क्रिकेटची किट बॅग

शेफाली वैद्य यांचा हा लेख WhatsApp वरुन आला. तो तुमच्यासाठी ेअर करतोय


काल लेक त्याची क्रिकेटची किट बॅग घेऊन आला आणि मला म्हणाला,
‘मम्मा बॅग फाटलीये, नवीन आण ना’.

मी बघितलं तर बॅग फाटली नव्हती तर उसवली होती.

मी त्याला म्हटलं,
‘अरे ही बॅग दुरुस्त होईल, मी शिवून आणते उद्या’.

त्याचा चेहेरा जरासा पडला.

‘नवी नाही आणणार’?

त्याने विचारलं.

‘बाळा, जरासं कुठे फाटलं तर एखादी वस्तू लगेच फेकायची नसते.
ती नीट करून परत वापरता येते’.
मी म्हटलं.

जरासा नाराज होऊनच तो गेला.

मी आज त्याची बॅग नीट शिवून आणून त्याला दाखवली तेव्हा कुठे त्याच्या चेहेऱ्यावरची नाराजी दूर झाली.

मी त्याला मग समजावून सांगितलं की ‘वापरा आणि फेकून द्या’ असं आपण करत राहिलो तर त्या टाकलेल्या वस्तू कुठे जातील ह्याचा त्याने कधी विचार केलाय का?

तो नाही म्हणाला.

मग मी त्याला लॅन्डफिल्स वरची छोटी एक फिल्म दाखवली.

जरा काही फाटलं, मोडलं तर जुनी वस्तू टाकून देऊन नवी घ्यायची ह्या आजकालच्या धोरणाचा एकूणच पर्यावरणावर किती भयंकर परिणाम होऊ शकतो हे जेव्हा त्याने आपल्या डोळ्यांनी पाहिलं तेव्हा त्याला माझं म्हणणं पटलं.

एकूणच आजकाल सगळीकडेच ‘वापरा आणि फेकून द्या’ हे तत्व रूढ होतंय.

बुटांपासून, पेनापर्यंत आणि फोन पासून लॅपटॉप पर्यंत आपण अमर्याद वस्तू विकत घेतोय, वापरतोय आणि जरा काही मोडलं, तुटलं, फाटलं तर त्या वस्तू फेकून देतोय.

लहान मुलांच्या बाबतीत तर हे खूपच जास्त होतंय.

जाहिराती बघून म्हणा किंवा त्यांच्या मित्र मैत्रिणींना बघून म्हणा, पण मुलं सतत नवीन वस्तूंचा हव्यास धरतात आणि आपल्या नशीबात नव्हतं पण मुलांच्या आहे तर त्यांना भोगू द्यात की हे सगळं असा विचार करून आपण शहरी, सुखवस्तू पालक त्यांचे हे नित्य नवीन लाड पुरवतोय.

त्यात चायना मेड चकचकीत दिसणाऱ्या पण अत्यंत तकलादू वस्तूंनी बाजार भरलेला आहे.

मी तिसरीत असताना मला माझ्या आजोबांनी त्यांचा उसवलेला सदरा टीप मारायला दिला होता.

मी मला जमेल तशी जाड्या-भरड्या, वेड्या-वाकड्या धाग्यांनी टीप मारली.

आजोबांनी तो सदरा अंगात तर घातलाच पण आल्या-गेल्याला कौतुकाने ते दाखवत राहिले की बघा माझ्या नातीने किती सुंदर टीप मारली आहे.

त्यानंतर ते त्यांचं सगळं शिवणाचं काम मलाच सांगायचे.

मी कुठे गेलेले असले आणि आईने त्यांचे कपडे शिवून द्यायची तयारी दर्शवली तरी ते माझ्यासाठी थांबून राहायचे.

मला खूप अभिमान वाटायचा की आजोबा फक्त मीच रफ़ू केलेले कपडे घालतात म्हणून.

त्या अभिमानातूनच मी चांगले बारीक, एकसारखे टाके घालायला शिकले.

तो लहानपणी शिकलेला धडा मला अजूनही आठवतोय.

आज अर्थातच जग बदललंय.

मध्यमवर्गीय माणसाच्या हातात देखील बऱ्यापैकी पैसा खेळतोय आणि बाजारपेठा नवनवीन उत्पादनांनी ओसंडून वाहत आहेत.

ह्या प्रवाहात वाहून जाणं सोपं आहे.

तरीही मला असं खरंच मनापासून वाटतं की आपल्या मुलांना आपण जुन्या वस्तू दुरुस्त करून वापरता येतात हे शिकवायला हवं.

साधी धाव-टीप घालणे, बटणे शिवणे, किंचित फाटलेले कपडे, बूट, रेनकोट, सॅक वगैरे शिवून आणून वापरणे ह्या गोष्टी आपण मुलांना शिकवायलाच हव्यात, आणि त्यासाठी आपणही हे सगळं करायला हवं, कारण मुलं अनुकरणानेच शिकतात.

केवळ परवडतं म्हणून सगळे हट्ट पूर्ण करायचे नसतात हा धडा खूप महत्वाचा आहे आणि तो मुलांना कळायलाच हवा, त्यासाठी पालक म्हणून स्वतःला आवडलेल्या गोष्टींना निग्रहाने नकार देणं आपल्यालाही जमलं पाहिजे.

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..