नवीन लेखन...

फेव्हिकाॅल

 

रात्रीचे आठ वाजले होते. सचिन अजूनही ऑफिसमधून आला नव्हता. सचिनचे बाबा, आई व पत्नी, सारिका घड्याळाकडे आळीपाळीने पहात होते. आज आईचा उपवास होता, म्हणून जेवणासाठी सचिनचं लवकर येणं त्यांना अपेक्षित होतं..

साडेआठच्या सुमारास दारावरची बेल वाजली व सारिकानं दार उघडलं. सचिनने पाठीवरची सॅक खुर्चीत टाकली व फ्रेश होण्यासाठी तो बाथरूममध्ये गेला. सारिकानं त्याच्या देहबोलीतून ओळखलं की, ‘कुछ तो गडबड है’…

चौघेही जेवायला बसले. सचिनचं जेवणात लक्ष नव्हतं. सारिकानं त्याला तसं विचारल्यावर सचिनचा स्फोट झाला. आज ऑफिसमध्ये त्याचं आणि बाॅसचं बिनसलं होतं, त्यामुळे तो विचलित झाला होता. त्यानं बोलायला सुरुवात केली, ‘माझं नशीबच फुटकं! माझं कुणाशी पटतच नाही.. आज बाॅसनं माझी अक्कल काढली. मी माझं काम सिरीयसली करुनही मलाच बोलणी बसली..’ तिघेही त्याचं हे बोलणं ऐकून त्यांच्याकडे पाहू लागले.. सारिकानं त्याला समजावलं, ‘थोडं शांततेनं घे. एवढ्याशा कारणावरुन नशिबाला दोष देवून नकोस.’ सचिन ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता, तो आता बाबांकडे पाहून बोलू लागला, ‘माझं नशीबच फुटकं, त्याला तुम्ही तरी काय करणार? आज माझ्या मित्रांच्या वडिलांनी मुलांसाठी मोठी इस्टेट करुन ठेवलेली आहे. तुम्ही काय केलं?’ एवढं बोलून तो ताटावरुन उठला. तसं तिघांनीही आटोपतं घेतलं..

सचिन मोबाईल घेऊन सोफ्यावर बसल्यानंतर सारिकानं बोलायला सुरुवात केली, ‘सचिन, मघाशी तू जे म्हणालास, ते मला अजिबात पटलेलं नाहीये. कोणत्याही गोष्टीचा शेवट करायला ‘माझं नशीबच फुटकं’ हा पर्याय नसतो. अशानं आपणच नकारात्मक होतो आणि यांचं पर्यावसान नैराश्यात होतं.

तुझं नशीबच फुटकं होतं म्हणूनच तुला आई-वडिलांनी इतकं प्रेमानं वाढवलं, नाही का? लहानपणापासून तुला हवं ते, मागशील ते घेऊन दिलं.. त्यांना जे लहानपणी मिळालं नाही, त्याची कमतरता त्यांनी, तुला कधीही भासू दिली नाही.

दर सणाला तुला नवीन कपडे, खेळणी यांची चैन होती. पाचवीत असताना तुला सायकल घेऊन दिली. तुला व्हिडिओ गेम हवा होता, तो आणून दिला.. तरीही तुझं नशीब फुटकं?

तुला शाळेसाठी रिक्षा लावली. तुला यायला उशीर झाला तर तुझी आई, बाबांना फोन करुन शाळेत जायला सांगायची.. तू सहलीला गेला होतास, तेव्हा रात्री अकरा वाजेपर्यंत बाबा शाळेच्या दाराशी बसची वाट पहात उभे होते.. तरीही तुझं नशीब फुटकं?

तुला बाबांनी कर्ज काढून लॅपटॉप घेऊन दिला. काॅलेजला जाण्यासाठी हप्त्यावर, स्पोर्टबाईक घेऊन दिली. तुला आयटी मध्ये संधी मिळावी म्हणून महागड्या काॅलेजमध्ये घातलं.. त्यावेळी फी भरण्यासाठी आईला घेऊन दिलेले दागिने मोडावे लागले… तरीदेखील तुझं नशीब फुटकं?

आता निवृत्त झाल्यानंतरही तुझे बाबा काम करायला जातात. जाताना पैसे वाचविण्यासाठी ते रिक्षा किंवा बसचा प्रवास टाळून तेच वाचलेले पैसे, रोजच्या भाजीसाठी वापरतात… तरीही तुझं नशीब फुटकं?

सचिन, तू खरंच नशीबवान आहेस. तुला चांगले आई-बाबा मिळाले. मघासारखं बोलून त्यांना दुखावण्याचा, तुला अधिकार नाहीये. जे काही ऑफिसमधील ताणतणाव असतील ते घराच्या बाहेरच ठेवायचे. त्याचा परिणाम कुटुंबावर होऊ द्यायचा नाही.. मला तुझ्या जीवनात येऊन काही महिनेच झाले आहेत.. मात्र माझ्या आई-वडिलांप्रमाणेच हे दोघेही माझे आई-बाबाच आहेत आणि त्यांना असं बोललेलं मला चालणार नाही!!’

सारिकानं पाण्याचा ग्लास त्याच्या हातात दिला. सचिनने एका दमात तो रिकामा केला. सारिका बाबांना म्हणाली, ‘बाबा, तुम्हाला आश्र्चर्य वाटलं असेल, मी सचिनशी एवढं तपशीलवार कसं बोलू शकले? दोन महिन्यांपूर्वी तुम्ही दोघेही नाशिकला गेला होतात, तेव्हा मी तुमच्या परवानगीशिवाय, जुन्या डायऱ्या वाचल्या. त्यातून तुम्ही सचिनला कसं वाढवलं, हे समजलं.. तुम्हा दोघांनी स्वतःचा विचार न करता त्याला कशाचंही कमी पडू दिलं नाही. आज त्याच्या यशामागे तुमचे अपार कष्ट आहेत, हे एकवेळ तो विसरेल.. मी नाही विसरु शकत.. म्हणून मी त्याला त्याची, जाणीव करुन दिली..’

सचिनला स्वतःची चूक कळली होती. तो बाबांची माफी मागून सारिकाला म्हणाला, ‘आज तू एका फुटक्या नशीबाला, फेव्हिकाॅलने जोडलं आहेस.. यापुढे मी कधीही असं बोलणार नाही! प्राॅमिस!!’

— सुरेश नावडकर.

मोबाईल: ९७३००३४२८४

४-९-२१.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 356 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..