नवीन लेखन...

संगणकीय विषाणू

संगणक वापरणाऱ्यांच्या तोंडी, ‘व्हायरस’ हा शब्द नेहमीच ऐकू येतो. आपल्या संगणकाला विविध प्रकारे आजारी पाडणारे हे व्हायरस म्हणजे काय, संगणकावर त्यांचा परिणाम काय होतो, त्यांची कार्यपद्धती कशी असते, त्यांचे निर्मूलन कसे केले जाते, इत्यादी बाबींचा ऊहापोह करणारा हा लेख…

मराठी विज्ञान परिषदेच्या ‘पत्रिका’ या मासिकातील मकरंद भोंसले यांचा हा पूर्वप्रकाशित लेख 


कधीकधी एखादी धडधाकट व्यक्ती प्रथमदर्शनी काहीही कारण नसताना अचानक आजारी पडते. अंगात ताप येतो, अशक्तपणा जाणवतो, अंगदुखी सुरू होते. डॉक्टर रक्ततपासणी करायला सांगतात आणि तिला मलेरिया, टायफॉइडसारखा सहज ओळखता येणारा रोग झालेला नाहीये, हे कळल्यावर डॉक्टर ‘व्हायरल फिव्हर’ झाला असल्याचं निदान करतात. व्हायरल फिव्हर म्हणजे विषाणूंच्या संक्रमणामुळे होणाऱ्या आजारांचा एक समूह. यामध्ये विषाणूंमुळं उद्भवणाऱ्या असंख्य प्रकारच्या आजारांचा समावेश होतो. अगदी अशाच पद्धतीनं कधीकधी एखादा उत्तम चालणारा संगणक अचानक त्रास द्यायला लागतो. कधी तो चालू व्हायला नेहमीपेक्षा जास्त वेळ घेतो, कधी अत्यंत मंदपणे काम करतो, कधी त्यावरचा काही किंवा सगळा डेटा दिसेनासा होतो, तर कधी काम करत असताना मध्येच तो एखादा आगंतुक संदेश दाखवायला लागतो. यावर उपाय शोधायला मग संगणकतज्ज्ञाला पाचारण केलं जातं आणि तोही त्या संगणकावर काही चाचण्या केल्यावर सांगतो, की त्या संगणकाला व्हायरस म्हणजे विषाणूची बाधा झाली आहे.

संगणकीय विषाणू म्हणजे संगणकामध्ये घुसून संगणकाला हानिकारक संसर्ग पोहोचवू शकणारी मानवानंच लिहिलेली एक संगणकीय आज्ञावली असते. एका जाणकार आज्ञाकारानं विकृत विचारानं लिहिलेली, संगणकीय विश्वात गुपचूप आणि बेमालूमपणे स्वत:ला पसरवणारी अशी आज्ञावली. या आज्ञावलीचा संसर्ग झालेला एखादा प्रोग्रॅम जर कुठल्याही संगणकात टाकला गेला, तर त्या प्रोग्रॅमसोबत हा संगणकीय विषाणूही त्या संगणकात आपलं बस्तान बसवतो. दरवेळी तो संगणक सुरू झाल्यावर किंवा त्या संगणकाद्वारे तो प्रोग्रॅम वाचला गेल्यावर हा संगणकीय विषाणू पसरत जातो आणि संगणकातील त्याचा प्रादुर्भाव वाढत जातो. संगणकीय जगात आज असे लाखो विषाणू कार्यरत आहेत आणि यांत सतत शेकडो नव्यानव्या विषाणूंची भरच पडत असते.

कोणालाही लक्षात येणार नाही अशा पद्धतीनं अगदी गुप्तपणे आपलं काम करण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळं या विषाणूंची लांबी अगदी छोटी असणं आवश्यकच असतं. काही विषाणू तर पन्नास बाइटहूनही कमी आकाराचे असतात, पण त्यामुळं कित्येक मेगाबाइटचा आकार असलेल्या संगणकीय फाईलना त्यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. अशा संगणकीय विषाणूंना जन्म देण्यासाठी संगणक क्षेत्रातील अत्यंत तज्ज्ञ व्यक्तीची गरज असते. मग अशा तज्ज्ञ व्यक्ती हे असं विघातक कृत्य का बरं करत असतील? याची कारणं वेगवेगळी असू शकतात. यांतील काही जणांना एखादा राजकीय संदेश द्यायचा असतो, काही जणांना एखाद्या प्रसिद्ध संगणकीय प्रणालीतील त्रुटी जगाला दाखवून द्यायची असते, काही जणांना त्यांनी विकसित केलेली एखादी नवीन आज्ञावली चालते की नाही हे पाहायचं असतं, काही जणांना दुसऱ्यांचा डेटा वेठीस धरून पैसे कमवायचे असतात, तर काही जण चक्क केवळ गंमत म्हणून हा उद्योग करतात.

