भाई – व्यक्ति की वल्ली

बर्‍याच प्रमोशनमुळे व नंतरच्या त्यावरील निरनिराळ्या टीकेमुळे चर्चा झालेला भाई—व्यक्ति की वल्ली हा सिनेमा पहाण्यात आला. अनेक नामवंत व्यक्तिंनी या सिनेमातील अनेक प्रसंगांवरून दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर यांच्यावर यथेच्छ तोंडसूख घेत टीका केली.सिनेमा पाहिल्यावर व या सगळ्या लेखाचं वाचन केल्यावर माझ्या मनात काही मूलभूत प्रश्न उभे राहिले व त्यादृष्टीने काहि लिहिण्याचा प्रयत्न करतोय.

लेख सुरू करण्यापूर्वी दोन गोष्टी अत्यंत विनम्रपणे सांगू इच्छितो :

१) महेश वामन मांजरेकर म्हणजे माझा कुणीही मित्र वा नातेवाईक नव्हे.त्यामुळे मी लेखामधे कुठल्याही biased opinion नी त्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला नाहि!
२) याआधी लेख लिहिणार्या व्यक्तींएवढं माझं संगीत , सिनेमा या क्षेत्रातील ज्ञान जास्त आहे असा कुठलाही मूर्खपणाचा माझा कांगावा नाहि ! मी लिहिलंय ते निव्वळ एक मराठी माणूस व त्याहीपेक्षा जास्त एक रसिक प्रेक्षक म्हणून !

सिनेमाच्या सुरुवातीलाच दाखवलं गेलंय की काही प्रसंग काल्पनीक घेतले आहेत.

आता हे धडधडीतपणे लिहून प्रक्षेपित केल्यानंतरहि वसंतराव देशपांडे भाईंच्या लग्नाला उपस्थित होते की नाहि यावर वितंडवाद का ? यातून भाई व वसंतराव यांचे घनिष्ठ संबंध अधोरेखित करण्याच्या महेशच्या प्रयत्नांना दाद द्यायची की टीका करायची ?

पं.भीमसेन जोशी , वसंतराव , भाई , कुमार गंधर्व , ग.दि.मा. अशी नामवंत व्यक्तिमत्व ही पात्ररचना व निवड इतकी अफलातून आहे त्याविषयी कुणालाच कौतुक नसावं ? एक ओळ नाही त्याबद्धल ? सागर तळाशीकरने उभारलेले गदिमा , अजय पूरकरने साकारलेले अण्णा — ते गाताना केलेली तोंडाची हालचाल , लकबी , स्वानंद किरकिरेंनी साकारलेले कुमार गंधर्व , सागर देशमुखांनी साकारलेले भाई सगळंच दाद देण्याजोगं ! पण याविषयी एक अवाक्षर नाहि ? तो काळ , सचिन खेडेकरनी साकारलेले भाईंचे तीर्थरूप , इरावतीने साकारलेल्या सुनीताबाई ….. निव्वळ अप्रतिम !

भाईंची पहिली पत्नी : सुंदर दिवाडकर.मृण्मयी देशपांडेचं थोड्याच वेळापुरतं सिनेमात डोकावणं व मग फोटोफ्रेममधे जाऊन बसणं! यानंतरचा भाईंचा संवाद निव्वळ तीर्थरूपांनी वचन दिले म्हणून मी सुंदरशी लग्न केलं असंच तिला वाटलं असणार! मी तिला समजावून सांगणार होतो पण एवढा वेळंच नाही हो मिळाला! अशा आशयाचा….. रत्नाकर मतकरींसारख्या सक्षम लेखकाची लेखणी ! मूळ सिनेमातील विनोदी बाजाला धक्का न लावता भाईंचा हळवा कोपरा दिसलाच की ! पण त्याचं कौतुक ? अं हं !

