नवीन लेखन...

चाफा बोलेना…चाफा चालेना…

Chapha Bolena... Chapha Chalena

कवी “बी”  यांच्या चाफा बोलेना…चाफा चालेना… या कवितेचा मानसी पटवर्धन यांच्या लेखणीतून उतरलेला  रसास्वाद


“चाफा”हि “बी”म्हणजेच श्री नारायण मुरलीधर गुप्ते यांची सुप्रसिद्ध कविता…

आचार्य अत्रे यांनी तर ही कविता म्हणजे “प्रेमाचे नितांत सुंदर सूक्त आहे” असे उद्गार काढले होते..

तर या कवितेस सुंदर चालीत गुंफायला हवे हि लतादीदींचा इच्छा होती .म्हणून त्यांनी प्रथम “खळे काकांना” यास चाल देण्याची विनंती केली ,पण अक्षर गणवृत्त आणि मात्रा वृत्ताने बंदिस्त नसलेल्या या कवितेकडे पाहून त्यांनी नकार दिला.तीच गोष्ट “यशवंत देव” यांच्या बाबतीत घडली,पण दीदी निराश झाल्या नाहीत ,त्यांनी “श्री वसंत पवारांना” विनंती केली आणि पवारांनी बारा कडवी असलेल्या या कवितेतील नेमकी सहा कडवी निवडली.

खर तर अक्षर गण आणि मात्रा वृत्तापासून दूर असलेल्या या कवितेला चालीत गुंफणे हे वसंत रावांपुढे एक आव्हानच होते ,पण ते त्यांनी लीलया पेलले आणि एका अजरामर,पिढ्यान पिढ्या गाजणाऱ्या गीताचा जन्म झाला …”चाफा बोलेना ,चाफा चालेना…..”

या कवितेचा अर्थ थोडा गूढ वाटतो आणि अनेकांनी दिलेला अर्थ वाचला कि मन संभ्रमित होते ,पण तरीही माझ्या परीने मला जो अर्थ पटला तो मी मांडणार आहे…सोनचाफा …ज्याला काही अध्यात्मिक महत्व आहे,जे फुल सुकले तरी गंध दरवळत राहतो,मग हा चाफा मनात दरवळला तर आनंदाची परमावधी साधेल…

चाफा बोलेना ,चाफा चालेना
चाफा “खंत” करी काही केल्या फुलेना

हि कविता म्हणजे जणू कवीचे त्याच्या “प्रतिभेशी” चाललेले हितगुजच आहे…कवींची प्रतिभा त्याच्यावर रुष्ट झाली आहे ,म्हणून तो नाराज आहे,अबोल आहे…हा एक अर्थ आणि दुसरा अर्थ अध्यात्मिक दृष्टीने घेता येईल….अध्यात्मात प्रगती होत नाही,प्रयत्न करूनही साधनेचे फळ मिळत नाही,आत्मानुभव येत नाही म्हणून साधक रुष्ट आहे.इथे “चाफा” हे जीवशिवाच्या ऐक्याचे ,आत्मानुभवाचे प्रतीक आहे.लतादीदींनी गाणे गाताना सुद्धा “चाफा बोलेना,चाफा चालेना” या ओळीत प्रथम बोलेना ,चालेना यांनन्तर एक छोटासा पोज घेतला आहे…आणि दुसऱ्यांदा मात्र त्यावर एक छोटीशी हरकत घेतली आहे…”खंत करी काही केल्या फुलेना” या ओळीत सुद्धा “फुलेना” वर जो मोहक हिंदोळा आहे तो अप्रतिम…

गेले ‘आंब्याच्या’ बनी
म्हंटली मैनांसवें गाणी
आम्ही गळ्यांत गळे मिळवून रे

प्रतिभेला बहर यावा म्हणून पोषक वातावरण मिळण्यासाठी आम्ही (कवी आणि प्रतिभा)आंब्याच्या रमणीय अशा वनात गेलो,जिथे राघू मैनांचा वावर होता ,वाटले आता तरी या रमणीय स्थळी प्रतिभा बहरेल …पण सारेच व्यर्थ….

आता अध्यात्मिक अर्थ पाहायचा झाला तर प्रापंचिक सुखाची ओढ लागून आम्ही आम्रवनी गेलो कारण आम्रमंजिरीने व्यापलेले वातावरण सुखदायी असते,प्रापंचिक सुखाची परमावधी येथे साधली जाते पण व्यर्थ हि सुखे चिरकाल टिकणारी नव्हती तर क्षणैक होती ,त्यामुळे तेथे मन रमलेच नाही

गेले केतकिच्या बनी
गंध दरवळला वनी
नागासवें गळाले देहभान रे

चल ये रे, ये रे गड्या
नाचु, उडू घालु फुगड्या
खेळु झिम्मा झिम्‌ पोरी झिम्‌ पोरी झिम्‌

आंब्याच्या वनि मन रमले नाही म्हणून केतकीच्या बनी गेलो,त्याचा गंध मनि दरवळला पण तोही क्षणैकच होता… इथे अध्यात्मिक दृष्टीने विचार केला तर आपल्या पाठीच्या कण्याच्या शेवटी वेटोळे घालून बसलेली कुंडलिनी शक्ती जेव्हा योगमार्गे जागृत होते ,तेव्हा साधक उच्च अनुभूती घेतो,अवर्णनीय आनंद सागरात पोहतो पण ध्यान संपले कि तोही आनंद क्षणाचाच ठरतो…

कडव्याच्या शेवटी आंब्याच्या वनात आणि केतकीच्या वनात घेतलेले अनुभव क्षणैक ठरले ,जणू झिम्मा फुगड्या यासारखे पोरखेळच…मग तेथे मन कसे रमावे…..