या विषाणूंचे वेगवेगळे प्रकार आहेत. यांची वर्गवारीही वेगवेगळ्या प्रकारे करता येते. ट्रॉय शहर जिंकायला आलेल्या ग्रीकांनी निघून जाताना शहराबाहेर एक लाकडाचा मोठा घोडा सोडला. तेव्हा आपल्या विजयाचं प्रतीक म्हणून शहरातल्या नागरिकांनी तो घोडा खेचून शहरात घेतला. रात्र झाल्यावर त्या घोड्यात लपून बसलेल्या ग्रीक सैनिकांनी त्यातून बाहेर पडून बाहेर दबा धरून बसलेल्या ग्रीक सैन्यासाठी शहराचे दरवाजे उघडले.

आणि त्या सैन्यानं ट्रॉय शहराचा ताबा घेतला. काही विषाणू अशाच पद्धतीनं वागतात म्हणून त्यांना ‘ट्रॉजन हॉर्स’ म्हणजे ‘ट्रॉयचा घोडा’ असं म्हणतात. ग्रीक सैनिकांप्रमाणे एखाद्या उपयोगी वाटणाऱ्या सॉफ्टवेअर-मध्ये किंवा एखाद्या संगणकीय खेळामध्ये लपून हे विषाणू संगणकात प्रवेश करतात आणि गुपचूप आपलं काम करतात.

काही विषाणू ‘लॉजिक बॉम्ब’ या वर्गात मोडतात. हे विषाणू प्रोग्रॅमसोबत किंवा संगणक प्रणालीसोबत राहतात आणि लक्षात येणार नाही अशा पद्धतीनं त्या संगणकाच्या माध्यमातून आपला प्रसार मुकाट करत राहतात. एखादी विशिष्ट तारीख आणि वेळ आल्यावर, फाईलचा आकार विशिष्ट झाल्यावर किंवा तत्सम घटना घडल्यावर या व्हायरसचं विध्वंसक काम सुरू होतं.

अजून एक विषाणूचा प्रकार म्हणजे संगणकीय किडा किंवा वर्म. असा विषाणू स्वत:च स्वत:च्या अनेक प्रती तयार करतो. जेव्हाजेव्हा असा किडा असलेला प्रोग्रॅम सुरू केला जातो, तेव्हातेव्हा या प्रोग्रॅमच्या अनेक प्रती तयार होत जातात जातात व त्यामुळं संगणकाच्या प्रणालीच्या कार्यात अडथळा येतो. अचूकपणे बोलायचं झाल्यास, एखाद्या एक्झिक्यूटेबल, म्हणजे ज्या प्रोग्रॅमद्वारे एखादी गोष्ट करून घेता येते, अशा प्रोग्रॅमच्या रूपानं इंटरनेटवरून अथवा कॉपॅक्ट डिस्क, फ्लॉपी डिस्क, डीव्हीडी अथवा यूएसबी ड्राइव्ह इत्यादी साठवणुकीच्या माध्यमांमार्फत एका संगणकापासून दुसऱ्या संगणकाला बाधा पोहोचवू शकणारी प्रणाली ही संगणकीय विषाणू मानली जाते. पण, आज संगणकीय विषाणू ही संज्ञा कोणत्याही प्रकारे संगणकात बिघाड न करणाऱ्या प्रणालींसकट सर्वच दुष्ट प्रणालींसाठी ढोबळपणे वापरली जाते. संगणकतज्ज्ञ मात्र अशा सर्व प्रणालींना ‘मालवेअर’ म्हणतात. यात पारंपरिक विषाणूंबरोबर अॅडवेअर आणि स्पायवेअर यांचाही समावेश होतो. ॲडवेअर प्रकारचा विषाणू हा संगणकाला तसा घातक नसला, तरी तो वापरणाऱ्याला नको त्या जाहिराती दाखवून छळतो. बऱ्याचदा या जाहिराती आपल्या संगणकाच्या पडद्यावर ‘विंडो’च्या स्वरूपात अचानक डोकावून त्रास देतात आणि यांतल्या काही विंडो तर बंदही करता येत नाहीत. स्पायवेअर प्रकारातले विषाणू तर चक्क हेरगिरी करतात.

