नवीन लेखन...

गझल सम्राट – मदन मोहन

हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णयुगात एस डी बर्मन, नौशाद, ओ पी नय्यर, शंकर जयकिशन, रोशन, रवी, सी रामचंद्र,खय्याम आदि अनेक मातब्बर संगीतकार आपल्या एका पेक्षा एक सुंदर आणि श्रवणीय रचनांनी रसिकांना तृप्त करीत होते.त्या काळात संगीत हा चित्रपटाचा प्राण असायचा. केवळ चांगल्या संगीतावर चित्रपट चालत असत. प्रत्येक संगीतकाराची एक खासियत असायची. केवळ संगीतकाराचे नाव पाहून लोकं  चित्रपटाला गर्दी करत. त्यामुळे संगीतकाराचे स्थान खूप महत्वाचे होते. अशा स्पर्धेच्या  काळात हिंदी चित्रपट संगीत क्षेत्रात आपल्या अनोख्या संगीताचा ठसा उमटवणे सोपे नव्हते. अशा स्पर्धेच्या युगात मदन मोहन यांनी आपली संगीतकाराची कारकीर्द सुरु केली आणि अल्पावधीतच त्यांनी आपल्या अनोख्या अशा  संगीत रचनांनी रसिकांचे लक्ष वेधून घेतले. एक प्रथितयश संगीतकार म्हणून अल्पावधीत त्याचं नाव मोठ्या आदराने घेतलं जाऊ लागलं…..

मदन मोहन याचं संपूर्ण नाव मदन मोहन कोहली. त्यांचा जन्म २५ जुन  १९२४ ला इराक देशातील  बगदाद या शहरात झाला. त्यांचे  वडील श्री राय बहादूर चुनीलाल इराकी पोलीस खात्यात नोकरीला होते. मदन मोहन याचं बालपण या इराकी देशात गेलं. इराक स्वतंत्र झाल्यावर मदन मोहन यांचे वडीलांना इराकी नागरिकत्व घेण्याचा किंवा सरकारी नोकरी सोडून आपल्या मायदेशात म्हणजे भारतात परत जाण्याचा पर्याय देण्यात आला. मदन मोहन यांच्या वडिलांनी भारतात परतण्याचा पर्याय निवडला.

 मदन मोहन यांना  संगीताची प्रेरणा आपल्या आई भगवंती देवी यांचेकडून मिळाली. लहानपणी आपल्या घरातील ग्रामोफोन वर ते तासं तास गाणी ऐकत असत. लाहोर येथे मदन मोहन यांनी कर्तारसिंग यांच्याकडून थोडेस शास्त्रीय संगीताचे प्राथमिक ज्ञान  मिळवले खरे पण ते काही संगीताचे रेग्युलर शिक्षण नव्हते. त्यानंतर त्यांचे वडिलाबरोबर ते मुंबईत आले. त्यांच्या वडिलांनी फिल्मीस्तान व बॉम्बे टोकीज स्टुडीओ भागीदारी घेतली. मदन मोहन यांनी वयाच्या ११ व्या वर्षी मुंबई मधे All इंडिया रेडीओ वर मुलांच्या प्रोग्राम मधे परर्फोर्म करायला सुरवात केली. १९४३ साली त्यांनी आर्मी जॉईन केली आणि तिथे दोन वर्षे काम पण केले पण त्यांची संगीताची आवड आणि ओढ यामुळे त्यांनी ती नोकरी सोडून परत मुंबईला आले. सन १९४६ला त्यांनी All इंडिया रेडीओ, लखनौ, इथे प्रोग्राम असिस्टंट  म्हणुन कामाला सुरवात केली. तिथे त्यांच्या संपर्कात उस्ताद फैंयाझ खान, उस्ताद अली अकबर खान,बेगम अख्तर, तलत मेहमूद या संगीत क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती आल्या. त्यानंतर १९४७ साली  त्यांची बदली  AIR, New Delhi इथे झाली. त्या ठिकाणी त्यांनी काही गझल कंपोज केल्या.

