नवीन लेखन...

चिरायु माझी मराठी माऊली

आज या महाराष्ट्र भूमीत रहाताना,मराठी भाषेतुन संवाद साधताना आनंद आणि अभिमानानी ऊर भरुन येतो,जेव्हा आपण ऐकतो की जगात मराठी भाषेचा क्रमांक पंधरावा आहे. हजारो वर्षापूर्वी सुरु झालेला तिचा प्रवास अगदी आज ही टिकून आहे.विविध प्रवाह झेलत,स्वत:त अनेक भाषिक शब्दांना समावून घेत घेत,व्याकरण आणि बोली समृध्द होत राहिल्या आणि प्रमाणतेचं स्वरुप येत गेल्यामुळे ती विस्तारत गेली.

तरी सुध्दा कधी कधी तिच्या भवितव्याविषयी, तिच्या अस्तित्वाविषयी प्रश्न उपस्थित केले जातात की मराठी भाषेचं पुढ़े काय? पण कोणत्याही ठराविक घटनेतुन ताबडतोब कोणत्यातरी निष्कर्षापर्यंत येणं योग्य ठरत नाही. एखाद्या भाषेवर जेव्हा दुसर्‍या भाषेचा प्रभाव होतो तेव्हा ती भाषा शब्दांमधुन सतत फुलत असते; पण अर्थ तोच रहातो. आत्तापर्यंत उर्दू, हिंदी, संस्कृतचे अनेक शब्द मराठी भाषेत दडलेत, त्यामुळे मराठी भाषा रुळत राहिली. वेळोवेळी झालेल्या संशोधनामुळे शुध्द, प्रमाणशीरता येत गेली. त्यामुळे दैनंदिन कामकाजात तिचा वापर होत राहिला. शेवटी बदल होत राहिल्याने त्यातील जिवंतपणा ही टिकुन आहे, जो पुढे ही अबाधित राहील. पण बदल होत राहिल ही वस्तुस्थिती आपण सर्वांनी स्वीकारली पाहीजे. त्यामुळे तिच्या वाढीसाठी शक्य ते प्रयत्न आपण मिळुन करण्याची गरज आज निर्माण झाली आहे.

थोडक्यात सांगायचं तर व्यक्तिगत पातळीपासुन सुरुवात केली तर मोठ्या स्तरावर अपेक्षित बदल घडवून आणता येतील. म्हणजे किमान सक्तीने मराठीत बोलून आणि तिचा आग्रह धरुन स्वत:पासुन याची सुरुवात करायलाच हवी. गेल्या सात आठ वर्षापासुन याची जागृकता अधिक वाढल्याचं जाणवतेय आणि दिसुन येतेय; याचं कारण म्हणजे प्रादेशिक माध्यमांचा झालेला अभूतपुर्व उदय. दूरचित्रवाणी वाहिन्या, मराठी वृत्तपत्र, मासिक,संकेतस्थळ (वेबसा्ईट्स) मोठ्या प्रमाणात मराठीत दाखल होत आहेत. संगणक तंत्रात जसा बदल होतोय तशी मराठी टंकलेकनात प्रगती होत गेली. फॉन्ट्सच्या सोप्या मांडणीमुळे तिचा वापर हा दिवसेंदिवस वाढतोच आहे. सोशल नेटवर्कींगच्या युगात संवादाची भाषा ही प्रादेशिकच असते. महाराष्ट्रीय आणि भारतीय समाज मग तो कोणत्याही वयोगटाचा असो किंवा कोणत्याही माध्यमात शिकलेला असो त्याला स्वत:च्या मातृभाषेतच बोलायला सोयीचं आणि आपुलकीचं वाटतं.

बरं रहाता राहिला प्रश्न मराठी साहित्य विश्वाचा, तर इतक्या विपुल पध्दतीनं आणि सर्वच विषयांना स्पर्श करणारं लेखन मग तो काव्य, कथा, गझल, समिक्षा, ललितनिबंध किंवा अभंग या प्रकारातली असेल ती अमरकृती अबाधित राहील. याची उदहारणंही देता येतील, ती म्हणजे आपल्या शहरात, आपल्या गावात ग्रंथ प्रदर्शन आयोजित केली जातात तेव्हा तरुणांची झुंबडच अधिक पहायला मिळते.

मध्यंरीच्या काळात साहित्यावर बेतलेल्या मराठी सिनेमांची निर्मिती करणं ह्या प्रवाहात कुठेतरी खंड जरुर पडलेला, पण गेल्या दशकात ती पोकळी बर्‍यापैकी भरुन निघाली आणि सिनेरसिकांकडूनही भरभरुन दाद तर मिळालीच पण आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याची दखल घेतली गेली; यानिमित्ताने अनेक तरुण गीतकार, कथाकार, कवि प्रकाशझोतात आले.

आज परदेशस्थ मराठी माणसांनी, त्या देशातील भावी पिढीसाठी अनेक उपक्रम आपल्या भाषेतून सुरु केले आहेत. जसं की आठवड्यातुन दोन तीन दिवस मराठीचं शिक्षण देणं व त्यासाठी प्रसार करणं; तर काही देशांमधून एफ.एम रेडिओ मार्फत मराठी कार्यक्रम प्रसारीत केले जात आहेत. कानावर सतत भाषा पडत राहिल्यामुळे तिचा प्रभाव ही वाढतोच आहे, त्यामुळे निश्चितच ती एखाद्दा झाडाच्या मुळांप्रमाणे स्वत:ला विस्तारतेच आहे.

थोडक्यात मराठीच्या भवितव्याविषयी आशादायक आणि काही प्रमाणात तरी दिलासादायक देणारी उदाहरणं ऐकल्यावर आणि वाचल्यावर निर्धास्तपणे, पण जबाबदारीनं एका नव्या दृष्टीकोनातून, नवीन उमेदीसह तिच्या वृध्दीसाठी प्रेरणा मिळते.

हीच प्रेरणा, हाच विचार कायम राखत मराठी भाषेला आपल्या आईचं स्थान आणि दर्जा देऊन तिच्या उध्दारासाठी तेवत रहाण्याचा संकल्प करु आजच्या जागतिक मराठी भाषा दिनी.

मराठी माझी माऊली तु, बोली तुझी नाद मधुर,

अगदी ओघवती अन् ओजस्वी,

शब्दांची वळणदार गुंफण करिता, वाक्य होती तेजस्वी;

निकटच्या प्रदेशी बोली,

वाढवी तुझी समृध्दी अन् आशयाची खोली,

म्हणून सुरु तुझा प्रवास अखंडी;

प्रवाह तुझा निरंतर, जो सुरु राहिल चिरंतर,

सर्व युगात रहाशील अनंत,

चिरायु अन् अव्वल

— सागर मालाडकर

Avatar
About सागर मालाडकर 111 Articles
श्री. सागर मालाडकर हे आकाशवाणीवरील निवेदक असून ते मराठीसृष्टीसाठी नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..