नवीन लेखन...

बीज अंकुरे अंकुरे

 
सकाळी सव्वा सातच्या सुमारास फलटणच्या दिशेने जाताना कात्रज गेल्यावर बोपदेव घाटातील नागमोडी वळणे घेत पुणे शहरातील काँक्रीटचे जंगल बघायला मिळाले. पश्चिमेकडील सहयाद्रीच्या पर्वतरांगा काहीशा पोपटी आणि काहीशा हिरव्या रंगाचा शालू नेसून नटल्या सारख्या दिसू लागल्या होत्या. वातावरण काहीसं ढगाळ असले तरी काही कोवळी सूर्यकिरणे ढगांची चादर पार करुन, रस्त्याच्या कडेला, खडकाळ पठारावर नुकत्याच उगवलेल्या कोवळ्या लुसलुशीत गवताला सोनेरी मिठीत घेत होती.
सृष्टीचे हे निर्मळ आणि निखळ सौंदर्य बघून,
बीज अंकुरे अंकुरे, ओल्या मातीच्या कुशीत
कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात?
बीजा हवी निगराणी, हवी मायेची पाखर
लख्ख प्रकाश निर्मळ, त्यात कष्टाचा पाझर
हवी अंधारल्या रात्री, चंद्रकिरणांची साथ
कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात?
अंकुराचे होता रोप, होई रोपट्याचे झाड
मुळ्या रोवुन रानात, उभे राहील हे खोड
निळ्या आभाळाच्या खाली, प्रकाशाचे गीत गात
कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात?
नाही झाला महावृक्ष, जरी नसे कल्पतरु
फुलाफळांचा त्यावरी, नाही आला रे बहरु
क्षणभरी विसावेल वाटसरु सावलीत
कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात?
या गीतकार मधुकर अरकाडे आणि संगीतकार अशोक पत्की यांच्या अजरामर गीताचे बोल कानात घुमू लागले.
रस्त्याने जाताना सासवड गेल्यावर पुरंदर तालुक्यातील चिकू, अंजीर, सीताफळ, जांभूळ आणि पेरू यांच्या हिरव्या गर्द आणि सुटसुटीत फळबागा नजरेस पडत होत्या. कुठे काळी तर कुठे तांबड्या मातीची नांगरणी केलेली शेतं दिसत होती. रस्त्याच्या आजूबाजूला दिसणारी प्रत्येक घरं, दारं, झाडे, पानं, वेली आणि झुडपं धुवून स्वच्छ आणि सुंदर दिसत होती.
निरा गांव गेल्यावर निरा नदीवरील पूल आणि त्या पुलाखाली नदीवरला घाट दिसत होता. साडे आठ वाजायला आले होते तरी घाटाच्या पायऱ्यांवर काही वारकरी आंघोळ करत होते, कोणी कपडे धुवत होते तर कोणी रस्त्याच्या कडेला पांढऱ्या धोतराची एक बाजू झाडाला बांधून तर दुसरी बाजू स्वतःच्या हाताने पकडून वाऱ्यावर सुकवत होते. पायी चालणाऱ्या वारकऱ्यांचे जथ्थे नजरेस पडू लागले होते. रस्त्याच्या कडेला कोळशावरची इस्त्रीने पांढऱ्या कुर्त्याना आणि लेंग्याना इस्त्री करुन घेण्यासाठी वारकरी घोळका करुन उभे होते.
कोणी रस्त्याच्या कडेला पाटावर बसून स्वतःच हात आरसा धरून दाढी करुन घेत होते. पाण्याचे टँकर आणि ट्रॅक्टर इकडून तिकडे धावत होते.
कपडे लत्ते, कांदा भजी, वडापाव, खाऊ मिठाई यांचे तात्पुरते स्टॉल जागो जागी लागलेले. लोणंद शहरात ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचा दोन दिवस मुक्काम असल्याने यावर्षी माझ्या लोणावळ्याच्या मामाने पालखीचे दर्शन लोणंद शहरांत घ्यायला जाऊ असा परवा सकाळी फोन केला. पाच वर्षांपूर्वी माझे बाबा, मावशीचे मिस्टर आणि मामा यांच्यासोबत मी वाखरी जवळील बंडी शेगाव इथे पहिल्यांदा वारी सोहळा आणि पालखीचे दर्शन घ्यायला गेलो होतो. त्यानंतर दोन वर्ष वारी सुरु असताना मी जहाजावर होतो, त्यापुढील दोन वर्ष कोरोनामुळे वारीच झाली नव्हती.