खरतर मदन मोहन यांचे वडील फिल्मीस्तान व बॉम्बे टोकीज सारख्या स्टुडीओज मधे भागीदार होते त्यांना मदनजीना सहज ब्रेंक देता आला असता. पण त्यांनी तसे केले नाही. संगीतकार म्हणुन नावारूपाला येण्यासाठी मदन मोहन यांना स्ट्रगल करावा लागला. मदन मोहन यांनी कुठेही आपल्या वडिलांच्या नावाचा वापर न करता स्वतःच्या हिकमतीवर चित्रपट मिळवले आणि ज्येष्ठ संगीतकारांच्या यादीत नाव मिळवले. आपल्या कारकिर्दीच्या सुरवातीला १९४८ साली संगीतकार  गुलाम हैदर यांनी मदन मोहन यांना त्यांच्या ‘शहीद’ यां चित्रपटात गायक म्हणून संधी दिली त्यावेळी त्यांच्या सहगायिका होत्या विख्यात गायिका लता मंगेशकर मात्र हे गाणे चित्रपटात वापरले गेले नाही वा कुठे रिलीज झाले नाही. सन १९४९ मधे आलेल्या “दो भाई” या चित्रपटासाठी असिस्टंट मुझिक डायरेक्टर म्हणून काम केले त्याचे  संगीतकार होते  विख्यात संगीतकार एस डी बर्मन.

मदन मोहन यांनी आपल्या २५ वर्षांच्या कारकिर्दीत १०० हून अधिक चित्रपटांसाठी संगीत दिले. मदन मोहन यांनी संगीत दिलेला पहिला चित्रपट होता “आंखे” (१९५०) या चित्रपटाच्या संगीताने त्यांचे वडील खूप प्रभावित झाले आणी तू मोठा संगीतकार बनशील असा त्यांनी मदनजीना आशीर्वाद दिला.आपण आपल्या मुलाला संधी दिली नाही याची खंत त्यांना वाटत होती. त्यानंतर दोन वर्षातच मदनजीच्या वडिलांचे निधन झाले.

त्यांच्या पहिल्या चित्रपटासाठी विख्यात गायिका लता मंगेशकर यांनी गावे अशी त्यांची इच्छा होती पण ती पूर्ण होऊ शकले नाही. मात्र १९५१ साली आलेल्या ‘मदहोश’ या मदनजीनी संगीतबद्ध केलेल्या चित्रपटासाठी त्या प्रथम गायल्या आणि त्या मदन मोहन यांच्या संगीताने प्रभावित झाल्या. त्यानंतर लता मंगेशकर या मदन मोहन यांच्या लीड गायिका राहिल्या. त्यांनी मदन मोहन यांच्या स्वर रचनांना योग्य न्याय दिला आणि या जोडीने दीर्घ काळ रसिकांना अनोखा आनंद दिला.

राज कपूर यांची भूमिका असलेला   ‘आशियाना’ (१९५२) या चित्रपटाला संगीत देण्याची संधी मदन मोहन यांना मिळाली. दुर्दैवाने चित्रपट यशस्वी होऊ शकला नाही पण  राज कपूर यांनी चित्रपटाच्या संगीताबद्दल मदन मोहन यांची खूप तारीफ केली होती. यानंतर आलेल्या ‘निर्मोही’ (१९५२), ‘बाघी’ (१९५३), ‘धून’ (१९५३), ‘मस्ताना’ (१९५४), ‘रेल्वे प्लेटफॉर्म’(१९५५), ‘भाई भाई’ (१९५६) हे चित्रपट यशस्वी ठरले आणि मदनजी यांच्या संगीताचा प्रभाव जाणवू लागला.

