श्रीमत् आदिशंकराचार्यांचे श्रीकृष्णाष्टकम् – मराठी अर्थासह

श्रीमत् आदिशंकराचार्यांचे श्रीकृष्णाष्टकम् मराठी अर्थासह

जगद्गुरू आदि शंकराचार्यांची सर्वच स्तोत्रे रसाळ व अर्थगर्भ आहेत. प्रस्तुत कृष्णाष्टक प्रामुख्याने बालकृष्णाच्या स्तुतिपर आहे. अत्यंत्त सोप्या तरीही तरल व प्रवाही अनुप्रासयुक्त अशा या स्तोत्राची गेयता वेगेवेगळ्या शब्दसमूहांच्या योजनेतून द्विगुणित होते. कठोर उच्चाराची अक्षरे त्यात क्वचितच असल्याने त्याची कोमलता अधिकच प्रत्ययास येते. डोळे मिटून चालीवर ते गायल्यास बालकृष्णाची प्रतिमा समोर उभी राहिल्याशिवाय रहाणार नाही.

आचार्यांच्या प्रासादिक भाषेच्या जवळपास जाणे सिद्धहस्त कवींनाही शक्य नाही. संस्कृत भाषेतील समास व संधींमधून थोडक्या शब्दात मोठा आशय सहज व्यक्त होतो. मराठीमधे तसा प्रयत्न केल्यास ती साहित्यकृती जडजंबाल व बोजड होऊन आजच्या पिढीला समजणे अशक्य होईल. तरीही मी येथे या स्तोत्राचे समश्लोकी स्वैर रूपांतर करण्याचा प्रयत्न केला आहे.

काही ठिकाणी या अष्टकाचा उल्लेख ‘श्रीकृष्णताण्डवस्तोत्रम्’ असाही केलेला आढळतो. तो तितकासा सयुक्तिक वाटत नाही.


भजे व्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं
स्वभक्तचित्तरंजनं सदैव नन्दनन्दनम् |
सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकं
अनंगरंगसागरं नमामि कृष्णनागरम् || १

मराठी- गोकुळाचा एकमेव भूषण असलेल्या, सर्व पातकांचा नाश करणा-या, आपल्या भक्तांच्या मनाला नित्य तोषविणा-या, शिरावर सुंदर पिसांचा झुपका धारण करणा-या, हाती सुमधुर स्वरांचा पावा घेतलेला, शृंगार रसाचा दर्या असलेल्या, नंदाच्या मुलाला, अष्टपैलू कृष्णाला मी नमस्कार करतो.

व्रजास भूषवी सदैव पातकांस नाशितो
मनांस मोद भाविकां
, दयानिधीस वंदितो ।
पिसे तुरे शिरी, सुरेल सानिका धरी करी
समुद्र प्रीतिचा खरा, नमू चलाख श्रीहरी ॥ १


मनोजगर्वमोचनं विशाललोललोचनं
विधूतगोपशोचनं नमामि पद्मलोचनम् |
करारविन्दभूधरं स्मितावलोकसुन्दरं
महेन्द्रमानदारणं नमामि कृष्णावारणम् || २

मराठी- मदनाचा तोरा हरण करणा-या, टपोरे चंचल नेत्र असणा-या, गोपालांचे दुःख दूर करणा-या, कमळाप्रमाणे डोळे असणा-या(कृष्णाला) मी नमस्कार करतो. ज्याचे दर्शन आणि स्मितहास्य सुंदर आहे, ज्याने आपल्या कमळासारख्या (कोमल) हातावर पर्वत उचलून धरला (आणि) इंद्राचा अभिमान छिन्नविछिन्न करून टाकला त्या कृष्णरूपी हत्तीला मी नमस्कार करतो.

अनंग गर्व नाशितो, विशाल नेत्र हालवी
नमू सरोजनेत्र सर्व गोपदुःख घालवी ।                                                                                          पद्महस्त पर्वतास, इन्द्रगर्व भेदितो


सुरेख गोड हास्य, मी हरी-गजास वंदितो ॥ २        

कदम्बसूनकुण्डलं सुचारुगण्डमण्डलं
व्रजांगनैकवल्लभं नमामि कृष्णदुर्लभम् |
यशोदया समोदया सगोपया सनन्दया
युतं सुखैकदायकं नमामि गोपनायकम् || ३

मराठी-  कदंबाच्या फुलांचे झुमके कानावर अडकवलेल्या, सुंदर गोबरे गाल असलेल्या, गोकुळातील गवळणीचा एकमेव लाडका असणा-या अशा सहजासहजी प्राप्त न होणा-या कृष्णाला मी वंदन करतो. आनंदित यशोदा, नंद व गोपालांबरोबर असलेल्या व (त्यांना) सुख देणा-या गवळ्यांच्या प्रमुखाला मी नमस्कार करतो.

