नवीन लेखन...

गणेशोत्सव २०२३ – गणपती बाप्पा मोरया!

नारायणाच्या अंगात जसं लग्न संचारत ना तसं माझ्या अंगात गणेशोत्सव संचारतो. एरवी सण- सनावळीच्या बाबतीत निष्क्रीय किंवा अजगरासारखी सुस्तावलेली मी, गणेश चतुर्थी तोंडावर आली की कुठून हरिणाची चपळता आणि उत्साह येतो अंगात हे त्या गणोबालाच माहीत! प्रत्येक मराठी माणसाच्या अंगात हा उत्साह संचारतो. वीरश्री संचारणे ह्या अर्थी गणेशोत्सवसाठी पण संचारावा लागतो. अनेक आघाड्या बेमालूमपणे सांभाळण्यासाठी ते आवश्यक आहे.

तमाम बायका मंडळींना तडतड, चिडचिड, बडबड करण्याचा जन्मसिद्ध हक्क विधात्याने आधीच बहाल केला आहे. पण ह्या काळात त्या सर्व हक्कांना स्थगिती देऊन तोंडात खडीसाखर , डोक्यावर बर्फाची लादी आणि हातात लोण्याचा गोळा घेऊन काम करण्याचे आणि करवून घेण्याचे कसाब अंगी भिनवावे लागते.

सुरवातच, २४ तासातला अर्धा तास द्या मला…अशी अशक्य कोटितली मागणी नवरोबा कडे करावी लागते. नवरा देखील एक वेळ आकाशातला चंद्र आणून देतो पण वेळ नाही देऊ शकत अशी वाक्ये फेकून आपल्या डोक्यावरच्या बर्फाच्या लादीच तापमान वाढवतो. वरती ही विशेष टिपण्णी की, दर वर्षी करतेस ना तू, मग त्याप्रमाणे यादी कर, प्लॅनिंग कर, आणि आण काय सामान आणायचं आहे ते…ही वाक्ये आपल्या तोंडातल्या खडीसाखरेवर जहाल तिखट फेकतात.मग सांगा बरं, ती बर्फाची लादी आणि खडीसाखर दोघी बिचाऱ्या किती टिकाव धरणार? अरे, सण काय माझ्या एकटीचा आहे का? अशी स्पष्ट नाराजी व्यक्त केली की जरा मवाळपणाचे धोरण घेतात. मी कधी अडवले आहे का? तू सांग काय करायचं? काय आणायचं मी आणतो आणि करतो.

तिथे नवरोबाने पण सावध पवित्रा घेतलेला असतो. शेवटी ही हिच्या मनाचच करणार मग आपण कशाला मध्ये पडा! गडबड झाली तर प्रकरण आपल्यावर शेकायच.

अशी पडत्या फळाची आज्ञा मिळताच बायको तयारच असते. तिने मागच्या वर्षीची यादी सांभाळून ठेवलेली असते. मागच्या वर्षी झालेली गडबड किंवा गल्लत मधून शिकून त्या यादीवर फेरफार केलेले असतात. दर वर्षी काही तरी नवीन भर किंवा खाडाखोड असतेच.पण यादी तीच जुनी असते. त्या खाडाखोड आकडेमोड आणि सूची दर्शक बाणाची चिन्हे सांभाळून यादी वाचणे हे म्हणजे समुद्रात सुई शोधणे. नवरा शरणागती पत्करत बायकोलाच वाचायला लावतो. तीही सराईतासरखे भराभर वाचते..आदल्या आठवड्यातली कामे, आदल्या दिवशीची कामे, पूजा सामान यादी, ५ दिवसांचे पाच जेवणे पदार्थ, त्याच समान, रोजचा सकाळ संध्याकाळचा नेवेद्य… विसर्जनासाठी लागणारी वाटणी/कैरी डाळ, खडीसाखर, कानावला, दही पोहे पुरचुंडी सगळा बारीक सारीक तपशील तिच्या डोक्यात असतो आणि त्याप्रमाणे ती त्या कागदावर वाचत असते आणि स्वतःशीच बोलून काही बदल करत असते. सर्व संपवून ती जेंव्हा डोकं वर उचलते, तेंव्हा नवरा मोबाईलवर बघत नुसतच हां हां म्हणत असतो. संपली यादी आता थांबावं तुझ मान डोलावण. परत डोक्यावरच्या लादीच तापमान वाढत.पण ह्या वेळेस तिला त्याच्या फार सूचना नकोच असतात. तीच प्लॅनिंग ठरलेलं असतं.फक्त त्याला सांगितलं हे मानसिक समाधान. हे झालं रे, मुळात आरास काय करूयात.

