गीता दत्त

बांगला देशातील फरीदपूर मधील एका संगीतप्रेमी आणि संपन्न कुटुंबात जन्म, लहानपणीच पंडीत हीरेंद्रनाथ चौधरी यांच्याकडून संगीताची थोडीफार तालीम.

वयाच्या सोळाव्या वर्षी “भक्त प्रल्हाद” चित्रपटात प्रथम गायन केले. परिणामत: गायिका म्हणून तिला बरीच प्रसिध्दी मिळाली. पुढे १९५३ मध्ये गुरूदत्त यांच्याशी अयशस्वी विवाह, याची परिणिती, गायन थांबविणे!! याचा मानसिक त्रास आणि आजारपण. याला तोंड देतानाच अखेर २०.जुलै १९७२ मध्ये पंचत्वात विलीन.

सुरवातीलाच आपण या गायिकेच्या आवाजाचे थोडक्यात विश्लेषण करायला घेऊ. आवाज रागदारी संगीताची तालीम घेऊन वा मेहनत करून रूंद तसेच जड झालेला नाही. तिच्या आवाजात किंचीतसा कंप आहे पण तो जर थोडा अधिक असता तर तो दोष ठरला असता. ज्या प्रकारे  हा कंप तिच्या विविध गाण्यांत आला आहे, त्याचा परिणाम, तो आवाज समाधानकारक भावपूर्ण वाटतो. तिच्या सुरवातीच्या गीतांत थोडा बंगाली स्पर्श जाणवतो. उदाहरणार्थ “मेरा सुंदर सपना बीत गया” – या गीतात काहीसा गोल उच्चार व शेवटचा स्वरवर्ण लांबवण्याची प्रवृत्ती आढळते. अर्थात पुढे ती लकब नाहीशी झाली, हे फार चांगले झाले.

भावनापट आणि लगावांची विविधता:

गीता दत्तच्या आवाजात विस्तीर्ण भावनापटांची प्रतीती येते. एका असाधारण भावावस्थेसहीत येणाऱ्या आवाजाच्या लगावाकडे आपण प्रथम वळूया. विविधकृत्याशिवाय अवतरणाऱ्या बहुतेक भारतीय भक्ती आणि धर्म संगीतात या लगावाचा आढळ होतो असे सहजपणे म्हणता येईल. अशी गीतें साध्या चालींची, सरळ साध्या लयबंधांची आणि संहितेबाबत ठराविक असतात आणि तरीही त्यात अनेक गुंतागुंतीच्या जागा असतात. अशा रचनांमधील बांधणीत पुनरावृत्ती अधिक आढळते आपल्या सादरीकरणामधून ही गायिका बहुतेक प्रसंगी भावनिक अवस्थेस सहज आवाहन करू शकते – उदाहरणार्थ “आज सजन मोहे अंग लगाये” ( चित्रपट प्यासा). अशीच फसवी अलिप्तता “आन मिलो श्याम सांवरे” ( चित्रपट देवदास) या मन्नाडे बरोबर गायलेल्या गीतात ऐकायला मिळते. नेहमीची आणि ढोबळपणे वावरणारी भजनी भावपूर्णताही तिच्या गायनातून ऐकायला मिळते – घुंघट के पट खोल” (चित्रपट जोगन ) किंवा “तोरा मनवा क्यूँ घबराये” (चित्रपट साधना) या रचना ऐकाव्यात.

