दिवाळीत जपू या सामाजिक भान

दिवाळी म्हणजे अक्षय्य आनंदाचा सण. असा सण जगातील इतर कोणत्याही संस्कृतीमध्ये आढळत नाही. कालपरत्वे हा सण साजरा करण्यात काही बदल होणे गरजेचे आहे. तसे प्रयत्न सुरू झाल्याने दिवाळीचा सण हळूहळू का होईना नवे रूप धारण करत आहे. फटाके फोडणे कमी करून, खरेदीप्रसंगी गरजूंना मदत करून आणि खाद्यपदार्थांऐवजी दिवाळी अंकांची देवाणघेवाण करून आपण नव्या प्रथांना जन्म दिला पाहिजे.

जगाच्या पाठीवर अनेक संस्कृती आहेत आणि त्यांचे आपापले सणही आहेत. मात्र, भारतातील दिवाळीसारखा सण जगात कुठेही नसेल. प्रकाशाचा, समृद्धीचे पूजन करण्याचा आणि मनसोक्तपणे आनंद साजरा करण्याचा सण म्हणून आपण दिवाळीकडे पाहत असतो. दिवाळीत नवी खरेदी केली जाते आणि भरपूर खर्च केला जातो. म्हणून दिवाळी झाली की बर्‍याचजणांचे खिसे हलके झालेले असतात. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर अर्थव्यवस्था कशी आहे याला नाही म्हटले तरी महत्त्व प्राप्त होते. सुदैवाने या क्षणाला तरी आपल्या देशाची अर्थव्यवस्था दिवाळी आनंदाने साजरी करावी अशी नक्कीच आहे.


हा लेख मराठीसृष्टी (www.marathisrushti.com) या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. लेख शेअर करायचा असल्यास लेखकाच्या नावासह शेवटपर्यंत संपूर्णपणे शेअर करावा...

महागाईचे संकट आहेच, परंतु तरीही आपला उत्साह कमी झालेला नाही. महागाईचा विषय तसा शहरांपुरता आहे. आपण तिचा खेड्यांच्या संदर्भात विचारच करत नाही. आपल्या देशातली ६५ टक्के जनता आजही खेड्यात रहाते आणि या जनतेचे सारे जीवन शेतीच्या अर्थव्यवहारावर आधारलेले आहे. शहरात लोक जिला महागाई म्हणतात तिच्यामुळे धान्य, फळे, भाज्या पिकवणार्‍या शेतकर्‍यांच्या हातामध्ये चार पैसे जादा गेलेले असतात. यावेळी अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतीमालाचे भाव थोडे वाढल्यामुळे शेतीव्यवसायावर अवलंबून असलेल्या लोकांच्या हातात पैसा खेळायला लागला आहे आणि त्याचे प्रत्यंतर बाजारात येत आहे. शेवटी शहरातल्या लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, खेड्यातल्या आणि शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांच्या हातात जाणारा पैसा शेवटी शहरातच येत असतो आणि शहरातल्या उद्योगांना चालना मिळत असते. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी वारंवार ही गोष्ट सांगत आले आहेत.

