तरुण दिग्दर्शकांकडून अपेक्षा

Expectations from Young Film Directors - An Interview with Hemant Desai

मराठी सिनेमाची १०० वर्षे पूर्ण होताना, मराठी चित्रपटांनी, अनेक पाऊलखुणांनी दखल घ्यायला भाग पाडलं. यातील महत्वपूर्ण विषयांवर तसंच आगामी काळात मराठी सिनेमाच्या स्वरुप आणि बदलांबाबत ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक हेमंत देसाई यांनी ‘मराठीसृष्टी.कॉम’ ला दिलेली ही विशेष मुलाखत..

प्रश्न: मराठी चित्रपट हा नावलौकिक मिळवत वेगाने ग्लोबलही होतोय. या विषयावर आपण काय सांगाल ?
हेमंत देसाई: मराठी सिनेमा हा सध्या आशयपूर्ण आणि विषयांच्या वैविधतेमुळे निश्चितच राष्ट्रीय पातळीवर दखल घ्यायला भाग पाडतो आहे. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर विचार करता आपण बरेचसे मागे आहोत. कारण सिनेनिर्मितीच्या प्रक्रियेचा विचार करता आपल्याला निर्मिती मूल्यांवर विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.

प्रश्न: पण मग आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये मराठी चित्रपटाचे स्क्रीनिंग्स होऊन कौतुक होत आहे, त्याबद्दल आपलं काय मत आहे ?
हेमंत देसाई: फिल्म फेस्टीवल्स् हे सर्वत्र होत असतात. व विविध भाषेतील चित्रपट तिथे दाखवलेही जातात. पण म्हणून तो चित्रपट दर्जेदार असेलच असं नाही. आणि तो लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचेल याचीही शाश्वती नाही. मराठी चित्रपट कोणत्या फेस्टीवल्स् मध्ये स्क्रीन होतात हा सुध्दा महत्वाचा भाग आहे. कारण आपला सिनेमा ज्यावेळी यु.के., यु.एस. – हॉलीवुडच्या धर्तीवर झळकेल व तिथल्या प्रेक्षक आणि समीक्षकांकडून दाद मिळवेल तेव्हा त्याला आणखीन वेटेज येईल असं मला वाटतं.

प्रश्न: मराठी चित्रपटांना हिरोचा चेहरा नाही अशी ओरड जी सतत होत आहे, यावर एक समीक्षक म्हणून कसे पाहता?
हेमंत देसाई: बर्‍याच अंशी ही गोष्ट खरी आहे की नायक म्हणून अजूनही आपल्याकडे चेहरा किंवा तसा कलाकार नाही. कारण मराठी माणसाची जशी छबी आहे, तिचं रुप आपल्याला त्या कलाकारांमध्ये दिसतं. मुख्य म्हणजे कॅरेक्टर साकारताना जी मेहनत घेतली जाते ती त्यानंतर सुध्दा कायम ठेवावी लागते. जसं की फिजिक, लुक्स् इत्यादी. तसं न केल्यामुळे मराठीत स्टारडम नाही. पण हळूहळू हा बदल होतोय व नायक म्हणून मराठी चित्रपटांमध्ये अनेक नवोदीत चेहरे येत आहेत. ज्यांच्याकडे फ्रेश लुक सोबतच अभिनयही आहे.

प्रश्न: गेल्या काही वर्षातील सिनेमाच्या प्रदर्शनाकडे आणि कामगिरीकडे पाहता सुवर्णकाळाची सुरुवात झाली आहे असं म्हणता येईल ?
हेमंत देसाई: मराठी चित्रपट बहुसंख्येने प्रदर्शित होत आहे. त्याच्या विषयांमध्ये आपल्याला नावीन्य पाहायला मिळतंय. पण अजुनही म्हणावा तसा ‘ब्लॉकबस्टर’ किंवा ‘सिनेमा’ म्हणून सतत चर्चेत राहावा असा चित्रपट अजुनतरी मराठी रुपेरी पडद्यावर दिसलेला नाही. अपवाद फक्त प्रभातचे सिनेमे, त्यातही ‘संत तुकाराम’, ‘कुंकू’, ‘माणूस’. त्यानंतरच्या काळात भालजी पेंढारकरांनी मराठी चित्रपटांना यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलं. त्याकाळात ज्या निर्माते-दिग्दर्शकांनी मराठी चित्रपटांची बुम निर्माण केली ती नंतर झालेली नाही. अर्थात ‘श्वास’ ही उत्तम कलाकृती होती. त्यानंतर पुन्हा एकदा मराठी चित्रपटांनी भरारी घेतली. व तो सिलसिला आजतागायत कायम आहे. पण तरी वर्षाला काही ‘शे’ चित्रपट प्रदर्शित होणं म्हणजे सुवर्णकाळ नाही. तरीही नव्या पर्वाची ही सुरुवात म्हणता येईल.