आता राहता राहिला प्रश्न भाईंच्या सिगारेट ओढण्याचा व भाईंसकट सगळ्यांनी दारू पिण्याबद्धलच्या सीन्सचा : तर मंडळी , या संदर्भात हिंदी सिने अभिनेत्री मुमताझचं वाक्य आठवलं फिल्म इंडस्ट्री ही सती सावित्रींसाठी नाहिये! आता याचा अर्थ यच्चयावत् सिने—नाट्यकलावंत हे व्यसनी असतातंच असं नाहि ! पण जी हकीगत आहे त्याबद्धल दाखवलं तर काय जगावेगळं व आक्षेपार्ह केलं ? म्हणजे आपण एखाद्या कलाकारावर इतकं प्रेम करायचं की त्याला देवस्वरूपंच मानायचं ! मग त्याने एखादी जरी चूक केली तरी ती अक्षम्य अथवा त्याच्याबाबत कुणीही काहीही बोलले—लिहिले तरी ते आक्षेपार्ह व लगेच आमच्या भावना दुखावणार ! म्हणजे महाराष्ट्राची ही लाडकी व्यक्तिमत्व — यांच्याबद्धल आम्हाला वाटतं ते प्रेम व आदर ! आणि महेश वामन मांजरेकरला वाटतं ते फक्त पैसे कमावण्याचं साधन म्हणून व्यवहार ? मुळात त्यालाही हे प्रेम होतं म्हणूनंच ना सिनेमा काढला ? मग त्यात व्यवहार आपसूक आलाच की , त्यात तेवढंच बोलायचं ?

आणि ही सगळी महाराष्ट्राची लाडकी व्यक्तिमत्व इतक्या उच्च कर्तृत्वाची आहेत की अशा काही प्रसंगांमुळे त्यांची प्रतिमा कधीही रसिकराजाच्या मनातून उतरणार नाही !

सिने—नाट्यसृष्टीच का , आज अवतीभवती किती माणसं एकही व्यसन नसणारी असतात ? माझ्यासारखी मूठभर ? मग जी हकीगत आहे ती अधिकतम वा बहुजन समाजाच्या दृष्टीने अावडीच्या अंगाने दाखवली गेली ( अधिक चांगले प्रसंग दाखवता आले असते ही शक्यता न नाकारूनही ! ) तर त्याचा एवढा बाऊ का ? सिनेमा सुटताना सिनेमातील व्यसनं बरोबर न्यायची की भाईंची विनोदबुद्धि , बाकीच्या व्यक्तिमत्वांची कला न्यायची की त्यांची व्यसनाधीनता — हे ओळखण्याएवढा रसिक राजा प्रेक्षक आज नक्कीच सुजाण आहे ! मुळात अमूक एक व्यसन अमक्यामुळे मला लागलं! यासारखं अर्थहीन विधान जगात दुसरं कुठलं असेल ? व्यसनं आपल्याला लागत नाहीत तर आपणहून जाऊन व्यसनांना चिकटतो ! गंमत , कुतुहल व गरज यातलं अंतर कमी कमी होत जातं व आपण व्यसनी बनतो!

नवीन पिढीला भाई समजून घ्यायचे असतील तर ते कुतुहल चाळवणारी भाई—व्यक्ति की वल्ली हा सिनेमा ही निव्वळ एक शिडी आहे ! प्रेक्षक सुजाण आहेत — भीमसेन जोशी , वसंतराव , कुमार , गदिमा , भाई ….. यांचं कर्तृत्वच इतकं पराकोटीचं उच्च आहे की त्यांच्या या व्यक्तिगत सवईंपलिकडे जाऊन त्यांना माणूस म्हणून व एक उत्कृष्ट कलाकार म्हणून बघण्याची प्रगल्भ नजर रसिकराजा प्रेक्षकाकडे असायलाच हवी आणि माझी खात्री आहे की आजकालच्या पिढीकडे अशी रत्नपारखी नजर नक्कीच आहे ! आजच्या पिढीचं सगळंच मला पटतं असं नाहिये पण त्यांच्या बर्याचशा बाबतीतील प्रायोगीक दृष्टिकोन हा खरोखरंच वाखाणण्यासारखा आहे !

लेख संपवताना पुन्हा एकदा हे अधोरेखित करतो की याआधी लेख लिहिणार्‍या कुणाही व्यक्तिच्या लेखनशैलीबद्धल व त्याविरुद्ध मत मांडण्यासाठी हा लेख लिहिलेला नसून एक वेगळा दृष्टिकोन मांडलाय इतकंच! यामागे सिनेमात दाखवलेल्या दृष्यांचं वा वृत्तीचं उदात्तीकरण करणं असा हेतू अजिबातंच नसून इतक्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला जनमानसामधे अधिकाधिक पोचवणार्‍या सिनेमाध्यमाचा वापर करणार्या महेश वामन मांजरेकर या बुद्धिमान व मराठीप्रेमी कलाकाराचं कौतुक करणं हाच उद्देश आहे !
महेश दुसर्‍या भागाची वाट बघतोय !

तुझाच चाहता ,

सप्रे म उदय गंगाधर — ठाणे
E-mail : sudayan2003@yahoo.com
सेल फोन : +९१९००४४१७२०५ (संध्या. ५.३० ते ६.३० या वेळेतच कृपया संपर्क करावा ही विनंती ! )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…