काही संगणकीय विषाणू हे संगणकाच्या भाषेतील ‘exe ‘ किंवा ‘com’ अशा नामाभिधानाच्या फाईलनाच बाधित करतात, तर काही विषाणू वापरकर्ता वाचू शकणाऱ्या ‘doc’ आणि ‘pdf फाईलवर हल्ला करतात. काही विषाणू यांपैकी काही न करता संगणकाच्या प्रणालीवरच हल्ला करतात आणि तिच्या कामात अनिष्ट ढवळाढवळ करतात. काही विषाणू स्वतःचा प्रसार पसरण्यासाठी ‘इ-मेल’चा आधार घेतात. एखाद्या ओळखीच्या व्यक्तीनं अथवा संस्थेनं पाठवलेल्या इ-मेलमधील लिंकवर क्लिक केल्यावर हा विषाणू, त्या इ-मेल अकाउण्टमधल्या सर्व संपर्क पत्त्यांना (काँटॅक्टना) तो मेल पाठवून देतो.

काही विषाणू फक्त एखादा विनोदी संदेश संगणकाच्या पडद्यावर उमटवतो, तर एखादा गुन्हेगारी प्रवृत्तीनं बनवलेला स्पायवेअर पद्धतीचा विषाणू वापरकर्त्यानं दाबलेली कळ फलकावरील प्रत्येक कळीची नोंद ठेवून ती इंटरनेटच्या साहाय्यानं मेल करतो. अशा पद्धतीनं वागणाऱ्या विषाणूला ‘की लॉगर’ विषाणू असं म्हणतात. अशा विषाणूच्या मदतीनं पासवर्ड चोरले जातात. हे टाळण्यासाठी अनेक बँका पासवर्डसाठी ‘ऑनस्क्रीन कीबोर्ड’ म्हणजे संगणकाच्या पडद्यावर येणारा कळफलक वापरायचा सल्ला देतात. मोबाइल फोनलाही अशा विषाणूंची बाधा होऊ शकते. मोबाइलमधील स्पायवेअर हे मोबाइलमधली माहिती गोळा करून त्याच फोनच्या मोबाइल नेटवर्कचा वापर करून त्या विषाणूच्या निर्मात्यानं आज्ञा दिलेल्या पत्त्यावर पाठवतात. यात व्यक्तिगत माहिती, उदाहरणार्थ सगळे संपर्कातले फोन क्रमांक, क्रेडिट कार्डबाबतची माहिती, असं काहीही असू शकतं.

खरं तर, एखाद्या आज्ञावलीनं आपल्याच प्रतिमा बनवत राहून संगणकाला काम करण्यापासून रोखणं हे काही नवीन नाही. फॉन न्युमाननं अगदी १९४९ मध्ये अशा आज्ञावलीची संकल्पना मांडली होती. अशा विषाणूसदृश आज्ञावल्या अगदी इंटरनेटचा पाया घालणाऱ्या आर्पानेटच्या काळातही लिहिल्या गेल्या होत्या. १९७१मध्ये बीबीएन टेक्नॉलॉजीजच्या बॉब थॉमसने ‘क्रिपर’ नावाचा एक विषाणू आर्पानेटसाठी लिहिला होता. ‘कॉम्प्यूटर वर्म’ किंवा संगणकीय किड्याचा हा पहिला अवतार हा विषाणू आर्पानेटला जोडलेल्या वेगवेगळ्या संगणकावर स्वतःची प्रतिमा बनवायचा. तसं बघायला गेलं, तर हा किडा विध्वंसक नव्हता. फक्त ‘मी क्रिपर आहे, मला पकडू शकलात तर पकडा’, असा संदेश संगणकाच्या पडद्यावर येण्यापलीकडे तो काही त्रास देत नसे. या क्रिपर किड्याच्या सर्व प्रतिमा आर्पानेटच्या जाळ्यातील सर्व संगणकांवरून नाहीशा करण्यासाठी रे टॉमलिन्सन यानं ‘रिपर’ नावाची एक आज्ञावली लिहिली. हा रिपर आर्पानेटच्या जाळ्यातील सर्व संगणकावरून फिरायचा आणि क्रिपरच्या सर्व प्रतिमा नाहीशा करायचा. जगाला माहीत असलेली विषाणू आणि त्या विषाणूवरील मात्रेची ही पहिली जोडी असावी.

