नवीन लेखन...

गोमुचे-प्रेम-सेवा-शरण (गोमुच्या गोष्टी – भाग ४)

परदेशात माहित नाही परंतु भारतांत तरी मॉलमधे वस्तु विकत घेण्यापेक्षां त्या पहाणे आणि मग कांही न घेतांच खायला फूड कोर्टमध्ये जाणे, अशी ग्राहकांची प्रवृत्ती जास्त असते.

आम्ही, मी आणि माझे मित्र, मात्र या नियमाला अपवाद आहोत. आम्ही इथे तिथे न पाहतां सरळ फूडकोर्टमध्ये खायलाच जातो.
असाच एकदा मी आणि गोमु दोघे सेंट्रल मॉलच्या फूड कोर्टमध्ये बसलो होतो. एक पिझ्झा मागवला होता. तो अजून तयार व्हायचा होता. एवढ्यांत आमच्या जवळच्याच टेबलापाशी दोन तरूणी येऊन बसल्या. दोघींचे वय पंचवीसच्या आसपास असावे. मी दोघींकडे पाहिलं. मला त्या चारचौघींसारख्याच वाटल्या. गोमुही त्यांच्याकडे पहात होता आणि मग पहातच राहिला होता.

मी म्हणालो, “गोमु, मी इथेच आहे. काय चाललयं तुझं ?”

त्याने मला हातानेच गप्प रहायला खूण केली आणि तो त्या दिशेला टक लावून पहात राहिला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव, विशेषत: डोळ्यांबाहेर पडू पहाणाऱ्या या डोळ्यांच्या बाहुल्या पाहून मला अंदाज आलाच होता.

“ध्येयवादी व्यक्तीची नजर जशी आपल्या ध्येयावर अविचल असते तशीच प्रेमात पडलेल्याची नजर आपल्या प्रेमपात्रावर स्थिर असते.”

इति मीच, प्रकाश कलबाडकर.

त्या दोघी मोठ्याने बोलत होत्या. गोमुच्या लक्षांत आलं की त्याही पिझ्झाची ऑर्डर देऊन आल्यात.

गोमु एका मिनिटानंतर उठला. माझ्याकडचं पिझ्झाचं बिल घेतलं. मला आश्चर्यच वाटलं कारण अशी काम सहसा मलाच करायला लागतात. मी आनंदाने बिल त्याच्याकडे दिलं.

तो बिल घेऊन निघाला पण प्रथम त्या दोघींकडे गेला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही पण पिझ्झा ऑर्डर केलाय ना ! तुमचं बिल द्या. आमचाही पिझ्झा आणायचाय. बरोबर तुमचाही आणू.”

आता माझ्या लक्षात आलं की आज त्याने हे काम कां करायला घेतलं. त्या दोघींची प्रतिक्रिया काय होईल याची मला क्षणभर भीती वाटली.

तोपर्यंत त्यांतली मोठी तरूणी म्हणाली, “आम्ही आणू की आमचा पिझ्झा.”

गोमुचे डोळे धाकटीवर खिळले होते.

तो तिच्याकडेच पहात म्हणाला, “अहो, पिझ्झा शॉप इथून दूर आहे. एवढ्या लांब चालत जायचा त्रास तुम्ही घेणं बर नाही. आम्ही आणू. तुम्ही बसा निवांत गप्पा करत.”

तेव्हां धाकटी म्हणाली, “ताई, देईनास कां आपलं बिलं. ते तिथवर जाणारच तर आहेत.”

आणि असं म्हणतांना तिने गोमुकडे पाहिलं आणि एक मधाळ हास्य त्याच्याकडे फेकलं.

गोमुची अवस्था “सुहास्य तुझे मनास मोही, जशी न मोही सुरा सुरांही” ह्या नाट्यगीतासारखी झाली.

गोमुने दोन्ही बिलं घेतली आणि आणून माझ्याकडे दिली.

“पक्या, प्लीज !” मी काय समजायचे ते समजलो.

गोमाजीशेट प्रेमांत पडले होते.

