नवीन लेखन...

कॅनडा व्हाया लंडन

 

विदेशदौरा नि तोही विमानातून ……! विचारच न केलेला बरा. सगळे कल्पने पलिकडचे, स्वप्नवत वाटावे असेच ! शेजारच्या शहरात जायचे म्हटले तरी दहा वेळा विचार करावा लागायचा. खर्चाचा कधी ताळमेळ बसायचाच नाही. जग आज प्रगत झालंय, माणूस चंद्रावर जाऊन पोहोचलाय. मंगळ, शुक्राचा तो वेध घेतोय …….. तिथे विमानातून विदेशदौरा, ही तशी आज सामान्य गोष्टच ! त्याचे आश्चर्य वाटण्याचे कारणही नव्हते. पण आम्हा सामान्य माणसांच्या दृष्टीने ही गोष्ट तशी मोठीच !
माझा एक जेष्ठ मित्र नेहमीच म्हणायचा,

‘मास्तर (मास + तर)…मास म्हणजे महिना नि तर म्हणजे तरणारा किंवा जगणारा ! महिन्याच्या पगारावर जगणारा तो मास्तर ! त्याला जगताही येत नाही नि मरताही येत नाही.’

माझ्या त्या मास्तर मित्राचे बोलणे मी त्यावेळी हसण्यावारी नेले; परंतु मीही पुढे मास्तरच झालो नि त्याच्या बोलण्यातील तथ्य आता अनुभवास आले. साधी गोष्ट सुध्दा सामान्य माणसाला कांहीवेळा अवघड होते. अनेकवेळा मला त्याचा अनुभवही आला.

माझ्या सौभाग्यवतींचा एखादी दुचाकी घेण्याचा नेहमीच आग्रह असायचा. परंतु प्रत्येक वेळी कांही तरी सबब पुढे करून वेळ मारून नेत असे. एक दिवस ती सहजच म्हणाली,

‘अहो, ऐकलत का ? शेजारच्या बंड्यानं मोटरसायकल घेतलीय …. !    

तिच्या बोलण्यातला रोख मी जाणून होतो. परंतु ऐकलं नसल्याचा बहाणा करून पेपर वाचण्यात मग्न असल्याचं नाटक केलं. त्यावर ती पुन्हा मोठ्यानं म्हणाली,

असल्या गोष्टी नाहीच ऐकायला यायच्या…….!

मला कांही म्हणाली का ?

नाही, शेजाऱ्यांना सांगतेय …. शेजारच्या बंड्यानं गाडी घेतलीय.  

मग बरच झाल की ! एखादा दिवस बसून जायला तरी मिळेल !’

तिच्या बोलण्याचा रोख लक्षात येऊनही कांही उमजलेच नसल्याचे भासवित मी म्हणालो. पण बायका मोठ्या बेरकी ! पुरषांची ढोंगं लक्षात यायला त्यांना वेळ लागत नाही. तिचं बोलणं मी गांभिर्याने घेत नसल्याचे पाहून ती पुन्हा म्हणाली,

‘अहो, तुमच्या लक्षात कसे येत नाही ! मुलगी इंजिनिअर झाली; मुलगा डॉक्टर होतोय. एखादी स्कुटर तरी……..?’

एका अर्थाने तिचेही बरोबर होते. शेजारी-पाजारी दिमाखात मोटारसायकलीवरून जातांना पाहून तिला तसे वाटणे स्वाभाविक होते. मास्तराला, तेही हायस्कूलमध्ये सेवा करणाऱ्या……आज दुचाकी घेणे तसे अवघड नाही. परंतु मुलांचे शिक्षण नि शुन्यांतून संसार उभा करण्यातच अर्धे आयुष्य गेले. पोटाला चिमटा लाऊन जगत होतो. त्यात मोटरसायकलचा विचारही पेलणारा नव्हता. पण हे बोलून उपयोगाचे नव्हते, म्हणून वेळ मारून नेण्याच्या उद्देशानेच म्हणालो,

अग, जरा धीर धर……. तुझी मुलंच तुला हवे ते घेऊन देतील.’

शेजारीच बसलेल्या संतोषीने हे ऐकलं नि ती म्हणाली,

‘मम्मी, जरा थांब. स्कुटरच काय तुला कार घेऊन देते.’

