नवीन लेखन...

घुस…

लेखक : निलेश बामणे

काल मी माझ्या दुकानात बसलेलो असताना ऐन ऑक्टोबर महिन्यात मुसळधार पाऊस अचानक पडायला लागल्यावर  दुकानाच्या समोरुन मोकळ्या दरवाजातून एक भली मोठी घुस दुकानात घुसली.  ती माझ्या नजरेस पडल्यामुळे मी तिला लगेच हुसकावून लावले. ती बाहेरही गेल्यासारखी दिसली मला.  त्यानंतर रात्री मी पाऊस पडायचा थांबल्यावर उशिरा दुकान बंद करून घरी गेलो. दुसर्‍या दिवशी रविवार असल्यामुळे नव्हे !  तर सकाळी लवकर जाग आल्यामुळे लवकर तैयार  होऊन जे दुकान मला  सकाळी दहा वाजता  उघडायचे होते ते मी नऊ वाजताच उघडले. दुकान उघडून मी सफासफाई वगैरे करून जेंव्हा  रॅकवरील सामानाची आवराआवर करायला गेलो तर रॅकच्या एका कप्प्यात ती घुस बसलेली मला दिसली. म्हणजे ती काल मी दुकान बंद करण्यापुर्वीच ती दुकानात येऊन बसलेली असणार !  मी तिला हातातील झाडूने ढकळत समोरच असलेल्या दरवाजातून बाहेर जाण्याचा मार्ग मोकळा केला तरी ती काही हालायचे नावच घेत नव्हती. मग नाईलाजाने मी आमच्या इमारतीत साफसफाईचे काम करणार्‍या सफाई कामगाराला बोलावून तिला हुसकावून बाहेर काढायला सांगितले करण  तसे करायलाही  मला का कोणास जाणे भीती वाटत होती. इतका मी हल्ली  भित्रा झालेलो आहे. तर त्या सफाई कामगरानेही तिला  हुसकावल्यावर ती समोरच्या दरवाजातून बाहेर जाण्याऐवजी पुन्हा दुकानातील एका कपाटाच्या कोपर्‍यात जाऊन लपली. तिथून ती काही केल्या हळतच नव्हती. आता त्या झाडूवाल्यालाही त्याचे साफसफाईचे काम करायला जायचे होते आणि मला त्या घुशीला कोणत्याही परिस्थितीत मारायचे नव्हते. पण काही केल्या ती जिवंत दुकानातून बाहेर पडायला तयार नव्हती. बहुतेक ती मरायलाच आलेली होती. मी विचार केला मी दुकानाच्या बाहेर गेलो तर दुकानात काहीही हालचाल नाही हे पाहून ती दुकानाच्या मोकळ्या दरवाजातून ती बाहेर निघून जाईल . जवळ – जवळ दोन तास मी दुकानाबाहेर सकाळचे ऊन खात फेर्‍या मारत  राहिलो पण ती काही मला बाहेर पडताना दिसली नाही. तसा रात्रभर तिने दुकानात बर्‍यापैकी धुडघुस घातलेला होता. दुकानात जागोजागी इकडे तिकडे पडलेल्या तिच्या लेंड्या त्याच्या साक्षिदार होत्या.  पण नशीब तसे तिने माझे खास काही नुकसान केलेले नव्हते. मला वाटते तितकी तिच्यात ताकदच उरलेली नव्हती.  मी आणखी काही वेळ दुकानाबाहेर उभा राहू शकत नव्हतो कारण मला संगणकावर  माझे कालचे  अपुर्ण राहिलेले काम आज  पुर्ण करायचे होते. त्यामुळे सावधानता म्हणून माझे दोन्ही पाय जमिनीपासून वर उंचावर  धरून मी संगणकावर माझे अपुर्ण राहिलेले काम करायला सुरुवात केली.

