नवीन लेखन...

डार्लिंग (विनोदी कथा )

दोन दशकांपूर्वी रविवारची सकाळ होती. सकाळचे दहा वाजले होते. विजय पेपर वाचत वाचता सोनल सोबत गप्पा मारत होता. त्याची आई बाजारात गेली होती तर बाबा त्यांच्या मित्राकडे गेले होते. इतक्यात टेलिफोनची रिंग वाजली. विजयने रिसिव्हर उचलताच पलीकडील व्यक्ती, ” हॅलो ! मी प्रतिभा… इतक्यात सोनल मध्येच काहीतरी बोलल्यामुळे विजयच्या ऐकण्यात व्यत्यय आला. पुन्हा रिसिव्हर कानाला लावत विजय म्हणाला, हा ! बोल डार्लिंग ! त्यावर पलीकडील व्यक्ती म्हणाली, मूर्ख कुठला ! ठेव फोन ! रिसिव्हर फोनवर ठेऊन विजय स्वतःशीच म्हणाला, च्या आयला ! डार्लिंग म्हणालो त्याचा राग आला वाटतं ! त्यांनतर विजय पुन्हा सोनलसोबत गप्पा मारण्यात रंगला. इतक्यात विजयची आई बाजारातून माघारी आली.

आपल्या हातातील बाजाराच्या पिशव्या स्वयंपाक घरात ठेऊन आल्यावर विजयला म्हणाली,” गाढवा ! विजय ! त्या प्रतिभाच्या आईने मला फोन केला होता तर तू तिला चक्क डार्लिंग ! म्हणालास ! आताच ती मला बाजारात भेटली होती. एखाद्या तरुण मुलीला डार्लिंग म्हणाला असतास तर ठीक ! एकवेळ प्रतिभाला डार्लिंग म्हणाला असतास तरी चाललं असतं पण त्या चाळीशी पार केलेल्या बाईला तू डार्लिंग म्हणतोस. इतक्यात विजयचे बाबा माघारी आल्यामुळे त्यांनी त्याच्या आईचे हे संभाषण ऐकले ते ऐकून ते म्हणाले,”अगं नीलम ! हा विजय ! कोणाला डार्लिंग म्हणाला ? त्यावर विजयची आई म्हणाली,” हा चक्क आपल्या प्रतिभाच्या आईला म्हणजे आपल्या कविताला डार्लिंग म्हणाला. त्यावर विजयचे बाबा म्हणाले,” अगं तो प्रतिभाच्या आईला प्रतिभा समजून डार्लिंग म्हणाला असेल, माझा मुलगा तिच्या आईला डार्लिंग म्हणण्याचा मूर्खपणा करूच शकत नाही. त्यावर विजयची आई रागाने म्हणाली,” हो ! तो मूर्खपणा तो करू शकत नाही ! पण तुम्ही नक्कीच करू शकता त्या दिवशी नाही का ? तुमच्या मैत्रिणीचा फोन आला होता तिला सारखे हा ! बोल डार्लिंग ! बोल डार्लिंग ! म्हणत होतात. त्यावर विजयचे बाबा म्हणाले, दुसरं काही बोलण्यासारखे नव्हतं कारण तिचं नावच डार्लिंग आहे. त्यावर विजयची आई म्हणाली, खरंच की काय ? काय नशीबवान बाई आहे, सारेच सारखे तिला डार्लिंग डार्लिंग म्हणत असतात. नाहीतर आम्ही ! आमचं नावही कोणी प्रेमाने घेत नाही. त्यावर विजयचे बाबा रागावून म्हणाले,” हे टोमणे कळतात बरं आम्हाला. त्यावर विजयची आई म्हणाली, कळतं पण वळत नाही ना ! त्यावर विजयचे बाबा म्हणाले,” म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की मी सारखं तुमच्या मागे -पुढे डार्लिंग डार्लिंग करत फिरावं ! त्यावर विजयची आई म्हणाली,” ते जमत नसेल तर निदान माझं नाव तरी प्रेमाने हळुवार घायचे ! त्यावर विजयचे बाबा रागावून म्हणाले,” तुमचं शहाणपण आता बाजूला ठेवा ! आणि स्वयंपाकाचं काय ते बघा ! तोपर्यत मी शेजारच्या जाधवांकडे जाऊन येते. त्यावर सोनल म्हणाली,” थांबा मी पण येते. ते दोघे लगेच निघूनही गेले.

