नवीन लेखन...

मंतरलेले दिवस – भाग २

गावी यात्रेच्या हंगामात कुस्त्यांचे जंगी आखाडे पहाण्यासाठी गावोगावी जाणे ही वेगळीच मजा असायची.जवळपासच्या गावांच्या आखाड्याला गावातील पंधरावीस जण हमखास असायचे.परंतू खुप दुरच्या गावचा आखाडा असेल तर जाणे टाळत.

एकदा असाच निवांत बसलो असताना माझ्या आत्याचा मुलगा शंकरदादा आला.आणि मला म्हणाला .
उद्या माझ्याबरोबर घोटवडी गावच्या आखाड्याला येशील का?

मी म्हणालो.तसेही मला काही काम नाही आणि मी घोटवडी गाव पाहिले नाही.निदान गाव तरी पहाता येईल.जाऊ आपण.
आजुन कुणी येणार असेल तर बघ.मी त्याला म्हणालो.

शंकरदादा हा १९८५ ते १९९३ या काळात पश्चिम भागात एक नामांकित पहिलवान होता.भागात त्याचा दरारा होता.पानाला चुना लावायच्या आत तो समोरच्या पहिलवानाला आस्मानातील चांदण्या मोजायला लावायचा.असा त्याचा खेळ होता.

दुसऱ्या दिवशी दुपारी १२.३० वा.आम्ही दोघे पायवाटेने,रानामाळातुन पायवाटेने दरमजल करीत घोटवडीच्या दिशेने निघालो.पायवाटेने जात असताना वाटेच्या अगदी कडेला घर असलेल्या श्री.काळुराम भवारी यांचे दारातील मांडवात विश्रांतीसाठी थांबलो व बाहेरूनच पाणी मागीतले.श्री.भवारी यांच्या पत्नीचे माहेर आमच्या गावचे होते. सासुरवाशीनीला माहेरचे कुणीही भेटले तरी किती आनंद होतो हे सांगावयास नलगे.त्यांनी पाणी दिल्यावर आम्हा दोघांनाही जेवण्याचा आग्रह केला.आम्हाला दोघांनाही तशी खुपच भुक लागली होती.कारण आम्ही दोघेही जेवण न करताच निघालो होतो.चट आखाड्याला भात खाता येईल हा विचार केलेला.

प्रथम आम्ही नको नकोच म्हणालो.परंतु मनातुन जेवायची इच्छा होतीच.

अरे जेवा थोडंथोडं? मटन आहे.
मटन म्हटल्यावर आम्ही बसलोच जेवायला.

पोटभर जेवल्यावर आमचा घोटवडीच्या दिशेने प्रवास सुरू झाला.उन्हातान्हातुन,डोंगरवाटेने कपाळावरचा घाम पुसत आम्ही चाललो होतो.उन मी म्हणत होतं,पायवाटेने अनेक लोक आखाडा पाहण्यासाठी चालले होते.ओळखीच्या लोकांबरोबर आम्ही गप्पा मारत एकदाचे घोटवडी गावात पोहचलो.
तेथे मंदिराच्या बाजुला भारूडाचा कार्यक्रम चालू होता.लोक भरउन्हात बसुन भारूडाचे वगनाट्य बघत होते.

काहीजण बर्फाच्या गारेगारी खात होते.स्रीया पाव्हण्यारावळ्या स्रीयांना कासाराकडुन बांगड्या भरून घेत होत्या.रेवड्या, शेंगोळी,खेळणी घेत होत्या.
थोड्याच वेळात भारूडाचा कार्यक्रम संपला.माईकवार अनाउंसमेंट झाली.सर्व यात्रेकरूंनी आखाड्याच्या जेवणासाठी बसुन घ्यायचे आहे.
अनाउंसमेंट झाल्याबरोबर आखाड्याला आलेले लोक तिकडे धावले.झाडाखाली विसाव्याला बसलेले,लोक झाडाखाली झोपलेल्या लोकांना उठवू लागले.लोकांचा लोंढा आखाड्याच्या जेवणाकडे चालू लागला.

भात खाचरांत,मोठमोठया ढेकळांतून लोकांच्या पंक्ती बसल्या.वडाच्या पानांचा पत्रावळीसारखा आकार करून लोक भात येण्याची वाट पाहू लागले.शेवटी एकदाच्या भाताच्या व आमटीच्या बादल्या घेऊन वाढपे लोक पंक्तीमधुन वाढू लागले.श्लोक झाल्यावर लोक आमटी भातात कालवुन खाऊ लागले.वर उन्हाचा कडाक्यात खाली तिखट आमटीचा ठसका व जीर तांदळाच्या भातावर लोक तुटून पडले.चारचारदा वाढपे बादल्या घेऊन वाढत होते.हाश्यहुश्य करत लोक जेवत होते.