दुपारी  माझा मामा त्याचे पेंशन संबंधी संगणकावर काहीतरी काम होते म्हणून माझ्या दुकानात आला.  माझा भाऊही त्याचवेळी दुकानात आल्यामुळे त्याने दुसर्‍या संगणकावार  त्याचे काम करायला घेतले.  तेवढ्यात मला अचानक  त्या घुशीची आठवण आली. कारण ती दुकानाबाहेर पडताना मला दिसलेली नव्हती. ज्या कोपर्‍यात ती जाऊन बसली होती तिथेच मेली वगैरे तर दुर्गंधी पसरेल या भितीने मी ती जेथे घुसली होती तेथील सामानाची हालवाहालव केली असता. पाहिले तर ती तेथेच अजूनही लपून बसलेली होती. आता तिला बाहेर काढताना तिचा गेम होणार ह्याचा मला साधारण अंदाज आला होता. पण तिला हुसकावून दुकानाबाहेर काढण्याची हिंमत माझ्याच्याने काही होत नव्हती.  तिला दुकानातून हुसकावून बाहेर काढण्याची जबाबदारी मी नाईलाजाने माझ्या मामावर सोपवली आणि मी लगेच दुकानातून बाहेर पडलो. माझ्या मामानेही तिला जिवंत हुसकावून बाहेर काढण्याचा अटोकाट प्रयत्न केला कारण आज त्याचा संकष्टीचा उपवास होता.  पण काही केल्या ती दुकानातून बाहेर पडायलाच तयार होत नव्हती. कितीही हुसकावले तरी जागची हालायलाच तयार नव्हती . त्यामुळे मी ही वैतागलो आणि मामाही वैतागला ! शेवटी नाईलाजास्तव तिच्यावर मामाने  त्याच्या हातात असलेल्या तिला हुसकावण्यासाठी घेतलेल्या पाईपाचा एकच फटका तिच्यावर मारला आणि तिचा एका फटक्यातच  गेम झाला. ती एका फटक्यातच मेली हे ऐकल्यावर मला क्षणभर वाईट वाटले. ती मेल्यावर मामानेच तिला प्लास्टीकच्या पिशवित भरून एकदाचे तिला कचर्‍याच्या डब्यात नेऊन टाकले आणि तिचा विषय एकदाचा संपवून टाकला.