तिचं बोलणं त्यावेळी हसण्यावारी नेलं; परंतु आज तिने ते खरं करून दाखविलंय. अभियांत्रिकी पदवीनंतर मुंबईच्या कोलगेट पाल्मोलिव्ह कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून तिला नोकरी मिळाली नि आमच्या आशा पल्लवित झाल्या. पहिल्या दोन वर्षातच कारगाडी घेऊन तिने घरी पाठविली सुध्दा ! आपला शब्द तिने खरा करून दाखविला. अभ्यासाप्रमाणेच नोकरीतही जिद्द, प्रामाणिक राहून तिने प्रगती साधली आहे. कॅनडातील एका कंपनीत चांगल्या पदावर ती आज काम करीत आहे. एक दिवस तिचा फोन आला,

पप्पा, तुम्हा दोघांचही प्लेनच तिकीट बुक केलय,  18 मे रोजी तुम्हाला कॅनडाला निघायचय.

पोर वयात असतो; तर उड्या मारीत गावभर मित्रांना ही आनंदाची बातमी दिली असती. परंतु आता निवृत्तीच्या वयात तसं करणं शोभणारं नव्हतं. मन भरून आलं, डोळ्यात आनंदाश्रु तरळले. पोरीवर केलेले संस्कार कारणी लागल्याचे समाधान वाटले. लग्नापूर्वी तिने आम्हाला कारमधून फिरवलं, आपल्या लग्नानंतर ती आता विमानातून फिरविणार होती.

आकाशात पक्षाप्रमाणे घिरट्या मारणारे इवलेसे विमान मी पाहिले होते. पाखराचे पंख लावून उंचउंच उडावे नि आभाळाचा निळा पडदा फाडून दूरवर झेप घ्यावी, असे तेंव्हा सतत वाटे. पण विमानात बसायचे तर बाजुलाच; प्रत्यक्षात विमान पाहण्याचा योगही कधी आला नव्हता. संतोषी कंपनीतर्फे प्रथमच ऑस्ट्रेलियाला गेली, त्यावेळी मुंबईचं अंतरराष्ट्रीय विमानतळ, तेही बाहेरून पहायचा योग आला. आपल्या लग्नानंतर ती कधी ऑस्ट्रेलियाला, कधी फ्रान्स, कधी अमेरिका तर कधी कॅनडा असा अधुनमधून विमान प्रवास करीत होती. मला या साऱ्या गोष्टींचे नवल वजा कौतुक वाटायचे. आज आम्हालाच प्रत्यक्ष विमान प्रवास करण्याचा योग आला होता.

***
कॅनडाला जायला अजून दोन महिन्याचा अवधी होता. विदेश दौऱ्यापेक्षाही विमान प्रवासाची मनात ओढ आणि तेवढेच औत्सुक्यही होते. ऑनलाईनवर पाठपुरावा करून या आधीच पासपोर्ट नि व्हीसाचा सोपस्कार संतोषीनेच पूर्ण करून घेतला होता. आता केवळ विमानात बसून आम्हाला आरामात कॅनडाला जायचे होते. आमच्या परिवारातच नव्हे, तर जवळच्या नातलगात संतोषीनंतर विदेशाचा प्रवास करणारे आम्हीच होतो. त्यामुळे कित्तेकानी भेटीगाठी घेऊन शुभेच्छा दिल्या. ज्यांना भेटता आले नाही, त्यांनी दूरध्वनीवरून अभिनंदन केलं. सारे कसे आधीच हवेतून चालल्यासारखे वाटायचे.
17 मे उजाडला तशी आमची घाई सुरू झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहाला मुंबईहून फ्लाईट ! त्यासाठी किमान दोन तास आधीच विमानतळावर पोहोचणे आवश्यक होते. म्हणून दोन दिवस आधीच पुण्याला गेलो होतो. पाहूण्यांच्या गाठीभेटी, निरोप घेण्यात दोन दिवस निघून गेले नि 17 मे रोजी रात्री साडेआकरा वाजताच मुंबईला जायला निघालो.