विजयची आई स्वयंपाकघरात गेल्यावर विजय सोफ्यावर बसून स्वतःशीच विचार करत होता की आपण मगाशी प्रतिभाच्या आईला प्रतिभा समजून डार्लिंग म्हणालो. सोनलसोबत गप्पा मारताना ची आई बोलतेय ! कदाचित ऐकायचं राहून गेलं वाटतं. इतक्यात परत टेलिफोनची रिंग वाजली विजयने रिसिव्हर उचलला, पलीकडून प्रतिभा म्हणाली,” आई सांगत होती, तिने तुझ्या घरी फोन केला तर तू तिला चक्क डार्लिंग म्हणालास ! त्यावर विजय रागावून म्हणाला, तुझ्या आयला मी डार्लिंग नाही म्हणालो, मला वाटलं तूच आहेस म्हणून म्हणालो. पण यापूर्वी तू कधी मला डार्लिंग म्हणाला नव्हतास ? या प्रश्नाला उत्तर देत विजय म्हणाला, हो ! त्यापूर्वी मी रेडिओवर डार्लिंग डार्लिंग काय म्हणतेस ? हे गाणं ऐकलं होतं ना! म्हणून चुकून बोलून गेलो. त्यावर प्रतिभा म्हणाली, डार्लिंग म्हणालास ते ही माझ्या आईला ! तरीच मी विचार करत होते विजय इतका रोमँटिक कधी झाला ? ते जाऊ दे ! पुन्हा एकदा डार्लिंग म्हण ना ! त्यावर आता डार्लिंग कोणालाच चुकूनही म्हणणार नाही म्हणजे नाही ! ते ऐकून प्रतिभाने रागाने फोन ठेऊन दिला.

विजयचे बाबा आणि सोनल शेजाऱ्यांकडून परत आल्यावर सर्वजण जेवायला बसले. जेवण झाल्यावर सर्वजण मिळून गप्पा मारत टी. व्ही. पाहत असताना , येऊ ! का घरात ? हे प्रतिभाचे शब्द कानी पडताच विजयची आई म्हणाली अगं ! प्रतिभा ये ना ! प्रतिभा आत येऊन सोफ्यावर विजयच्या बाजूला बसली. त्यावर विजयची आई प्रतिभाला म्हणाली,” काय म्हणतेय कविता डार्लिंग ? त्यावर प्रतिभा म्हणाली, अहो ! मामी ! या विजयच्या डार्लिंगने आमच्या घरात वादळ निर्माण केले आहे. म्हणूनच तर मी इकडे आले. असं काय झालं ? या विजयच्या आईच्या प्रश्नाला उत्तर देत प्रतिभा म्हणाली,” काही खास नाही आई बाबांना म्हणाली की विजय तिला डार्लिंग म्हणाला. त्यावर बाबा म्हणाले, त्याला वेड लागलं असेल नाहीतर तो तुझ्यासारख्या म्हातारीला डार्लिंग कसा बोलेल ? त्यावर आई म्हणाली, ” तो निदान वेडाच्या भरात तरी मला डार्लिंग म्हणाला, तुम्ही मला एकदाच डार्लिंग म्हणाला होतात ते ही मी तुमच्यासोबत लग्नाला होकार द्यावा म्हणून ! तुमच्या त्या डार्लिंगला भुलून मी लग्नाला होकार दिला. पण लग्नानंतर डार्लिंग तर सोडा ! साधं प्रियेही कानावर आलं नाही. त्यावर बाबा रागावून म्हणाले, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की या वयात आम्ही सारखं डार्लिंग डार्लिंग करत तुमच्या मागे फिरावं ? त्यांच्या डार्लिंग डार्लिंगला वैतागून मी इकडे आले. त्यावर विजयची आई म्हणाली, ” त्यात काय वैतागाचे ! तुला माहीत नाही हे पुरुष मोठे लबाड असतात. लग्नापूर्वी डार्लिंग डार्लिंग म्हणत सारखे मागेपूढे घुटमळत असतात. पण लग्न झाल्यावर मांजराचे वाघ होतात. त्यावर विजयचे बाबाही रागावून म्हणाले,” तुम्ही बायकापण लग्नापूर्वी सोज्वलपणाचा किती आव आणता मधुर बोलून पुरुषांना घायाळ करता पण लनानंतर खरे दात दाखवता. त्यावर तुम्ही आता गप्पच बसा म्हणून विजयची आई स्वयंपाकघरात गेली. मग विजयच्या बाबांनी आपला मोर्चा प्रतिभाकडे वळवत तिला म्हणाले,” प्रतिभा तुला वाटतं का विजय इतका मूर्ख आहे की तो तुझ्या आईला डार्लिंग म्हणेल. त्यावर प्रतिभा हसत म्हणाली,” नाही तो आईला डार्लिंग म्हणण्याचा मूर्खपणा करणार नाही पण चुकीच्या माणसाला डार्लिंग म्हणण्याचा मूर्खपणा नक्कीच करू शकतो ? म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का की विजय तुझ्या ऐवजी तुझ्या आईला डार्लिंग म्हणाला ? त्यावर प्रतिभा आणि विजय दोघेही बावचळले ! प्रतिभाने तर लाजेने मान खाली केली. त्यावर विजयचे बाबा म्हणाले, सुनबाई ! मांजर जरी डोळे मिटून दूध पीत असलं तरी जगाचे डोळे उघडे असतात. ते जाऊदे ! मी आणि नीलम चित्रपट पाहायला जाणार होतो पण ! आता तिच्या डोकयात ते डार्लिंगच भूत चढलं आहे ते इतक्यात उतरणार नाही. विजय आणि तूच जा आता चित्रपट पाहायला आणि त्यांनी दोन तिकीट तिच्या हातात दिल्या आणि म्हणाले,”घाबरू नकोस ! कविताला मी फोन करून सांगतो. पण चित्रपट संपल्यावर सरळ घरीच या ! नाहीतर रस्त्यात डार्लिंग डार्लिंग करत राहाल. विजय आणि प्रतिभा चित्रपट पाहायला गेले आणि सोनल तिच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला.

