नवीन लेखन...

छत्रपती संभाजी महाराजांचे इंग्रज, सिद्धी आणि पोर्तुगीज यांच्याशी संबंध

छत्रपती संभाजी महाराजांनी अवघ्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये पोर्तृगीजांशी असा लढा दिला की पोर्तृगीजांची यापूर्वी कधीही फजिती झाली नव्हती अशी फजिती झाली. अवघ्या 32 वर्षांच्या वादळी आयुष्यात त्यांनी अनेक विजय संपादन केले. एकूण 120 मोहिमांचे त्यांनी नेतृत्व केले. तरीही छत्रपती संभाजी महाराजांनी एकदाही हार पत्करली नाही.

छत्रपती संभाजी महाराजांची कारकिर्द हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवरायांच्या इतकीच चित्रथरारक व अभ्यासनीय आहे. त्यांच्या ठायी आपल्या पित्याप्रमाणेच शौर्य, पराक्रम, राष्ट्रप्रेम व धर्मप्रेम इत्यादी सर्वोत्कृष्ट गुण भरपूर होते. या गुणांची बाजू इतिहासकारांनी विशेषतः बखरकारांनी पुढे न आणता त्यांचे विकृत चारित्र्य, बखरी, दंतकथा, द्वेषमुलक लिखाणाचा आधार घेऊन त्यांची प्रतिमा रंगविली आणि पत्करलेल्या हौतात्म्यामुळे त्यांना धर्मवीर म्हणून गौरविले. हीच त्यांच्या बलीदानाविषयी जमेची बाजू होती.

संभाजी महाराजांनी अवघ्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी पोर्तृगीजांशी लढा देऊन त्यांची यापूर्वी कधीही फजिती झाली नव्हती अशी फजिती केली. अवघ्या 32 वर्षांच्या वादळी आयुष्यात त्यांनी अनेक विजय संपादन केले. एकूण 120 मोहिमांचे त्यांनी नेतृत्व केले. एकदाही हार पत्करली नाही. सिद्दीच्या पाठीशी इंग्रज सतत उभे राहात. ते सिद्दीला रसद पुरवित. अशा इंग्रजांना धडा शिकवून दमात ठेवले होते. पोर्तुगीजांना गोव्यात जाऊन त्यांनी जाब विचारला होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांचा लढा चालूच होता. मुंबई बेट इंग्रजांच्या ताब्यात 1664 डिसेंबर महिन्यात आलं. शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट करून इंग्रजांना योग्य तो संदेश दिला होता. म्हणून त्यांनी मराठ्यांशी सख्य राखण्याचा प्रयत्न चालू ठेवला होता. त्यात गुपचूपपणे ते सिद्दीशी लागूलचालनही ठेवीत होते. हे महाराजांना समजताच त्यांनी पावसाळ्यात मुंबई बंदराच्या आश्रयाला जात होते ते थांबविले. असेच धोरण संभाजी महाराजांनी आपल्या नऊ वर्षाच्या कारकिर्दीत स्वीकारून इंग्रजांवर चांगलेच नियंत्रण ठेवले होते. 1680 च्या सुरुवातीला इंग्रजांनी राजापूरला जाण्यास परवानगी मागितली ती नाकारली होती.

सिद्दी याचवेळी पेण-नागोठणे भागात लुटालूट करीत होता आणि याला इंग्रजांनी मदत केल्याचे लक्षात येता, संभाजी महाराजांनी  राजापूरच्या वखारीवर सैन्य पाठविले. इंग्रज सपशेल घाबरला आणि त्यांनी संभाजी महाराजांशी तह करून त्यांनी घातलेल्या सर्व अटी मान्य केल्या. त्यात सिद्दीला मदत न करणे ही प्रमुख अट होती. सिद्दीने 16 मार्च 1681 रोजी मराठ्यांची दोन गलबते व चार माणसे पकडली. मात्र याचवेळी संभाजी महाराजांचे तीन हजार सैन्य आणि मराठा अधिकारी तेथे तैनात असल्याने इंग्रजांनी सिद्दीलाच दम देऊन ती गलबते सोडावयास लावली. एकवेळ ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर रिचर्ड केजविनने संभाजी महाराजांशी मैत्री करून मुंबईच्या संरक्षणाची जबाबदारी संभाजी महाराजांवर सोपविली होती. मुंबईची बेटे 40 हजार पागोड्यांना संभाजी राजांना विकण्याच्या मनःस्थितीत असल्याचे सुरतेच्या गर्व्हनरने लिहून ठेवले आहे.

