नवीन लेखन...

एक भेट सुरेश भटांची

महाराष्ट्राचे जे चार काल्पनिक भाग मानले जातात, त्यात पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भ या भागांचा समावेश केला जातो. या चारीही विभागांत अनेक मान्यवर कवी, साहित्यिक, वाङ्मयकार, वक्ते यांची फार मोठी मांदियाळी आहे. आज सुरेश भट या मान्यवर वैदर्भीय कवि-गझलकार यांच्या कामगिरीचा ताळेबंद मांडताना त्याच विदर्भातल्या कवी अनिल, (आर. रा. देशपांडे), कुसुमताई देशपांडे, ग. ल्यं. माडखोलकर, प्राचार्य राम शेवाळकर, मधुकर केंचे, पु. भा. भावे अशा किती तरी नामवंत साहित्यिक वाङ्मयकारांची नावं नजरेसमोर येतात. या नावांमध्ये ठसठशीतपणानं दिसणारं एक नाव म्हणजे सुरेश भट. त्यांच्याच कवितेत सांगायचं, तर कवी सुरेश भट हे ‘रंग माझा वेगळा’ असं मानणारे आणि वास्तवात तसंच वागणारे एक आगळ्या-वेगळ्या प्रकारचे कवी आणि माणूस होते. म्हणूनच ते लिहितात की, ‘रंगूनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा । गुंतून गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा ।’ हे त्यांचं जीवनतत्त्वज्ञान असावं असंच अनेकांना वाटलेलं आहे.

मनापासून प्रेम करावं असा हा जिंदादील माणूस आणि कवी आणि कदाचित यामुळंच त्यांच्या माणूस म्हणून असणाऱ्या गुणदोषांसह संगीताचं साम्राज्य निर्माण करणाऱ्या ‘मंगेशकर कुटुंबियांनी’ कविराज असा गौरव करीत सुरेश भटांचे सारे रागलोभ स्वीकारत त्यांच्यावर अपरंपार प्रेम केलं. हा कवी अफलातून प्रतिभेचा होता. तितकाच लहरी होता. तितकाच फेबिफीकर होता. स्वतः भट सांगायचे की मी माझ्या आयुष्यात किमान २५-२७ तरी नोकऱ्या केलेल्या आहेत. ‘जमून घेणं’ हा मला वाटतं त्यांचा स्वभावच नसावा. ‘जमलं तर सूत, नाही तर…’ असा एक अवलिया कलंदर माणूस होता; पण त्यांच्या मस्तकात श्रीहरीच्या शंखाचा स्पर्श झाला असावा आणि म्हणूनच त्यांच्या प्रतिभेला प्रचंड घुमारे फुटून त्यांच्या कवितेनं साऱ्या महाराष्ट्राला वेडंपिसं केलेलं होतं. ‘सुरेश भट कसे होते?’ या प्रश्नाचं उत्तर एकच देता येतं- ‘He was different.’

माझी आणि सुरेश भट यांची गाठ पडली, ती दूरदर्शनच्या परिसरात. नेमकं काय झालं होतं ते आता आठवत नाही. पण त्यांना बहुधा कुणीही ओळखलं नव्हत आणि तो त्यांचा त्यांना मोठा अपमान वाटला होता.

दूरदर्शनच्या लाऊंजमध्ये बसून ते त्या संदर्भातला ‘निषेध’ व्यक्त करीत होते. कसलाही शब्द न वापरता. अबोलपणानं माझ्या हे लक्षात आलं. मी त्यांना सन्मानपूर्वक ‘काय कविराज?’ अशी साद घातली आणि माझ्या रूममध्ये घेऊन आलो. नवीन पिढीतले अनेकजण त्यांना ओळखत नव्हते; पण मग ‘कालाय तस्मै नमः’ असं कशाला म्हणतात हो! पाणी विचारलं, चहा विचारला स्वारी हळूहळू नॉर्मलवर आली. मग मला म्हणाले, ‘विश्वासराव प्रथम काही तरी खायला मागवा.’ ‘काय मागवू’ मी विचारल-‘काहीही मागवा खूप भूक लागली आहे.’ कँटिनच्या पोऱ्याला बोलावून त्यांच्यासाठी बरंच काही खायला मागवलं; पण त्या खाण्यात सिक्वेन्स असा काहीच नव्हतं.

प्रथम ते चहा प्यायले. मग लस्सी प्यायले. मग त्यांनी इडलीवर ताव मारला. मग मध्येच एक कोल्ड्रिंक प्यायले. पुन्हा वडा – सांबर मागवलं. आता परत चहा आणि आईस्क्रिम हवं म्हणाले. सारं काही साग्रसंगीत झाल्यावर या कविराजाचा जीव शांत झाला.

