नवीन लेखन...

नसेल स्पर्धा तर माणूस ‘अर्धा’

Competition - The Essence of Life

आजचे युग स्पर्धेचे युग आहे असे नेहमी म्हटले जाते. पण मला ते तितकेसे पटत नाही. स्पर्धा हा काही केवळ आजच्या युगाचाच युगधर्म नाही. तर स्पर्धा हा निसर्गचक्राचाच अविभाज्य घटक आहे. पृथ्वीच्या उत्पत्तीपासून स्वतःचे अस्तित्व राखण्याच्या स्पर्धेत अवघी सजीव सृष्टी धडपडताना दिसते. जे या स्पर्धेत यशस्वी झाले ते टिकले आणि मागे पडले ते नामशेष झाले. “सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट” या तत्वातून हीच गोष्ट तर स्पष्ट होते. -डायनॉसोरसारखे अजस्त्र, महाकाय प्राणी नष्ट झाले पण डासांसारखे बचावले कारण अस्तित्व टिकविण्याच्या स्पर्धेत ते यशस्वी झाले. एकाच जागी उभी राहून वाढणारी झाडेसुद्धा अधिकाधिक सूर्यप्रकाश मिळविण्यासाठी एकमेकांपेक्षा उंच वाढण्याची स्पर्धा करतात मग अशा सर्वव्यापी स्पर्धेपासून मानवी जीवन मुक्त कसे असेल?

स्पर्धा ही वैश्र्विक चैतन्याचे प्रतिक आहे असे मला वाटते. गुणवत्ता यादीत येण्यासाठी झटणारे विद्यार्थी, वर्ल्डकप मिळवण्यासाठी क्रीडागंणावर झुंजणारे विविध देशाचे क्रिकेटचे संघ, आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्या उत्पादनाचा खप वाढावा म्हणून परिश्रम करणारे उद्योजक. चित्रपटसृष्टीतील आपले आघाडीचे स्थान अबाधित रहावे म्हणून धडपडणारे सिनेस्टार्स इतकेच काय ९.५२ च्या लोकलमध्ये विंडोसीट पकडण्यासाठी धावपळ करणारा सामान्य माणूस देखील या चैतन्याचा भाग आहे. जे पुढे जाते ते जीवन आणि पुढे जायचे म्हणजे स्पर्धा आलीच म्हणून तर शिक्षण, राजकारण, कला, क्रीडा, अर्थकारण अशा सर्वच क्षेत्रात स्पर्धा आढळते आणि ती असायलाच हवी. ती जर नसेल तर एक प्रकारचे साचलेपण येउन त्या क्षेत्रावर मरगळ पसरेल.

स्पर्धा म्हणजे चालना. स्पर्धा म्हणजे गती. प्रगती साधण्यासाठी गती अनिवार्य असते. पण ही गोष्ट लक्षात न घेता अनेकजण स्पर्धेचा विनाकारण बाऊ करतात. स्पर्धेमुळे निर्माण होणारी चुरस गतीला पूरक, पोषकच असते. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी किमान गुणवत्ता जोपासणे आवश्यकच असते. .आणि स्पर्धेत आघाडी मिळविण्यासाठी कमाल गुणवत्ता राखणे अपरिहार्यच असते. म्हणजे त्या त्या क्षेत्रातील सेवा, उत्पादनाचा दर्जा राखण्यात आपोआपच ढिलाई येते. आणि समाधान होत नसतानाही नाईलाजाने समाज ती सेवा ते उत्पादन स्वीकारतो. पण संधी मिळताच अशा उत्पादनाकडे पाठ फिरवतो. दूरध्वनी सेवेबाबतचा अनुभव याबाबत पुरेसा बोलका आहेच.

इतरांपेक्षा अधिक चांगले असे काही करून दाखविण्याची भावना स्पर्धेमुळे निर्माण होते. ही भावनाच विकासाची वाट दाखवते. काही जणांना असे वाटते की, स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांवर विपरित परिणाम होतो. त्यांची शक्ती स्पर्धेत अनाठायी खर्च होते. विशेषत: मार्कांची संधी – गुणवत्ता यादी – विद्यार्थ्यांचे नुकसान करणारी आहे. असा विचार करणाऱ्यांना स्पर्धेचे तत्व उमगलेले नाही असे मला वाटते. स्पर्धा कोणाबरोबर आणि कशासाठी याचे भान जरुर राखायला हवे. प्रत्येक विद्यार्थी गुणवत्ता यादीत येऊ शकणार नाही. पण प्रत्येकाने त्यासाठी मन:पूर्वक प्रयत्न केले तर त्याची कामगिरी निश्चितच सुधारेल. धावण्याच्या स्पर्धेत फक्त तीन खेळाडूच पुरस्कार प्राप्त ठरतात म्हणून इतरांनी स्पर्धेत भाग घ्यायचाच नाही किंवा स्पर्धाच भरवायची नाही हा विचारच अपरिपक्व आहे. स्पर्धेचे दडपण आणि त्यातून येणारा ताण काहीवेळा विद्यार्थ्याच्या बाबतीत अनुभवायला मिळतो खरा पण त्याला पालकांचा दुराग्रह, अवाढव्य अपेक्षा असे इतर घटकच जास्त जबाबदार असतात. आपल्या मुलांची शारीरिक, बौद्धिक क्षमता ओळखण्याची कुवत पालकांमध्ये नसेल तर त्याचा दुष्परिणाम मुलांवर निश्चित होतो. पण दोष मात्र स्पर्धेवर ढकलला जातो.