सिद्दीने संभाजी राजांच्या मुलुखातून मुले पळवून मुंबईत ती गुलाम म्हणून विकण्याचा संतापजनक प्रकार सुरू केल्यावर संभाजी महाराजांनी आपला संताप व्यक्त करून हे प्रकार त्वरित थांबवावे असा सज्जड दमच दिला. परिस्थिती आणखीन बिघडली जावू नये म्हणून इंग्रजांनीही माघार घेतली. याचवेळी कारंजा बेटावर महाराजांनी  ताबा मिळविल्यावर तर इंग्रजांनी लागलीच त्यांच्याशी तह करण्याकरिता संभाजी राजेंकडे, केजवीनकडे मुंबई बेटाचा अधिकृत ताबा आल्यावर त्यांनी कॅप्टन गॅरीला संभाजी महाराजांकडे तह करण्यास पाठविले. जोडीला थॉमस बिल्कीस व दुभाषा म्हणून राम शेणवी याला पाठविले. हे सर्वजण महाडजवळील खाडीच्या छावणीत भेटले. या तहामध्ये इंग्रजांनी सिद्दीला थारा देऊ नये, युद्ध सामग्री पुरवून उपद्रव देण्यास मदत करू नये व दिवसेंदिवस मैत्रीचे संबंध अधिक घट्ट करावेत. ‘तुमचा मित्र तो आमचा मित्र आणि तुमचा शत्रु तो आमचा शत्रु’ हे जाणून आपल्या मैत्रिला तह करण्यास संमती दिली. त्याप्रमाणे तहाच्या  अटी निश्चित करण्यात आल्या. या तहाच्या मसुद्यात कर्नाटकासाठी 11 कलमे व मुंबईसाठी 30 कलमे संभाजी महाराजांनी मान्य केली. अशाप्रकारे इंग्रजांवर त्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले. यामध्ये शिवाजी महाराजांच्या वेळी विकत घेतलेल्या माणसामागे कडक जकात द्यावी लागत असे. मात्र संभाजी महाराजांनी गुलामाच्या व्यापाराला संपूर्ण बंदीच घातली होती. ही एक क्रांतिकारी लक्षणीय बाबच लक्षात घ्यावी लागते. या महत्त्वपूर्ण तहामुळे संभाजी महाराजांच्या इच्छेप्रमाणे इंग्रजांनी सिद्दीला मुंबईत थारा व साहित्य दिले नाही. त्यामुळे मराठ्यांच्या मुलुखात सिद्दीचे उपद्रव देणे महाराजांच्या अंतापर्यंत बंद पडले.

संभाजी महाराजांनी सिद्दीला प्रचंड जेरीस आणलेच होते. जंजिरा किल्ल्यास शिड्या लावून समुद्रात कापसाच्या गाद्या टाकून  सेतू बांधण्याचा अचाट प्रयोगही करून पाहिला. त्यांच्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी पद्मदुर्ग किल्ल्याचा चतुराईने उपयोगही केला. सिद्दीसोबतचे फास आवळत असतानाच औरंगजेब आपल्या सामर्थ्यासह स्वराज्याचा घास घेण्यासाठी सर्व शक्तीनिशी आल्यावर संभाजी महाराजांना ही सिद्दीवरील आटोक्यात आलेली मोहीम नाईलाजाने आवरती घ्यावी लागली आणि स्वराज्य संरक्षणार्थ त्यांना सिद्ध व्हावे लागले. काही वेळा नशिबाची साथही मिळाली आणि पुढील इतिहासच बदलून गेला. मात्र त्यांनी सिद्दीच्या अत्याचारांना आणि जुलुमाचा चांगलाच बंदोबस्त  केला हे महत्त्वाचे आहे. या मोहिमेत त्यांनी युद्धनितीचे अनेक डावपेच वापरून पाहिले. त्यांच्या धाडसी, पराक्रमाची योग्या त्या प्रकारे नोंद घेतली गेली नाही. संभाजी  महाराज आणि पोर्तुगीज यांच्या संबंधाविषयी लाखो कागदपत्रे गोव्याच्या पुरालेखागारामध्ये उपलब्ध आहे. पिसुर्लेकरांनी गोव्याचे पोर्तुगीज आणि मराठेयांच्या संबंधीचे अभ्यासपूर्ण असे ऐतिहासिक दस्तावेजावर पुस्तकच लिहिले आहे.