ते आता यश मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नव्हते आणि लहान सहान कामांत मी त्याला मदत करणं हे बालपणापासूनचा मित्र म्हणून माझं कर्तव्य होतं. मला लेक्चर ऐकायचे नव्हतं म्हणून मी मुकाट्याने दोन्ही बिलं त्याच्या हातून घेतली आणि दोन पिझ्झा आणायला गेलो. मला पिझ्झा आणायला बारा तेरा मिनिटे लागली. तेवढ्यांत गोमुने मुक्काम आमच्या टेबलावरून त्यांच्या टेबलापाशी हलवला होता. तो त्यांना काय जोक्स सांगत होता की काय माहित नाही पण त्या दोघी चक्क खिदळत होत्या. मला त्याने तिकडेच बोलावले.

त्यांना माझी ओळख करून देत म्हणाला, “हा प्रकाश कलबाडकर. माझा खास मित्र. आणि पक्या ह्या कमला आणि अमला, दोघी बहिणी.”

खरं तर मी नुसती मान हलवायला हवी होती.

पण आपणही संवादाला थोडा हातभार लावावा असं वाटून मी विचारलं, “जुळ्या कां ?”

मी किती मूर्ख आहे असं सांगणारी एक नजर माझ्याकडे टाकत गोमु म्हणाला, “अरे पक्या, मगासपासून ही म्हणजे अमला हिला म्हणजे कमलाला ‘ताई’ अशी हांक मारतेय हे लक्षांत नाही आलं तुझ्या ?”

खरं तर तोच विसरत होता की गेली तेरा मिनिटे मी पिझ्झा आणण्याच्या कामांत गुंतलो होतो आणि त्यामुळे “ताई” ही अमलाची प्रेमळ हांक ऐकायला मी तिथे नव्हतो. गोमुची स्थिती “भरे मनांत सुंदरा” ह्या विद्याधर गोखलेंच्या नाट्यगीतागत झाली होती. गोमुने त्या तेरा मिनिटांतही त्यांची बरीच माहिती मिळवली होती. त्या कुठे रहातात. कोणत्या कॉलेजात आहेत असं विचारून त्यांचे शिक्षण पुर्ण होऊन त्या आता काम करताहेत, हे ही त्याने जाणून घेतलं. मोबाईल नंबरही एक्स्चेंज केले. मी त्याची प्रगती बघून थक्क झालो. ट्वेंटी-ट्वेंटीमध्ये फास्टेस्ट सेंचुरी मारणाऱ्या ख्रिस गाईलला देखील त्याचा हेवा वाटला असता. जवळून पहाताना मलाही जाणवलं की दोघी तशा दिसायला चांगल्या आहेत आणि बोलण्यांत स्मार्ट आहेत.
आम्ही चौघंही सावकाश पिझ्झाचा समाचार घेत होतो व खातां खातां गप्पा मारत होतो. माझा सहभाग कमीच होता.
पण गोमु मला एखादा प्रश्न विचारून उत्तर द्यायला भाग पाडायचा.

निघण्याच्या आधी थोडा वेळ गोमु त्यांना म्हणाला, “येत्या शनिवारी मी माझ्या एका मित्राकडे तुमच्याच भागांत येणार आहे. तुमच्या घरी आलो तर चालेल ना !”

मी आश्चर्यचकित झालो. पिझ्झा ते त्यांच घर हा पल्ला फक्त चार दिवसांत? हे म्हणजे चार ओव्हरमध्येच सेंचुरी मारल्यासारखं झालं. पण मी कांही बोललो नाही.

कमला म्हणाली, “या की. आमच्या आईशी ओळख करून देऊ तुमची.”

“प्रीतिचा पारिजात फुलला” ह्या मधुकर जोशी ह्यांच्या गीतातले भाव गोमु अनुभवत होता पण एकटाच.

त्या दोघी “बाय बाय” करून गेल्यावर गोमु म्हणाला, “पक्या, काय मस्त दिसते रे ?

हंसताना तर एकदम फ्लॕश टाकल्यासारखं वाटत होतं. मी तर तिला पहाताच प्रेमांत पडलो.”

