नवीन लेखन...

इंग्लंडचे महान क्रिकेटपटू डब्ल्यू जी ग्रेस

इंग्लंडचे महान क्रिकेटपटू डब्ल्यू जी ग्रेस यांचा जन्म १८ जुलै १८४८ रोजी झाला.

‘फादर ऑफ क्रिकेट’ अशी ओळख आलेल्या विलियम गिलबर्ड ग्रेस उर्फ डब्ल्यू. जी. ग्रेस हे इंग्लंडचे महान क्रिकेटपटू ओळखले जात असत. द डॉक्टर, डब्ल्यूजी, डॉक अशा अनेक टोपणनावांनी ते ओळखले जात.आक्रमक फलंदाज, उपयुक्त अष्टपैलू असलेल्या ग्रेस यांच्या नावावर अनेक डोमेस्टिक आणि कसोटी क्रिकेट विक्रम आहेत.

डब्ल्यू जी ग्रेस यांच्या क्रिकेटच्या कारकीर्दीच्या सुरुवातीमागे एक घटना कारणीभूत होती. १८५९ साली मार्था हे नाव असलेल्या ग्रेसच्या आईनं ‘ऑल इंग्लंड इलेव्हन’ या संघाच्या जॉर्ज पार नावाच्या कर्णधाराला एक पत्र लिहिलं. त्या पत्रात आपला मुलगा ईएम ग्रेस याचा त्या संघात समावेश केला जावा, अशी विनंती मार्थानं केली होती. ईएम ग्रेस चांगला फटकेबाजी करणारा फलंदाज आणि उत्तम दर्जाचा क्षेत्ररक्षक आहे असं मार्थानं लिहिलं होतं. त्याच पत्रात आपला १२ वर्ष वय असलेला दुसरा एक मुलगा तर ईएम ग्रेस या त्याच्या मोठय़ा भावाहूनही जास्त प्रतिभावान क्रिकेटपटू असल्याचा उल्लेखही मार्थानं केला होता. हा १२ वर्षांचा मुलगा म्हणजेच डब्ल्यूजी ग्रेस होता. आपली अशी शिफारस करणारी आई मिळणं हे डब्ल्यूजी ग्रेसचं भाग्यच होतं.

१८६४ सालच्या जुलै महिन्यात आपल्या वयाच्या १५ व्या वर्षीच ‘साऊथ वेल्स क्रिकेट क्लब’ या संघाबरोबर एका दौऱ्यावर गेलेला असताना डब्ल्यूजीनं ससेक्सच्या ‘जेंटलमेन’ या संघाविरुद्ध १७० धावा केल्या. दुसऱ्या डावात ५६ धावा काढून डब्ल्यूजीनं आपल्या संघाला विजय मिळवून दिल्यावर एका विलक्षण खेळाडूचं आगमन झालं असल्याची सगळ्यांनाच जाणीव झाली. डब्ल्यूजी तब्बल ६ फूट ४ इंच इतका उंच आणि ११५ किलो वजनाचा असल्यामुळे लोक त्याला जरा टरकूनच असायचे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे डब्ल्यूजीच्या वयाच्या १३ व्या वर्षी त्याला झालेल्या न्यूमोनियामुळे त्याचं एक फुफ्फुस काढून टाकावं लागलं होतं. तरीही त्याची शारीरिक क्षमता जबरदस्त होती. डब्ल्यूजीचं जेवण एकदम भरपेट असे. तसंच डब्ल्यूजीची लांबलचक दाढी, त्याच्याभोवती असलेलं एक प्रकारचं गूढ वलय, त्याच्यामध्ये असलेली कधीच संपणार नाही असं वाटेल इतकी ऊर्जा आणि आपल्या सोयींनुसार क्रिकेटच्या नियमांना हवं तसं वाकवण्याची त्याची खासियत यामुळे डब्ल्यूजी कायम चर्चेत असे. आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत डब्ल्यूजीनं जवळपास १.२० लाख पौंड्स म्हणजेच आजच्या हिशेबानं जवळपास ८ कोटी रुपये कमावले असं मानलं जातं! मुळात ‘हौशी’ तत्त्वावर क्रिकेट खेळणारा खेळाडू म्हणून सगळ्यांनी कशी काय मान्यता दिली असेल, असा प्रश्न पडतो. याचं सोपं उत्तर म्हणजे डब्ल्यूजीकडे ‘डॉक्टर’ ही पदवी होती. म्हणजेच वैद्यकीय व्यवसाय हे आपलं उत्पन्नाचं मुख्य साधन असून आपण गंमत म्हणून क्रिकेट खेळतो असं डब्ल्यूजी दाखवायचा. पण कहर म्हणजे डब्ल्यूजीची डॉक्टरकीची पदवी हीच एक बंडल होती. वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठीची पात्रता पूर्ण करण्यासाठी डब्ल्यूजीनं तब्बल एका दशकभराचा काळ लावला होता. त्यानंतर डब्ल्यूजीचं क्रिकेटचं कौशल्य लक्षात घेऊन आणि त्यानं खरंच डॉक्टरकी केली तर त्याच्याकडे येणाऱ्या रुग्णांचं काय होईल या भीतीनं काही श्रीमंत माणसांनी डब्ल्यूजीच्या नावावरच्या दवाखान्यात दुसऱ्याच एका डॉक्टरला बसवलं. त्यामुळे ‘जेंटलमेन’

