गेल्या दहा हजार वर्षात … ( पूर्वार्ध )

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने । शब्दांचीच वस्त्रे यत्ने करू ।।
शब्दची आमुच्या जीवीचे जिवन । शब्द वाटे धन जनलोका ।।
तुका म्हणे पहा शब्दची देव । शब्देची गौरव पूजा करू ।।

— जगद्गुरू संत तुकाराम


हा लेख मराठीसृष्टी (www.marathisrushti.com) या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. लेख शेअर करायचा असल्यास लेखकाच्या नावासह शेवटपर्यंत संपूर्णपणे शेअर करावा...

” माझ्या मराठीचीया काय बोलू कौतुके, अमृताचीया पैजा जिंके ” अश्या शब्दात जिचा गौरव केला जातो, ती तुमची माझी मायबोली म्हणजेच मराठी. म्हणूनच असं म्हटलं जातं की ” लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, धर्म पंथ जात एक मानतो मराठी ” येथील भूमिपुत्राच्या नसानसांत रक्त बनून जर काही वाहत असेल तर ती माय मराठीच आहे.

मराठी साहित्य किंवा वाङ्मय हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे समाज जीवनाचे एक प्रतीक आहे.

या मराठी भाषा-भगवतीचा गौरव करताना अनेक साहित्यिकांनी वेगवेगळे साहित्य अलंकार तीला अर्पण केले आहेत. अश्याच अनेक साहित्यिकांपैकी एक ” दशसहस्त्रेषु ” खणखणीत नांव म्हणजेच ” प्रल्हाद केशव अत्रे ” अर्थातच ” आचार्य अत्रे “.

आचार्य अत्रेंबद्दल त्यांच्याच शैलीत सांगायचे झाले तर गेल्या दहा हजार वर्षात झाला नाही असा साहित्यिक म्हणजेच आचार्य अत्रे.

आपल्या लेखनातून, भाषणातून, पत्रकारितेतून महाराष्ट्राला खडबडून जागे करणाऱ्या त्या महान साहित्यिकांस त्रिवार वंदन.

आचार्य अत्रेंचा जन्म, १३ ऑगस्ट १८९८ रोजी,  पुणे जिल्ह्यातील सासवड गावांत झाला.

सौ.अन्नपूर्णा केशव अत्रे आणि श्री. केशव विनायक अत्रे  हे त्यांचे माता-पिता होत. त्यांचे घराणे आणि कुटुंब हे सुस्थापित आणि सुसंस्कृत घरांपैकी एक असेच प्रसिद्ध होते. लक्ष्मी आणि सरस्वती दोन्हीही अत्रेंच्या घरात एकाच वेळी नांदत होत्या. त्यांच्या वडलांचा गावांमध्ये चांगलाच दरारा होता असेही म्हटले जाते. आपल्या जन्मभूमी बद्दल सांगताना अत्रे लिहितात,

जीवनाचे हे विलक्षण वेड माझ्यामध्ये कसे आले लहानपणापासून निसर्गाची आणि  इतिहासाची मला सोबत मिळाली.

ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून उगम पावलेल्या कऱ्हेच्या काठी मी जन्माला आलो आणि तिच्याच अंगाखांद्यावर जेजुरीच्या खंडोबाच्या भंडाऱ्याने वाढलो. मोठा झालो. उशाशी शिवछत्रपतींचा पुरंदर किल्ला अष्टौप्रहर पहारा करी तर श्री. सोपानदेवांची भक्ती वीणा शेजारी सदैव वाजे.

खरेतर सासवड गांव  तसे पाहता एक साधे खेडे होते पण त्या साध्या खेड्याचे एवढे मार्मिक वर्णन अत्रेच करू जाणे. अर्थात ती त्यांची जन्मभूमी आहे त्यामुळे निश्चितच तिच्याबद्दल त्यांच्या भावना तीव्र असणे स्वाभाविकच आहे. परंतु अत्रेंचे एकंदरीतच लेखन हे तीव्रतेने भरलेले आहे. काहींना त्यामध्ये अतिशयोक्ती वाटत असली तरी एखादी भावना किंवा प्रसंग अगदी निश्चित तीव्रतेने मांडण्यात त्यांचा हातखंडा होता.

उदाहरणाचं द्यायचे तर ” अमुक एखाद्याच्या भरघोस यशाने विरोधक तोन्डावर पडलेअसे सरळमार्गी न लिहिता ” त्याच्या त्या महाविजयाने विरोधकांचे थोबाड फोडले ” अशी अगदी खणखणीत आणि सुस्पष्ट शब्द रचना करून त्या विजयाचे महत्व; अगदी थोडक्यात पण निश्चित तिव्रतेने सांगणे हे त्यांचे वैशिठ्य म्हणावे लागेल. म्हणूनच अत्रे म्हणजे अत्रंगी असे एक सूत्रच बनले आहे.

त्यांचा हा अत्रंगीपणा अगदी लहानपणापासून त्यांच्या स्वभावातच होता. एकदा लहानपणी त्यांनी आणि त्यांच्या मित्राने आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळींची विडी पिण्याची खोड मोडावी म्हणून, विडीमध्ये नकळत लवंगी फटाका लपवला होता. सवयीप्रमाणे जेंव्हा विडी पेटवली गेली तेंव्हा काय घडले असेल हे वाचकांनी स्वतःच कल्पना करून पहावे.