त्याची प्रेमांत पडायची ही पहिलीच वेळ नव्हती, हे मला माहित होतं. त्यामुळे दोघींपैकी कुणाबद्दल तो बोलतोय याचा मला अंदाज नाही आला.

मी विचारलं, “कोणाबद्दल बोलतोयस् ?”

“पक्या, लेका तू काय डोळे मिटले होतेस काय रे ?

अर्थातच मी अमलाबद्दल, धाकट्या बहिणीबद्दल बोलतोय.” गोमुने सांगितलं.

“मला तर कांही दोघींमध्ये फारसा फरक नाही वाटला. तशा दिसायला बऱ्या आहेत.” मी माझे मत नोंदवले.

गोमु मोठ्याने ओरडला, “बऱ्या !”

आजूबाजूला बसलेल्या एक दोन टेबलांवरच्या लोकांच्या हातांतला चहा डुचमळून सांडला तर एकजण कढी पीत होता ती त्याच्या शर्टावर पसरली.

मी म्हणालो, “बऱ्या म्हणजे ठीक आहेत.”

गोमु म्हणाला, “बऱ्या काय ? ठीक काय ? अरे, दोघीही मस्त आहेत आणि अमला तर एकदम अल्टीमेट. कोठल्याही हीरॉईनपेक्षा कमी नाही. बस्स !

माझा प्लॕन ठरला.

शनिवारी जाऊन तिच्या आईला पण अशी खूष करून टाकतो की तीच मला सांगेल, ‘माझ्या मुलीचा स्वीकार करा हो.’

आता बघच तू!”

इति, कोण बरं ?”

एकूण काय “ती पाहतांच बाला कलीजा खलास झाला.” ह्या प्र. के. अत्रे ह्यांच्या नाट्यगीतात वर्णन केल्याप्रमाणे झाली होती.

रोज नाही तरी दिवसाआड मला भेटणारा गोमु पुढचे पंधरा दिवस मला भेटला नाही. मला थोडी काळजी वाटायला लागली.
मी इतर मित्रांकडे चौकशी केली. पण कोणालाच तो भेटला नव्हता. तो ज्या चाळीतली खोली शेअर करायचा आणि जिथे व्हरांड्यात झोंपायचा, तिथेही मी चौकशी करून आलो. तिथे मला एक गोष्ट कळली की गेले चार दिवस सोडले तर त्याआधी झोंपायला तो तिथे येत होता. मला आश्चर्य वाटलं. कारण त्याच्या आयुष्यांत बरं वाईट घडलेलं काहीही मला सांगितल्याशिवाय त्याला एक दिवसही रहावत नसे.

पण पंधरा दिवसानंतर एका संध्याकाळी तो घाईघाईने माझ्याकडे आला.

“कसा आहेस पक्या ?” त्याने आल्या आल्या मला विचारले.

मी त्याला म्हणालो, “तूच सांग तुझा पत्ता काय आहे ते ? पंधरा दिवस गायब आहेस.”

“पक्या, मला आतां बिलकुल वेळ नाही. मी गिरणींत पीठ दळायला दिलंय ते घेऊन मला लागलीच जायचंय.”

गोमु घाईघाईनेच बोलला. “अरे त्या दिवशी मी त्या अमला आणि कमलाशी ओळख करून दिली की नाही तुझी ?
सध्या माझा मुक्काम त्यांच्या घरी आहे. बाकी सगळं मी तुला मग सांगतो.”

हे ऐकून माझा आ पसरलेला असतानाच तो निघूनही गेला.

गोमुने “प्रेम सेवा शरण, सहज जिंकी मन” हा मानापमान मधला खाडीलकरांचा सल्ला मनावर घेतला होता तर.

