नवीन लेखन...

भगवद्गीतेला अभिप्रेत चार जीवनकलह !

या जगतात चार प्रकारचे कलह संभवतात. प्रथम कलह आपण आणि इतरेजन यांच्यात असू शकतो. दुसरा स्वतःशीच (आपुलाची वाद आपणाशी !) तिसरा आपण आणि बाह्य विश्व तर चौथा असू शकतो- आपण आणि ईश्वरात ! पहिले दोन प्रकार आपल्या दैनंदिन जीवनात दिसतात. मात्र उरलेले दोन्ही सहजासहजी दृश्य नसतात. त्यांना आपण सामाजिक कलह / व्यक्तिगत कलह /नैसर्गिक कलह अथवा आध्यत्मिक कलह असेही म्हणू शकतो. त्यातही सामाजिक आणि व्यक्तिगत कलह सामान्यतः नैसर्गिक आणि आध्यत्मिक कलहांचे परिणाम असतात. एक नक्की की या कलहांचे अस्तित्व असेपर्यंत कोणीही एकमेकांवर प्रेम करू शकणार नाही.

मूळ कलह आहे आपण आणि अमूर्त पूर्णब्रह्म यांच्यात ! पण त्यातून सामाजिक कलह जास्त उद्भवतो. आणि आपण त्यांची उत्तरे शोधण्यात वेळ घालवतो आणि त्याची कारणेही आपणांस माहित नसतात. सामाजिक सेवा आणि कार्य ज्यांना आपण उत्तर मानतो , प्रत्यक्षात ते उत्तर नाहीच. त्यातून आपण परस्पर प्रेमाचा देखावा जरूर करू शकतो पण ते तात्कालिक असते. आपण आतून एकमेकांवर प्रेम करीत नसतो त्यामुळेच हे उत्तर चिरकालीन मानता येत नाही. अंतर्प्रेम नसल्याने हा बाह्य देखावा फोल ठरतो. अगदी जिवलग मित्रांनाही अंतराय अनुभवायला येऊ शकतो. मानवाला हे गुह्य माहित नसते. कितीही ज्ञान असले तरीही हे गुह्य उलगडत नाही. जोपर्यंत अंतर्द्वंद्व अस्तित्वात आहे तोपर्यंत हे सामाजिक सौहार्द अशक्य आहे. शेवटी समाज म्हणजे तरी काय ? तो मानवांचा समूह असतो. व्यक्तिगत शांतता नसेल तर सामाजिक सौहार्द कसे असेल ? एक घटक अस्वस्थ असताना अखिल विश्व संतुष्ट कसे होऊ शकेल? समाजवाद आणि साम्यवाद यांच्या तत्वज्ञानात ही खोट आहे. आणि जोपर्यंत ह्या विचारसरणी समस्येच्या मुळाकडे लक्ष देत नाही ,तोपर्यंत त्या यशस्वी होणार नाही. तेव्हा एकच निष्कर्ष निघतो की व्यक्तिगत सुखस्वास्थ्य असेल तरच समाज स्वस्थ असेल मात्र अंतर्द्वंद्व जोपर्यंत आहे तोवर व्यक्तिगत सुखस्वास्थ्य संभवत नाही.

अंतर्द्वंदाची प्रमुख कारणे म्हणजे व्यक्तिमत्वाच्या अंतर्गत थरांमधील असमतोल ! आपल्या व्यक्तिमत्वाचे तीन थर आहेत- जागृतावस्था , सुप्तावस्था , आणि अबोधावस्था ! जागृतावस्थेत आपण आनंदी असू शकतो पण व्यक्तिमत्वाचा अभ्यास तिथेच थांबत नाही. पाश्चात्य विचारशैलीत फक्त जागृतावस्थेचा विचार प्रामुख्याने असतो आणि त्यामुळेच कदाचित त्यांना आयुष्याच्या  समस्या सोडविता येत नाही. मानवी मन त्या जागरुकवस्थेच्या पलीकडे असते. नवीन संशोधनात काही मर्यादेपर्यंत काही कोडी उलगडली आहेत. परकी व्यक्ती सोडा, आपण स्वतःलाही फारसं ओळखत नाही कारण वरील तिन्ही थर बरेचदा अपरिचित असतात.

सुप्तावस्थेत आणि जागृतावस्थेत कलह का दिसून येतो? त्यासाठी सुप्तावस्था प्रथम समजून घ्यायला हवी. सुप्तावस्था म्हणजे वर्षानुवर्षे जुन्या अनुभवांचे थरावर थर साचत जाणे ! आपल्या पंचेंद्रियांनी बाह्य परिस्थितीच्या  केलेल्या आकलनानंतर ही अनुभूती असते. त्यामुळे जागृत मन जो फक्त एक छोटा हिस्सा असतो आपल्या सुप्त मनाचा, अशा अनुभवांपासून तयार झालेला असतो. थोडक्यात आपले बाह्य व्यक्तिमत्व आपल्या पंचेंद्रियांच्या आकलनापासून तयार होते. आता काळजीपूर्वक पृथक्करण करायला हवे.

