नवीन लेखन...

भिंतीवरचा तिचा फोटो 

– भीषण , भयंकर , निर्दय , निष्ठूर , क्रूर , अघोरी हे शब्दसुद्धा सौम्य वाटावेत असं ते दृश्य !

कालची रात्र प्रचंड अस्वस्थतेत गेलेली .
मन सुन्न आणि मेंदू बधीर अवस्थेत गेलेला .
डिलीट केल्यानंतरसुद्धा अजूनही
व्हिडिओतले ते दृश्य डोळ्यांसमोर सारखं उभं राहतंय .
भयभीत करणारं .
हृदयाचे ठोके थांबवणारं .
नजरेत अंगार निर्माण करणारं.
रक्ताचा लाव्हा उकळून ज्वालामुखीचा उद्रेक होईल की काय असं वाटणारं …

रात्री केव्हातरी तो व्हिडीओ समूहावर आला .
आणि मनाची शांती उद्ध्वस्त करून गेला .

नव्या फॅशनच्या आहारी गेलेल्या त्या तरुणीचे हात बांधलेले .
कुणीतरी तिच्या डोक्यात मोठा दगड घालत होता . घाव चुकला आणि मारणाऱ्याने पिकाव हाती घेऊन तिच्या डोक्यावर , चेहऱ्यावर घाव घालायला सुरुवात केलेली .
काही क्षण धडपड …
मग सगळं शांत .
रक्तबंबाळ चेहरा आणि निष्प्राण देह …
क्रूरतेचा नंगानाच घालून झाल्यावर पिकाव टाकून जाणारा तो …
तो कोण होता हे व्हिडिओत दिसत नव्हतं .
ही क्रूरता आणि विकृती कोण चित्रित करीत होतं , हेही व्हिडिओत दिसत नव्हतं .

– हे सगळं लिहिताना अंगावर काटा उभा राहतोय .
भयावह पोकळी निर्माण होतेय मनात .
वाटतंय काहीच लिहू नये .
पण…
संवेदनशील मन स्वस्थ बसू देत नाही.
हा व्हिडीओ कुणी व्हायरल केला , हे माहीत नाही .
– डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा तेच दृश्य …
– तोच चेहरा …तेच घाव…

ती कोण होती हे माहीत नाही .
पण ती कुणाची तरी मुलगी होती .
कुणाची तरी नात .
कुणाची तरी बहीण .
कुणाची तरी प्रेयसी .
कुणाची तरी मैत्रीण .
किंवा कुणाची तरी ….!

चार भिंतीची सुरक्षित चौकट मोडून , अंतहीन अशा अनोळखी रस्त्यावरून बेमुर्वतपणे जाताना पाठी एकदा तरी वळून बघितलस का बये ?

बघितलं असतंस तर तुला दारात , खिडकीत , गॅलरीत बरेच चेहरे दिसले असते .
कावरेबावरे झालेले .
अगतिक होऊन म्लान चेहऱ्याने तुला परत बोलावणारे .
तुझ्यावर नितांत माया करणारे .
आधारवड असणारे .
तुझ्यावर कायमची सावली रहावी म्हणून उन्हातान्हाची पर्वा न करणारे .
तुझ्यावर कुणाची दृष्ट लागू नये म्हणून तीट लावणारे आणि मीठ मिरची , भाकरतुकडा ओवाळून टाकणारे …

घर .
घराची ममता . ऊब . वात्सल्य . जिव्हाळा .
घर .
घरातली नाती . नात्याची गुंफण . नात्यातील गुंतागुंत .
घर .
घराचे संस्कार . घरातल्या पुस्तकांनी केलेले संस्कार . घरातल्या सणवारांनी केलेले संस्कार .
घरातल्या ज्येष्ठांनी दिलेली अनुभवाची शिदोरी .
आईच्या हाताची चव .
तिच्या डोळ्यातल्या पाण्याचा पारदर्शीपणा .
तिचा स्नेहाळ स्पर्श ,
बाबांच्या करारी नजरेपाठची काळजी .
भावाच्या रक्षाबंधनातून आलेला संरक्षणाचा आश्वासक सूर .

सगळं सगळं विसरून जाण्याइतकी बाहेरच्या उनाड वाऱ्याची ओढ खरी की , कधीही हाती न येणाऱ्या भ्रामक , खोट्या इंद्रधनुष्याची अवास्तव हाव खरी ?

व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली सुचलेला दुराचार खरा की स्वतःच्या भावनांशी खेळणाऱ्याचा मूळ हेतूच ओळखता आला नाही हे खरं ?

काय खरं ?
काय खोटं ?

कपड्यांच्या फॅशनचं अतिरेकी अंधानुकरण तुझ्या जीवावर बेतलं नाही ना ?
छोट्या मोठ्या पडद्यावरच्या मायाजालात तर फसली नाहीस ना ?
मित्रमैत्रिणींनी दाखवलेल्या मृगजळात तर अडकली नाहीस ना ?
नोकरीच्या पॅकेजमधून आलेला माज , होणाऱ्या पार्ट्या , हुक्का पार्लर्स , पब्ज आणि ड्रग्ज मधून येणारी नशा शमविण्यासाठी केलेलं लॉंग ड्राइव्ह तुला खुणावत नव्हतं ना ?

कदाचित…
कदाचित यातलं काहीच नसेल .
तू साधेपणानं जीवन जगत असशील .
नाकासमोर बघून चालत असशील .
पण आजूबाजूच्या हिंस्त्र लांडग्यांच्या नजरा तुला ओळखता येत नव्हत्या असं कसं म्हणता येईल बये ?

कदाचित ,
तू उच्चविद्याविभूषित असशील ,
संस्कारी असशील ,
वाचनानं , अनुभवानं तू शहाणी असशीलही .
मर्यादांचं पालन ही तुझ्या आयुष्याचं इतिकर्तव्यता असेल ,
पण निर्जन जंगलात जाताना हे सगळं धन तू कुठल्या गाठोड्यात बांधून फेकून दिलं होतंस ?

आता कसलीच उत्तरं मिळणार नाहीत .
हे का झालं , कसं झालं , कुणी केलं याचा थांगपत्ता लागेल न लागेल .

पण बये ,
आजीआजोबा आपली नात कुठं शोधतील ?
मनानं खचून गेलेले बाबा आवंढा कसा गिळतील ?
आणि दादा ,
स्वतःच्या बहिणीचं संरक्षण करण्यात कमी पडलो म्हणून स्वतःचं मनगट चावत असेल .
कल्पना आहे तुला ?

नसणार !
कसलीच कल्पना नसणार !

पण एक मात्र खरं ,
तुझ्या घरातल्या भिंतीवरचा , हार घातलेला तुझा फोटो बघून , अनेक आया , तरुण असलेल्या आपल्या मुलींना , नव्याने जन्म देतील .
तो जन्म सारासार विचारांचा असेल .संस्कारांचा असेल .
आणि सावधपणा शिकवणारा असेल .

— आईबाबांच्या डोळ्यांवरचा अश्रूंचा दाट पडदा तेव्हाच विरळ होईल बये !!!

–डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
९४२३८७५८०६
———————
नावासह सर्वत्र पाठवायला हरकत नाही .

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 109 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..