नवीन लेखन...

नाट्य-चित्र कानोसा – झपाटलेला २ – 3D

वीस वर्षांपूर्वी जेव्हा एका प्रसंगामध्ये लक्ष्या आणि तात्या विंचू यांच्या बाचाबाचीत इंस्पेक्टर महेश जाधव कडून बाहुलारुपी तात्या विंचूच्या कपाळात मध्यभागी गोळी लागून त्याचा मृत्यू होतो. झपाटलेला २ मध्ये याच तात्या विंचूचा आत्मा बाबा चमत्कार कडून पुन:रुजिवीत करण्यात येतो. याच तात्या विंचूचा २० वर्षांनंतर वावर या पृथ्वीवर कसा आहे त्याला नेमकं काय साध्य करायचं आहे, हे “झपाटलेला २” मधून पहायला मिळतं. 3D तंत्रज्ञानामुळे चित्रपट विशेष चर्चेत होता, पण त्याचबरोबर या चित्रपटात वेगळं काही तरी पहाण्याची अपेक्षा करणार्‍या प्रेक्षकांचा थोडासा हिरमोड होण्याची शक्यता ही आहे, कारण कथा, पटकथा, संवाद यांच्या कमजोरतेमुळे चित्रपटाचा आशय ही दुबळा वाटतो, खरंतर आणखीन जोर द्यायला हवा होता तो कथानकावर, जो देता ही आला असता, पण तांत्रिकदृष्ट्या, संगीतामुळे तसंच तात्याविंचूच्या कारनाम्यांमुळे चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन होत रहातं.

“झपाटलेला २” ची कहाणी घडते ती मुंबई आणि श्रीरंगपूर मध्ये तात्या विंचू जिवंत झालेली बाब पोलिस कमिशनर महेश जाधव (महेश कोठारे) यांना कळते. त्यावेळेस ते श्रीरंगपूर गाठतात. त्याच गावात लक्ष्मीकांत बोलके (लक्ष्मीकांत बेर्डे) यांचं कुटुंब आहे. आदित्य बोलके (आदिनाथ कोठारे) आणि त्याची आजी. आदित्य बोलकेंना आपल्या वडिलांप्रमाणेच बोलक्या बाहुल्यांच्या खेळांना प्रचिती मिळवून त्याद्वारे मनोरंजन ही करायचं आहे. श्रीरंगपूर या गावी जत्रोत्सव सुरु आहे विविध फड उभारले आहे कुठे लावणीचा तर बोलक्या बाहुल्यांचा सुद्धा. अशातच बोलक्या बाहुल्यांचा खेळ दाखवायला आहेत मकरंद अनासपुरे. आणि चित्रपटाला नृत्याची फोडणी मिळावी यासाठी लावणीचा फड आहे. सोनाली कुलकर्णी या चित्रपटात लावणी नृत्यांगना असली तरी अभिनेत्री म्हणून तिची भूमिका अगदी नेमकी आहे. सई ताम्हणकर वार्ताहरच्या भूमिकेत असून, तिचा एकंदर चित्रपटात वावर कमीच आहे.
मध्यंतरापूर्वी एखादा सीन्सचा अपवाद वगळला तरी फारसं चित्तथरारक असं काहीच घडत नाही, परंतु दिपक शिर्के, मकरंद अनासपुरे, तसंच लावणीच्या फडातील कलाकारांसमवेत आदित्य बोलके (आदिनाथ कोठारे) ची धम्माल मस्ती यामुळे बर्‍यापैकी विनोदी प्रसंग उद्भवतात आणि कथा पुढे सरकते ती आदिनाथ कोठारे-सोनाली कुलकर्णी, मकरंद अनासपुरे-सई ताम्हणकर यांच्या रोमॅंटिक प्रसंगांनी सुद्धा.
तात्या विंचूचा करिष्मा पहायला मिळतो तो मध्यंतरानंतर कारण श्रीरंपूरच्या जत्रेचा समारोप जवळ आला आहे; अशातच खेळ, नृत्य, मनोरंजनाच्या सर्व कार्यक्रमांना ऊत आलेला असतो. आणि तात्या विंचूचा रोल भाव खाऊन जातो. अर्थातच त्याचं सर्व श्रेयं पाध्ये कुटुंबियांना देणं महत्वाचं ठरतं, कारण 3D तंत्रात बाहुल्यांचा वापर कथेशी निगडीत सर्व बाबींना नीट समजून घेऊन स्वत: कडून शंभर टक्के या चित्रपटाला दिल्याचं जाणवतं, यासाठी त्यांचं अभिनंदन करायलाच पाहिजे.
गाणी सुरेल आहेत, पण भडिमार झाला आहे. कथा भरकटल्यामुळे शेवटी तडकाफडकीनं “वाईण्ड अप” केल्याचं वाटत राहतं. 3D चा प्रभाव असल्यामुळे काही नवीन गोष्टी प्रथमच मराठीतल्या रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पहायला मिळाल्या आहेत, याची दखल ही घ्यावीच लागेल कारण मराठीतला हा पहिला 3D सिनेमा आहे.
सह कलाकार, पाहुणे कलाकारांच्या भूमिका अगदी चोख आहेत, निवड उत्तम असली तरी आदिनाथ कोठारेला जास्त फोकस करत असल्याचं जाणवत राहतं. त्याच्या अभिनयात थोडीशी सुधारणा आहे, पण पडद्यावरचं काम उत्तम आहे.
हा चित्रपट पाहिल्यावर “झपाटलेला १” ची आठवण होते आणि सहाजिकच लक्ष्मीकांत बेर्डेंची छबी (प्रतिमा) डोळ्या समोर उभी राहते, कदाचित त्यांच्या नसण्यामुळे चित्रपटाचा “कॉमेडी बाज” कमी झाल्याचं जाणवत राहतं. तरीपण चित्रपट कंटाळवाणा कुठेच वाटत नाही, त्यामुळे फुल-२ मनोरंजनाचा पर्याय आणि “झपाटलेला १” ची कन्टीन्युटी म्हणून “झपाटलेला-२” हा एकदा तरी थिएटर मध्ये जाऊन पहायलाच हवा असा सिनेमा आहे.

— सागर मालाडकर

Avatar
About सागर मालाडकर 111 Articles
श्री. सागर मालाडकर हे आकाशवाणीवरील निवेदक असून ते मराठीसृष्टीसाठी नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..