सन १९८२मध्ये रिचर्ड स्केंत्रा नावाच्या नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं ‘एल्क क्लोनर’ नावाचा एक विषाणू बनवला. हा ‘बूट सेक्टर’ला बाधा आणणारा विषाणू होता. कोणताही संगणक सुरू झाल्यावर जेव्हा तो पहिल्यांदा डिस्क वाचतो, तेव्हा या बूट सेक्टर भागातील आज्ञावलीतील आज्ञा तो आपल्या स्मृतीत साठवतो. एल्क क्लोनर हा विषाणू डिस्कच्या या बूट सेक्टरमध्ये जाऊन बसतो. रिचर्डन हा विषाणू एका संगणकीय खेळाबरोबर जोडला होता. जेव्हा हा खेळ पन्नासाव्या वेळी खेळला जायचा, तेव्हा खेळाऐवजी ‘एल्क क्लोनर’ शीर्षकाची एक कविता संगणकाच्या पडद्यावर दिसायची. या कालावधीत हा विषाणू ‘अॅपल’च्या डॉस ३.३० प्रणालीला चिकटायचा आणि त्यानंतर त्या संगणकाच्या फ्लॉपी डिस्क ड्राइव्हच्या माध्यमातून त्याचं प्रसारण करत राहायचा.

हा जगातला असा पहिला विषाणू होता, जो एका पीसीवरून दुसऱ्या पीसीवर, म्हणजे एका व्यक्तिगत संगणकावरून दुसऱ्या व्यक्तिगत संगणकावर फ्लॉपी डिस्कच्या माध्यमातून पसरत गेला.

असाच एक ‘ब्रेन’ नावाचा बूट सेक्टर विषाणू पाकिस्तानमधील बासित आणि अमजद अल्वी या दोन भावांनी १९८६ साली लिहिला होता. त्यांचं लाहोरमध्ये दुकान होतं आणि त्यात ते वैद्यकीय व्यवसायासाठी लागणारं, त्यांनी स्वतः लिहिलेलं सॉफ्टवेअर विकायचे. हे सॉफ्टवेअर बेकायदेशीरपणे दुसऱ्यांना वाटणाऱ्या गिऱ्हाइकांना धडा शिकवण्यासाठी त्यांनी हा विषाणू तयार केला होता. एका ठरावीक दिवशी सर्व संगणकांवर हा विषाणू प्रकट होईल अशी सोय त्यात करण्यात आली होती. अशा दिवशी हा विषाणू फ्लॉपी ड्राइव्ह मंद करायचा आणि संगणकाच्या पडद्यावर एक संदेश यायचा. या संदेशात विषाणूचं नाव आणि त्याच्या नायनाटासाठी या अल्वी बंधूंच्या कंपनीचं नाव, पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक यायचा. जेव्हा इंग्लंड आणि अमेरिकेहूनही त्यांना या संदर्भात दूरध्वनी आले, तेव्हा आपलं सॉफ्टवेअर चोरीच्या मार्गानं कुठवर पोहोचलंय हे पाहून त्यांनाही आश्चर्य वाटलं.

प्रत्येक विषाणूत एक शोधप्रक्रिया असते, जी संगणकावरील अशा नव्या फाइल आणि नव्या डिस्कच्या शोधात असते, की ज्यांना तो चिकटू शकतो. अशा शोधलेल्या फाईलमध्ये अथवा डिस्कमध्ये तो आधी स्वत:ची प्रतिमा चिकटवतो आणि या पद्धतीनं त्यात या विषाणूंचा प्रादुर्भाव होतो. असे विषाणू हे बऱ्याचदा लॉजिक बॉम्ब प्रकारातले असतात. अशा प्रत्येक विषाणूंना कार्यरत करणारी घटना घडली की मगच तो विषाणू सक्रिय होतो आणि त्याच्या आज्ञावलीत लिहिल्याप्रमाणे तो संगणकात अपाय घडवून आणतो. कधी तो सर्व संगणकीय प्रक्रिया थांबवतो, कधी तो संगणकावर कोणतीही नवी फाईल लिहू देत नाही, कधी तो संगणकावरील काही किंवा सर्व डेटा उडवतो, तर कधी फक्त एखादा राजकीय किंवा गंमतशीर संदेश दाखवतो.