लतादीदींनी हे कडवे कमालीचे गोड गायले आहे…”गळ्यात गळे मिळवून रे ” येथे गळ्याsssत ला दिलेला झोका अप्रतिम…तसेच नागासवे गळाले देह भान रे…यानंतर त्यांनी झिम्मा जो स्वरांनी खेळला आहे आणि त्यानंतर घेतलेला आलाप खूप अप्रतिम…वेड लावणारा……!!!!

हे विश्वाचे अंगण
अम्हां दिले आहे आंदण
उणे करू आपण दोघेजण रे

जन विषयाचे किडे
यांची धाव बाह्याकडे
आपण करू शुद्ध रसपान रे

चाफा फुली आला फुलून
तेजी दिशा गेल्या आटुन
कोण मी – चाफा ? कोठे दोघे जण रे ?

कविमन पुढे म्हणते….हे विश्वरुपी अंगण आम्हाला जणू भ्रमंती करण्यासाठी आंदण दिले आहे…इथल्या अनेक संवेदना आम्हाला नवनिर्मितीची प्रेरणा देतात..

पण पुढे कवी म्हणतात “जन विषयाचे किडे, ह्यांची धाव बाह्याकडे आपण करु शुद्ध रसपान रे’.

कवी म्हणतात की मानवी मन विश्वाच्या बाह्यरुपाकडं, भौतिकतेकडे सहज अाकर्षित होतं. पण ‘शुद्ध रसपान’ हवं असेल तर भौतिकतेला सोडून “परमात्म्याचा” वेध घेण्याचा ध्यास मनानं घ्यायला हवा. कवीला असं वाटतंय की त्यासाठी त्यांच्या काव्यप्रतिभेनं परमात्म्याचा ध्यास घ्यावा. हे ध्येय जितकं उच्च तितकंच दैवी!!! ‘दिठी दीठ जातां मिळून, गात्रे गेली पांगळून, अंगी रोमांच आले थरथरून’

यांत ‘दिठी’ म्हणजे दृष्टी! कवी म्हणतात, माझी दृष्टी, माझं मन जेंव्हा परमात्म्यात विलिन होईल तेंव्हा ही लौकिक जगाची ‘गात्रं’ गळून पडतील अाणि मग माझ्या कवितेचं जे अंतिम ध्येय अाहे ते साध्य होईल.

इथं कवितेचं शेवटचं कडवं – “चाफा फुली आला फुलून, तेजी दिशा गेल्या आटून, कोण मी – चाफा! कोठे दोघेजण?”कवी म्हणतात की माझी कविता अशी बहरावी कि जिने मला मुक्ती लाभावी…मग प्रतिभाशक्ती आणि मी असा भेद उरणार नाही आणि खऱ्या अर्थाने आत्मज्ञान गवसेल….

आध्यत्मिक दृष्टया हि मी आणि माझा आत्मानुभव यात अभेद झाला की ज्ञानप्रकाश उरेल,चाफा खऱ्या अर्थाने फुलेल,साधकाला खऱ्या अर्थाने चिरंतन आनंद मिळेल…

चाफा फुलला…. जीवशिवाच्या एकात्मस्वरूपाचा बोध झाला…. त्या तेजामध्ये दिशा, काळ हि दृश्य जगाच्या भेदाच्या कल्पनेची परिमाणं विरून जातील…
हा एकात्मतेचा अनुभव इतका परिपूर्ण आहे की तिथे “कोण मी चाफा” मी आणि माझा आत्मानुभव यात भेद राहीला नाही….

दुसऱ्या अंतऱ्याची चाल पहिल्यासारखीच आहे…पण दीदींनी कमालीच्या तन्मयतेने गीत गायले आहे…विशेषकरून “चाफा फुली आला फुलून” हा आत्मज्ञानाचा आनंद त्यांनी विलक्षण सुंदर प्रकट केला आहे….श्री वसंत पवारांच्या संगीताबद्दल काय लिहावे…त्याने खरंच दाही दिशा उजळल्या आहेत…त्यांच्या प्रतिभेने आणि दिदींचा स्वराने हा भावगीतातील चाफा बहरला आहे…वसंतरावांनी हा भावगीतातील चाफा समर्थपणे फुलविला…आणि रसिकांना अनंदरूपी शुद्ध रसपान करविले……धन्य ते बी कवी, वसंत पवार …आणि लतादीदी……कसे विसरायचे त्यांचे ऋण… पिढ्यान पिढ्या हा चाफा फुलतो आहे आणि फुलणार आहे…..!!!!!

यातील काही संदर्भ नेटवरून तर काही श्री मधू पोतदार यांच्या “मानसीचा चित्रकार तो “या पुस्तकातून घेतले आहेत….

– मानसी पटवर्धन

— संकलन : शेखर आगासकर
सोशल मिडियातून येणारे चांगले लेख जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझा  उपक्रम.

6 Comments on चाफा बोलेना…चाफा चालेना…

  1. उत्तम रसास्वाद, जन विषयाचे किडे या शब्दाचा अर्थ शोधण्याकरिता मी आपला लेख शोधला आणि तो खूप खूप आवडला. धन्यवाद.

  2. मी अनेक वर्षापासून नागासोबत खेलण्याचा अर्थ समजन्या साठी अस्वस्थ होतो.
    उत्तम रसग्रहण.
    धन्यवाद मानसी मैडम व शेखर जी

  3. लेख चांगला आहे. रसग्रहण उत्तम आहे. पण संगीत वसंत पवारांचे नसून वसंत प्रभूंचे आहे. कृपया याची नोंद घ्यावी. मराठी भावगीताचा हा बादशहा होता आणि मोजक्या मराठी चित्रपटाला त्यानी संगीतपण दिले.___आनंद कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..