व्हिसेरेईने शिवाजी महाराजांच्या निधनाबाबत 29 मे 1680 या दिवशी संभाजीस दुखवट्याचा संदेश पाठवून दिला. त्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, ‘आपले दूत रामजी नाईक ठाकूर यांच्याबरोबर पाठविलेले आपले पत्र मिळाले. आपले पिता शिवाजी राजे यांच्या  निधनाबद्दल आम्हाला फार दुःख झाले. मृत्यू कुणालाच चुकत नाही. दैवी इच्छेसमोर कुणाचीच मात्रा चालत नाही.  आपणासारखा शांततेने राज्य करणारा राजा आपल्या प्रजेला लाभला याबद्दल आपली प्रजा अभिनंदानास पात्र आहे. प्रजेच्या दृष्टीने न्याय आणि शांतता यासारखे सुख दुसरे कोणतेच नसते.’ मात्र लवकरच 20 जानेवारी 1681 च्या पत्राद्वारे गोव्याच्या व्हिसेरेईने संभाजी महाराजांविरुद्ध कटकटी सुरू झाल्याचे पत्र कोकणचा सुभेदार तानाजी रामयांस लिहिल्याचे स्पष्टपणे दिसून येते. त्यांनी त्याचवेळी संभाजी महाराजांकडे आश्रयार्थ आलेल्या औरंगजेबाचा मुलगा अकबर याला डिचोलीत एक वाडा बांधून दिल्याची तक्रारही नोंदवली होती. पुढे पोर्तुगिजांशी अनेक कारणावरून बेनाव होत गेला. त्यातच आंजेदिव बेट घेण्यासाठी हालचाली सुरू केल्याचा सुगावा त्यांना लागला. दोन्हीकडून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र याचवेळी संभाजीराजांचा कोकणचा सुभेदार अण्णाजी पंडित यांनी वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारून या बेटावरून अप्रत्यक्षरित्या पोर्तुगिजांवरदबाव  आणण्याचे काम चतुराईने केले.गोव्याचे पोर्तुगीज, संभाजी महाराज आणि औरंगजेब या दोघांना खूश करण्यासाठी संधीसाधूपणाचे राजकारण नेहमीच खेळत असत. याबाबत व्हिसेरेई काँट द आल्बेर याने 12 एप्रिल 1683 रोजी औरंगजेबाला लिहिलेले एक पत्र उपलब्ध आहे. त्यामध्ये ‘तुम्ही संभाजीराजांवर आक्रमण करण्यास येत आहात ते कळले. मी तुम्हास सर्वतोपरी आवश्यक त्या मदतीचे आश्वासन देतो,’ असे स्पष्टपणे लिहिले आहे. इकडे संभाजी महाराजांविरुद्ध कारस्थाने सुरूच होती. तिकडे औरंगजेबाला खूश करणारे पत्रव्यवहार ते करीत होतेच. दुटप्पी निती होती. तत्पूर्वी संभाजी महाराजांशी जो तह, करार केलेला होता. त्याला सपशेल हरताल फासण्याची तयारी या पोर्तुगीज गोव्याच्या व्हिसेरेईने दाखविली होतीच. आणि प्रत्येक वेळी ते अशाच प्रकारची भूमिका घेत असत. ही असंख्य अशा कागदपत्रांवरून दिसून येते आणि या गोव्याच्या पोर्तुगिजांचा ढोंगीपणा संभीजा महाराजांच्या चांगल्या प्रकारे लक्षात आला होता.

याच दरम्यान 1683 मध्ये संभाजी महाराजांनी चौलचा पाडाव करून पोर्तुगीजांना जबरदस्त दणका दिला होता. पुढे 16 डिसेंबरला फोंड्याच्या किल्ल्यास वेढा घातला. हा नऊ दिवस सतत हल्ला चालला. संभाजी महाराज जातीने या युद्धात सहभागी झाले. या युद्धात संभाजी  महाराजांनी न भूतो न भविष्यती असा पराक्रम गाजवून पोर्तुगीज व्हिसेरेई कसाबसा जीव घेऊन त्याचे नशीब बलवत्तर म्हणून दोन वेळा मृत्यूच्या दाढेतून निसटला. शेवटी अशा प्रकारचा लाजीरवाणे अपयश स्वीकारून 11 नोव्हेंबर 1683 रोजी पोर्तुगीलला परतला तो थेट जेसुइटांच्या मठात जाऊन चार दिवस राहिला. त्याने स्वतःलाच कोंडून घेतले होते. संभाजी महाराजांनी नंतर अजिबात उसंत न घेता जुवे बेटावरील पोर्तुगीजांची वाताहात केली. येथील किल्ल्यांची शिबंदी फारच थोडी. ती पण गैरसावध असल्याने मराठ्यांना हा किल्ला सहज घेणे शक्य झाले. याचवेळी संभाजी महाराजांनी गोवा शहरावर चाल करण्याचे ठरविले. पण नदीला भरती आल्याने ते शक्य झाले नाही. इकडे भयभीत, पळपुट्या व्हिसेरेईने आपला राजदंड आणि इतर राजचिन्हे पोर्तुगाल राज्याच्या वतीने सेंट झेवियरला अर्पण केली आणि त्याच्या प्रेतासमोर करुणा भाकली ती मान्य झाल्याने संभाजी महाराजांनी आक्रमण केले नाही, अशी त्यांची धारणा आहे. अशाप्रकारे शूर संभाजी राजांनी पोर्तुगीजांचा चांगलाच दणका दिला होता.पुढे पोर्तुगीज आणि मराठ्यांमध्ये तहाच्या वाटाघाटी झाल्या. यामध्ये कविकलश याने वाटाघाटीत भाग घेतला होता. यामध्ये आजेदिव बेट खाली करणे. पोर्तुगिजांनी एक लक्ष होणांचा नजराणा देणे, पोर्तुगिजांनी या तहाच्या अटी मान्य करण्यासाठी अक्षम्य अशी  चालढकल केली. अखेरपर्यंत पोर्तुगीज आणि मराठे यांच्यातील संघर्ष चालूच राहिला. संभाजी महाराजांनी गोव्याच्या पोर्तुगिजांवर आपले वर्चस्व त्यांच्या अखेरपर्यंत कायमचे राखले होते.

डॉ. भास्कर धाटावकर

(व्यास क्रिएशन्स च्या कोंकण प्रतिभा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..