विदेशाचा पहिलाच प्रवास आणि तोही विमानातून…. एक अनोखा आनंद वजा मनात धास्ती होती. विचारांच्या तंद्रीतच विमानतळ गाठले. सोबत कन्या व जावईबापू होतेच. त्यामुळे प्रवासाची भिती बाळगण्याचे कारण नव्हते. परंतु अशा नवख्या प्रवासाची आम्हाला धास्ती वाटणे स्वाभाविक होते.

विमानतळ भव्य……! नवख्या माणसाला गोंधळात टाकणारे ! त्यात रात्रीची वेळ, तरीही प्रवाशांनी गजबलेले ! सामान्य, गरीब प्रवाशापासून ते उच्च वर्गीय सुशिक्षित प्रवाशांनी गजबलेले बस, रेल्वे स्थानक आम्ही पाहिले होते. पण इथे सर्वजण सुटाबुटातले…. क्वचित हिंदी….. इंग्रजी बोलणारेच अधिक ! तेही डोकीवरून जाणारे!
लगेजकार्टमध्ये बॅगा टाकल्या नि आत प्रवेश करण्यासाठी रांगेत उभे राहीलो. आधीच ऑनलाईन तिकिट बुक केले होते. ई-तिकीट पाहून गेटकिपरने आत जाऊ दिले. वाटले आता थेट विमानात जाऊन बसायचे! पण नाही, इथे सगळा वेगळाच प्रकार होता.

 ‘बसमध्ये जाऊन बसायचे नि वाहकाकडून तिकिट घ्यायचे’ इतकी सोपी गोष्ट इथे नव्हती. बोर्डींग पास, लगेजचे वजण, मग सोबतच्या केबीन बॅगची कस्टम अधिकाऱ्यांकडून तपासणी….! मेटल डिटेक्टरची तपासणी पार करून जाणं तर एक कसोटीच होती. हातातील घड्याळ, पेन, मोबाईल एवढेच नाही तर बूटही ट्रेमध्ये काढून ठेवले नि मेटल डिटेक्टरची चौकट पार करून मी सहीसलामत पलिकडे गेलो. परंतु सौभाग्यवती मेटल डिटेक्टरमधून जातांना सुंईऽऽ आवाज झाला. त्याबरोबर तपास अधिकाऱ्यांनी त्यांना रोखलं ! सौभाग्यवतींना ना इंग्रजीचा पत्ता, हिंदी तीही मोडकी-तोडकीच. त्याबरोबर त्या कांहीशा गोंधळल्याच; सोबत संतोषी होतीच, तिने आधीच या साऱ्या गोष्टींची कल्पना दिली होती.  आपल्या मम्मीला तिने धीर दिला. एका महिला अधिकाऱ्यानी त्यांची कसून तपासणी केली, तेंव्हा त्यांच्या साडीला लावलेली पीन आढळून आली. ती काढून घेऊन तिला जाऊ दिलं. आम्हाला सगळच तसं नवलाईचं व मनाला धुगधुग लावणारं !

फ्लाईट सकाळी साडेसहा वाजताची, त्यामुळे आमच्याकडे अजून चार तासाचा अवधी होता. विमानतळाची इमारत भव्य, सुसज्य आणि आकर्षक ! विद्युत रोषणाईने नटलेली दुकाने मनाला भुरळ घालीत होती. ते आगळंवेगळं दृश्य पहात फिरू लागलो. तेवढ्यात आर्ट गॅलरीने आमचे लक्ष वेधून घेतले.

कुणी अमेरिकेला जाणारे, कुणी इंग्लंड, कुणी कॅनडा, तर कुणी फ्रान्सला ….. ! आम्ही जाणार होतो लंडनमार्गे कॅनडाला. नऊ तासाचा प्रवास नि लंडनहून पुढे हॅलिफॅक्सपर्यंत सहा तास…., मध्ये लंडनला दीड तासाचा ब्रेक ! एअर इंडिया विमानाला लंडन विमानतळावर एअर कॅनडाच्या विमानाचे कनेक्शन होते.

अंतरराष्ट्रीय विमानतळावरील विविध रंगी, विविध ढंगी दृश्य मी प्रथमच पहात होतो. स्वच्छ, सुंदर, भव्य विमानतळ !  मुंबईचे (भारतीय) विमानतळ असूनही विदेशी प्रवाशांचीच गर्दी अधिक ! त्यांचे पोशाख, बोलण्याची स्टाईल, चालण्यातील ढब सगळेच कसे नवखे.