लक्षात आलं का ,मी तुम्हाला समाजाकडून व्यक्तीकडे घेऊन गेलो, आणि तेथून आता आपण विश्वातील कर्मांकडे वळणार आहोत. यालाच निसर्ग म्हणतात. या कर्मांकडे पाहण्याची आपली नजर काय आहे यावरून आपल्या पंचेंद्रियांची तपासणी होत असते. आपण निष्कर्ष काढलाय -समाज व्यक्तीवर अवलंबून असतो आणि व्यक्ती कर्मांवर ! यामधील नातं आपलं व्यक्तिमत्व ठरवीत असतं. आपण आता परिणामाकडून कारणांकडे निघालो आहोत. आसपास खूप घटना घडत असतात आणि त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी पंचेंद्रिये आसुसलेली असतात. या प्रक्रियेत पंचेंद्रिये कळत -नकळत इष्ट घटनांकडे आकृष्ट होतात आणि अनिष्ट घटनांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. हे अव्याहत सुरु असते. मग प्रश्न पडतो – पंचेंद्रिये अशी निवडक का असतात?

त्यांना काही गोष्टी कां प्रिय असतात आणि काही अप्रिय?

पंचेंद्रिये दोन प्रकारे विचार करतात- एकतर जग/वस्तू बाहेर असतात. दुसरा दृष्टिकोन असतो- जग/वस्तू  ( दोन परिमाणात ) वेळ आणि अंतराळ यात असतात. सगळं जग/वस्तू एकमेकांशी आतून जोडलेल्या असतात हे पंचेंद्रियांना लक्षात येत नाही. वस्तू शारीर (घनावस्थेत) असतात,बाह्य असतात आणि एका जागी स्थिर असतात हे पंचेंद्रियांचे आकलनच मुळी चुकीचे असते.

वस्तूंचं सत्य रूप कधीच विविध /भिन्न असत नाही तर समन्वय आणि एकत्व हेच वस्तूंचं वास्तव असतं. सुरुवातीला वस्तू आपापसात विभागल्या आहेत असा भास होतो, मग हळूहळू त्यांच्यातील जोडणी कळते आणि शेवटी सर्वांच्या ठायी अभिन्नत्व असल्याचा साक्षात्कार होतो.

गीतेत अठरा अध्याय आहेत आणि ते प्रत्येकी सहा अशा तीन गटात विभागलेले आहेत. पहिले सहा अध्याय विभागणी (व्यक्ती), नंतरचे सहा सुसूत्रीकरण ( वैश्विक ) आणि शेवटचे सहा एकत्व ( पूर्णत्व ) अधोरेखित करतात आणि जीवनकलह सोडविण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करतात. हा विषय अतिशय गहन आहे आणि आता सांगितली ती फक्त गीतेत अंगुलीनिर्देश केलेली बाह्यरेखा आहे. गीता समजून घेणे खूप वेळखाऊ काम आहे. तरीही मी थोडसं सोप्पं करायचा प्रयत्न करतो. जोपर्यंत मानव आणि ईश्वरातील कलह संपत नाही तोपर्यंत इतर कोठलाही कलह संपणार नाही. आपलं परमात्म्यापासून अलग होणं हेच सर्व कलहांच्या मुळाशी आहे. व्यक्ती जेव्हा एकत्व ,सुसूत्रीकरण आणि समाजोत्थानासाठी प्रयत्न करीत असते तेव्हा प्रत्यक्षात हा प्रवास त्या परमात्म्याशी जोडून घेण्याच्या दिशेने सुरु असतो.

आणि जोपर्यंत आध्यात्मिक एकत्व प्राप्त करून घेत नाही तोपर्यंत आपण अयशस्वी होत राहणार. फुटक्या काचेचे तुकडे कितीही प्रयत्न केले तरी जोडले जात नाहीत. त्यासाठी ते तुकडे वितळले पाहिजेत म्हणजे एकसंध जोडता येतात. हे गुपित लक्षात येत नाही तोपर्यन्त आपण राष्ट्रसंघासारख्या बाह्य यंत्रणांकडे नजर लावून बसू. एकत्व संमेलने आणि परिषदांनी साध्य होत नसते. आपलं व्यक्तिमत्व विरघळवून त्या परमात्म्यात मिसळलं की एकत्व सिद्ध होतं.

