
कार्यकाळ: १६ मे १९९६ ते १ जून १९९६ तसेच १९ मार्च १९९८ ते २२ मे २००४
जन्म: २५ डिसेंबर १९२४
अटलजींनी देशाला सामर्थ्यवान करण्यावर भर दिला. १९९८ मध्ये वाजपेयी सरकारने जमिनीखाली पाच अणुचाचण्या केल्या. त्या जगाला, खासकरून अमेरिकेला हादरविणाऱ्या ठरल्या. कारण भारताने अमेरिकेच्या हेरगिरी उपग्रहाला चुकवून त्या पार पाडल्या होत्या.
भारताचे दहावे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी सुहृदयी कवी आणि ओजस्वी वक्ते म्हणून ओळखले जातात. लोकसभेतील संख्याबळाचा अभाव आणि अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे अटलजींना पहिल्यांदा केवळ १३ दिवसच पंतप्रधानपदाचा कार्यभार पाहता आला. त्यानंतरच्या दोन वर्षांमधील राजकीय घडामोडींमध्ये आधी १३ महिने व पुढे त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत ‘रालोआ’नेच बहुमत मिळविल्यामुळे तिसऱ्या वेळी अटलजींनी संपूर्ण पाच वर्ष पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळली. आपल्या कार्यकाळात अटलजींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा अधिक उंचावत नेली. वाजपेयींनी पाकिस्तानसोबत शांतता चर्चेसाठी मोठा पुढाकार घेतला. त्यांनी लाहोर-दिल्लीदरम्यान बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. कारगिल युद्धानंतर पाकिस्तान दौऱ्यावर जाणाऱ्या क्रिकेट संघाला त्यांनी ‘खेल भी जीतो और दिल भी’ असा संदेश दिला. कारगिल युद्धादरम्यानची मुत्सद्देगिरी वाजपेयींच्या कणखरतेची साक्ष देणारी आहे. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी भारत-पाकमध्ये मध्यस्थीची तयारी दाखविली; पण वाजपेयींनी बाणेदारपणे त्यास नकार दिला. यामुळे अमेरिकेला जागतिक पोलीस समजण्याच्या प्रवृत्तीला सणसणीत उत्तर तर दिले गेलेच शिवाय काश्मीरप्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा आणि तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप करवून घेत शिमला करार मोडण्याचा पाकिस्तानचा प्रयत्नही शिताफीने उधळला गेला.
Leave a Reply