संघाकडून क्रिकेट खेळायला डब्ल्यूजी मोकळा झाला आणि त्याच्या तावडीतून अनेक रुग्णही सुटले! अन्यथा डब्ल्यूजीच्या हातून किती जणांचा मृत्यू झाला असता कोण जाणे!

डब्ल्यूजी ग्रेसच्या करामतींना काही मर्यादाच नव्हती. एकदा सूर्य आकाशात तळपत असताना डब्ल्यूजीनं वेगळीच चाल रचली. अचानकपणे प्रतिस्पर्धी फलंदाजाचं लक्ष वेधून घेत त्यानं सूर्याकडे बोट दाखवलं. फलंदाज तळपत्या सूर्याकडे बघायला लागल्यावर डब्ल्यूजी लगेच ‘‘ते बघ, सुंदर हंस पक्ष्यांचा थवा उडतोय,’’ असं फलंदाजाला म्हणाला. त्यासरशी फलंदाजानं निरखून पाहिलं, पण त्याला काहीच दिसलं नाही. तेव्हा ‘‘अरेच्चा, तो थवा झाडामागे गेला वाटतं,’’ असं म्हणाला. लगेचच गोलंदाजाला डब्ल्यूजीनं ‘फलंदाजाच्या लेग स्टम्पवर एकदम जोरात चेंडू टाक’ अशी सूचना दिली. तळपत्या सूर्याकडे बघून नजरेसमोर अंधारी आलेला फलंदाज अर्थातच वेगानं आलेला हा चेंडू नीट न दिसल्यामुळे खेळू शकला नाही आणि त्याची दांडी उडली! नॉटिंगमशायरच्या एका फलंदाजानं एकदा एक चेंडू खेळल्यावर जवळच क्षेत्ररक्षण करत असलेल्या ग्रेसनं त्या फलंदाजाला चेंडू गोलंदाजाकडे परत द्यायची विनंती केली. त्याप्रमाणे फलंदाजानं तसं करताच ग्रेसनं लगेच पंचाकडे फलंदाज चेंडू हाताळल्यामुळे ‘हॅण्डल्ड द बॉल’ प्रकारानं बाद झाला असल्याची दाद मागितली. पंचासमोरही फलंदाजाला बाद देण्यावाचून दुसरा पर्याय नव्हताच!

एका सामन्यात डब्ल्यूजी त्रिफळाबाद होऊन त्याच्या स्टम्प्सवरच्या बेल्स उडाल्या. त्याबरोबर ‘‘आज फार वारा आहे ना,’’ असं म्हणत डब्ल्यूजीनं त्या बेल्स परत जसं काही झालंच नाही अशा आविर्भावात स्टम्प्सवर ठेवून टाकल्या. तसंच दुसऱ्या एका सामन्यात डब्ल्यूजी सरळसरळ बाद असताना त्यानं मदान सोडलंच नाही. उलट पंचाला डब्ल्यूजीनं ‘‘प्रेक्षक या फालतू गोलंदाजाची गोलंदाजी पाहायला आलेले नसून माझी फलंदाजी पाहायला आले आहेत,’’ असं सुनावून आपला डाव पुढे सुरू ठेवला!

पहिल्या महायुद्धाच्या काळात २३ ऑक्टोबर १९१५ रोजी डब्ल्यू. जी. ग्रेस यांचे निधन झाले. असे म्हणतात त्यांच्या निधनामुळे महायुद्ध चक्क एक दिवस थांबवण्यात आलं!

— अतुल कहाते.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 2959 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..