च्यायला ! इथे एखादेतरी झाड असते तर झाडाच्या सावलीखाली निवांत जेवता आले असते असे विचार अनेकांच्या मनात तरळून जात होते.
शेवटी एकदाचे आम्ही जेवन करून आंब्याच्या झाडाखाली जाऊन बसलो.

काही पोरांनी झाडाखाली पत्यांचा डाव मांडला.पोरं तीन पत्ती खेळू लागली.काहीजण गलीवर चिल्लर नाणी फेकून खेळू लागली.तर काहीजण वामकुक्षीसाठी सावलीला लवंडले.

तासाभरानंतर सनई,चौघडे वाजू लागले.अरे उठा…आखाडा निघाला..झोपलेल्यांना जागी करत लोक बोलू लागले.तीनपत्ती, गलीवरचे चिल्लर खेळ बंद करून लोक आखाड्याच्या दिशेने चालू लागले.

आखाडा सुरू झाला.सुरूवातीला लहान मुलांच्या कुस्त्या चालू झाल्या.आखाड्यात रेवड्या उधळल्या गेल्या.पोर शर्ट काढुन आखाड्यात एकमेकांना भिडू लागली.तार काही पोरं नुसतीच रेवड्या गोळा करू लागली.एकाच वेळी लहान पोरांच्या पंधरा वीस कुस्त्या सुरू झाल्या.एकच गलका झाला.नुसताच धुराळा…

सुरूवातीला दहा रूपयापासुन कुस्त्या चालू झाल्या.हळुहळू आखाड्याला रंग चढू लागला.पंचांच्या निर्णयावरून वाद झडू लागले.
शेवटी एकदा एका नामांकित मल्लावर म्हैस बक्षिस असलेली कुस्ती जाहिर झाली.कसलेला पहिलवान बघुन अनेकांनी आंदाज घेतला.व आपल्या आवाक्यात नाही हे ओळखुन अनेक जण जागीच थिजले.

इतकावेळ शंकरदादाही अंदाज करीत होता.समोर धरलेल्या पहिलवानापुढे शंकरदादा खुपच खुजा वाटत होता.आणि अचानक शंकरदादा उठला व समोर धरलेल्या पहिलवानापुढे जाऊन म्हणाला मी खेळतो याच्याबरोबर..

कुस्ती लावनारे श्री.मारूती धंद्रे बोलले.अरे तुझा याच्या बरोबर जोड आहे काय? मरायचय का तुला? समोरचा पहिलवान केवढा तु केवढा? तुझा पाडाव लागनार नाही! चल जागेवर जाऊन बस ?

हे ऐकून मलाही बरं वाटलं.खरंच शंकरदादा त्या पहिलवानापुढे अगदी खुजा व तब्येतीने खुपच बारीक होता.

शंकरदादा परत माघारी फिरला.तेवढ्यात खाली बसलेले पब्लीकमध्ये असणारा एकजण ओरडला.होऊद्या या दोघांची कुस्ती तुम्हाला काय अडचण आहे?तो खेळायला तायार आहे ना ? नाहीतरी दुसरा कुनीच पहिलवान तायार नाहीय.

खाली बसलेला समाज ही कुस्ती झालीच पाहीजे म्हणून एकच गलका केला.

शेवटी गावकरी व धंद्रेसाहेबांची चर्चा झाली व एकदाची कुस्ती लागली.

शंकरदादाला मी खुपच दुषणं देऊ लागलो.तुला अकलेचा भाग आहे का? मरायचय का तुला त्याच्यासमोर? असे मी त्याला बोलू लागलो.
तो एवढचं बोलायचा गप तुला काय कळतयं ? पडलो तर पडलो.

दोनही पहिलवानांनी काच्या केला.आपापल्या देवाला नमस्कार केला.व दोघेही मैदानात उतरले.

