नवीन लेखन...

भिंत

योगसामर्थ्याव्दारे संत ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली होती. अर्थात या गोष्टीला सातशे वर्ष होऊन गेली असली तरी ही सर्वांसाठी अभिमानाची, कौतुकाची आणि तितकीच गर्वाची गोष्ट आहे. तर तिकडे चीनमध्ये अतिप्राचीन काळात उत्तरेकडील सीमेवरुन मंगोलिया प्रांतातून होणारी परकीय आक्रमणे थांबविण्यासाठी दगड, माती व विटा वापरुन भिंत बांधली गेली. ह्या महान भिंतीचे अनेक भाग असून त्यांची एकूण लांबी सुमारे ६,४५० किमी आहे. असा अंदाज लावला जातो की ही भिंत अवकाशातून दिसते.

माणुस जेव्हा गुहेतून, झाडांवरून रहाण्यासाठी इतर ठिकाणे शोधू लागला, त्यावेळी त्याने सर्वप्रथम वृक्षांच्या पानांचा वापर करून आडोसा तयार केला असवा, त्यानंतर बांबू, दगड, विटा, माती, चुना यांचा वापर करून भिंत उभारली असावी, असे इतिहास तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आदीम काळापासुन सुरू झालेला भिंतीचा हा प्रवास अलिकडच्या स्मार्ट भिंतीपर्यंत येऊन थांबलेला आहे.

२१व्या शतकात तर प्रत्येकाची स्वतंत्र भिंत तयार झाली आहे, ज्याला ‘वॉल’ म्हटले जाते. या वॉलवर काहीही चिटकवता येते, पोस्ट करता येते, त्यातून चांगले आणि वाईट असे दोन्ही अर्थ समाजापर्यंत तत्क्षणी पोचतात, ही या भिंतीची किमया..

तर ही भिंत जी आहे ती उभी राहिली तर विभाजन करते, ती उभी राहिली तर कुणाच्या तरी डोक्यावर छत उभे करते, ती उभी राहिली तर कुणाला तरी आधार देते, कुणाचे तरी संरक्षण करते, कुणाचा तरी सांभाळ करते.

भिंतीचे देखील खुप प्रकार आपण पाहू शकतो. कसे… तर एखाद्याच्या घराचा पत्ता शोधायचा असेल तर कुंपण भिंतीवर असलेल्या नावाचे फलक मदतीला धावून येतात. किमान भिंतीचा रंग तरी पत्ता शोधायला मदत करतो. मग घरात प्रवेश केल्यावर समोरच्या भिंतीवर लावलेलं एकादं छानसं पेंटींग, एखादी छानशी कलाकृती, एखाद ‘वॉलपीस’, एखादं घड्याळ लक्ष वेधुन घेते. किंवा बहुतांश घरातील भिंतीवर त्या घरातील पती-पत्नीचे फोटो असतात. त्या फोटोमध्ये आणि आत्ताच्या त्यांच्या दिसण्यामध्ये खुप अंतर असते हा भाग वेगळा. झोपडपट्टी भागात जर गेलो तर कुडाच्या भिंती पहायला मिळतात.

घरात बसुनच शेजारच्यांशी संवाद साधण्याची संधी या भिंतीव्दारे मिळत असते. त्यामुळे कामे करता करता असा संवाद सहज साधला जातो. कुठे लाकडी फळ्यांच्या भिंती पहायला मिळतात. कुठे तंबू उभारून भिंती तयार केलेल्या असतात. एक ना अनेक प्रकार भिंतीचे आपण पाहू शकतो.

ग्रामीण भागातील एखाद्या जुन्या घरात प्रवेश केला तर तेथील मुख्य हॉलमधल्या भिंतीवर विविध देवतांचे फोटो, प्रमाणपत्रांच्या केलेल्या फ्रेम, मुलांच्या लहानपणाचे ब्लॅक ॲन्ड व्हाईट फोटो असे बरेच काही काही पहायला मिळते. तेच जर मगाशी म्हटल्याप्रमाणे शहरातील घरात प्रवेश केला तर चित्र पालटते.

एखाद्या सरकारी कार्यालयात गेले तर… एक प्रश्न नेहमीच छळ करतो मनाचा, तो असा की सरकारी कार्यालयातील भिंतींच्या रंगाची निवड कोण बर करत असेल? एक तर भिंत सरकारी, त्यातही त्यांचे रंग असे असतात की ते पाहुनच समोरच्याच्या कामाचा उत्साह त्यात मारला जातो. त्यातून सरकारी कार्यालयातील भिंतीची अवस्था खुपच बोलकी (!) असते. जागो जागी वेगवेगळे डाग उमटलेले असतात, फाईली ठेवण्यासाठी विविध ठिकाणी रॅक केलेले असतात. भिंतीला लागून मग सरकारी टेबल ठेवलेली असतात, त्यावर हाडामासाची माणसं यंत्रवत (!) काम करत असतात….

कारागृहातल्या भिंती बरच काही सोसत असतात, ऐकत असतात. घरातल्या भिंती देखील बरच काही सहन करत असतात, पाहत असतात निमुटपणे, भिंतीला कान असतात हे आपण नेहमीच ऐकत आलो आहोत, हे जरी खरे असले तरी भिंतीला बोलता येत नाही, हे देखील तितकेच खरे… घरातल्या भिंती बोलू लागल्या तर…

एखाद्या सरकारी अधिकाऱ्याच्या कॅबिनची भिंत असेल तर त्यावर राष्ट्रपुरुषांच्या तसबिरी लावलेल्या दिसतात. एखादा मोठा सुविचार पहायला मिळतो. शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल तर ओळीने सर्व राष्ट्रसंत, राष्ट्रपुरुष, शाळेचे संस्थापक आदींचे फोटो लावलेले आपण पाहू शकतो.

मराठीत भिंत, हिंदीत दिवार आणि इंग्रजीत वॉल असलेली ही भिंत सर्वपरिचीत आहे. मग भिंतीचे अनेक प्रकार आपल्याला दिसतात. जसे भिंत शब्दांची असते, सुरांची असते, संगिताची असते. सोशल मिडीयावर असलेल्या भिंतीवर तुम्ही व्यक्त होऊ शकता, तिथे ही भिंत व्यासपीठ बनते. भिंत माणुसकीचीही असते. काही ठिकाणी माणुसकीची भिंत हा उपक्रम सुरू आहे, काही ठिकाणी तो बंद पडलाय.

तर अशी ही भिंत दोन घरात उभी राहिली तर विभागणी करते, मनांत उभी राहिली तर अबोला निर्माण करते. मानवी मनाच्या भिंती छेदणे अवघड होऊन जाते, पण हा छेद देणे आवश्यक आहे, कारण हा छेद दिला तर प्रत्येकासाठी नवे आकाश खुले होणार आहे, हे लक्षात घेतले पाहिजे…

— दिनेश दीक्षित
(१८ एप्रिल २०१८)

Avatar
About दिनेश रामप्रसाद दीक्षित 46 Articles
मी जळगाव येथे वास्तव्यास असतो. जळगाव येथे गेल्या २५ वर्षापासून मी पत्रकारितेत कार्य करत आहे. दहा वर्ष मु. जे. महाविद्यालयाच्या जर्नालिझम डिपार्टमेंटमध्ये गेस्ट लेक्चर घेतले आहेत. मला सामाजिक कार्यात भाग घेण्याची आवड आहे. तसेच तरुण मुलांशी संवाद साधुन त्यांना चांगल्या गोेष्टी सांगण्याचा प्रयत्न करणे आवडते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..