१९५७ साली आलेल्या ‘देख कबीर रोया’ या चित्रपटातील गाण्यांनी मदन मोहन खूप प्रकाशात आले ‘हमसे आया ना गया’ (तलत),  ‘तू प्यार करे या ठुकरा रे’ (लता), ‘कौन आया मेरे मन के’ (मन्नाडे) अशी एका पेक्षा एक सरस गाण्यांची बरसात या चित्रपटातुन मदन मोहन यांनी केली. त्या पाठोपाठ आलेल्या “अदालत” या चित्रपटातील गाण्यांनी मदन मोहन यांच्या संगीताची एक वेगळीच झलक रसिकांना बघायला मिळाली. यातील गाणी आठवून बघा ‘जमी से हमे आसमा तक’ (आशा/रफी), ‘यु हसरतोंका दाग’ (लता),‘जा ना था हमसे दूर’ (लता). या गाण्यांमधून मदन मोहन यांच्या संगीताच्या वेगळेपणाची रसिकांना जाणीव झाली आणि त्यांना एका पाठो पाठ चित्रपट मिळू लागले.

त्यानंतर आलेला ‘संजोग’ (१९६१) असाच म्युझिकल हिट होता. त्यातली ‘वो भुली दास्ता’ (लता), ‘भुली  हुई यादोने’ (मुकेश) ही गाणी खूप गाजली. ‘संजोग’ पाठोपाठ आलेल्या ‘अनपढ’ (१९६२), ‘मनमौजी’  (१९६२), ‘आप की परछाईयां’ (१९६४), ‘गझल’ (१९६४) या चित्रपटाद्वारे मदन मोहन यांच्या संगीतात होणारा बदल लोकांना जाणवला. १९६४ साल हे मदनजी यांच्या कारकिर्दीतील सुवर्ण वर्ष होत. या वर्षात मदन मोहन यांनी संगीत बद्ध केलेले तब्बल ८ चित्रपट प्रकाशित झाले. ते म्हणजे ‘आप की परछाईयां’, ‘गझल’ ‘हकीगत’ जहां आरा’,’पूजा के फुल’, ‘शराबी’, ‘सुहागन’, ‘वह कौन थी’ या सर्व चित्रपटातील गाणी म्हणजे रसिकांना  एक पर्वणी होती. अस म्हटलं  जातं की ‘वह कौन थी’ या चित्रपटातील ‘नैना बरसे रिम झिम झिम’  ही धून त्यांना १२ वर्षापूर्वीच सुचली होती पण त्यासाठी ते योग्य चित्रपट आणि योग्य सिच्युएशन ची वाट पहात होते ‘वह कौन थी’ च्या निमित्ताने ती त्यांना मिळाली. या चित्रपटातील  ‘आप क्यु रोये’ आणि ‘लग जा गले’  ही लताची गाणी पण माइल स्टोन होती. ‘हकीगत’ या फिल्म मधील ‘होके मजबूर मुझे उसने भुलाया होगा’ या गाण्यासाठी त्यांनी रफी, तलत, मन्नाडे आणि भूपेंद्र या चार मातब्बर गायकांचे आवाज वापरले. यातील ‘जरा सी आहट है (लता), कर चले हम फिदा (रफी) ही गाणी पण खुप गाजली.

या नंतर मदन मोहन यांनी संगीत दिलेले ‘रिश्ते नाते’ (१९६५),’नीला आकाश’ (१९६५), ‘दुल्हन एक रात की’ (१९६६), ‘मेरा साया’ (१९६६) आणि ‘नौनिहाल’ (१९६७) हे चित्रपट.   तुम्हारी झुल्फ के साये मे शाम’ हे रफी चे ‘नौनिहाल’ मधील गीत.’तेरे पास आके मेरा वक्त गुजर जाता है’ हे  रफी/आशा यांचे ‘नीला आकाश’ मधले युगल गीत. ‘झुमका गिरा रे’ (आशा), ‘नयनो  मे बदरा छाये’ (लता) ‘आप के पेहेलू मे’ (रफी) ही मेरा साया मधील गाणी आजही खूप आनंद देतात. या सर्व चित्रपटांनी मिळवलेल्या यशाने मदन मोहन यांचे नाव हिंदी चित्रपट सृष्टीत गाजू लागले.