फ्लाईट उशीरा असलेले प्रवाशी विमानतळावरील दृश्य पहाण्यात, वस्तुची खरेदी करण्यात वेळ घालवित होते. आम्हीही असाच तासभर वेळ घालविला नि कांही वेळ वेटिंग रूममधील बाकांवर विश्रांती घेतली. पहाटे सहाच्या सुमारास एअर इंडिया विमानाचे बोर्डिंग सुरू झाले. टनेल सारख्या पॅसेजमधून आम्ही विमानात पाऊल टाकले. विमानाच्या प्रवेशव्दारावरच हवाई सुंदरीने आमचे सुहास्य स्वागत केले. त्याचा स्वीकार करून आम्ही आमच्या आरक्षित जागी आसनस्थ झालो.

ऊंच आकाशातून घिरट्या मारीत जाणारं, कधी तरी स्वप्नात रूंजू घलणारं विमान ! आज त्यात प्रत्यक्ष बसलो होतो. उंच भरारी घेऊन आकाशाला गवसणी घालणाऱ्या पक्षाप्रमाणे आता उंच झेप घेणार होतो. धरतीवर बरसात करणाऱ्या मेघांशी गुजगोष्टी करण्याची संधी मिळणार होती. विमानाच्या गतीपेक्षा शतपटीने मनाने गती घेतली नि कल्पनेच्या पुष्पक विमानातून ते उंच भरारी मारू लागले.

माझ्या मनाची अवस्था लहान मुलापेक्षा वेगळी नव्हती. मोठ्या कौतूकांने विमानात नजर भिरभिरत होती. आकाशात इवलेसे दिसणारे विमान प्रत्यक्षात किती भव्य, प्रवाशांनी भरगच्च भरलेले ! विमानाच्या इंजीनचा सुंईऽऽ आवाज वगळता सारेच कसे शांत, नवलाईचे. एवढ्यात सीट समोरील टीव्ही स्क्रीनमधून आवाज ऐकू आला. प्रवाशांना हिंदी, इंग्रजीत आलटून-पालटून सूचना देण्यात येत होत्या. शेवटी विमान हालले, धावपट्टीवरून हळूहळू गती घेऊ लागले नि शेवटी त्याने आकाशात झेप घेतली.

खिडकीच्या बाजूला सौ. नि तिच्या शेजारी मी. विमानातून पृथ्वीवरील दृश्य पहाण्याची ओढ होतीच. मग नजर विमानात स्थिरावणार कशी? डोळे सारखे खिडकीबाहेर भिरभिरत होते. विमान उंचउंच झेपावत होते. खाली अथांग अरबी समुद्र नि वर अनंत आकाश ! पहाटेच्या आंधुक प्रकाशात समुद्रातील लाटांचा लपंडाव दिसला नाही. एक-दोन इवलीशी जहाजे संथ गतीने पाण्यावर तरंगताना दिसत होती. परंतु कांही मिनिटातच समुद्र दृष्टीआड झाला नि जमिनीवरील दृश्य नजरेच्या कक्षेत आले. घरे नकाशातील मोठ्या बिंदूप्रमाणे आणि रस्ते जाड रेषेप्रमाणे दिसत होते. मध्येच नागमोडी वळणे घेत जाणारी नदी एखाद्या सुंदर तरुणीच्या गळ्यातील मौल्यवान हाराप्रमाणे व सरोवर तिच्या कपाळावरील बिंदीप्रमाणे शोभून दिसत होते. कांही वेळाने विमान ढगापलिकडे गेले नि पृथ्वीवरील निसर्ग सौंदर्य त्याच्याआड लपले. सृष्टी सौंदर्यात रममान झालेले मन कांहीसे उदास झाले.