आता चिरंजीव संभाषणात उडी घेतात. अति उत्साहात, आई हे करू, ते करू. ‘अरे सोप्प नाहीये ते, आणि तेवढा वेळही नाहीये.अशी शब्दिक चकमक ही होते. शेवटी मुलाच्या हट्टापुढे आई नमत घेते आणि बाबा आणि तू ठरवा असं म्हणत शस्त्रे खाली ठेवते.
बाबांना माहीत असते कोणी ही कितीही उड्या मारल्या तरी शेवटी आरासीचे काम आपल्याच गळ्यात पडणार.

एकदा का आरास आणि याद्यांची उजळणी झाली की मग खऱ्या लढाईला सुरुवात होते आणि कामाचे स्फुरण चढते. मग १५ दिवस आधी सगळे सर्व्हिसिंग वाले, एसी सर्व्हिसिंग, वॉटर फिल्टर सर्व्हिसिंग, पेस्ट कंट्रोल असे सर्वजण येऊन घर खराब करून गेले की, घर साफ सफाई, रद्दी काढणे, स्वयंपाक घर आवरणे, मोठे डबे रिकामे करून घासून पुसून ठेवणे, पूजेच्या सामानाची तयारी करणे, कोरडी तयारी, खोबरं किसणे, रवा, बेसन, खसखस भाजून ठेवणे, वाण सामान आणून कुठल्या दिवशी काय लागेल त्याप्रमाणे कपाटात अरेंज करणे. एका वेळी, अनेक आघाड्यांवर तोंड देण्यासाठी गणेशोत्सव असा संचारावाच लागतो. हा हा म्हणता बाप्पा येण्याचा दिवस ८ दिवसांवर येऊन उभा राहतो. बाप रे, अजून आरास काहीच झाली नाहीये, कसं होणार आपलं असं म्हणत आरासीच्या मागे लागणे.आणि सालाबाद प्रमाणे ह्या वर्षी काही खरं नाही आपलं, बाप्पा नीट सगळं करवून घे रे! असं म्हणतं देवाला आर्त साकडे घातले जाते आणि तो ही तितक्याच प्रेमाने प्रतिसाद देत आपल्याला दहा हत्तींच बळ देत आपली नाव पार करतो. हाच उत्साह अगदी शेवटच्या दिवसापर्यंत टिकतो. एरवी कलेशी वाकडं असल तरी कलाधिपतीसाठी आरास करताना अनेक नवीन क्लृप्त्या अचानक सुचून सरते शेवटी देखणी आरास गणेश आगमनाच्या आधी तयार होते. ह्याचे सर्व श्रेय त्या विघ्नहर्त्याला! मग प्राणप्रतिष्ठा, मोदकाचा नैवेद्य, रोज वेगवेगळे प्रसाद, लोकांची उत्साहाने सरबराई, आरती, स्तोत्रे, अथर्वशीर्ष, अभिषेक ह्या सगळ्यात ४-५ दिवस कसे भुरकन उडून जातात. आता डोक्यावरच्या बर्फाच्या लादीचा, तोंडातल्या खडी साखरेचा आपल्याला विसर पडलेला असतो किंबहुना गरजही नसते. कारण सगळं घरचं आनंदमय झालेलं असतं.

विसर्जनाचा दिवस उजाडतो.हात लोण्याचा मृदुलतेने, खिन्न मनाने लाडक्या बाप्पासाठी ह्या वर्षीचे शेवटचे मोदक वळत असतात. तोंडातली खडीसाखर विरघळलेली असते आणि तोंडातून एक शब्द फुटत नसतो. डोक्यावरची बर्फाची वितळलेली लादी आता डोळ्यातून वहात असते. इतक्या दिवसांची गडबड आता संपणार असते. बाप्पा आपल्या घरी जाऊन पुढच्या वर्षी परत येणार असतो.
आता बर्फाची लादी, खडीसाखर ह्यांची गरज नसते.कारण बाप्पा जाताना घर, मान, चित्त समाधानाने आणि शांततेने भरून जातो.

– यशश्री पाटील
१२-०९-२०२३

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..