कुशल शल्‍यचिकित्‍सक डॉ. डेंटन कूली

विलक्षण बुद्धिमान व प्रतिभेचे उत्तुंग देणे लाभलेला हा कुशल शल्‍यचिकित्‍सक स्‍वतःच्‍या कर्तृत्‍वावर पूर्ण विश्वास ठेऊन होता. त्‍यांच्‍या कारकीर्दीतील एक प्रसंग नेहमी उधृत केला जातो. एकदा एका खटल्‍याच्‍या संदर्भात कूली यांची साक्ष होती. त्‍यांना वकिलाने विचारले की, ‘आपण स्‍वतःला जगातील सर्वोकृष्‍ट हृदयशल्‍यविशारद समजता, ही आत्‍मप्रौढी आहे असे आपणास वाटत नाही का?’ यावर कूली म्‍हणाले, ‘कदाचित शक्‍य आहे, परंतु मी खरे बोलण्‍याची शपथ घेतली आहे’.

संपूर्णपणे कृत्रिम हृदयाचे मानवी शरिरात प्रथम प्रत्‍यारोपण करण्‍याचे श्रेय डॉ. डेंटन कूली यांना जाते. कूली, डॉ. मायकेल डिबाकी यांच्‍याकडे तेव्‍हा काम करत होते. या प्रत्‍यारोपणानंतर कूली यांनी स्‍वतःवर वादळही ओढवून घेतले व डिबाकी यांच्‍याबरोबर जवळजवळ आयुष्‍यभर चालणारे वैरदेखील!