हजारो मैलाच्या गतीने विमान पुढे जात असल्याचे समोरच्या स्क्रीनवर दिसत होते; परंतु प्रत्यक्षात मात्र त्याची जाणीव होत नव्हती. एकाच जागी स्थीर असल्यासारखे वाटायचे. तिथे जमीनीवरील खाच-खळग्यांचे धक्के नव्हते, बसप्रमाणे प्रवाशांची रेटारेटी नव्हती. सर्वजण आपापल्या जाग्यावर शांतपणे बसून होते. कोणी समोरच्या टीव्ही स्क्रीनवर चित्रपट पहात होते, तर कोणी लघुपट पहाण्यात रमून गेले होते. विचारांच्या तंद्रीत मला केंव्हा झोप लागली, समजलेच नाही. विमानातील एअर होस्टेसने अल्पोपहारासाठी हाक मारली नि मला जाग आली. बाहेर काळोख दाटला होता. दूरवर आकाशातील तारे लुकलुकतांना दिसत होते. आसनासमोरील टीव्ही स्क्रीनवर पाहिले, विमानाने बरेच अंतर कापले होते. लंडनला पोहोचण्यास अजून चार तासाचा अवधी होता. मला पुन्हा पेंग आली.

लंडनच्या अंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उतरले त्यावेळी सकाळचे साडेनऊ (भारताच्या प्रमाणवेळेनुसार त्यावेळी रात्र होती) वाजले होते. आम्हाला पुढचे विमान पकडण्याची घाई होती. लंडनहून हॅलिफक्सला जाण्यासाठी एअर कॅनडाच्या विमानाचे कनेक्शन होते. परंतु झाले भलतेच. हॅलिफक्सचे विमान पकडण्यासाठी एका टर्मिनलवरून दुसऱ्या टर्मिनलवर जाईस्तोवर विमान निघून गेले. आमचे विमान लंडनला पोहोचण्यास कांहीसा उशीर झाला नि एअर कॅनडाच्या विमानाने वेळेत उड्डाण केले. त्यामुळेच सारा गोंधळ झाला. एअर कॅनडाच्या अधिकाऱ्यांना ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी पर्यायी विमानातून जाण्याची आमची व्यवस्था केली; परंतु त्यासाठी लंडन विमानतळावर चार तास प्रतीक्षा करावी लागली.

भारतीय प्रमाणवेळेपेक्षा इंग्लंडची प्रमाणवेळ सुमारे नऊ तास मागे होती. त्यामुळे लंडनला आलो तरी वेळेत फारसा फेरफार झाला नव्हता. मी गमतीने कन्येला म्हणालो,

‘आमच्या जीवनातला एक दिवस वाढला तर…’

त्यावर ती तेवढ्याच मिस्कीलपणे म्हणाली,

‘होऽ, पण परत जातांना एक दिवस कमी होणार ना….!’

लंडनचे अंतरराष्ट्रीय विमानतळ वैविध्यतेने गजबजलेले, विस्तीर्ण नि सुंदर ! एका टर्मिनलवरून दुसऱ्या टर्मिनलवर जाण्यासठी अंतर्गत रेल्वेची विशेष व्यवस्था होती. स्वच्छता तर वाखानण्यासारखी. विमानतळावरील चार तास बरेच कांही सांगून गेले. जगातील विविध महत्वाच्या शहरांना हवाई मार्गाने जोडणारे हे जंक्शनच जणू ! जगातील विविध संस्कृती व भाषांचा इथे संगम झालेला. साऱ्यांची जगातल्या विविध शहरांना जाण्यासाठी एकच धावपळ सुरू होती. कोणी नोकरीच्या निमित्ताने, कोणी व्यापार, कोणी व्यवसाय तर कोणी प्रवासाच्या निमित्ताने येथे आलेला !

एकेकाळी जगावर स्वामित्व गाजविलेल्या इंग्लंड देशाची ही राजधानी, याच देशाने जगात औद्योगिक क्रांती घडवून आनली, याच देशाने विज्ञान क्षेत्रातही क्रांती केली, आमच्या देशावर दिडशे वर्षे राज्य केले. त्याच इंग्रजांच्या राजधानीत आज मी होतो. या देशाविषयी, इथल्या लोकांविषयी मनात कुतूहल वजा औत्सुक्य होते….. त्यांना जाणून घेण्याचे, जगावर राज्य करण्यामागचे त्यांचे इंगित समजून घेण्याचे! परंतु इंग्लडचा प्रवास करण्याचा अजूनतरी योग आला नव्हता; किमान त्यांच्या राजधानीत पाऊल ठेवण्याची संधी तरी मिळाली होती. व्हीसा नसल्याने विमानतळाबाहेर जाता येत नव्हते, याची मनात खंत होती. विमानतळावरूनच बाहेर नजर फिरवित त्यांच्या यशामागचं गमक जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होतो. इथली भूमी नि त्या भुमित रहाणाऱ्या लोकांचे अवलोकन करीत होतो. त्याच नजरेतून गोऱ्या लोकांकडे पहात होतो. त्यांची बोलण्याची पध्दत, चालण्यातील ढब….. परंतु एवढ्यावर कांही उमजण्यासारखे नव्हते. स्वप्नात नसताना कॅनडाला जाण्याचा योग आला, असाच केंव्हा तरी इंग्लंड फिरण्याचाही योग येईल, असे मनाचे सांत्वन केले. एवढ्यात –

