नवीन लेखन...

चेहरे पावसाचे

तो मी नव्हेच’ नाटकामध्ये, ‘लखोबा लोखंडे’ची आपण अनेक रूपं पाहिली. त्यामध्ये व्यक्ती एकच होती, त्यानं बदलली होती ती, स्वतःची रूपं… तसंच आपल्याला आत्ताच्या पावसाबद्दल सांगता येईल.. पाऊस तोच, मात्र त्याचं पडण्याचं ठिकाण बदललं की, त्याची रूपंही बदलत जातात..

निसर्ग सौंदर्याने नटलेला गोवा. जिथं पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. इथला पाऊस दारुसारखा आहे, इथं येणारा हौशी, दारुचा मनसोक्त आस्वाद घेतो मात्र ती दारु, त्याला चढतच नाही.. तसंच इथल्या पावसाचं आहे, भरपूर पडतो मात्र जाणवतच नाही!

कोल्हापूरचा पाऊस हा घरजावईसारखा असतो.. एकदा घुसला की, निघायचं तो नावच घेत नाही. मुक्कामीच राहतो. ‘रहा’ म्हणायची पंचायत व ‘निघून जा’ म्हणायचीही पंचायत! त्याच्यापायी संपूर्ण शहर पाण्याखाली जातं..

सातारचा पाऊस, ‘सातारी जर्दा’ सारखा.. एकदा सुरु झाला की, किक बसल्यासारखा पडतच राहणारा… ओढे, नाले, झरे, ओहोळ भरभरुन वाहणारा..

मुंबईचा पाऊस हा प्रेयसीचा खडूस बाप किंवा भावासारखा असतो.. कधी येऊन टपकेल आणि आपल्याला धू धू धुवेल हे सांगता येणार नाही.. जर त्यांच्या तावडीत आपण सापडलो, तर आपली काही खैर नसते…

पुण्याचा पाऊस, पक्का बायकी! बायका चिडल्या की जसं स्पष्टपणे बोलतही नाहीत आणि चिडण्याचं कारणही सांगत नाहीत, सारखीच पिरपिर करीत बसतात ना.. तसाच इथला पाऊस पडत असतो.. दिवसभर त्याची पिरपिर व भुरभुर चालूच राहते.. धड काही कामही सुचत नाही व बाहेर पडून, भिडे पुलावरुन पाणी वाहतंय का? हे देखील पाहायला जाता येत नाही…

खरा पाऊस कोकणातला! लग्न झाल्यावर माणूस जसा संसारात गुंतून जातो, तसाच हा पाऊस एकदा सुरु झाला की, शेवटपर्यंत धों धों कोसळतच राहतो..

मराठवाड्यातील पाऊस म्हणजे, जणू काही एखादं लफडंच. जमलं तर जमलं, नाही तर सगळंच हुकलं.. त्याची शाश्वती कुणालाही सांगता यायची नाही..

बेळगांवचा पाऊस सात जन्म मिळालेल्या अनुभवी बायकोसारखा.. प्रेमाची रिमझिम, आपुलकीच्या धारा.. वरुन वर्षाव करीत असतात, मायेच्या गारा..

नाशिकचा पाऊस, पंचवटीतील रामासारखा.. एकदा पडायला लागला की, बाणांच्या वर्षावासारखा.. गोदावरी टुथडी भरुन वाहू लागली की, आवरतं घेणारा…

ही पावसाची विविध रूपं पाहिली की, त्या निसर्गराजाचं कौतुक करावसं वाटतं.. वर्षातले त्याच्या वाट्याला आलेले चार महिने तो बरसून जातो.. पूर्वी त्याच्या तारखा कधीही चुकायच्या नाहीत… आता मात्र माणसांनी केलेल्या सिमेंटच्या जंगलामुळे तो हवामान खात्याच्या अंदाजालाही गुंगारा देतो.. आणि एकदा का मनावर घेतलं की, चार दिवसांत सगळी धरणं भरुन टाकतो.. आता त्याचंही मानसिक संतुलन बिघडलंय.. काही ठिकाणी त्याच्या वर्षावाने, नैसर्गिक आपत्ती ओढवल्या जातात.. दरडी कोसळतात, पूल वाहून जातात.. माणसं बेघर होतात, संसार उध्वस्त होतात… मग मात्र हा पाऊस आवरतं घेतो आणि अपराध्यासारखा शांत होतो…

© सुरेश नावडकर.

मोबाईल: ९७३००३४२८४

२५-७-२१.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..