विजयची आई स्वयंपाकघरातून बाहेर आल्यावर विजयचे बाबा त्याच्या आईला म्हणाले, डार्लिंग ! माझ्यासाठी जरा चहा ! आणते का ? त्यावर विजयची आई गालात गोड हसून स्वयंपाकघरात गेली आणि चहा नाश्ता घेऊन आल्यावर चहा पिता पिता विजयची आई विजयच्या बाबांना म्हणाली,” आपल्यासाठी आणलेल्या चित्रपटाच्या तिकीटं तुम्ही विजय आणि प्रतिभाला दिलीत ! त्यावर विजयचे बाबा म्हणाले त्यामुळेच तर आपल्याला हा एकांतवास मिळालाय आता करत बसू डार्लिंग डार्लिंग ! त्यावर विजयची आई गोड लाजली आणि म्हणाली,” अहो ! पण आता विजय आणि प्रतिभाच्या डार्लिंग डार्लिंगला पूर्ण विराम द्यायला हवा ! त्यावर विजयचे बाबा म्हणाले, हो ! यंदाच उडवून टाकू त्यांच्या लग्नाचा बार ! तिकडे विजय आणि प्रतिभा ज्या चित्रपटगृहात चित्रपट पाहायला गेले त्याच चित्रपटगृहात नेमके प्रतिभाचे आई- बाबाही आले. त्यांनी त्या दोघांना पाहिले पण पाहून न पहिल्यासारखे केले. प्रतिभाची आई प्रतिभाच्या बाबांना म्हणाली,” पाहिलंत का ? आपले जावईबापू ! त्यावर प्रतिभाचे वडील हसून म्हणाले हो ! हल्ली सासूला डार्लिंग म्हणणारा जावई भेटतो कोठे ? पण आता ह्यांच्या डार्लिंगला ! वेसण घालायला हवी ! त्यावर प्रतिभाची आई म्हणाली,” मी आजच बाजारात नीलमशी बोलले तर ती म्हणाली,” यंदाच यांच्या लग्नाचा बार उडवू या ! न राहून प्रतिभाच्या आईने प्रतिभाला हाक मारलीच प्रतिभा ! डार्लिंग ! त्यावर वळून पाहात विजय ! प्रतिभाला म्हणाला, ” त्या बघ ! माझ्या डार्लिंग सासू बाई तुला हाक मारता आहेत…त्यावर प्रतिभासह सारेच मनमुराद हसले…

— निलेश बामणे

Avatar
About निलेश बामणे 416 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..