एक विनोदी लेखक, कवी म्हणून सुरु झालेला अत्रेंचा प्रवास, आक्रमक वक्ता, विडंबनकार, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, परीक्षक, चित्रपट पटकथा-संवाद लेखक आणि अखेर सयुंक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रेसर राजकारणी अश्या अनेक वळणावरून ४० वर्षे अविरत पणे सुरु राहिला.

महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनपटावर अत्रेंनी १९५४ साली काढलेला चित्रपट चांगलाच गाजला होता, त्याच प्रमाणे साने गुरुंजींची ” श्यामची आई ” चित्रपट स्वरूपात समाजासमोर आणण्याची करामत अत्रेंचीच होती.

अत्रे म्हटले त्यांचे भाषणातले विनोद आठवतात. आक्रमकतेतील विनोदीपणा आणि विनोदातली आक्रमकता हे असे चमत्कारीक मिश्रण त्यांच्या वक्तृत्वात होते.

अत्रेंची सभा म्हणजे हशा आणि टाळ्या यांचा महापूरच असे. त्यांचे भाषण सुरु असताना कोणी जर त्यांची टिंगल-टवाळी करायचा प्रयत्न केला तर त्याची काही खैर नसे, हजरजबाबी अत्रे त्याची अशी काही टर उडवत असत की टिंगल करणारा श्रोता तिथून पळून जाणेच योग्य समजे.

विनोद ज्याला कळतो ते राष्ट्र मोठं असतं ” असे अत्रे म्हणत असतं. त्यांना विनोदी शैलीचा वारसा श्रीपाद कृष्ण कोल्हटकर आणि राम गणेश गडकरी यांचे कडून मिळाला होता. या दोघांनाही ते आपल्या गुरुस्थानी मानत. अत्रेंचे साहित्य हे केवळ वाग्विलास नाही, त्यामध्ये कधी अप्पलपोटी खल प्रवृत्तीचे दर्शन घडवतात तर कधी देवभोळ्या लोंकाची होणारी फसवणूक दाखवतात.

साष्टांग नमस्कार ” या विडंबनात्मक विनोदी नाटकांपासून अत्रेंचा नाटककार म्हणून प्रवास सुरु झाला. या नाटकानंतर अत्रेंनी अनेक रेकॉर्ड ब्रेक नाटके लिहिली.

बुवा तेथे बाया या नाटकात त्यांनी एखाद्याच्‍या देवभोळेपणाचा फायदा उठविणारे लोक कसे ठगतात आणि तेही किती चतुराईने याची विनाोदी पद्धतीने मांडणी केली आहे. लग्नाचे वय टळून गेल्याने मागचा पुढचा विचार न करता जास्त चौकशी न करता, बाह्यतम दिखाऊपणाला भुलून मिळेल त्याचाशी लग्न करून, स्वतःचे आयुष्य बरबाद करून घेणाऱ्या मुली आणि त्यांचे कुटुंबियांच्या मूर्खपणाचा फायदा कसा घेतला जातो याचे वास्तववादी चित्रण ” तो मी नव्हेच ” या नाटकात दिसते. या नाटकातील नायक किंवा खलनायक लखोबा लोखंडे एवढा प्रसिद्ध झाला की कोणीही फसवणूक केल्यास त्याला लखोबा लोखंडे म्हणायचा प्रघात पडला.

ब्रह्मचारी नाटकात त्यांनी ढोंगीपणाचे केलेले विडंबन हे अखेर समाजाला अंतर्मुख होण्यास भाग पाडते. लग्नाची बेडी हे देखील असेच एक गंभीर विषयावरील विनोदी नाटक त्यामध्ये विवाह बाह्य संबंध; ज्याला एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर म्हटले जाते त्यावर प्रकाश टाकणारी कथा मोठ्या विनोदी पद्धतीने मांडली आहे. या  व अशी जवळ जवळ २५ नाटके अत्रेंनी लिहून महाराष्ट्राला खळखळून हसवले आहे आणि त्याच प्रमाणे प्रसंगी अंतर्मुख होण्यास भाग पाडले आहे.

झेंडूची फुले या विडंबनात्मक काव्य संग्राहातून कवींच्या कवितांचे विडंबन करताना, तात्कालीन तथाकथित कवींची येथेच्छ टिंगल देखील त्यांनी उडवली आहे.

भन्नाट विनोद बुद्धी असणाऱ्या अत्रेंनी शिक्षण क्षेत्रातही अशीच अफाट कामगिरी गेलेली आहे. तात्कालीन शालेय क्रमीक पुस्तकांचे रूप पालटून, विद्यार्थाना शालेय अभ्यासक्रमात रुची वाटेल अशी पुस्तके त्यांनी निर्माण केली आहेत. नवयुग वाचन माला आणि अरुण वाचन माला यांतील पुस्तके अगदी अलीकडच्या काळापर्यंत मार्गदर्शक ठरत आलेली आहेत. केवळ मराठीच नव्हे तर गुजराती भाषेतही असा अभिनव प्रयोग करणाऱ्या दिग्गजांमध्ये आचार्य अत्रेंचे नाव आहे. खरे तर ही वाचनमाला १९३४ सालाची परंतु आजही ती तितकीच काल सुसंगत आहे हे विशेष.

आचार्य अत्रे यांच्या साहित्याबद्दल अधिक माहिती पुढील भागामध्ये घेउ…

(क्रमश:)

— © श्रीपाद श्रीकांत रामदासी

Avatar
About श्रीपाद श्रीकांत रामदासी 6 Articles
मी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये नोकरी करतो. विविध प्रकारच्या लेखनाची आवड असून, चरित्रात्मक लेखनात विशेष रस आहे. काही कविता देखील केल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..