चित्रपटदृष्ट्या उपयुक्त असे इतरही काही भाव गीताच्या गायनात आढळतात. हात टेकल्याचा हताश भाव – “ठेहेरो जरासी देर” (चित्रपट सवेरा), काकुळतीचा आणि स्वीकार करणारा भाव – “वक्त ने किया (चित्रपट कागज के फूल), नाजूक आणि मृदू भाव – “हवा धीरे आना” (चित्रपट सुजाता) उत्साही आणि उसळी घेणारा भाव – “दो चमकती आँखों में” ( चित्रपट डिटेक्टीव), हलका फुलका आणि प्रेमपूर्वक खट्याळभाव – “कैसा जादू बालम तूने डाला” (चित्रपट १२ ओ क्लॉक), फक्त शब्दोच्चारात विनोदी व गायन नेहमीचे – ” ये है बॉंबे मेरी जान” (चित्रपट सी. आय. डी. ) तसेच “जाने क्या तुने कही” (चित्रपट प्यासा) हे गीत आशंका आणि प्रेमभरल्या भावनांचे आहे आणि अतिशय सौम्य तक्रारीच्या सुरांत गायले असल्याने, चटका लावून जाते. “साहेब बिबी और गुलाम” चित्रपटातील तिन्ही गाण्यांचा संक्षेपाने उल्लेख करायला हवा. १) “पिया ऐसो जिया में” – हे साधे गीत खेड्यातील वातावरणाचा गंध घेऊन येणाऱ्या स्त्री गीतांच्या वर्गात मोडेल. अशिक्षित आवाजाचे साधेपण गायनात आणून गीताची परिणामकारकता सुंदरपणे वाढवली आहे. २) “चले आओ” हे गीत पठण आणि गायन, या दोहोंचा अंतर्भाव करून उभे राहिले आहे. ३) “न जाओ सैंय्या” यात कारुण्य आणि शोक भाव सापडतात पण ते देखील अंतर्मुखी आणि व्याकुळ सुरात प्रगट होतात. मुद्दामून उल्लेख करण्याची बाब म्हणजे, ही तिन्ही गीते सादर करताना, आवाजात शहरी संस्कृतीचे गुण अजिबात ऐकायला मिळत नाहीत.

नाइट क्लब गीते:

चमकदार, उर्जायुक्त, किंचित प्रमाणात स्वरेलपणास बाहेर ढकलणारे आवाज आणि त्यांचे लगाव, ही अशा प्रकारच्या गाण्यांची खास लक्षणे म्हणता येतील. यात आणखी खास बाब म्हणजे आवाजाने मींड घ्यावी पण मान्य स्वरांतरांच्या मधल्या बिंदूंना हळूच स्पर्श करीत खाली यावे. तसेच आघातापूर्ण लयबद्ध गायन देखील अत्यावश्यक असते. त्यात आणखी भर घालायची झाल्यास, मुद्दामून बिघडवले उच्चार आणि शब्दांची अपभ्रंश फेक तसेच स्वरांत आवश्यक तितके आवाहकत्व जेणेकरून समोरच्याला नृत्य करण्यास प्रवृत्त करावे. या गायिकेने अशी गाणी फार सुरेखरीत्या गायली आहेत.

“सुनो गजर क्या गाये” (चित्रपट बाझी) हे सुरवातीच्या काळातील गीत. वास्तविक यात भूल घालण्याचे किंवा वशीकरण करण्याचे परिणाम स्पष्ट नाहीत पण पुढील विस्ताराच्या पाऊलखुणा आढळतात. “मेरा नाम चिन चिन चिन” (चित्रपट हावरा ब्रिज) “जाता कहां हैं दिवाने” (चित्रपट सी.आय.डी.) दुसऱ्या रचनेत मिस्कीलपणा आणि मुश्किलपणा देखील दिसून येतो. यात द्रुतगती तसेच वशीकरणासाठी योजलेल्या सुरावटीचा मादकपणा सांभाळायचा, अशी दुहेरी कसरत आहे.

सुश्राव्य आणि जुळवून घेणारी युगुलगीते:

सर्वसाधारणपणे युगुलगीते म्हणजे एक पुरुष आणि एक स्त्री स्वर – यांनी एकानंतर पद्धतीने किंवा एकत्रित पद्धतीने सादर केलेली गीतें. यात कधीकधी सामूहिक स्वरांचा देखील अंतर्भाव होतो. यातील वेधक बाब म्हणजे स्त्री आणि पुरुष एकमेकांना गुणवत्तापूर्ण प्रतिसाद देत असतात. अशा गायनात साधारणपणे तीन प्रकारचे प्रतिसाद दिलेले आढळतात.

१) “मुझको जो तुम मिले” (चित्रपट डिटेक्टीव) हेमंतकुमार आणि गीता दत्त यांनी सादर केलेली रचना. या गीतात लालित्यपूर्ण दादरा तालात दोघांनी सावरेल आणि किंचित कंपायमान आवाज लावले आहेत. याशिवाय आणखी सुंदर उदाहरण घ्यायचे झाल्यास, “ना ये चाँद होगा” (चित्रपट शर्त). सध्या चालीच्या या गीतात सफाईदार गायनाने प्रेमिकांची एकमेकांविषयी असलेली टिकाऊ प्रीती व्यक्त होते.

