नवीन लेखन...

फ्रेश वॉटर

दुपारी बारा वाजल्यानंतर जहाजावरुन कंपनीला नून रिपोर्ट पाठवला जातो. मागील चोवीस तासात जहाजावर वापरलेले इंधन ,पाणी आणि जहाजाने कापलेले अंतर अशा बऱ्याच गोष्टींची माहिती कंपनीला दिली जाते. दुपारी दोन वाजता चीफ इंजिनियर ने शिप्स ऑफिस मधून खाली इंजिन कंट्रोल रूम मध्ये फोन केला. फ्रेश वॉटर टँक ची लेव्हल चेक करून रिपोर्ट करायला सांगितले. लेव्हल पाहिल्यानंतर त्याला कळवले असता सुरवातीला तो चिडून बोलला म्हणाला पाण्याचे कंझप्शन किती झालय ते तुमच्यापैकी कोणाच्या लक्षात कसे आले नाही. कालच्या चोवीस तासात पन्नास टन पाणी जास्त गेलंय प्रत्येक चार तासांनी रिडींग घेता तेव्हा कळलं कसं नाही कोणाला . जहाजावर बॉयलर साठी आणि डोमेस्टिक म्हणजे केबिन आणि गॅली म्हणजेच किचन साठी असं एकत्र मिळून अठरा ते वीस टन म्हणजे साधारण 20 हजार लिटर गोडे पाणी वापरले जाते. काल दुपारी बारा वाजल्यापासून आज दुपारी बारा वाजेपर्यंत सुमारे 70 टन म्हणजे 70 हजार लिटर पाणी वापरले गेले.

जहाजावर समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी बनवले जाते हे पाणी गोडे असल्याने वर्षभरात साठवलेले असले तरी त्याला जहाजावर फ्रेश वॉटर असे बोलले जाते . जहाजावर सी वॉटर आणि फ्रेश वॉटर अशा दोन वेगवेगळया सिस्टिम असतात. फ्रेश वॉटर म्हणजेच डिस्टिल्ड वॉटर जे समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून बाष्पीभवन प्रक्रियेने बनवले जाते ते बॉयलर साठी आणि केबिन मध्ये आंघोळ व मशीन मध्ये कपडे धुण्यासाठी वापरले जाते तसेच याच डिस्टिल्ड वॉटरला मिनरलायझेशन युनिट मध्ये मिनरल्स अॅड करून पिण्यासाठी वापरले जाते. जहाजावर साधारण पणे 1000 टन म्हणजेच 10,00,000 लिटर्स फ्रेश वॉटर राहील अशा दोन किंवा त्यापेक्षा जास्त टाक्या असतात. फ्रेश वॉटर जनरेटर म्हणजेच खाऱ्या पाण्यापासून डिस्टिल्ड वॉटर बनवणारा प्लांट हा इंजिन सुरू असताना त्याच्या पासून निर्माण होणाऱ्या उष्णतेवर खाऱ्या पाण्याचे बाष्पीभवन करण्याचे काम करत असतो. अशा प्लांट ची कॅपॅसिटी ही रोजच्या वापरा पेक्षा नेहमी दुप्पट असते. कारण जहाजाचे इंजिन बंद असताना फ्रेश वॉटर जनेरेटर सुध्दा बंद असल्याने जहाजावर तेवढे दिवस पाणी पुरे पडू शकेल यासाठी पुरेसा साठा करून ठेवता येणे गरजेचे असते.