गोमु घाईघाईत गेला पण मी बराच वेळ विचार करत राहिलो. एखाद्याच्या एखाद्या कृतीवरून तर्क करून निष्कर्ष काढायला मी कांही शेरलाॅक होम्स नव्हतो. पण आमची मैत्री ‘यह दोस्ती हम नही तोडेंगे’वाली असल्यामुळे मी तर्क-कुतर्क करत राहिलो. गोमु त्यांच्याच घरी रहातो म्हणजे त्याने म्हटल्याप्रमाणे त्या घरांत नक्कीच आपला जम बसवलाय. त्या मुलींच्या आईला खूष केलं आहे. पण मग गिरणींत पीठ द्यायला तो कां आला होता? ही कामे त्याच्यावर सोपवली होती?
तो खूप जवळचा वाटू लागला होता कां? गोमुचं त्या घरांतलं नेमकं स्थान काय आहे? हे समजायला कांही मार्ग नव्हता.

त्यांत पुन्हां पुढले पंधरा-सोळा दिवस तो आला नाही. मी आता त्याची प्रेमकहाणी ऐकायला खूप आतुर होतो. एवढ्या वेळांत तो अमलाला पटवण्यात नक्की यशस्वी झाला असेल, असं मला वाटत होतं. “प्रथम तुज पाहतां जीव वेडावला” ह्या गदिमांच्या गीतापासून सुरू झालेला गोमुचा प्रवास “आज आपुल्या प्रथम प्रीतिचा संगम हा झाला” हे प्र. के अत्रेंचे शब्द तो कधी ऐकवतोय याची मी वाट पहात होतो. त्यानंतर तो माझ्याकडे आला, तेव्हां त्याच्या हातांत पिशवी होती. त्याचा चेहरा उजळलेला होता. त्याने आल्या आल्या पिशवींतून लग्नपत्रिका बाहेर काढतांच मी त्याचा हात हातात घेऊन अभिनंदन केलं.

मी विचारलं, “कधी लग्न आहे ?”

गोमु म्हणाला, “लग्न अजून पंधरा दिवसांनी आहे. मग मी थोडा मोकळा होईन.”

मी म्हणालो, “गोमु, लग्नानंतर गुंतशील संसारात. फुरसत मिळणार नाही. मोकळा कसला होतोयस ?”

गोमु म्हणाला, “पक्या, अजून माझं लग्न ठरायचं आहे. अमलाच्या मोठ्या बहिणीचं, कमलाचं लग्न आहे आणि त्याची सर्व जबाबदारी माझ्यावर आहे. म्हणजे पैशांची नाही. सगळा खर्च मावशी करताहेत. पण सर्व व्यवस्था, अगदी हॉलपासून हारापर्यंत आणि गुरूजींपासून बँडपर्यंत, मलाच करायची आहे. बोल मग लग्नाला येतोयस की नाही ?”

मी पत्रिका वाचत म्हणालो, “जमेल असं वाटत नाही. त्याच वेळी मला आॕफीसच्या कामासाठी नागपूरला जायचय.” म्हणजे सध्या तरी “प्रीती सुरी दुधारी” ह्या प्र.के. अत्रे यांच्या नाट्यगीताप्रमाणे ती गोमुला अजून व्याकुळ करत होती. कमलाच्या लग्नाच्या वेळी मी नागपूरला होतो तरी विचार करत होतो की गोमु समारंभात कसा गडबडींत असेल आणि कसा मिरवत असेल!

मी नागपूरहून परत आल्यावर मला त्या लग्नसोहोळ्याचं रसभरित वर्णन ऐकायला मिळालं.

गोमुने उधारीत भर घालून लग्नासाठी डीझायनर कुर्ता आणि जाकीट घेतलं होतं. त्यांत कसा दिसत असेल! वराला आल्या आल्या आरतीने ओवाळण्यापासून ते वरातीत नाचण्यापर्यंत सबकुछ गोमुने केलं होतं. त्या घरांत कुणी पुरूष नव्हता.
कन्यादान करायला कुठले कोंकणातले लांबचे मामा आले होते. नाही तर गोमुने ते कामही केलं असतं. लग्नानंतरची उस्तवास्त, बिलं भागवणं सर्व गोमुने केलं होतं. अर्थात खर्चाचे मोठे आयटम आले की मावशी ठरवत असत. लहान सहान बाबी गोमुनेच पाहिल्या होत्या.

मी गोमुला म्हटलं, “तुझी कांही प्रगती झाली की नाही ?”