जय बजरंग बली अशी गर्जना करीत‚ एका पायावर नाचत‚ जांग कसलेला समोरचा पैलवान मैदानभर फिरला. त्याची तयारी दाबजोर होती.दुसऱ्या बाजूनं शंकरदादाही ‘बजरंग बली कीऽ जय.’ असं गर्जत एका पायावर नाचत मैदानात उतरला. कळकाच्या दांड्यासमोर तुरकाठी दिसावी तसा शंकरदादा त्या पहिलवानापुढे किरकोळ दिसू लागला.अनेक जण हळहळले. हा हा म्हणत हा पहिलवान शंकरदादाला पाडणार हे सगळ्या लोकांना उघड दिसत होतं.
पाच-दहा मिनिटं झाली. दोन्ही पैलवानांची मैदानात खडाखडी चालली होती. समोरच्या पहिलवानाने शंकरदादाला पटात घेतलं. कौशल्यानं शंकरदादानं पट फोडला.‘हे रे माज्या भाद्दरा!’ धंद्रे साहेब ओरडले.आपण कुस्त्या लावायला उभे आहोत हेच ते विसरले होते. शंकरदादा मैदानात एवढा वेळ कधीच कुचमला नव्हता. दमछाकीला तो टिकणं शक्यच नव्हतं. शंकरदादानं त्वरेने काही केलं तरच जमणार होतं.

शंकर सावध झाला. गळ्यात हात चढवायला चालून येणारा समोरचा मल्ल बघून‚ नाकात माती शिरल्याच्या आविर्भावानं चिमटी लावून त्यानं नाक शिंकरलं. तो ओला हात ढालीसारखा तसाच पुढं धरला. त्याच्या घाणेरड्या ओल्या हाताचा स्पर्श होणार म्हणून बिचकलेला पहिलवान आठ्या घालीत एक पाऊल मागं हटला.थोडावेळ त्याचं चित्त चलबिचल झालं. तेवढ्यात शंकरदादानं चपळाई करून त्याच्या दोन्ही पायांना आपल्या पायांची गोफणीमिठी घातली. आणि दार ढकलावं तसं त्याला नुसतं मागं ढकललं. पायाला आढा बसलेला धिप्पाड रपहिलवान ‘आकडीच्या’ डावावर हां हां म्हणता सरळ मैदानात उताणा झाला.शंकरदादानं त्याला दिवसा चांदन्या मोजायला लावल्या. ‘बजरंग बली कीऽ जय!’ फटाकड्यासारखी उसळी घेत शंकरदादा मैदानभर बेहोश होऊन नाचू लागला.

रोख बक्षिसांची तर नुसती खैरात झाली.

म्हशीवर कुस्ती जिंकली असल्यामुळे एका गावक-याने आम्हाला गोठ्यात बांधलेली म्हैस सोडून आमच्या हवाली केली.म्हशीला बघुन आम्ही टरकलोच.म्हशीचा अगदी सांगाडा दिसत होता.म्हैस घरी न्यावी की नाही याबाबत आमच्यात चलबीचल झाली.परंतू ही बक्षीस मिळालेली म्हैस आहे.न्यावीच लागेल असा विचार करून आम्ही दोघे म्हशीला घेऊन परत आल्या वाटेने घरी चालू लागलो.

डेहणे गावच्या हद्दीत सातक्यात (रानाचे नांव ) आल्यावर म्हैस जे बसली ती उठेचना.खुप प्रयत्न करूनही म्हैस काही उठेना.आम्ही मग तसेच घरी आलो.
दुसऱ्या दिवशी आम्ही वाळलेल्या गवताच्या पेंढ्या व पाणी घेऊन गेलो.तर तेथे म्हैस बसलेलीच.गेल्यावर म्हशीला गवत टाकले.पाणी पाजले..म्हशीने आम्ही नेलेले सर्व गवत खाल्ले.परंतु म्हैस काही उठली नाही.

आज उठेल उद्या उठेल असे करता करता आठ दिवस झाले तरीही म्हैस काही उठली नाही.
शेवटी आम्ही सात आठ लोकांना घेऊन गेलो.लाकडाची दंडाळी घालून म्हशीला उठवले.सुरूवातीला म्हैस पायच धरेना..आता काय करायचे असा प्रश्न उभा राहिला..

कुणीतरी म्हणाले म्हशीला काही दिवस पेंड,सुग्रास चालू करा.आपोआप तिच्यात उठायचे बळ येईल.असा सल्ला देऊन लोक घरी आले.
शंकरदादा दररोज म्हशीला पेंड,सुग्रास.गवत देत होता.पाणी पाजत होता.आणि अश्चर्याची गोष्ट तीन दिवसात म्हैस ऊभी राहीली.शंकरदादाला तो पहिलवान पाडल्यापेक्षा जास्त आनंद झाला.

अजुन चार दिवसांनी म्हैस स्वतःहून चालत घरु आली.

हीच म्हैस पुढे अनेक वर्ष शंकरदादाकडे होती.

लेखक – श्री.रामदास तळपे

लेखकाचे नाव :
रामदास तळपे
लेखकाचा ई-मेल :
rktalpe9425@gmail.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..