प्रश्न: आगामी काळात मराठी चित्रपटासमोर कोणती आव्हानं आहेत असं तुम्हाला वाटतं ?
हेमंत देसाई: पहिली गोष्ट म्हणजे सर्वच चित्रपटांमध्ये आजकाल तोचतोच पणा येतोय. उदाहरणार्थ प्रेम, रोमॅन्स वगैरे. तसंच साचेबद्ध विषयांभोवती फिरणारी पटकथा पहायला मिळते. म्हणजे या विषयांपलीकडे सुध्दा जग आहे हे सुध्दा आपल्याकडच्या चित्रपटांनी दाखवून द्यायला पाहिजे. दुसरं म्हणजे संगीत आणि गाणी. चित्रपटांना आवश्यकता असेल तरच गाणी दाखवावीत. नाहीतर भलीमोठी गाण्यांची यादी असलेल्या चित्रपटांची कथा भरकटण्याची शक्यता निर्माण होते व तो अयशस्वी ठरु शकतो. त्याचबरोबर सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात प्रेक्षकांना कोणताही चित्रपट आयफोन किंवा त्यांच्या पी.सी.वर आणि होम थिएटरवर पाहता येऊ शकतो. त्यामुळे प्रेक्षक चित्रपटगृहाकडे फिरकत नाहीत अशी ओरडाओरड करता येणार नाही. उलट आता ही वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे. आणि सशक्त चित्रपटाची निर्मिती करुन प्रेक्षकांना आपल्या चित्रपटाकडे कसं आकृष्ट करता येईल या पद्धतीने त्याची रचना असायला हवी. तरच तो टिकेल.

प्रश्न: मराठीतल्या नवोदित दिग्दर्शक व निर्मात्यांच्या बाबतीत आपण कसं विश्लेषण कराल ?
हेमंत देसाई: गेल्या तीन-चार वर्षांत आपण पाहिलं असेल की आपल्याकडे विविध विषयांवरच्या कलाकृतींना स्पर्श करण्यात आला आहे. या चित्रपटांच्या सर्वच बाजू भक्कम असल्याचंही आपल्याला दिसलं. यामध्ये वळू पासून अलिकडच्या काळात बालक पालक सारख्या आशयघन असलेल्या सिनेमांचा उल्लेख करता येईल. या सर्व चित्रपटांच्या निमित्ताने परेश मोकाशी, गिरीश व उमेश कुलकर्णी, रवी जाधव, सचिन कुंडलकर आणि सुजय डहाके यांसारखे सृजनशील आणि धडाडीचे युवा चित्रकर्मी इंडस्ट्रीला लाभल्यामुळे ही मंडळी नवनवीन प्रयोग करुन मराठी सिनेमाला जागतिक स्तरावर अनोखं स्थान प्राप्त करुन देतील, अशी अपेक्षा आहे.

प्रश्न: सध्या आपण कोणत्या विषयांवर लेखन करत आहात आणि आपल्या ‘बॉम्बे टॉकीज’ या नव्याने प्रकाशित होणार्‍या पुस्तकाविषयी थोडंसं ?
हेमंत देसाई: सध्या मी बर्‍याच वृत्तपत्रांमधून मनोरंजन तसंच राजकीय विषयांवर स्तंभ लेखन करतोय. त्याशिवाय महाराष्ट्रातल्या व्याख्यानमाला आणि चर्चासत्रांमध्ये सुध्दा तज्ञ म्हणून सहभागी होत असतो. येत्या एक ते दोन महिन्यांमध्ये ‘बॉम्बे टॉकीज’ हे मुंबईतले विविध लोकेशन्सवर शुट झालेल्या चित्रपटांची माहिती देणारं पुस्तक वाचकांच्या भेटीला येणार आहे.

(मुलाखत व शब्दांकन : सागर मालाडकर)

Avatar
About सागर मालाडकर 111 Articles
श्री. सागर मालाडकर हे आकाशवाणीवरील निवेदक असून ते मराठीसृष्टीसाठी नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…