२२ ऑगस्‍ट १९२० रोजी अमेरिकेतील ह्यूस्‍टन येथे एका अत्‍यंत सधन कुटुंबात कूली यांचा जन्‍म झाला. टेक्‍सास प्रांतातील ऑस्‍टीन येथून त्‍यांनी पदवी घेतली. विषय होता प्राणीशास्‍त्र. शल्‍यचिकित्‍सेकडे ते वळले ते एका विलक्षण घटनेनंतर. १७ वर्षांचे असतांना ते सॅन अॅन्‍टोनिओ येथे त्‍यांच्‍या एका शल्‍यचिकित्‍सक मित्राला भेटावयास गेले. तो मित्र दारू पिऊन गोंधळ घालतांना भोसकून जखमी झालेल्‍यांवर उपचार करीत होता. सुरीची जखम टाके घालून शिवत असतांना, कूली यांनी त्‍या संपूर्ण घटनाक्रमाचे अतिशय बारकाईने निरीक्षण केले. त्‍या घटनेचा त्‍यांच्‍या मनावर खोलवर परिणाम झाला व त्‍यांनी शल्‍यचिकित्‍सक होण्‍याचे ठरविले. सुरुवातीला त्‍यांनी गालव्‍हेस्‍टन या गावी वैद्यकीय शिक्षणास सुरुवात केली, पण नंतर तेथून ते बाल्टिमोर येथील जॉन हॉपकिन्‍स येथे गेले. जॉन हॉपकिन्‍स येथून १९४४ साली त्‍यांनी वैद्यकीय पदवी मिळविली. जॉन हॉपकिन्‍स येथे असतांना कूली यांना डॉ. आल्‍फ्रेड ब्‍लॅलॉक यांच्‍याकडे काम करण्‍याची संधी मिळाली. डॉ. ब्‍लॅलॉक यांच्‍या पहिल्‍या जगप्रसिद्ध ‘ब्‍लू बेबी’ (जन्‍मजात हृदयदोष असलेली बालके) वरील उपचारपद्धतीतील शस्‍त्रक्रियेदरम्‍यान कूली डॉ. ब्लॅलॉक यांच्‍याकडे प्रशिक्षणार्थी होते. दुसर्‍या महायुद्धाच्‍या दरम्‍यान कूली लष्‍करात भरती झाले. ऑस्ट्रियातील लिन्‍झ येथील रुग्‍णालयात शल्‍यचिकित्‍सा प्रमुख म्‍हणून ते कार्यरत होते. लष्‍करातील सेवा बजावून ते अमेरिकेला परत आले व पुन्‍हा जॉन हॉपकिन्‍स येथे रुजू झाले. १९५० मध्‍ये त्‍यांनी काही काळ लंडन येथे डॉ.रसेल ब्रॉक यांच्‍यासमवेतही काम केले. अमेरिकेस परत आल्‍यानंतर कूली यांनी डॉ. मायकेल डिबाकी यांच्‍यासमवेत काम करण्‍यास सुरुवात केली. डॉ. डिबाकी तेव्‍हा बेयलर विद्यापीठात शल्‍यचिकित्‍सेचे प्रमुख होते. १९५१ पासून १९६९ मध्‍ये बेबनाव होऊन राजीनामा देईपर्यंत डिबाकी व कूली यांनी एकत्र काम केले. कृत्रिम हृदय विकसित करण्‍यासाठी ते दोघे प्रयत्‍नशील होते. त्यासाठी ते प्राण्‍यांवर प्रयोग करत होते. ते प्रयोग यशस्‍वी झाले परंतु अद्यापि मानवी रुग्‍णावर त्‍याची चाचणी झाली नव्‍हती. त्‍यामुळे मानवी रुग्‍णावर कृत्रिम हृदय  प्रत्‍यारोपित करावयास अजून काही अवधी पाहिजे असे डॉ. डिबाकी यांचे मत होते. यादरम्‍यान कार्प या नावाचा रुग्‍ण इस्पितळात दाखल झाला. त्‍याचे हृदय अत्‍यंत कमकुवत झाले होते व  त्‍यामुळे रक्‍तपुरवठा सुरळीत ठेवण्‍याचे काम करण्‍यास असमर्थ होते. इतक्‍या कमकुवत हृदयावर उपचारास मर्यादा होत्‍या. एक वेळ अशी आली की त्‍यापुढे उपचार होणे शक्‍य नव्‍हते. त्‍यावेळी कूली यांनी त्यावर कृत्रिम हृदय प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला. डिबाकी यांचे एक सहकारी अर्जेंटिना येथील डॉ. डोमिंगो लिओट्टा, डिबाकी व कूली यांच्‍या समवेत कृत्रिम हृदयावर काम करीत होते. कूली यांनी  लिओट्टा यांच्‍या मदतीने प्रयोगशाळेतून कृत्रिम हृदय आणविले. सोळा सहकार्‍यांच्‍या पथकासह शस्‍त्रक्रिया करून कार्प यांचे हृदय काढून त्‍या जागी हे कृत्रिम हृदय बसविले. या संपूर्ण प्रक्रियेला तीन तास इतका वेळ लागला. प्‍लॅस्टिक व डॅक्रॉन यांचा उपयोग करून हे हृदय बनविण्‍यात आले होते व ते एक नियंत्रणप्रणालीला जोडले होते. शस्‍त्रक्रियेनंतर ६४ तासपर्यंत या यंत्राने काम केले. हा देखील विक्रमच होता. याआधी प्राण्‍यांवर प्रयोग करीत असतांना हे यंत्र यापेक्षा कमी वेळ चालले होते. या अवधीत कार्प यांच्‍यासाठी सुयोग्‍य दात्‍याचा शोध युद्धपातळीवर सुरू झाला. तसा दाता मिळाल्‍यावर कार्प यांच्‍यावर परत एकदा शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली व मानवी हृदय प्रत्‍यारोपित करण्‍यात आले. शस्त्रक्रिया केल्यानंतर  ३२ तासांनी कार्प यांचे न्‍यूमोनियामुळे निधन झाले. ४ एप्रिल १९६९ ला सुरू झालेल्‍या या वादळी प्रक्रियेचा तो अंत होता. या क्रांतिकारी घटनेनंतर कूली यांना बराच रोष सहन करावा लागला. कृत्रिम हृदय बसविण्‍यापूर्वी त्‍यांनी डिबाकी यांची परवानगी घेतली नव्‍हती. कृत्रिम हृदयावर संशोधन करण्‍याच्‍या प्रकल्‍पास अमेरिकन केंद्र शासनाचे अनुदान मिळत होते. कूली यांच्‍या या शस्‍त्रक्रियेमुळे या प्रकल्‍पाचे अनुदान थांबविण्‍यात येईल अशी भीती डिबाकी यांना वाटली. इतकेच नव्‍हे तर घाईघाईने, प्रसिद्धीसाठी कूली यांनी बालिशपणे वागून सदर शस्‍त्रक्रिया केली असे डिबाकी यांचे मत झाले. कूली यांना अर्थातच या गोष्‍टी अमान्‍य होत्‍या. त्‍यांचे म्‍हणणे असे पडले की प्रयोगादरम्‍यान एखाद्या उपकरणामुळे जर रुग्‍णाचे प्राण वाचण्‍यास मदत होत असेल तर त्‍यात काहीच वावगे नाही व त्‍यामुळे अनुदानासाठीच्‍या अटींचा भंग होत नाही. पुढे जाऊन कूली असेही म्‍हणाले की रशियनांनी अंतराळात पहिली झेप घेतली व अमेरिकेस मागे टाकले. या क्षेत्रातही ते आघाडी घेऊ शकले असते पण मी त्‍यांना मागे टाकले.