२) “तूने मेरा दिल ले लिया (चित्रपट शरारत) या गाण्यात किशोर कुमार आणि गीता दत्त यांनी मोकळेपणाने, काहीशा थिल्लर आवाजात आणि शब्दांती आंदोलित लगावाने गायले आहे. “दे भी चुके हम” (चित्रपट जाल) याही गीतात मौजमजा व्यक्त होते. या रचनेत शिट्टीचा स्वन, गद्यात उद्गार, सर्वप्रकारची हुंकारयुक्त फेक आणि इतर विशेषांनी कॉमिक वातावरणात भर टाकतात.

३) “दिल से दिल टकराया” ( चित्रपट लव्ह मॅरेज) गायक गीता दत्त आणि रफी. उच्चारण आणि प्रक्षेपण यांत नाट्यपूर्ण पद्धतीचा अवलंब करून गरीमायुक्त, दणदणीत आणि कारागिरीपूर्ण आविष्कारात असलेल्या तालांचे प्रक्षेपण असून सुरेख प्रतिसाद देतात.  असाच अनुभव “जाने कहा मेरा जिगर” आणि “उधर तुम हसीन हो” (चित्रपट मिस्टर अँड मिसेस ५५) या रचनांत आहे.

इतर प्रकारची परिणामकारक गीते: 

“बाबूजी धीरे चलना” आणि ” ये लो मैं हारी पिया” (चित्रपट आर पार) ही गाणी चमकदार आणि हलकेफुलके आहेत.  यांत रंगतदार उच्चारण आहे आणि ते देखील रंगतदार पद्धतीने केलेले आहे. आपल्या सुजाण अपभ्रंशातून गीता, गाण्यातील वाद्यमेळाला प्रतिसाद देते. “ठंडी हवा काली घटा” (चित्रपट मिस्टर अँड मिसेस ५५) हे गीत अपेक्षा निर्माण करणारे आहे. जास्त काही भावनात्मक न करता गीता दत्त शांत आणि आत्मविश्वासाने गीत उभे करते. “ऐ दिल मुझे बता दे” (चित्रपट भाई भाई) हे गीत, खेळकर वृत्तीने आतल्या प्रेमाला पाहणारे पण गंभीर अंतर्मुखतेने नव्हे. द्रुत गतीने हे गाणे पुढे चालत असते. “ला ला ला” सारखे स्वरहुंकार व्यवस्थितपणे सादर केले आहेत.

रागदारी पद्धतीची गाणी: 

रागदारी पद्धतीची गाणी कुठली हे तपासताना, एकूणच फारशी गाणी ऐकायला मिळत नाहीत. पण त्याकडे झुकाव असलेल्या काही रचना सापडतात. उदाहरणार्थ “देखो जादूभरे तोरे नैन” (चित्रपट आसमान) हे गीत द्रुत तीनतालात असून, गौडसारंग, तिलंग इत्यादी रागांच्या क्षेत्रांत स्वररचना फिरते. या रचनेत अनेक शास्त्रोक्त संगीतनियमांना नीटपणे बाजूला सारले आहे आणि ते कार्य गीता दत्तने समर्थपणे पार पाडले आहे. दुसरी एक रचना – “बाट चलत” (चित्रपट लडकी) – रचना थेट पारंपरिक भैरवी “बंदिश की ठुमरी” या अंगाने बांधली आहे. इथे मात्र सरगम गाताना चाचपडल्याची भावना होते.

खरे सांगायचे झाल्यास, गीता दत्त अशा प्रकारच्या गायनासाठी नव्हती हेच खरे आणि हीच तिच्या गळ्याची खरी मर्यादा.

— अनिल गोविलकर 

About अनिल गोविलकर 92 Articles
मी अनिल गोविलकर. उभरता लेखक असे म्हणता येईल. माझा ब्लॉग आहे – www.govilkaranil.blogspot.com ही वेबसाईट आहे. या वर्षी, माझ्या ब्लॉगला ABP माझा स्पर्धेत २रे पारितोषिक मिळाले आहे. तसेच "रागरंग" नावाचे पुस्तक – रागदारी संगीतावरील ललित आणि तांत्रिक, लेखांवर आधारित- प्रसिद्ध झाले आहे. मी १९९४ ते २०११, दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्ताने वास्तव्याला होतो. त्याचा परिणाम म्हणून त्या देशावरील ललित लेख – जवळपास ३५ ते ४० लेख लिहिले आहेत तसेच संगीतावर आधारित ( जागतिक स्तरावरील संगीत) १०० पेक्षा जास्त लेख लिहून झाले आहेत. काही आवडलेल्या पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत .

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

कोकणचा मेवा – फणस

प्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...

कोकणचा मेवा – जांभूळ

कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...

Loading…