त्यानंतर ‘चिराग’ (१९६९), ‘दस्तक’ (१९७०), हीर रांझा (१९७०) बावर्ची (१९७२) ‘हसते जख्म’ (१९७३), ‘मौसम’ (१९७५) हे मदन मोहन यांचे संगीताने गाजलेले चित्रपट. ‘तेरी आंखो के सिवा दुनिया मे’ हे रफीने गायलेले ‘चिराग’ या चित्रपटातील  गीत,  ‘बैया ना धरो बलमा’ हे लताचे ‘दस्तक’ या चित्रपटातले गीत, ‘तुम बिन जीवन’ हे मन्नाडे यांनी गायलेले ‘बावर्ची’ या चित्रपटातील गीत ही सर्व गाणी म्हणजे मदन मोहन यांची अजरामर कलाकृती आहे.

मदन मोहन यांनी शास्त्रीय संगीताचा खूप चांगला वापर आपली गाण्यातून केला. ‘कौन आया मेरे मन के’ हे मन्नाडे यांनी गायिलेले हे ‘देख कबीरा रोया’ मधील गीत रागेश्री रागावर आधारित आहे . मेरा साया मधील लतानी गायलेली ‘तू जहां” (राग नंद), नयनो मे बदरा (राग  भीमपलास), आप की पहेलू मी हे रफीचे गीत (राग मिश्र पिलू),  ‘बावर्ची’ चित्रपटातील मन्नाडे यांचे ‘तुम बिन जीवन’ (राग रागेश्री)  अशी काही निवडक गाणी आहेत.

त्याचप्रमाणे आपल्या संगीतातून गझल हा संगीत प्रकार खूप समर्थ पणे वापरला. त्यांना ‘गझल सम्राट’ असे संबोधल्यास ते योग्य ठरेल. ‘रस्मे उल्फत को निभाना’ ही लताने गायलेली ‘गझल ‘मधुवंती’ रागामधे त्यांनी कंपोज केली आहे तर   ‘रंग और नूर की’ हो रफीने गायलेली गझल ‘शिवरंजनी’ रागात आहे.

मेलडी हा गाण्याचा आत्मा आहे असे त्यांचे म्हणणे होते आणि त्यांची गाणी ऐकताना याची प्रचीती येते.त्यांच्या स्वर रचना ह्या अनोख्या आहेत चालींचे माधुर्य आपल्याला वेगळाच आनंद देऊन जाते. त्यामुळे त्यांची गाणी लोकांच्या मनावर ठसत आणि गुण गुणली जात.

विख्यात गायिका लता मंगेशकर यांनी त्यांच्या कडे सर्वात ज्यास्त गाणी गायिली. मदनजी यांचे कंपोझिशन आणि लता यांचा स्वर म्हणजे रसिकांसाठी दुग्ध शर्करा योग होता. ज्याप्रमाणे ओ पी नय्यर यांची रचना आशा भोसले यांच्या आवाजात एक अनोखा आनंद देऊन जाते तसाच अनुभव मदनजी यांचे कंपोझिशन लताच्या आवाजात ऐकताना येतो. मेल सिंगर मधे मोहमंद रफी याला मदन मोहन यानी खूप संधी दिली आणि रफीने पण त्यांच्या कंपोझिशनना योग्य न्याय दिला.

मदन मोहन यांनी स्वरबद्ध केलेल्या चित्रपटातील काही निवडक रचना खाली दिल्या आहेत.