या घटनेनंतर डिबाकी व कूली यांच्‍यात जे वितुष्‍ट आले ते चाळीस वर्षेपर्यंत. डिबाकी यांच्‍या ९७व्‍या वर्षी त्‍यांना ‘डेंटन कूली कार्डिओव्‍हॅस्‍क्‍युलर सोसायटी’तर्फे जीवन गौरव पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले. डिबाकी वृद्ध झाले होते. व्‍हीलचेअरवर बसून त्‍यांनी तो पुरस्कार स्‍वीकारला तेव्‍हा ८६ वर्षांचे कूली व्‍यासपीठावरून खाली उतरून डिबाकी यांच्‍याजवळ गेले. वाकून दोघांनी हस्‍तांदोलन केले व वादाला पूर्णविराम दिला.

डॉ डिबाकी व डॉ कूली

डॉ. कूली निष्‍णात शल्‍यविशारद होते. शस्‍त्रक्रियेला लागणारा वेळ व रुग्‍ण बरा होण्‍याचा कालावधी यांचा सरळ संबंध असतो असे त्‍यांचे मत होते व त्‍यामुळे जलद गतीने शस्‍त्रक्रिया करणे ही त्‍यांची खासियत होती. जर्मनीतील बर्लिन येथील ‘हार्ट इन्स्टिट्यूट’चे माजी संचालक डॉ. रोलंड हेत्सर, कूली यांचे एकेकाळचे सहकारी होते. “कूली जलद गतीने काम करतात पण शस्‍त्रक्रियेदरम्‍यान ते अत्‍यंत संथ वाटतात. परंतु त्‍यांनी घातलेला प्रत्‍येक टाका परिपूर्णच असतो. कोठलीच क्रिया त्‍यांना परत करावी लागत नाही इतके ते निष्‍णात आहेत. त्‍यामुळे सकृतदर्शनी ते संथ वाटत असले तरी त्यांची प्रत्येक कृती परिपूर्ण  असल्याने त्यांची गती अत्यंत वेगवान रहाते.”  डॉ. हेत्सर यांची ही प्रतिक्रिया अत्‍यंत बोलकी आहे.

