल्यावर,
“प्रसाद बायकोला घेऊन ये आता” असं सतत सांगत राहिल्या बाई, पण भेट होणं बहुधा नियातीला मंजूर नव्हतं. आजही याचं खूप वाईट वाटतं. लगेच जायला हवं होतं, असही आज वाटतं. पण आता हे वाटून काय उपयोग, प्रेमाच्या ओलाव्याने बोलावणाऱ्या बाई आज या जगात राहिल्या नव्हत्या. अनेकदा खूप आठवण येते, त्यांच्या भरभरून बोलण्याची, मनसोक्त गप्पांची, निखळ हसण्याची आणि त्यांच्या दृढ विचारांची.

असे गुरू असे शिक्षक, ज्यांनी आपल्या वागणुकीतून विद्यार्थ्यांना खूप काही दिलं आणि समृद्ध केलं शिष्यांना. आज गुरुपौर्णिमा, तुम्ही जिथे कुठे असाल तिथून तुमचे आशीर्वाद साऱ्या विद्यार्थ्यांवर नक्कीच असतील.
बाई खरंच खूप खूप धन्यवाद , फक्त एकच मनापासून सांगावसं वाटतं, खूप घाई केलीत हो आमच्यातून जाण्याची.l
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः,
गुरुः साक्षात्‌ परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥
तुमचा एक विद्यार्थी,

–प्रसाद कुळकर्णी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..