म्हणून आपली स्पर्धा कोणाबरोबर आहे हे ओळखणे जरुरीचे आहे. तुल्यबळ स्पर्धकांमध्येच खरी स्पर्धा रंगत असते. ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्या क्रिकेट संघात स्पर्धा संभवतच नाही कारण दोन्ही संघाच्या गुणवत्तेत अफाट फरक आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाच्या दृष्टीने बांगला देशचा संघ स्पर्धकच नाही. पण बांगला देशच्या संघासाठी मात्र वेगळया अर्थाने स्पर्धा आहे – ऑस्टेलियाविरुद्ध याआधी केलेल्या खेळापेक्षा जास्त चांगला खेळ करून दाखवण्याची स्पर्धा आणि हीच स्पर्धा त्यांच्या खेळांचा दर्जा उंचावयाला मदत करणारी ठरेल. म्हणजे स्पर्धा नेहमी इतरांशीच असते असे नाहीतर कधीकधी ती स्वत:शी देखील असते. आणि अशी स्वत:शी ‘असलेली स्पर्धा हीच सर्वोकृष्ट
स्पर्धा असते. इथे तुम्हाला ज्याच्यावर मात करायची त्याची बलस्थाने आणि कमजोर जागा पूर्ण माहीत असतात. त्यामुळे कमजोर जागा नष्ट करून स्पर्धा जिंकण्याची संधी तुम्हाला सहज उपलब्ध असते. या संधीचा जे फायदा घेतात ते आपोआपच इतरांबरोबरच्या स्पर्धेत पुढे येतात.

स्पर्धा मग ती स्वत:शी असो की इतरांशी, त्यात भाग घ्यायचा तो जिंकण्यासाठीच. पण अपेक्षित यश मिळाले नाही तर नाराज, निराश व्हायचे नाही. मिळालेल्या अनुभवातून शहाणे होऊन अधिक जोमाने पुढल्या स्पर्धेची तयारी करायची. यश मिळण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब मात्र कधीच करू नये. स्टिरॉईड घेऊन एखादा धावपटू सुवर्णपदक मिळवू शकेल किंवा पेपर फोडून विद्यार्थी भरघोस मार्क मिळविलही पण हे यश निर्भेळ नसेल. शिवाय जगाला माहीत नसले तरी, त्यांच्या अंतर्मनाला नक्की माहीत असते की तो या यशाला खऱ्या अर्थाने लायक नाही. अशा फसवणूकीमुळे स्पर्धेचा हेतूच नष्ट होतो. गैरव्यवहार फोफावतात आणि खऱ्या गुणवत्ता धारकांवर अन्याय होतो.अशा अपप्रवृत्तीमुळे स्पर्धा बदनाम होते. ह्या अपप्रवृती दूर करून निकोप स्पर्धा जोपासण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. स्पर्धेची भीती न बाळगता, खुल्या दिल्याने आणि अथक परिश्रमांसह स्पर्धेला सामोरे जायला शिका. तुमच्या प्रगतीची गुरुकिल्ली स्पर्धेतच दडलेली आहे. तुमच्या गुणवत्तेला दाद स्पर्धेमुळेच मिळणार आहे तेव्हा स्पर्धेतील, जीवन जगा आणि जीवनाची स्पर्धा जिंका.

-चिंतामणी कारखानीस

चिंतामणी कारखानीस
About चिंतामणी कारखानीस 75 Articles
चिंतामणी कारखानीस हे ग्राहक संरक्षण सेवा समिती या संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष होते. त्यांना या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल २०१० चा Consumer Awareness Award हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे ते माजी अध्यक्ष आहेत. विविध वृत्तपत्रांत व मासिकांत त्यांचे लेख प्रकाशित झाले असून आकाशवाणीवर भाषणेही प्रसारित झाली आहेत. ते शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रवक्ते आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..