कदम्बपुष्प डूल, कानशील गाल गोबरे
अनेक गोपिकांस मित्र, त्या नमू अप्राप्य रे ।
यशोमती सहर्ष, नन्द गोप सर्व संगती
जमा, तयास मोद दे, तुवां प्रणाम गोपती ॥ ३


सदैव पादपंकजं मदीय मानसे निजं
दधानमुत्तमालकं नमामि नन्दबालकम् |
समस्तदोषशोषणं समस्तलोकपोषणं
समस्तगोपमानसं नमामि नन्दलालसम् || ४

मराठी-  आपले चरणकमल माझ्या मनात नित्य ठेवणा-या, सुरेख कुरळ्या केसांच्या बटा असलेल्या नंदाच्या लेकराला मी नमस्कार करतो. सर्व दोषांचे हरण करणा-या, सर्व जनांचे पालन पोषण करणा-या, सर्व गवळ्यांच्या मनात (स्थान) असलेल्या, नंदाला प्रिय असणा-या (कृष्णा) ला मी नमस्कार करतो.

मनात माझिया सदैव पादपद्म ठेवितो
बटा सुरेख, मी सुनंदलेकरास वंदितो ।
करून सर्व दोषनाश, लोक सर्व पोशितो
प्रणाम नंदबालकास, गोपमानसात तो ॥ ४


भुवो भरावतारकं भवाब्धिकर्णधारकं
यशोमतीकिशोरकं नमामि चित्तचोरकम् |
दृगन्तकान्तभंगिनं सदा सदालिसंगिनं
दिने दिने नवं नवं नमामि नन्दसम्भवम् || ५

मराठी-  भुईवरील (दुष्टांचे) ओझे निरसन करणा-या, भवसागरात (ओलांडण्यासाठी नौकेचे) प्रमुखत्व सांभाळणा-या, इतरांचे मन काबीज करणा-या यशोदेच्या मुलाला मी नमस्कार करतो. जो डोळ्यांच्या कोप-यातून सुंदर चंचल कटाक्ष टाकतो, नेहेमी भृंगांच्या संगतीत असतो, दररोज जो नवा नवा भासतो अशा नंदाच्या पुत्राला मी नमस्कार करतो.

भवाब्धितारु सारथी, भुभार जो कमी करी                                                                                  यशोमती सुता नमू, मनास अन्य जो हरी ।
कटाक्ष हालते सुरेख, नित्य भृंगसंग तो
दिनी नव्या दरेक, नंदबालकास वंदितो ॥ ५


गुणाकरं सुखाकरं कृपाकरं कृपापरं
सुरद्विषन्निकन्दनं नमामि गोपनन्दनम् |
नवीनगोपनागरं नवीनकेलिलम्पटं
नमामि मेघसुन्दरं तडित्प्रभालसत्पटम् || ६

मराठी-  जो गुणांची खाण आहे, जो सुखाचे मूळ आहे, दयेचे आगर आहे, जो इतरांवर कृपा करतो, जो देवांच्या शत्रूंना शासन करतो, जो नवाच अष्टपैलू गोप आहे, ज्याला नवनवीन खेळांची आत्यंतिक आवड आहे, जो अभ्रांप्रमाणे सुंदर आहे, ज्याचे वस्त्र विद्युल्लतेच्या तेजाप्रमाणे झगमगत आहे, त्या गोपालाच्या मुलाला मी वंदन करतो.

गुणागरा, सुखागरा, कृपानिधी, कृपाकरा                                                                                      विनाश देव शत्रुचा, प्रणाम गोप कूमरा ।
नवा लबाड गोप, खेळ आवडे नवा खर
विजेजशी प्रभा पटा, प्रणाम अभ्रसुंदरा ॥ ६   (पट- वस्त्र,शेला)


समस्तगोपनन्दनं हृदम्बुजैकमोदनं
नमामि कुंजमध्यगं प्रसन्नभानुशोभनम् |
निकामकामदायकं दृगन्तचारुसायकं
रसालवेणुगायकं नमामि कुंजनायकम् || ७

मराठी-  सर्व गोपालांना (पुत्रवत असणा-या) आनंद देणा-या, हृदयकमलाला आनंद देणारा एकमेव, वाटिकांमध्ये विहार करणा-या, सूर्यासारखा प्रसन्न दिसणा-या, (कृष्णाला) मी नमस्कार करतो. मनी इच्छिलेले देऊन आकांक्षापूर्ती करणा-या, आपल्या कटाक्षांचे बाण असणा-या, मधुर पावा वाजवणा-या वाटिकेच्या नायकाला मी वंदन करतो.

जनांस गोप पुत्रसा, मनास मोद एक तो (जनास गोप मोद दे)
विहार वाटिकेत, भास्करा प्रसन्न वंदितो ।
मनात देत वांछिले, कटाक्ष बाण नेटका                                                                                      सुरेल वेणु वादका, नमू निकुंजनायका ॥ ७

टीप- येथे गोप नन्दन असा शब्द वापरला आहे. नंदन या शब्दाचा अर्थ ‘आनंद देणारा’ तसेच ‘पुत्र’ असाही घेता येईल. दोन्ही अर्थ चपखल आहेत.