गोमु म्हणाला, “आता बाजी आपल्या खिशांत आहे. मावशी कांही नाही म्हणणार नाहीत.”

मी म्हणालो, “मावशी ‘हो’ म्हणतील पण आधी तू अमलाशी बोललांस कां? तिने होकार दिला कां ?”

गोमु म्हणाला, “तोच तर प्रॉब्लेम आहे. प्रिन्सिपाल समोरही बोलायला मी कधी घाबरलो नाही, हे तुला माहिती आहे. पण “माझ्याशी लग्न करशील कां ?” हा प्रश्न तिला विचारायला धीर होत नाही. दोन तीनदां धीर करून सुरूवातही केली, “अमला…..” आणि पुढे शब्दच फुटले नाहीत. पण आतां नक्की विचारीन.”

शालेय जीवनांत प्रिन्सिपालसमोर बोलण्याहून किंवा ऑफीसमधे साहेबाला उलट उत्तर देण्याहून प्रेमिकेपुढे लग्नाचं प्रपोजल मांडणे, भल्याभल्यांना कां जड जातं हे मला कधी कळलेलं नाही. कदाचित माझ्यावर अजून तशी वेळ आली नाही म्हणून असेल. अजून तरी गोमु “प्रेम वरदान, स्मर सदा” ह्या कुसुमाग्रजांच्या ययाती आणि देवयानी नाटकांतील पद मनाशी बाळगून होता.

त्यानंतर गोमु मला भेटला तो अगदी विमनस्क अवस्थेत. बराच वेळ नुसता बसूनच होता. मीही त्याचा रागरंग बघून त्याला कांही विचारलं नाही.

थोड्या वेळाने इंग्रजीचा आश्रय घेत तो म्हणाला, “Never trust women… ते शेक्सपियरच एक वाक्य आहे ना पक्या असंच कांहीतरी?”

“Frailty, thy name is woman” असं हॕम्लेट आपल्या आईबद्दल म्हणतो”, मी सांगितलं.

मला थोडा अंदाज आला की ह्याचं कांही अमलाशी जमलं नाही.

मी हळूच विचारलं, “अमलाशी बोललास कां ?”

गोमु निःश्वास टाकत म्हणाला, “तिला विचारायची वेळच आली नाही, मित्रा. लग्नाचा व्हीडीओ आणि फोटो घेऊन गेलो ते पाहतांना एका तरूणाच्या फोटोकडे बोट दाखवून मावशी म्हणाल्या, ‘हा निशिकांत. आमच्या अमलाचा होणारा नवरा. आतां लौकरचं ह्या दोघांच पण लग्न लावून टाकायचं बरं कां गोमाजीशेट. अरे, ह्या दोघींना भाऊ नाही, त्याची सारी कसर तू भरून काढलीस. किती राबलास कमलाच्या लग्नांत. आतां दोन तीन महिने आराम कर. मग पुन्हां तुझ्यावरचं माझी सारी भिस्त असणार.’

माझा मामा बनवला रे ह्यांनी. ह्या तिघींनी मला मुद्दामच आधी अमलाचं जमलंय हे सांगितलं नाही. कामं करायला माझा वापर केला. कधी बायांवर विश्वास ठेवू नकोस. तू अविवाहीत रहाण्याचं ठरवलयसं ना तेच बरोबर आहे.”

एवढं बोलून त्याने पुन्हां दीर्घ सुस्कारा सोडला. मी त्याच्या पाठीवर हात ठेवला पण कांही बोललो नाही.बोलण्यासारखं कांही राहिलचं नव्हतं.

परंतु थोड्या वेळाने गोमुच म्हणाला, “एक झालं. मी ‘इव्हेंट मॕनेजर’ म्हणून चांगलं काम करू शकतो, हे सिध्द झालं.
मस्तपैकी फी घेऊन आता अशी काम घ्यायला हरकत नाही. मावशी फी देणार असतील तर अमलाच्या लग्नाची व्यवस्था सुध्दां मी ठेवीन पण आता फुकटांत नाही. विचारतोच त्यांना.”

“प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं.”

इति नक्कीच मंगेश पाडगावकर.

— अरविंद खानोलकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..