आणि मग राग व्यक्त झाला तो इतकाच, ‘तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातली मंडळी आमच्या विदर्भाकडच्या मंडळींना फारच तुच्छ लेखता बुवा? मी त्यावर झाल्या प्रकाराबद्दल साऱ्या दूरदर्शनच्यावतीनं त्यांची माफी मागितली. स्वारी एकदम खूष झाली. मला वाटतं सुरेश भट हे एखाद्या निरागस मुलासारखे होते. ते शांत होऊन गप्पा मारायला लागले. तेवढ्यात आमचा एक सहकारी विनय धुमाळे माझ्या रूममध्ये आला. त्यानं मात्र भटांना नुसतं ओळखलं नाही, तर कविराज असा त्यांचा आदरपूर्वक उल्लेख करून, ‘भाऊसाहेब एक अर्धातास द्या. आपण तुमची एक घरगुती स्वरूपाची काव्यगायनाची मैफिल रेकॉर्ड करू. नाही म्हणू नका. मी अक्षरश: अर्ध्याच तासात सारी व्यवस्था करतो. ‘ त्याप्रमाणं धुमाळे यांनी पहिल्या मजल्यावरच्या ‘मिटिंग हॉल’मध्ये त्यांची मैफल सज्ज केली. दूरदर्शनचेच अनेक निर्माते या मैफिलीत सामील झाले. साधारण वीस-पंचवीसजण होते. आणि भटांनी त्यांच्या अनुनासिक पद्धतीच्या मांडीतून एकेक कविता सादर केली.

‘रंगून रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतून गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा’ ही कविता भटांनी सादर केली मात्र… जमलेले सारे निर्माते चाट झाले आणि त्यांना एकसमयावच्छेदे करून भटांची ताकद आणि ओळखही झाली. मग रामाच्या अक्षय्य भात्यातून एकेक बाण निघावा, तशी भटांनी त्यांच्या ठेवणीतल्या एकेक कविता सादर केल्या. ‘मलमली तारुण्य माझे, तू पहाटे पांघरावे’,

‘अय्या ही कविता या सुरेश भटांची आहे, मला तर ठाऊकच नव्हतं बाई.’ कुणी तरी महिला निर्मात्या बोलून गेल्या. अर्थात् एक खरं होतं की, सुरेश भटांचा तो तुंदिल देह, कुडता, पायजमा, भव्य चेहरा आणि तितकीच भव्य अंगकाठी यामुळं हा कवी अशा प्रकारची मृदु-मुलायम कविता लिहील यावर कुणाचाच चटकन् विश्वास बसणं शक्य नव्हतं. त्यानंतर सुरेश भटांनी मालवून एक दीप, चेतवून अंग अंग, राजसा किती दिसात लाभला असा निवांत संग, ही कविता सादर केली. मंगेशकर कुटुंबियांनी या कविता त्यांच्या कार्यक्रमांमध्ये वारंवार सादर केलेल्या असल्यामुळे जमलेल्या साऱ्या मैफिलीला त्या चांगल्याच ठाऊक होत्या. पण त्या कवितांचे ते मृदु-मुलायम-तरल शब्द आणि सुरेश भट यांची प्रगल्भ प्रतिभा यांचा मेळ कुणाच्याच डोक्यात बसत नव्हता आणि ते स्वाभाविकही होतं.

मग सुरेश भट यांनी त्यांची खास कविता सादर केली-‘एक साधा प्रश्न माझा, लाख येती उत्तरें’, हे खरे की ते खरे की, ते खरे की ते खरे’ टाळ्यांचा कडकडाट झाला. हळूहळू भटही काय चीज आहे हे जमलेल्या साऱ्यांच्याच लक्षात यायला लागलं. आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याची प्रत्येकालाच हळहळ वाटायला लागली. केलेली चूक खरंतर प्रत्येकालाच जाणवत होती; पण प्रसंग घडून गेलेला होता. सुरेश भट मध्येच तांब्यातलं पाणी, भांड्यात ओतून, भांडं ओठाला न लावता पटापट पाणी प्यायले. विश्रांती वगैरे न घेता सुरेश भट यांनी त्यांच्या अत्यंत गाजलेली उषःकाल होता होता, काळरात्र झाली; अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली’ ही गद्यात पण अनुनासिक पद्धतीनं सादर केलेली कविता मनाचा ठाव घेऊन गेली. सुहासिनी मुळगावकर, आबा-आकाशानंद देशपांडे, विजया जोगळेकर, खुद्द विनय धुमाळे, केशव केळकर, अरुण काकतकर, अशोक डुमरे, विनायक चासकर’ अशी एकेक दिग्गज निर्माते-मंडळी या मैफिलीत सामील झाली. मैफल खूप रंगात आली होती.