हे कसं करायचं त्याबाबत गीता मार्गदर्शन करते. सुरुवातीपासून आपण सगळे सर्वश्रेष्ठ बनण्याच्या धडपडीत असतो. हे सहजासहजी जमत नाही कारण त्यासाठी शिस्त आणि आध्यत्मिक प्रशिक्षणाची गरज असते. मात्र या प्रवासात घाबरून एखाद्या क्षणी तुम्हाला वाटेल की हे अशक्य आहे. ही अवस्था गीतेच्या प्रथम अध्यायात सांगितली आहे (काहीतरी करायची इच्छा तर आहे पण हातून काही होत नाही ). विश्वातील माणसे बहुसंख्येने या गटात मोडतात. त्यांना सत्याचा शोध तर घ्यायचा असतो पण सुप्त मन त्याविरुद्ध बंड पुकारून उठते.

दुसरा अध्याय म्हणतो यावर उपाय एकच – गुरु किंवा मार्गदर्शक ! त्याविना हा आध्यात्मिक मार्ग आक्रमण करणे अवघड जाते. फक्त पुस्तके वाचून हे साध्य होत नाही. ज्याने पूर्वी हा मार्ग चोखाळला आहे अशालाच वाटाड्या म्हणून निवडावे लागते. याच अध्यायात योगाचार्य भगवान श्रीकृष्ण सांगतो- ज्ञानाधिष्ठित प्रयत्न यशाकडे नेतात , ज्ञानाधीष्ठित कृती नव्हेत ! कृती जिंकत नाही ,कृतीचे ज्ञान जिंकते. ज्ञान आणि कर्म यांचा सुंदर मिलाफ हेच भगवदगीतेचे सार आहे. ह्या दोन्ही संकल्पना समजून घेण्यात आपण मुळातूनच कमी पडतो. आपला (गैर)समज असा आहे की ज्ञान म्हणजे काही न करणे (निष्क्रिय राहणे ) आणि कर्म म्हणजे ज्ञानाविना काम करणे ! श्रीकृष्ण म्हणतात- कर्माविना काहीही करणे म्हणजे ज्ञान नाही, आणि ज्ञानाविना काहीही करणे म्हणजे कर्म नाही. ज्ञान आणि कर्म या संकल्पना समजायला अवघड आहेत. कर्म हे ज्ञानाचे बाह्य /दृश्य स्वरूप असते तर ज्ञान हे कर्माचे अंतरस्वरूप /अंतर सत्य असते. ही गीतेची मध्यवर्ती कल्पना आहे.

जेव्हा ज्ञानाधिष्ठित कर्म केले जाते तेव्हा आपल्याला बाह्यजगात वावरण्यासाठी अंतःशक्ती मिळते. दुसऱ्या ते सहाव्या अध्यायात ज्ञान आणि कर्म यांच्या संयोगासाठी व्यक्तिमत्व कसे शिस्तीच्या साच्यात बसवावे याचे मार्गदर्शन आहे. या प्रक्रियेत आपण ध्यानावस्थेत  प्रवेश  करतो. ध्यान म्हणजे काय याचा खुलासा सहाव्या अध्यायात होतो. या अवस्थेत आपण बाह्य विश्वाला नाकारू शकत नाही. खूप लोकांची अशी समजूत असते -ध्यान धारण ही एखाद्याची व्यक्तिगत साधना असते. सातव्या अध्यायापासून गीता आपल्याला जाणवून देते की ध्यानधारणा म्हणजे व्यक्तीची विश्वाशी जोडणी ! थोडक्यात आपल्या खोलीत बसून एकांतात ध्यानधारणा करणे ही संकल्पना आता ध्यानधारणा ही मनाची वैश्विक कृती असते या संकल्पनेमध्ये परावर्तित करण्याची गरज आहे. सातव्या ते अकराव्या अध्यायात व्यक्ती आणि विश्वाचं हळूहळू एकीकरण कसं होतं याचं स्पष्टीकरण आहे. खरंतर ही प्रक्रिया जशीजशी घडत असते तसतसे अध्यात्म हळूहळू प्रकट व्हायला लागतं. मग तेथे व्यक्ती ,विश्व ,अध्यात्म या संकल्पना एकात्म होतात.

गीतेच्या बाराव्या अध्यायात आध्यात्मिक प्रगतीतून हे एकत्व कसे साधता येईल याचे तंत्र सांगितलेले आहे. तेराव्या अध्यायापासून शेवटपर्यंत, या वैश्विक ज्ञानाचा वापर करून आपण या जगात आनंदीपणे कसे जगू शकतो याचे सुंदर वर्णन आहे. त्यानंतरच समाजकार्य करू शकतो. याचा अर्थ असा नाही की आपण सुपरमॅन असल्याशिवाय हे होऊ शकणार नाही. गीता आपल्याला या जगात वैश्विक जीवन कसं जगायचं यासाठी तयार करते. थोडक्यात गीतेमध्ये समाजकार्य , समाजसेवा, व्यक्तिगत शांतता आणि भगवद प्रचिती हे सारं सांगितलं आहे. जगातील योग क्षेत्राचं हे व्यापक आणि सर्वसमावेशक चित्र आहे.