काही विषाणू हे संगणकाच्या स्मृतीत राहतात. जेव्हा संगणक सुरू केला जातो, तेव्हा संगणकाच्या प्रणालीबरोबर हे विषाणूही त्या प्रणालीचा भाग बनून संगणकाच्या कार्यपद्धतीवर लक्ष ठेवतात. त्यामुळं असे विषाणू त्याला शोधणाऱ्या विषाणू प्रतिबंधक आज्ञावलीला फसवण्यात सहज यशस्वी होतात. जेव्हा एखाद्या संगणकावरच्या फाईलला विषाणूचा संसर्ग होतो, तेव्हा हा संसर्ग सहजपणे लक्षात न येऊ देण्यासाठी वेगवेगळे विषाणू वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरतात. प्रत्येक संगणकाची प्रणाली त्या संगणकावरील सर्व फाईलच्या संदर्भात तिच्यातील माहिती शेवटी कधी बदलली, त्या वेळेची नोंद ठेवते. काही विषाणू त्याच्या प्रादुर्भावानंतरही फाईलमधली माहिती बदलली तरी ही नोंदलेली वेळ बदलू देत नाहीत, तर काही विषाणू फाईलला प्रादुर्भाव होऊनही तिचा मूळ आकार बदलू देत नाहीत. यासाठी ‘चेर्नोबिल’सारखे काही विषाणू त्या फाईलमध्ये असलेल्या रिकाम्या जागांचा वापर करतात आणि या रिकाम्या जागांमध्ये विषाणूची आज्ञावली घुसडली जाते.

काही विषाणू तर त्यांना हुडकणाऱ्या सॉफ्टवेअरमध्येच बदल करून टाकतात, ज्याद्वारे ते इतर विषाणू शोधू शकतील, पण स्वतःसारखे विषाणू शोधणारच नाहीत. संगणकाची सुरक्षा हे खरं तर ऑपरेटिंग सिस्टिमचं म्हणजे संगणक प्रणालीच्या अनेक कामांमधलं एक काम. पण विषाणूंचे निर्माते या प्रणालीतल्या त्रुटींचा अभ्यास करतात आणि याच त्रुटींचा फायदा उठवून संगणकात विषाणू शिरकाव करतो. आजवर लिनक्स आणि मॅकच्या तुलनेत विंडोज या संगणक प्रणालीच्या संगणकामध्ये विषाणूंचा प्रादुर्भाव जास्त पाहण्यात आला आहे. अर्थात, या सर्व क्लृप्त्यांवर इलाज शोधला जातोच आणि या विषाणूंना संगणकातून हुडकून त्यांचा नायनाटही केला जातो.

संगणक प्रणालीत प्रादुर्भाव करून संगणक सुरू केल्यावर तो बंद होईपर्यंत, पूर्णवेळ त्याच्या स्मृतीत राहणाऱ्या विषाणूचा बंदोबस्त करणं थोडं जिकिरीचं असतं. याचं कारण म्हणजे, हा विषाणू संगणकाची प्रणाली आणि विषाणुविरोधी सॉफ्टवेअरमधल्या संवादात बेमालूम ढवळाढवळ करतो आणि दोघांनाही फसवतो. अशा परिस्थितीत एखाद्या स्वच्छ, म्हणजे कोणताही प्रादुर्भाव न झालेल्या माध्यमातून संगणक ‘बूट’ म्हणजे चालू करून प्रादुर्भाव न झालेल्या प्रणालीला संगणकाचा ताबा देऊन मगच अशा विषाणूचा नायनाट करता येऊ शकतो.