मला  हे कळत नव्हते त्या घुशीचा  जिव धोक्यात असतानाही आणि  समोर दरवाजा मोकळा असतानाही ती दरवाजाच्या बाहेर का पडत नव्हती ?  तिला तिचा मृत्यू जवळ आल्याचे कळले होते का ? तिला तिचा जीव नकोसा झाला होता का ? की तिला आत्महत्या करायची होती ?  ते काहीही असले तरी मला कोणत्याही परिस्थितीत ती माझ्यासाठी कितीही उपद्रवी असली. संभाव्य नुकसानदायक असली  तरी तिला ठार मारायचे नव्हते. जरी ती मरायला आलेली असली तरी !  मला तिच्या मृत्यूचे पातक  माझ्या डोक्यावर नको होते. खरे तर मी  इतका हळवा कधीच नव्हतो.  पण जेंव्हापासून मी शाकाहारी झालो आहे तेंव्हा पासून कदाचित माझ्या स्वभावात गीतेत सांगितल्याप्रमाणे  अमुलाग्र बदल झालेला आहे. कोणतेही हिंसात्मक कृत्य मला हल्ली सहनच होत नाही. एका बापाने आपली मुलगी लग्न करायला सतत नकार देते, लग्नाला तयारच होत नाही म्हणून तिचा खून केला. या संदर्भातील बातमी वाचून मला प्रंचंड मनस्ताप झाला. हल्ली मी प्रत्येक जीव हा  त्याचे त्याचे असे एक स्वतंत्र अस्तित्व राखून असतो असे मानायला लागलेलो आहे.  म्हणजे त्या बापाने त्या मुलीला जन्माला घातलेले असेल. तिला लहानाचे मोठे केले असेल.  तरी तो त्या मुलीचा मालक होत नाही. तिच्या आयुष्याबाबत लग्नासारखा महत्वाचा निर्णय तिच्या मर्जी विरुद्ध घेण्याचा अधिकार त्याला मिळत नाही. मला ती मुलगी त्या  घुशीसारखी वाटली जी नाहक मारली गेली होती. ही घुस जशी मला माझ्या दुकानात नको होती. तशी ती मुलगी बहुतेक तिच्या बापाला त्याच्या आयुष्यात त्याच्या घरात  नको होती. ती मुलगी ही कोणत्याही परिस्थितीत तिच्या बापाचे घर सोडायला तयार नव्हती. तिचा जीव गेला तरी. शेवटी तिच्या हट्टाने तिच्या बापाकडून अपघाताने का होईना तिचा जीव घेतला गेला. त्या मुलीने अगोदरच वेळ असता आपल्या बापाचे घर सोडून आपल्या विचारांसह स्वतंत्र आपल्या हिंमंतीवर जीवन जगायला सुरुवात करायला हवी होती. या बाबतीत माणसाला पक्षांकडून बोध घेता येतो. जोपर्यत पक्षांच्या पिल्लांच्या पंखात बळ येत नाही तोपर्यत त्या पिल्लांचे माता पिता त्यांना खाऊ घालतात पण त्यांच्या पंखात बळ येताच त्यांना घरट्यातून बाहेर हुसकावून लावतात, त्यानंतर त्याच्या आयुष्यात कधीही पुन्हा ढवळाढवळ करत नाहीत. माणसाने ह्यातून बोध घ्यायला हवा ! परदेशातील लोकांनी या सर्वातून बोध घेतलेला आहे पण भारतींयाना खासकरून मध्यमवर्गीय भारतीयांना ह्यातून अजूनही बोध घेता आलेला नाही. भारतीय माणुस आजही मान- मर्यादा अब्रु वगैरे गोष्टीत गुंतून पडलेला आहे. त्यातून तो जोपर्यत बाहेर पडत नाही आणि प्रत्येक व्यक्तीचा एक स्वतंत्र जीव म्हणून विचार करत नाही तोपर्यत हे असे प्रकार होत राहणार… एकीकडे स्त्री – पुरुष समानतेच्या वल्गना करायच्या आणि दुसरीकडे स्त्री म्हणजे आपल्या घराण्याची मान- मर्यादा अब्रु समजून तिच्यावर पुरुषांनी आपला मालकी हक्क दाखवत जीव घ्यायचा !  किती हा विरोधाभास ? मला व्यक्तीश: एका स्त्रीची तुलना घुशी सोबत करताना वाईट वाटत होते पण हेच एक भयाण वास्तव आहे आजही कितीतरी उच्चशिक्षित स्त्रिया त्यांना त्यांच्या समोरील सर्व दरवाजे मोकळे असताना, समोरचे मोकळे आकाश त्यांना खुणावत असतानाही त्या पुरुषांच्या वर्चस्वाखाली दबून राहतात. पण त्याच्या वर्चस्वाला नाकारून त्याच्या अन्यायाला न जुमानता बाहेर पडण्याची हिंमत करत नाहीत. अगदी समोरच्या पुरुषाकडून त्यांचा जीव घेण्याची शक्यता निर्माण झाली तरी.

त्या  घुशीला तसेच ठेवणे जर माझ्या दुकानासाठी उपद्रवी नसते तर मी तिला हुसकावण्याचाही प्रयत्न केला नसता. मला वाईट याचे वाटत होते की त्या घुशीला जरी माझ्या मामाने मारले असले तरी तिच्या मरणाला कोठेतरी मी ही जबाबदार होतो. पण तिच्या मरणाला ती ही तितकीच जबाबदार होती. कारण तिने अगोदरच तिने मरणे स्विकारले होते. तिला तिचा जीव वाचविण्याच्या अनेक संध्या असतानाही. एखाद्या  घुशीला कोणी मारणे ही काही मोठी घटना नव्हती. रोज अशा हजारो घुशी मारल्या जात असतील. पण त्यांना मारल्याचा माझ्या इतका विचार कोणी कधी स्वप्नातही केला नसेल. काही केल्या ती घुस आणि ती बापाने मारलेली मुलगी दोन्ही डोक्यातून जात नव्हत्या. कधी –   कधी  मला वाटते हल्ली मी जरा जास्तच हळवा झालेलो आहे की साधा झुरळ मारतानाही मला वाईट वाटते. कदाचित माझा प्रवास हिंसेकडून अहिंसेकडून सुरु झालेला आहे कदाचित तो तेंव्हाच सुरु झाला होता जेंव्हा वीस वर्षापुर्वी मी मांसाहार सोडून शाकाहारी झालो होतो…

लेखक : निलेश बामणे

Avatar
About निलेश बामणे 419 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..