विदग्धगोपिकामनोमनोज्ञतल्पशायिनं
नमामि कुंजकानने प्रवृद्धवन्हिपायिनम्|                                                                      किशोरकान्तिरंजितं दृगंजनं सुशोभितं
गजेन्द्रमोक्षकारिणं नमामि श्रीविहारिणम् || ८

मराठी-  प्रगल्भ गोपींच्या हृदयरूपी सुंदर मंचकावर विराजमान झालेल्या, कुंजवनात भडकलेला अग्नी प्राशन करणा-या, (आपलं) बालशरीर ज्याने रंगविले आहे, जो दाही दिशात शोभून दिसतो, गजेन्द्राला मोक्ष देणा-या, लक्ष्मीबरोबर विहार करणा-या त्या (कृष्णा) ला मी नमस्कार करतो.

प्रगल्भ गोपिका मनी सुरेख मंचकी वसे
प्रणाम त्या, वनातला प्रचंड अग्न पीतसे ।
शरीरकांति रंगली, दिशादिशात शोभतो
गजेन्द्रमुक्ति, श्रीसवे विहार, त्यास वंदितो ॥ ८

टीप- अग्नीप्राशनाच्या गोष्टीचा संदर्भ श्रीमद् भागवताच्या दशम स्कंधातील १९ व्या अध्यायातील प्रलंबासुराच्या गोष्टीतील मुंजवन व भांडीर वनाशी आहे.


यदा तदा यथा तथा तथैव कृष्णसत्कथा
मया सदैव गीयतां तथा कृपा विधीयताम् |
प्रमाणिकाष्टकद्वयं जपत्यधीत्य यः पुमान्
भवेत्स नन्दनन्दने भवे भवे सुभक्तिमान् || ९

मराठी-  जेव्हा (जमेल) तेव्हा, जशी (जमेल) तशी तशीच ही कृष्णाची गोड कथा मी नेहेमी गावी, आणि (कृष्णाने) मजवर कृपा करावी. जो या प्रमाणिका अष्टकाच्या युगुलाचा अभ्यासपूर्वक जप करील, तो कृष्णभक्त जन्मजन्मांतरी श्रेष्ठ पुरुष ठरेल.

जसे तसे जमेल, जेधवा जमेल तेधवा
गीत मी सदा म्हणो, कृपाप्रसाद तो हवा ।
प्रमाणिकाष्टक द्वय प्रयत्नपूर्व गातसे
दरेक जन्म कृष्णभक्त श्रेष्ठ व्यक्ति होतसे ॥ ९

टीप– प्रमाणिका छंदात ‘जरलग’ अशी अक्षररचना असून त्याची जोडी (द्वय) घेतल्यास ‘पंचचामर’ (अक्षररचना- जरजरजग) वृत्त होते. येथे आचार्यांनी आपल्या वृत्ताला पंचचामर असे न म्हणता प्रमाणिकाद्वय असे म्हटले आहे.

। इति श्रीमत् शंकराचार्यकृतं श्रीकृष्णाष्टकं सम्पूर्णम् ।

— धनंजय बोरकर (९८३३०७७०९१)

 

धनंजय मुकुंद बोरकर
About धनंजय मुकुंद बोरकर 14 Articles
व्यवसाय इलेक्ट्रॉनिक (एव्हियॉनिक्स) इंजिनियर. संस्कृत भाषेची आवड. मी केलेले संस्कृत काव्यांचे मराठी गद्य व स्वैर पद्य रूपांतर - १. कविकुलगुरू कालिदासाचे `ऋतुसंहार' (वरदा प्रकाशन, पुणे) २. जयदेवाचे `गीतगोविंद' (प्रसाद प्रकाशन, पुणे). ३. मूकशंकराचार्याचे `मूक पंचशती' ४. जगन्नाथ पंडितांचे `गंगा लहरी' इत्यादी. मी ऋतुसंहार मधील श्लोकांवर आधारित एक दृकश्राव्य कार्यक्रम तयार केला असून त्याचे अनेक कार्यक्रम पुण्यात व इतर ठिकाणीही सादर केले आहेत.

2 Comments on श्रीमत् आदिशंकराचार्यांचे श्रीकृष्णाष्टकम् – मराठी अर्थासह

  1. खूपच सुंदर रचना.. तीच चाल, तीच लय .. अतिशय योग्य शब्दांची निवड.. फारच छान.. अभिनंदन..

  2. खूपच छान! मनाला खूप भावते. शंकराचार्यांच्या आत्मषटकम् चे मराठी काव्य केले आहे का? असल्यास मला पाठवू शकाल का?‌ नमस्कार.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..