गीताचे बोल गायक/गायिका चित्रपट
देख तेरे भगवान की हालत रफी रेल्वे प्लेटफॉर्म
चांद मधम है अस्मा चूप है लता रेल्वे प्लेटफॉर्म
ए दिल मुझे बता दे गीता दत्त भाई भाई
कौन आया मेरे मन के मन्नाडे देख कबीर रोया
तू प्यार करे या ठुकरा रे लता देख कबीर रोया
बैरन हो मन्नाडे देख कबीर रोया
हमसे आया ना गया तलत देख कबीर रोया
दो घडी वो जो पास रफी/लता गेट वे ऑफ इंडिया
तुझे क्या सुनाऊ ए दिलरुबा रफी आखरी डाव
जमी से हमे आसमा तक रफी/आशा अदालत
यु हसरतोंका दाग लता अदालत
जा ना था हमसे दूर लता अदालत
वो भुली दास्ता लता संजोग
भुली हुई यादोने मुकेश  संजोग
जिया ले गयो लता  अनपढ
आप की नजरोने लता अनपढ
जरुरत है जरुरत है किशोरकुमार मनमौजी
अगर मुझसे मोहोबत है लता आप की परछाईयां
मै निगाहे तेरे चेहरेसे रफी आप की परछाईयां
यही है तमन्ना रफी आप की परछाईयां
रंग और नूर की बारात रफी गझल
नगमा और शेर की लता गझल
जरा सी आहट लता हकीगत
अब तुम्हारे हवाले वतन साथियो रफी हकीगत
फिर वोही शाम तलत जहां आरा
तू मेरे सामने है रफी सुहागन
नैना बरसे रिम झिम लता वह कौन थी
आप क्यु रोये लता वह कौन थी
लग जा गले लता वह कौन थी
तेरे पास आके रफी/आशा नीला आकाश
आप को प्यार छुपाने की रफी/आशा नीला आकाश
झुमका गिरा रे आशा मेरा साया
तू जहां लता मेरा साया
नयनो मे बदरा छाये लता मेरा साया
आप के पेहेलू मे रफी मेरा साया
यु रूठों ना हसीना रफी निंद हमारी ख्वाब तुम्हारे
तुम्हारी झुल्फ के साये मे शाम रफी नौनिहाल
न तुम बेवफा हो लता एक कलि  मुसकाई
तेरी आंखो के सिवा दुनियामे रफी चिराग
माई रे मै कासे कहु लता दस्तक
बैया ना धरो बलमा लता दस्तक
ये दुनिया ये मेहफिल रफी हीर रांझा
मिलो न तुम तो हम घबरायेंगे लता हीर रांझा
तुम बिन जीवन मन्नाडे बावर्ची
भोर आई गया किशोर/मन्नाडे बावर्ची
तुम जो मिल गये हो रफी हसते जख्म
आज सोचा तो आंसू लता हसते जख्म
रस्मे उल्फत को निभाना लता दिल की राहे
रुके रुके से कदम लता मौसम
दिल धुंडता है भूपेंद्र मौसम
तेरे दरपे आया हू रफी लैला मजनू

 

या व्यतिरिक्त अजून अनेक प्रसिद्ध गाणी असतील जी इथे द्यायची राहू  गेली असतील कारण मदन मोहन यांच्या संगीताचा मागोवा घेणे हे काही सोपे काम नाही.

‘राजा मेहेदी अली खान’ या गीतकाराने मदन मोहन यांच्या पहिल्या चित्रपटासाठी गाणी लिहिली होती. त्यानंतर मदन मोहन यांनी त्यांना त्यांच्या अनेक चित्रपटात गीतकार म्हणुन संधी दिली. मदन मोहन यांनी ‘राजिंदर क्रिष्ण’, ‘हसरत जयपुरी’, ‘कैफी आझमी’ आणि ‘साहीर लुधियानवी’  आदि अनेक मातब्बर गीतकारांबरोबर काम केले.