भाज्या, फळे आणि धान्याचे भाव वाढले तर शहरांचाही विकास त्याच पैशांमधून होणार असतो, असे ते म्हणतात. एकंदरीत, ६५ टक्के जनतेच्या हातात बर्‍यापैकी पैसा आल्याने दिवाळीतला आर्थिक व्यवहार वाढत आहे. आता शेतकर्‍यांच्या घरी वॉशिंग मशीन, फ्रीज आणि वाहने मोठ्या प्रमाणावर दिसू लागली आहेत. दिवाळीचा सण परंपरेप्रमाणे साजरा होत असतोच, पण काळानुरुप त्यात काही बदल होत असतात. असे बदल झालेही पाहिजेत. महाराष्ट्रात पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी घडवत आणलेला एक बदल मोठा दखलपात्र आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी फटाकेविरहीत दिवाळी साजरी करण्याची मोहीम सुरू केली आहे. फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण अंतिमत: सर्वांनाच घातक ठरणारे आहे. अनेक अपरिहार्य कारणांमुळे पर्यावरणाची हानी होत आहेच. त्यात आपल्या हातून फटाके उडवून आपण आणखी भर कशाला टाकायची ? ते आपण नक्कीच टाळू शकतो. म्हणून पर्यावरणवादी संघटना फटाकेविरहित दिवाळीची मोहीम राबवत आहेत. त्यांचा प्रचार विशेषत्वाने शाळा-शाळांमधून सुरू आहे. पर्यावरणाची हानी शेवटी पुढच्या पिढीला घातक ठरणारी आहे. त्यामुळे या पिढीवर आपले पर्यावरण शुद्ध ठेवण्याचा संस्कार रुजवला जात आहे. सुदैवाची बाब म्हणजे तो बर्‍यापैकी रुजतही आहे. महाराष्ट्रातल्या कित्येक शाळांमध्ये मुलांनी फटाकेविरहित दिवाळी साजरी करण्याच्या शपथपत्रांवर सह्या केल्या आहेत. फटाक्यांच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजामध्ये हा फटाकेविरहित दिवाळीचा आवाज फारसा लक्षात येणार नसला तरी एक छान सुरुवात झाली आहे हे नाकारता येत नाही आणि त्याचे स्वागतच केले पाहिजे.

दिवाळीचा फराळ ही सर्वांसाठीच अपूर्वाईची बाब असते. मात्र आता आपले जीवनमान इतके सुधारले आहे की, दिवाळीच्या फराळाचे आपल्याला नवल राहिलेले नाही. कारण पूर्वीच्या काळी जे खाद्यपदार्थ केवळ दिवाळीतच खायला मिळायचे आणि ज्याच्यासाठी आपण आतुरतेने दिवाळीची वाट पहायचो ते खाद्यपदार्थ आता रोजच खायला मिळू लागले आहेत. ही मध्यमवर्गीयांची परिस्थिती आहे. असे असले तरी रीतीनुसार घरोघर फराळाचे पदार्थ केले जातात आणि त्यांची देवाणघेवाणही होत असते. या पदार्थांचे नवल राहिलेले नसल्यामुळे असे खाद्यपदार्थ वाया जातात. तेव्हा खाद्यपदार्थाच्या देवाणघेवाणीची प्रथा बंद करावी आणि ज्या वंचित समाजघटकांना हे खाद्यपदार्थ मिळत नाहीत त्यांच्यापर्यंत ते नेऊन पोहोचवावेत. ज्यांना या खाद्यपदार्थांचे अप्रूप नाही त्यांनी या पदार्थांच्या आणि महागड्या सुक्या मेव्याऐवजी दिवाळी अंकांची देवाणघेवाण करावी. ही नवी प्रथा सुरू करायला हरकत नाही. शिवाय मुस्लिम समाजाने रमजानच्या महिन्यातील इफ्तार पार्टीला जसे सामुहिक आणि सामाजिक रुप दिलेले आहे तसे दिवाळीच्या फराळाला देऊन एक नवी प्रथा पाडली पाहिजे. त्यातून माणसा माणसातील अंतर कमी होईल. तसे ते व्हावे यासाठीच लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला होता, परंतु त्याचे काय झालेले आहे हे आपण चांगलेच अनुभवत आहोत. तेव्हा गणेशोत्सवात जे अपेक्षित होते ते दिवाळीच्या फराळातून साध्य करता येऊ शकेल.

दिवाळीची मजा फटाके उडवण्यातच असते असे नाही. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या रुपाने आपण या मजेला पर्याय देऊ शकतो. आता सध्या महाराष्ट्राच्या सर्वच शहरांमध्ये दिवाळीच्या पहाटेला पहाट गाण्यांचे कार्यक्रम सरसकट व्हायला लागले आहेत, ही देखील एक चांगली प्रथा मानता येईल.

— अरविंद जोशी
(अद्वैत फीचर्स)

— “मराठीसृष्टी”च्या दिवाळी अंकात पूर्वप्रकाशित

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..