पन्नास हजार लिटर पाणी वाया गेले होते त्यामुळे आमच्या सर्व इंजिनियर्स च्या तोंडचे पाणी पळाले. चीफ इंजिनियर खाली आला. पाणी गेले कुठे सगळ्यांची शोधा शोध सुरू झाली. ज्या ज्या सिस्टिम मध्ये फ्रेश वॉटर कुलिंग आहे त्या सर्व तपासून बघितल्या तीन चार तास झाले पण कुठे काही सापडेना. ज्युनियर इंजिनिअर येऊन सांगू लागला, डोमेस्टिक वॉटर सप्लाय पंप एकसारखा चालू बंद होत आहे. नॉर्मली एकदा बंद झाल्यावर कमीतकमी आठ ते दहा मिनिटांनी सप्लाय प्रेशर कमी झाले की डोमेस्टिक पंप ऑटोमॅटिक ली चालू होतो व दोन ते तीन मिनिटात बंद होतो. पण सध्या तो दहा मिनिटे चालू राहून काही सेकंदात बंद होत असल्याची माहिती ज्युनियर इंजिनियर ने दिली. ताबडतोब पंप बंद करण्यात आला. संध्याकाळचे सहा वाजले असल्याने आंघोळ करण्यासाठी डोमेस्टिक वॉटर चालू करावे लागणार होते. चीफ इंजिनिअर ने एक तास पंप चालू ठेवायला सांगितले आणि बंद केल्यावर पाण्याच्या टाकीवर लक्ष ठेवून लेव्हल दर तीस मिनिटांनी लिहून ठेवायला सांगितली. पंप बंद केल्यापासून पाणी जायचे बंद झाले. त्यामुळे सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला व सगळे शांतपणे झोपायला गेले. एकदम एवढे पाणी कुठून आणि कसे गेले याचा प्रत्येक जण विचार करत होते. कोणाच्या केबिन मध्ये चुकून नळ वगैरे बंद करायचा राहून गेला असेल वाटले. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता पुन्हा पंप चालू करून अनाउन्समेंट केली की प्रत्येकाने आपापल्या केबिन मधील नळ बंद आहेत की नाही याची खात्री करून घ्यावी. चीफ इंजिनियर ने पाण्याच्या टाकिसह सप्लाय पंप वर सुध्दा लक्ष ठेवायला सांगितले. त्यादिवशी संध्याकाळी आणि रात्री दहा पर्यन्त सगळं ठीक होतं. दहा ते अकरा तासाभराचा राऊंड घेतल्यानंतर इंजिन रूम मध्ये कोणी नसल्याने जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता पाण्याची लेव्हल बघितली तर पुन्हा एकदा खूप मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेल्याचे आढळून आले. सप्लाय पंप सुध्दा एक सारखा चालू बंद होत होता. चीफ इंजिनियरला फोन करून ही गोष्ट सांगितली तो म्हणाला कोणाला काही बोलू नकोस मी कळवतो तुला तू खालीच थांब. पाच मिनिटांनी अनाउन्समेंट झाली की सगळ्यांना मीटिंग साठी कॅप्टन ने ब्रिजवर बोलावले आहे. चीफ इंजिनियर ने फोन केला की तू मीटिंगला जाऊ नकोस बाकी सगळ्यांना पाठवून दे आणि मेस रूम मध्ये येवून थांब. वर ब्रिजवर मीटिंग सुरू होती अर्थातच पाण्याचा विषय होता, त्याचवेळेला चीफ इंजिनियर मेस रूम मध्ये आला आणि म्हणाला चल सगळ्या केबिन चेक करत जाऊ या. एक एक केबिन चेक करत असताना जहाजावर दोन महिन्यांपूर्वी जॉईन झालेल्या एका ट्रेनी च्या केबिन मध्ये बेसिन चा नळ पूर्णपणे उघडा सापडला त्याच्यातून धो धो पाणी वाहत होते आणि समुद्रात वाया जात होते. हा ट्रेनी इंजिन रूम मध्येच काम करत होता. चीफ इंजिनियरने ब्रिजवर जाऊन सांगितले की लीक सापडला आहे कोणीतरी चुकून चेंजिंग रूम मधील वॉश बेसिन चा नळ चालू ठेवला होता. सगळ्यांना पुन्हा एकदा सगळे नळ बंद असल्याची खात्री करण्याबद्दल सूचना देण्यात आल्या. अर्ध्या तासाने चीफ इंजिनियर ने नळ चालू ठेवणाऱ्या ट्रेनी ला बोलावले आणि विचारले काय रे तुला तुझे करीयर संपवायचे आहे का आजच, ट्रेनी ने रडत रडत माफी मागितली आणि सांगितले की सेकंड इंजिनियर त्याला एका कामावरून खूप ओरडला आणि म्हणून त्याला त्रास व्हावा यासाठी त्याने पाणी वाया घालवण्याचा प्रकार केला हे सांगत असताना त्याच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. पण यापुढे असे कधीच न करण्याचे त्याने कबुल केले. चीफ इंजिनियर ने त्याला आणि मला या प्रकाराबद्दल कोणाजवळ काही न बोलण्याची सूचना केली.

चीफ इंजिनियर त्याला पुढच्या बंदरात घरी पाठवू शकला असता, कारण जहाजावर अशा चुका आणि असे वागणे बिलकुल खपवून घेतले जात नाही. एखाद्यावर असलेला राग व्यक्त करण्याकरिता किंवा त्रास देण्याकरिता जहाजावरील सिस्टिम किंवा मशिनरी सोबत कोणी काही छेडछाड केली की ती एखादा अपघात आणि जहाजावर काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवाचे बरे वाईट करण्यास कारणीभूत ठरू शकते. चीफ इंजिनियर वयस्कर असल्याने त्याने प्रकरण ज्याप्रमाणे हाताळले आणि एखाद्याचे करियर बरबाद होऊ न देता त्याला एक संधी देण्याचे औदार्य दाखवले असे जहाजावर क्वचितच बघायला मिळते. कारण एखाद्या कडून चुकून जरी काही गडबड झाली तरी त्याला घरी पाठवले जाते व पुन्हा कंपनीत घेतले जात नाही, अशा मुद्दाम गडबड करणारे किंवा कोणाला त्रास होईल असे वागणारे लोक जहाजावर काम करण्याच्या योग्यता ठेवत नाहीत. त्याला सेकंड इंजिनियर विरुद्ध तक्रार होती तर त्याने चीफ इंजिनियर किंवा कॅप्टन ला तशी कल्पना द्यायला पाहिजे होती.

अथांग समुद्रात पावसाचे पाणी नदी नाल्या मधून येऊन मिसळते आणि पुन्हा खारे होते. जसजसं किनाऱ्याजवळ येतो तसतसं गढूळ पाणी आणि जसजस किनाऱ्यापासून लांब जाऊ लागतो तसतसं नितळ आणि निळशार पाणी. बंदरातून निघाल्यावर काही तासाने समुद्राचे नितळ आणि निळे पाणी दिसायला लागते. अशा या नितळ निळ्याशार समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून बनविलेले जाणारे गोडे पाणी आणि तेच पाणी पिऊन जहाजावर नोकरी करता करता पाहिलेले सातही समुद्र लक्षात राहतात. मनातल्या मनात का होईना पण , कोणी जर म्हणाले मी चार पावसाळे अधिक पाहिलेत किंवा माझे केस काय उन्हात पांढरे झालेत का तर त्यांना मी पण सात समुद्राचे पाणी प्यायलो आहे असे सांगावेसे वाटते.

© प्रथम रामदास म्हात्रे
मरिन इंजिनियर
B. E. (mech), DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 57 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

1 Comment on फ्रेश वॉटर

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..