तेवढ्यात कुणी तरी भटांना विचारलं, ‘काही चहा’ वगैरे घेणार का मधे?’ त्यावर भट म्हणाले, ‘लस्सी घेऊ बघा आता आणि मग दहा मिनिटांनी चहा घेऊ, त्यानंतर भोजन असणारच आहे ना!’ लस्सी आली. भटांनी लस्सी घेतली आणि ते पुढच्या कवितेकडे वळले. हीही त्यांची कविता उत्तम आणि मुख्य म्हणजे विलक्षण लोकप्रिय ठरलेली. ‘आम्ही जिवंत राहू, आम्ही जिवंत राहू’ आम्हीच ते उद्याचे आकाशरंग पाहू’ त्या भरदार आवाजात त्यांनी सुरू केलं, ‘त्यांची परस्परांची पूजा सुरूच राहो, आम्ही कधी न फोडू त्यांचा पुढ्यात टाहो’ आणि कवितेचं शेवटचं कडवं सादर करताना अनुनासिकेचा तो स्वर टीपेला लावत तो कविराज गरजला, ‘जेव्हा आम्ही भडाग्नी त्यांच्या जगास देऊ, एकेक आसवाचा तेव्हा हिशोब मागू.’ या कवितेच्या त्या ओळी १९७७ मध्ये इंदिरा गांधी यांचा दारूण पराभव झाला, त्यावेळी सादर केलेल्या एका कार्यक्रमात आम्ही वापरल्या होत्या आणि त्यानंतर १९८० मध्ये जनता पक्ष सरकार नाईलाजानं पायउतार झालं त्याही वेळी वापरल्या होत्या.

वास्तवाचं दर्शन घडवणारी, जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारी, निर्भिड स्वरूपाचं तत्त्वज्ञान मांडणारी अशी सुरेश भट या कविची कविता आणि गझल होती. त्या मैफिलीत मग साऱ्यांचा चहा झाला. भटसाहेब तर आधीच प्यायलेल्या लस्सीवर चांगला दोन कप चहा प्यायले. मग त्यांनी मिसळीवर ताव मारला आणि जेवणाला किती वेळ आहे? असा प्रश्न करीत सर्वांना चकित करीत आणखी एक कविता सादर करतो, असं म्हणत त्यांनी ‘सरणावर जाताना’ या कवितेच्या ओळी सादर केल्या. समाज-मनाची जगताना होणारी रोजची पंचाईत वर्णन करणारी ही कविता ऐकताना अंगावर सर्रकन काटा आला. आपल्या जाड्याभरड्या आवाजात आणि तशाच प्रकारच्या चालीत सुरेश भट म्हणाले, ‘इतुकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते’ ही काव्यपंक्ती केवळ मुंबईसारख्या शहरामधलाच नव्हे, तर माळीणसारख्या छोट्यातल्या छोट्या गावातला माणूस सुद्धा दैनंदिन जीवन जगताना प्रत्येक क्षणी अनुभवतो आहे. सामाजिक परिस्थितीचं जबरदस्त भान असणारा हा कवी त्या छोटेखानी मैफिलीत त्या दिवशी पूर्णपणानं भान विसरून कविता सादर करीत होता.

मैफिल संपली. कॅमेरा युनिट काम करायचं थांबलं. ‘पॅकअप्’ अशी ऑर्डर दिली गेली. आणि सुरेश भट निर्माते धुमाळे यांना म्हणाले, ‘धुमाळे एक कागद आणि पेन द्या. माझ्या सगळ्या कवितांचे हक्क राईटस् मी तुमच्या दूरदर्शनला देऊन टाकतो.’ आणि आता मला नक्की आठवत नाही; पण तसं बहुधा त्यांनी एका कागदावर लिहून धुमाळे यांच्याकडे तो कागद सोपवला. आज तो कागद दूरदर्शनच्या महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये असेल की नाही कुणास ठाऊक? पण जिंदादिल अशा त्या माणसाचं कविचं जरासं कौतुक करून त्याच्या बाबतीत घडलेला तो ‘दुर्लक्षितपणा’चा प्रकार सोडता क्षणीच एखाद्या लहान मुलासारखं आपलं मन आहे हे या जिंदादिल माणसानं तिथल्या तिथं दाखवून दिलं. ‘वैदर्भीय जिंदादिली’ त्या दिवशी एकदम सहज बघायला मिळाली.

दूरदर्शनमल्या नोकरीत अनेक प्रकारची बरी – वाईट माणसं भेटली. पण सुरेश भट यांच्यासारखा कलंदर, अवलिया आणि राग आणि लोभ एकाच प्रकारानं व्यक्त करणारा ‘सेलेब्रेटी’ क्वचितच भेटला. त्यानंतर मात्र भट अनेकदा भेटले. दूरदर्शन केंद्रातही आले. पण पुन्हा ते तसे कधी रागावलेले दिसले नाहीत. मला असं वाटायचं की अशा कलंदर असा मान्य व्यक्तींचा ‘इगो’ समजावून घेऊन त्यांना त्या प्रकारची ‘ट्रीटमेंट’ देण्यात आमच्या दूरदर्शनमधली काही मंडळी तया काळात कमी पडत. आणि दुसरं म्हणजे माझी नोकरी ‘परमनंट’ आहे, माझं कोण काय वाकडं करणार आहे’ ही भावना या वागण्यामागं असे की काय कणास ठाऊक! पण रागावलेले सुरेश भट बघता बघता साऱ्या दूरदर्शनचे मित्र झाले हे मात्र अगदी खरं!!

— डॉ. विश्वास मेहेंदळे
मुंबई

काव्यदीप मासिकातून साभार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..