‘मिस्टर देसाई अँड फमिली मेंबर्स आर रिक्वेस्टेड टू कॉंटॅक्ट !’

एअर कॅनडाच्या काऊंटरवरून उद्घोषणा झाली.

चार तासानंतर टोरॅंटोला आणि तेथून पुढे हॅलिफक्सला जाण्याची एअर कॅनडाने व्यवस्था केली होती. आम्हाला कॅनडाला जाण्यास चार तास विलंब झाला. परंतु या वेळेत लंडन विमानतळावर बरंच कांही पहाता आलं, शिकता आलं.
विविध विचारांच्या तंद्रीत विमान प्रवासाचा अनोखा अनुभव घेत कॅनडातील हॅलिफक्सच्या भुमित येऊन पोहोचलो. पहिल्याच विमान प्रवासाच्या अविस्मरणीय आठवणी मनात घोळत कन्येच्या घरी आलो. नव्या जगताचा नवा प्रवास पुढे होताच.

— मनोहर (बी. बी. देसाई)

…………………………………………………………………………………………..

लेखक परिचय

 ………………………………………………………

नाव : मनोहर तथा बी. बी. देसाई

 जन्म : 1-5-1954

जन्मस्थळ : बेळवट्टी, ता. जि. बेळगाव

सध्याचा पत्ता : 651, “संतोष’

सुखसागर कॉलनी (जैन मंदिर गल्ली),

गणेशपूर – बेळगाव (कर्नाटक) – 591 108

 शिक्षण : एम. ए. बी.एड.

 व्यवसाय : 1976 ते 2004 – माध्यमिक शिक्षक

2004 ते 2014 – माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक

मे 2014 – सेवेतून निवृत्त

 

 लेखन : पुनर्वसन कादंबरी

‘मला भावलेला कॅनडा’ प्रवास वर्णन प्रकाशनाच्या वाटेवर

दैनिक “सकाळ’ व “बेळगाव वार्ता’मधून विविध विषयांवर 20 वर्षे लेखन,

ज्वाला, जिव्हाळा, अमरदीप दिवाळी अंकातून कथा,  लेख व कविता प्रसिद्ध,

अमरदीप दिवाळी अंकाचे सात वर्षे संपादक म्हणून कार्य

 

पुरस्कार – बेळगाव वांड:मय चर्चा मंडळाचा साहित्य पुरस्कार,

जिव्हाळा सहित्य पुरस्कार, मराठी संस्कृती संवर्धनचा पुरस्कार,

वर्धा येथील आयडीयल साहित्य पुरस्कार,

मळेकरणी संस्थेचा साहित्य पुरस्कार

 

हव्यास : लेखन, वाचन, विविध विषयांवर व्याख्याने,  सामाजिक कार्यात सहभाग

………………………………………………………………………………………………

बी. बी. देसाई
About बी. बी. देसाई 23 Articles
लेखन : पुनर्वसन कादंबरी, ‘मला भावलेला कॅनडा’ प्रवास वर्णन प्रकाशनाच्या वाटेवर, दैनिक "सकाळ' व "बेळगाव वार्ता'मधून विविध विषयांवर 20 वर्षे लेखन, ज्वाला, जिव्हाळा, अमरदीप दिवाळी अंकातून कथा, लेख व कविता प्रसिद्ध, अमरदीप दिवाळी अंकाचे सात वर्षे संपादक म्हणून कार्य हव्यास : लेखन, वाचन, विविध विषयांवर व्याख्याने, सामाजिक कार्यात सहभाग
Contact: Facebook

1 Comment on कॅनडा व्हाया लंडन

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..