हे समजलं तरी अंमलात आणण्यासाठी आपल्या जुन्या सवयी सोडायला हव्यात. त्यासाठी योगाची सवय लावली पाहिजे. मग आवश्यक असलेल्या वेळेची निवड करा -सकाळ, दुपार,किंवा संध्याकाळ ! मात्र रोज एक तास ध्यान करा. तीन गोष्टी सोडा- धूम्रपान, दारू पिणे , आणि मांसाहार ! एवढे केले तरी तुम्हाला २५ टक्के यश येईल. मनही आपोआप शांत होईल आणि ध्यानात अडथळे येणार नाहीत. विचारांनी किंवा कृतीतूनही कोणाला दुखावू नका. तसेच इंद्रिय नियमन करायला लागा.

संस्कृत मध्ये एक शब्द आहे – ब्रह्मचर्य ! म्हणजे इंद्रिय नियमन आणि शरीरातील ऊर्जेचे जतन !! यांची अंमलबजावणी केल्याशिवाय ध्यानधारणा यशस्वी होऊ शकत नाही. अन्यथा ते समुद्राच्या पृष्ठभागावर घर बांधण्यासारखे होईल. (असं घर पाण्यात बुडेल.) किंवा दुसरी उपमा म्हणजे असं करणं याचा अर्थ अंगावर नवा शर्ट घालणे पण शरीरात टॉयफॉईड चा ताप असणे.

स्वतःबद्दल जो विचार आपण करतो तसाच विचार आपण जगाबद्दल करायला हवा असं गीतेत सूचित करण्यात आलंय. संपूर्ण भारतीय संस्कृती आणि तत्वज्ञान “स्वतः” (आत्मन) भोवती फिरते. आत्मन या शब्दात मनाला जे जे अभिप्रेत असतं  (आर्थिक प्रगती,सामाजिक प्रगती , राजकीय प्रगती,व्यक्तिगत ,मानसिक,नैतिक ,बौद्धिक आणि आध्यात्मिक) ते सगळं सामावलेलं आहे. मात्र याबाबत कोणालाही आश्चर्य वाटल्या वाचून राहणार नाही. कारण आत्मन या शब्दाबद्दल आपल्या मनात वेगळीच धारणा असते. व्याकरणात स्वतः हा शब्द वेगळ्या संदर्भात येतो आणि आध्यात्मिक क्षेत्रात स्वतः या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. जेव्हा स्वतः हा शब्द आपण उच्चारतो त्यावेळी मी,ती,तो,असे स्वाभाविकपणे मनात येते कारण स्वतः हा शब्द कायम शरीराच्या संदर्भात वापरला जातो. म्हणजे स्वतः खूप असतात असा त्याचा अर्थ होतो .

स्वतः अथवा आत्मन याचा अतीन्द्रिय असा अर्थ येथे अभिप्रेत आहे. त्यामुळे व्यक्तिगतता किंवा शारीर अर्थ इथे घेऊ नये, तर ती एक वैशिष्ट्यपूर्ण देहभानाची अवस्था असते. थोडक्यात येथे बाह्यवस्था आणि वस्तुनिष्ठता नसते. त्यामुळे जेव्हा तुम्ही स्वतः असा उल्लेख करता तेव्हा तुम्ही बाह्यरूप नाकारता. जागृतावस्था बाह्य असू शकत नाही, ती आतमध्ये वास्तव्याला असते. जर जागृतावस्थेत विभागणी करता येते अशी तुमची कल्पना असेल तर त्याचा अर्थ असा की जागृतावस्थेच्या दोन घटकांमध्ये अंतर आहे. पण याची जाण कोणाला असते? तर ती फक्त जागृतावस्थेला ! आणि असे अंतर नसेल तर जागरूकता म्हणजेच अद्वैत !

प्रत्येकजण स्वतःला “स्वतः ” असे संबोधू लागला तर पूर्ण जग अशा स्वतःनी भरून जाईल. स्वतः जर जागृतावस्थेपासून अविभाज्य असेल तर मग जगही आपोआप जागरुकावस्था अनुभवेल. मात्र अज्ञान आणि गैरसमजांमुळे आपण अद्वैतला आपणापासून भिन्न मानत असतो.

— डॉ. नितीन देशपांडे 

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..