मदन मोहन यांना  १९७१ साली आलेल्या ‘दस्तक’ चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ठ संगीतकार हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.मदन मोहन यांना “अनपढ” ‘वह  कौन थी’ आणि ‘मौसम’ या चित्रपटांच्या संगीतासाठी फिल्मफेर अवार्ड साठी नॉमिनेट केले होते पण दुर्दैवाने त्यांना फिल्म फेअर अवार्ड मिळाले नाही. इतकी उत्कृष्ठ गाणी देऊन तब्बल २५ वर्षे आपल्या संगीताने रसिकांना तृप्त करणाऱ्या या गुणी कलाकाराला अखेरपर्यंत ‘फिल्म फेअर अवार्ड’ मिळू नये हे दुर्दैवच.

मदन मोहन यांचा विवाह शीला धिंगरा (फ्रीडम फायटर मदनलाल धिंगरा यांची पुतणी) हिच्याबरोबर १९५३ साली झाला. मदनजी याना एक मुलगी (संगीता) व दोन मुलगे होते (संजीव आणि समीर). मदन मोहन हे अत्यंत भावना प्रधान होते. त्यांच्या बरोबर काम करणारया सर्वांशी ते खूप आपुलकीने वागत. ते खूप स्वाभिमानी होते  त्यांना क्रिकेट, हॉकी,फुटबौल, बिलियर्डस आदि खेळात रुची होती. हार्मोनियम व पियानो ही वाद्ये ते सफाईने वाजवीत. सतार हे पण त्यांचे खूप आवडते वाद्य होते त्याचा खूप चांगला वापर त्यांनी आपल्या संगीतातून केला.

या महान गायकाचा मृत्यु १४ जुलै १९७५ साली त्यांच्या वयाच्या अवघ्या ५१ व्या वर्षी लिव्हरसंबधित आजाराने  मुंबई येथे झाला. त्यांच्या या अकाली मृत्यूने सर्व रसिक आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती हळ हळल्या.

मदन मोहन यांच्या अकाली मृत्युनंतर त्यांच्या मुलाने संजीव कोहली याने यश चोप्रा यांच्या ‘वीर झारा’ या फिल्म साठी मदन मोहन यांच्या धून वापरल्या. त्याची गीते जावेद अख्तर यांनी लिहिली होती आणि यातील बरीच गाणी लता मंगेशकर यांनी गायिली होती. या चित्रपटात शहारुख खान, प्रीती झिंटा आणि राणी मुखर्जी यांच्या भूमिका होत्या. चित्रपटाच्या संगीताची सर्वांनी तारीफ केली एवढंच नव्हे त्या फिल्मने अनेक पुरस्कार पण मिळवले.

मदन मोहन आज आपल्यात नसतील पण त्यांनी निर्माण केलेल्या अजरामर अशा रचना आजही रसिकांना खूप आनंद देऊन जातात परत परत ऐकाव्याशा वाटतात.

(वरील लेखासाठी संबधित वेब साईटचा आधार घेतला आहे).

— विलास गोरे

Avatar
About विलास गोरे 17 Articles
मी आय डी बी आय बँकेत एन पी ए विभागात (कर्ज वसुली) व्यवस्थापक पदावर काम करतो, मला ३५ वर्षाहून अधिक काळ बँकेच्या विविध विभागात काम करण्याचा अनुभव आहे, मी कॉमर्स पदवीधर असून कायद्याचा अभ्यास पण पूर्ण केला आहे (B, COM , L L B). मी शेअर मार्केट मध्ये नियमित गुंतवणूक करतो व शेअर मार्केट व इतर investment चा मला २५ वर्षाहून अधिक अनुभव आहे. मला हिंदी चित्रपट संगीत, मराठी साहित्य, किल्ल्यांवर भटकंती तसेच इतर पर्यटन याची आवड आहे.मी काही कथा , लेख,व्यक्तिचित्रण लिहू इच्छितो.
Contact: YouTube

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..