नवीन लेखन...

डिहायड्रेशन अर्थात शरीरातील पाणी कमी होणे

उन्हाळ्यात विशेषतः देशावर वा कोरड्या प्रदेशांत होणारा त्रास म्हणजे डिहायड्रेशन अर्थात शरीरातील पाणी कमी होणे हा होय. बाहेरील तापमानाप्रमाणे शरीराचे तापमान बदलणे आणि आपल्याला वातावरणाशी समायोजित ठेवणे याकडे आपल्या शरीराचा नैसर्गिक कल असतो. तापमानात वाढ झाली की आपल्याला घाम येतो; जेणेकरून शरीराचे तापमान कमी होईल आणि बाहेरील उष्णतेचा आपल्याला त्रास होणार नाही. हवेत आर्द्रता असणाऱ्या मुंबईसारख्या ठिकाणी घामाच्या धारा लागणे काही नवीन नाही. मात्र कोरड्या प्रदेशांत तितकासा घाम येत नाही असेही आपण अनुभवतो. यामागील कारण म्हणजे या घामाचेदेखील होत असलेले बाष्पीभवन होय. यामुळेच अन्यत्र घाम अधिक येऊन गेल्यावर नैसर्गिकपणे अधिक पाणी पिण्यामागील कल कोरड्या प्रदेशांत मात्र दिसून येत नाही. शरीरातील पाणी कमी झाले आहे हे लक्षात न आल्याने डिहायड्रेशनची समस्या उद्भवते. या उन्हाळ्यात तर केवळ मराठवाड्यासारख्या कोरड्या प्रदेशांतच नव्हे तर मुंबई-गोव्यासारख्या दमट वातावरणातदेखील डिहायड्रेशन झालेल्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. याकरता हा लेखप्रपंच.

कोणत्याही कारणाशिवाय डोके दुखणे हे डिहायड्रेशनचे पहिले लक्षण. ते वेळीच ओळखले तर पुढील दुष्परिणाम टळतात. मात्र; अनेकदा त्याकडे दुर्लक्ष होते आणि परिणामतः ओठ सुकणे, अंग गळून जाणे इत्यादि पुढील लक्षणे दिसू लागतात. डिहायड्रेशन टाळण्यास/ झाल्यास आटोक्यात आणण्यासाठी खालील गोष्टी अवश्य लक्षात घ्या.

– उन्हाळ्याच्या दिवसांत एरव्हीपेक्षा थोडे अधिक पाणी प्या. मात्र एकाच वेळी भरपूर पाणी न पिता थोड्या थोड्या वेळाने पाणी पिणे उपयुक्त ठरेल.

–  उन्हात बाहेर पडणे टाळा. अगदीच पडावे लागले तर डोक्यावर टोपी वगैरे घालणे विसरु नका. सोबत (डोक्यावर किंवा खिशात) फोडलेला कांदा ठेवण्याचा गावाकडे करण्यात येणारा उपायदेखील लाभदायक असतो.

– डोके दुखणे, ओठ कोरडे पडणे अशी लक्षणे दिसू लागल्यास अन्य काही न करता पाणी पिणे सुरु करा. इथेही थोडे थोडे पाणी पिण्याचा नियम पाळायचा आहे. अन्यथा उलटी होऊ शकते.

– उलटी झाल्यास साळीच्या लाह्या खाव्यात वा त्या पाण्यात किंचित शिवजून त्यात साखर व चिमूटभर मीठ घालून प्यावे. (हा उपाय एरव्ही उलटी झाल्यासदेखील ‘प्रथमोपचार’ म्हणून केला जाऊ शकतो.)

– शरीरातील पाणी कमी झाल्याची लक्षणे दिसल्यास चहा वा कॉफी यांसारखी पेये वा कार्बोनेटेड शीतपेये पिणे कटाक्षाने टाळा. या साऱ्यांमुळे मदत होण्याऐवजी शरीरातील पाणी अधिक घटते हे लक्षात घ्या.

– लघवीच्या रंगाकडे आवर्जून लक्ष द्या. पिवळ्या रंगाची तसेच अतिशय गरम गरम लघवी होणे हे लक्षण आढळल्यास आपल्या वैद्यांची आवर्जून भेट घ्या.

– गृहिणींनी जेवण बनवताना कोरड्या भाज्या टाळून रसभाज्यांच्या पाककृती अधिक प्रमाणात बनवाव्यात. जेणेकरून त्यामार्फतही पाण्याचा अंश शरीरात जाईल.

हे सारे मुद्दे लक्षात ठेवून वागलात तर डिहायड्रेशनच्या त्रासापासून दूर राहाल हे नक्की. अन्यथा या काळात कित्येक रुग्ण केवळ याच कारणामुळे हॉस्पिटल्स सलाईन लावलेले दिसतात ही सत्यस्थिती आहे. सजग राहून वेळेत काळजी घेणे वा निष्काळजीपणाने दुर्लक्ष करून मग उपचार करत बसणे; यांपैकी कोणता मार्ग निवडायचा ते सर्वस्वी तुमच्या हातात आहे!!

© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

30 March 2017

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..