नवीन लेखन...

डबल सीट

“डबल सीट’ म्हणजे एकाच दुचाकीवरील दोघांचा प्रवास.. माझ्या लहानपणी मी वडिलांच्या सायकलच्या दांडीवर असलेल्या छोट्या लाकडी सीटवर बसून फिरायला जात असे. त्यावेळी सीटवरुन घसरु नये म्हणून माझे दोन्ही पाय हॅण्डलच्या राॅडला एकावर, दुसरा टाकलेला असे.

पुढे पाचवीत असताना मी शाळेतल्या मैदानावर, धडपडत सायकल शिकलो. कधी मित्राच्या सायकलमागे त्याच्या सीटला पकडून कॅरीयरवर बसून डबलसीटचा आनंद घेतला तर कधी पुढे दांडीवर बसून आणि हॅण्डलला धरुन घरापासून विठ्ठलवाडीपर्यंत सहलीची हौस भागवली..

मी स्वतः काॅलेजला गेल्यानंतरच मित्रांना डबल सीट घ्यायला सुरुवात केली. ऐंशीच्या दशकात मी जेव्हा विश्रांतवाडी, कळस, देहू रोडला मिलीट्रीच्या परिसरात जात असे तेव्हा अनेक मिलीट्रीतले सरदारजी आपल्या पत्नीला, मुलांना सायकलवरुन डबल सीट घेऊन जाताना हमखास दिसायचे. तेव्हा स्कुटर अशा क्वचितच दिसायच्या. त्याकाळी सायकल हेच सर्वसामान्यांचं एकमेव वाहन होतं.

बदलत्या काळानुसार सायकलींची जागा स्कुटरने घेतली. व्हेस्पा, लॅम्ब्रेटा, एम फिफ्टी अशा बजाजच्या स्कुटर व मोपेड रस्त्यावर दिसू लागल्या. त्यावरुन डबल सीट जाणारी कुटुंब दिसू लागली. त्याकाळी स्त्रिया साडीमध्येच असायच्या, साहजिकच त्या स्कुटरवर बसताना एका बाजूला दोन्ही पाय घेऊन, चालविणाऱ्याच्या खांद्यावर हात ठेवून बसायच्या.

सुरुवातीला पुरुषच स्कुटर चालवायचे, कालांतराने स्त्रियाही चालवू लागल्या. साडी ऐवजी त्या पंजाबी ड्रेस वापरु लागल्या. त्यामुळे पुरुषांच्या मागे त्या बॅलन्स ठेवून आरामशीर बसू लागल्या.

हिंदी व मराठी चित्रपटांतूनही नायक-नायिका सायकलवरुन गाणी म्हणताना दिसत होत्या. ‘तेरे मेरे सपने’ चित्रपटात देव आनंदच्या पुढे बसून मुमताजने ‘हाऽ मैं ने कसम लीऽ..’ असं म्हणत देव आनंदच्या ‘होऽ ला होऽ’ केलेलं आहे. कधी अशीच री, विनोद खन्ना व योगिताबालीनं ‘मेरे अपने’ मध्ये देखील ओढलेली आहे..

‘बाॅबी’ चित्रपटात मिनी राजदूतवर ऋषी कपूर, डिंपलला डबल सीट घेऊन जो प्रवास करतो तो फार रोमॅंटिक होता. त्यामुळेच तो चित्रपट तरूणवर्गाने पुन्हा पुन्हा पाहिला..

मी पहिल्यांदा टीव्हीएस मोपेड वापरली. तेव्हा सदाशिव पेठेतून औंध हाॅस्पिटल, चिंचवडपर्यंत जात असे. याच मोपेडवरुन शहरात व जवळपासच्या उपनगरात मागे मित्राला, भावाला, वडिलांना घेऊन प्रवास केला आहे.

आयुष्यात पहिल्यांदा मी एका लेखिकेला, नंतर ती प्रकाशिका झाली.. नागनाथ पार ते नारायण पेठेतील मॅजेस्टिक प्रकाशन पर्यंत घेऊन गेलो होतो.. त्यावेळी मला फार टेन्शन आलं होतं. नंतर मात्र सवय झाली. कधी ज्येष्ठ अभिनेते शरद तळवलकरांना माझ्या आॅफिसपासून त्यांच्या चिमणबागेतील घरी नेऊन सोडलं तर कधी राजा गोसावींना नाटकाच्या तालमी पर्यंत घेऊन गेलो.

मोपेड नंतर एम एटी दुचाकीवरून अनेकदा डबलसीटने प्रवास केला. माझा नेहमी आग्रह असे, की मागे बसणाऱ्याने माझ्या खांद्यावर हात ठेवावा. काही जण तसा हात न ठेवल्याने मागे ती व्यक्ती बसली आहे, असे समजून मी गाडी सुरु करायचो व नंतर पुढे गेल्यावर कळायचे की, ती व्यक्ती बसलेलीच नाहीये…

कोणी महत्त्वाची व्यक्ती मागे बसलेली असताना, वाटेत जर गाडीने असहकार पुकारला तर गाडीचा भयंकर राग येत असे. अशाने ‘इज्जतीचा फालुदा’ होण्याची वेळ येत असे. मग गाडी कडेला घेऊन, तिचा स्पार्क प्लग काढून, तो स्वच्छ करुन गाडी स्टार्ट करावी लागे. हेच जर पावसाळ्यात घडलं तर, गाडी रस्त्यावर तशीच सोडून देण्याची इच्छा, हज्जारदा मनात येत असे.

एम एटी नंतर मी टीव्हीएस स्कुटी वापरली. काही वर्षांनी ती सुद्धा बंद केली.. पस्तीस वर्षांपूर्वी माझं हिरो होंडा मोटरसायकल घेण्याचं स्वप्न होतं. त्यासाठी मी बुकींग देखील केलं होतं. काही कारणास्तव ते स्वप्नं पूर्ण होऊ शकलं नाही…

आता मी स्वतः, घरातल्या व मित्रांच्या गाडीवर डबल सीट बसून प्रवास करतो. कारण ‘स्वदेस’ या शाहरुख खानच्या चित्रपटापासून सगळीकडे सर्रास टीबल सीट बसून दुचाकी सुसाट पळत असतात.. त्यांच्यापुढे आपण गाडी चालवणं ही अशक्यप्राय गोष्ट आहे. शिवाय मामांचा त्रास… काही झालं की, गाडी घ्या बाजूला… पावती फाडा किंवा दक्षिणा द्या… त्यापेक्षा दुसऱ्यांच्या मागे निवांत बसणं कधीही चांगलंच!!!

© सुरेश नावडकर.

मोबाईल: ९७३००३४२८४

५-८-२१.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 187 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..