संगणकीय विषाणूंमुळे संगणक बंद पडतात, डेटा खराब किंवा नाहीसा होतो, वेळेचा अपव्यय होतो, आणि पर्यायानं कोट्यवधी रुपयांचं नुकसान होतं. या संगणकीय विषाणूंना संगणकात शिरकाव करण्यापासून रोखण्यासाठी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर अशा दोन्ही स्वरूपांतल्या ‘फायरवॉल’ वापरल्या जातात. गावात चोर येऊ नये म्हणून वेशीवर पोलीस ठाणं उभारावं आणि त्यातल्या पोलिसानं गावात येणाऱ्या प्रत्येकाची झडती घेऊन तो योग्य वाटल्यावरच त्याला गावात प्रवेश करू द्यावा, असं काहीसं काम या फायरवॉल करतात. संगणकात येणाऱ्या डेटाची शहानिशा करूनच, त्यात विषाणू नाही याची खात्री करून घेतल्यानंतरच त्याला संगणकात प्रवेश दिला जातो. संगणकामध्ये शिरकाव करणाऱ्या सर्व डेटाला या फायरवॉलच्या अग्निपरीक्षेतून उत्तीर्ण व्हावं लागतं.

तरीही, जर विषाणूंचा शिरकाव संगणकात झालाच, तर त्यांचा प्रादुर्भाव कमीतकमी होण्यासाठी आणि त्यांना संगणकीय प्रणालीतून हुसकावून लावण्यासाठी खास वेगळ्या ‘अँटिव्हायरस’ म्हणजे विषाणुरोधक आज्ञावल्या लिहिल्या जातात. एखाद्या संगणकीय फाईलला एखाद्या विषाणूचा प्रादुर्भाव झाला, तर त्या फाइलीत एका ठरावीक जागी त्या विषाणूमुळं बाइटची एक ठरावीक रचना दिसून येते. याला त्या विषाणूचा ठसा किंवा ‘व्हायरस सिग्नेचर’ असं म्हणतात. या आज्ञावल्या संगणकावरच्या सर्व फाईलमध्ये, त्यांच्याकडे असलेल्या माहितीनुसार सर्व विषाणूंच्या सह्या शोधतात. एखाद्या फाईलमध्ये एखाद्या विषाणूची सही सापडली, की त्या फाईलला त्या विषाणूचा प्रादुर्भाव झालाय हे ओळखता येतं.

या विषाणुरोधक सॉफ्टवेअरची वेगळी बाजारपेठ निर्माण झाली आहे. यात ‘अवास्ट’, ‘अविरा’सारखी मोफत मिळणारी आणि ‘नॉर्टन’, ‘क्विकहील’, ‘मॅकफी’सारखी विकत मिळणारी सॉफ्टवेअर आघाडीवर आहेत. विषाणुविरोधी सॉफ्टवेअर ही फाईलमध्ये झालेला विषाणूंचा प्रादुर्भाव नाहीसा करून त्या पूर्ववत करत असली, तरी काही वेळा हे शक्य नसतं. त्या परिस्थितीत अशा फाईलना सिस्टिमपासून अलग करून त्या ‘क्वारंटाइन’मध्ये टाकल्या जातात, ज्याअन्वये त्या त्यापुढं कोणतीही इजा करू शकत नाहीत. कधीकधी तर विषाणुविरोधी सॉफ्टवेअर अशा फाईल चक्क नष्ट करून टाकतात.

विषाणू आणि विषाणुरोधक या दोघांमध्ये सदैव चोर-पोलिसाचा खेळ सुरू असतो. विकृत आज्ञाकार नवनवीन संगणकीय विषाणू लिहीत राहतात आणि विषाणुरोधक सॉफ्टवेअर लिहिणारे त्या नवनव्या विषाणूंवर मात्रा शोधत असतात. काही संगणकतज्ज्ञांच्या मते, त्यांचा धंदा चालावा म्हणून विषाणुरोधक सॉफ्टवेअर बनवणाऱ्या कंपन्याच हे विषाणू बनवतात. हे म्हणजे पोलिसांनीच रात्री चोर बनून दरोडा घालायचा आणि सकाळी तपासाचं नाटक करून मुद्देमाल पकडल्याचं दाखवून स्वत:ची पाठ थोपटून घ्यायची असं झालं!

-मकरंद भोंसले
संगणकतज्ञ
Email-mbbhonsle@yahoo.com

मराठी विज्ञान परिषदेच्या ‘पत्रिका’ या मासिकातील हा पूर्वप्रकाशित लेख 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..