डॉ. कूली व डॉ. डिबाकी या दोघांनी मिळून क्रांतिकारी वाटणार्‍या शल्‍यचिकित्‍सेतील कित्येक उपचारप्रणाली विकसित केल्‍या. रक्‍तवाहिन्‍यांमधील प्राणघातक फुगवटे तसेच मान व पायातील रक्‍तवाहिन्‍यांतील अर्धांगवायूच्‍या झटक्‍याला निमंत्रण देणारे अडथळे दुरुस्‍त करू शकणारी शस्‍त्रक्रिया त्‍यांनी विकसित केली. स्‍वतंत्रपणे कूली यांनी देखील हृदयशल्‍यचिकित्‍सेतील कितीतरी नवीन तंत्रे विकसित केली. ‘रक्‍तविरहित शस्‍त्रक्रिया’ करण्‍यात ते विशेष प्रवीण होते. हार्ट-लंग मशीन मधून रुग्‍णाच्‍या शरीरात बाहेरून जाणारे, दात्‍याच्‍या रक्‍ताचे प्रमाणे मर्यादित ठेवण्‍यात कूली यशस्‍वी झाले होते. याचा सर्वात मोठा फायदा म्‍हणजे ‘हेपॅटायटिस बी’ या प्रकारची गंभीर कावीळ होण्‍याचा धोका कमी झाला. कूली जेव्‍हा ‘ओपन हार्ट’ शस्‍त्रक्रिया करत होते तेव्‍हा ‘हेपॅटायटिस बी’ वर उपचार होतील  अशी औषधे नव्‍हती, त्‍यामुळे असा संसर्ग होणे म्‍हणजे मृत्‍यूला निमंत्रण देण्‍यासारखेच होते. तसेच असे कित्‍येक रुग्‍ण असतात की ज्‍यांना काही धार्मिक कारणांमुळे दुसर्‍याचे रक्‍त स्‍विकारता येत नसते. त्‍यांनाही कूली यांच्‍या तंत्रामुळे फायदा होऊ लागला. १९८४ मध्‍ये कूली यांना  ‘प्रेसिडेंटस् मेडल ऑफ फ्रीडम’ ने सन्‍मानित करण्‍यात आले. ‘रेने लेरिच’ पुरस्‍कारही कूली यांना प्रदान करण्‍यात आला. याव्‍यतिरिक्‍तही असंख्‍य सन्‍मान व पुरस्‍कारांनी कूली यांना गौरविण्‍यात आले. कूली यांच्‍याकडे १०० हृदयप्रत्‍यारोपण शस्‍त्रक्रिया सर्वप्रथम करण्‍याचा मान जातो. कूली निष्‍णात शल्‍यविशारद होतेच. वयाच्‍या पन्नाशीतच त्‍यांनी ५००० पेक्षा जास्‍त हृदयशस्‍त्रक्रिया व १७ हृदयप्रत्‍यारोपण शस्‍त्रक्रिया केल्‍या होत्‍या. त्‍यांनी विपुल लिखाणही केले. त्‍यांची १२ पुस्‍तके व १४०० पेक्षा जास्‍त शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.

— डॉ हेमंत पाठारे,  डॉ अनुराधा मालशे

 

Avatar
About डॉ. हेमंत पाठारे, डॉ अनुराधा मालशे 20 Articles
डॉ. हेमंत पाठारे हृदय-शल्यविशारद आहेत. ते हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (हार्ट-लंग ट्रान्स्प्लांट) करतातच पण त्याशिवाय अशा शस्त्रक्रिया करण्यास उत्सुक शल्यचिकित्सकांना प्रशिक्षण देणे, त्यांच्या कामाची चिकित्सा करणे व परीक्षण करणे हे देखील ते करतात. भारतातील विविध शहरांतील हृदयशल्यचिकित्सकांना त्यांच्या शहरात हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण कार्यक्रम सुरु करणे व राबविणे यासाठी डॉ. हेमंत पाठारे प्रशिक्षक व निरीक्षक आहेत. डॉ अनुराधा मालशे इंग्लंडमधील केंब्रीज विद्यापीठातील डॉ. एल. एम. सिंघवी फेलो आहेत.

1 Comment on कुशल शल्‍यचिकित्‍सक डॉ. डेंटन कूली

  1. Really interesting information. We are aware of the names of the Doctors but this article gives us in-depth information of their achievements.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…