यावर्षी मामाने बाबांना येण्यासाठी आग्रह केला. फोन स्पीकर वर असल्याने मामाने माऊली उद्या या नक्की आणि माऊली बोला येतो असे म्हणा बाबांनी पण हो माऊली बोलून फोन ठेवला. पण काल बाबा काही निघाले नाहीत. वर्षभरापूर्वी माझ्या मावशीचे मिस्टर ज्यांना माझी मावस भावंडंच नाही तर माझ्या नात्यातील प्रत्येक व्यक्ती पपा म्हणूनच हाक मारायचे ते हार्ट अटॅक ने आम्हाला सोडून गेले. माझ्या बाबांना मोठे साडू म्हणून त्यांच्याप्रती खुप आदर आणि जिव्हाळा होता. यावर्षी पपांच्या शिवाय वारीला जाणे कदाचित माझ्या बाबांना अस्वस्थ करत होते म्हणून ते निघाले नाहीत. पण मी काल संध्याकाळी सिंहगड एक्सप्रेसने लोणावळ्याला पोहोचलो.
सकाळी साडे पाच वाजता मामाचा ड्रायव्हर भगवान काका, माझा चुलत मामा दिना मामा आणि बाबा न आल्याने मामाचे लोणावळ्यातील एक मित्र असे पाच जण आम्ही मामाच्या मर्सिडीझने निघालो होतो. साडे आठच्या सुमारास आम्ही लोणंदला पोचलो एका बंद असलेल्या दुकानासमोर गाडी पार्क केली.
माझा मामा डॉ. दीनमित्र माने हा लोणावळा परिसरातील एक प्रथितयश भूलतज्ञ आहे. त्याचे वय बाहत्तर असले तरीही मागील तेरा चौदा वर्षांपासून तो, माझे बाबा, मावशीचे मिस्टर पपा आणि दिना मामा हे नियमित पालखीच्या दर्शनाला लोणावळ्याला एकत्र जमून निघत असत. यावर्षी बाबा आणि पपा नसल्याने तो थोडा नाराजच होता.
गाडीतून येताना आम्हाला रस्त्यावर भली मोठी रांग दिसली होती, आम्ही बाहेरून दर्शन घेण्याच्या विचाराने पालखी ठेवलेल्या तंबुला शोधत निघालो. चंदनाचा गंध आणि कुंकू व बुक्क्याचा टिळा लावणारे हातात ताट घेऊन रिकामे कपाळ असणाऱ्यांना थांबवून गंध आणि टिळा लावत होते. माऊली टिळा लावून घ्या, मग आम्ही पण माऊली टिळा लावून द्या बोलून त्यांच्या ताटात पाचचे कॉइन टाकले.
कपाळावर गुगल मॅप च्या लोगोच्या आकाराचे गंध आणि टिळा का लावला जातो त्याचे एवढं महत्व का आहे याचं गुगल वरच सर्च केलं. अष्टगंध हे थंड असते, दोन्ही भुवयांच्या मध्ये नाका पर्यंत खाली आलेला टिळा हा आज्ञा चक्राच्या स्थानावर येऊन त्यामुळे चेहरा सूर्या प्रमाणे तेजस्वी दिसू लागतो. चंदनाच्या शितलतेमुळे मन प्रसन्न व एकाग्र होते. हे झाले शास्त्रीय कारण आता अध्यात्मिकतेने पाहिले तर कपाळी गंध व टिळा लावणारे लोकं देवाला मानणारे असतात. शुभकार्य हे गंध आणि टिळा लावल्याशिवाय शुभ वाटतच नाही. विष्णूने पांडुरंग अवतारात हातात कमळ आणि शंख असे निःशस्त्रधारी रूप घेतले होते. त्यावेळी शेष नागाने विष्णूला विचारले देवा शिरसागर मध्ये तुम्ही माझ्या शय्येवर पहुडता पण पांडूरंग अवतारात माझे स्थान कुठे. त्यावर पांडुरंगाने शेष नागाला त्यांच्या कपाळावर जागा दिली, अशा प्रकारच्या कथा आहेत.
लाईन चा मागोवा घेत घेत आम्ही पुढे गेलो तर समोरच्या विरुद्ध दिशेने आणखीन एक लाईन पालखी ठेवलेल्या तंबूच्या दिशेनं आलेली दिसली. ती लाईन तुलनेने खूपच लहान होती, मग आम्ही त्या लाईन मध्ये उभे राहिलो. पालखीतील पादुकांवर वाहण्यासाठी पान फुल आणि बुक्क्याची पुडी विकणाऱ्या अनेक महिला लाईन जवळ बसल्या होत्या. पाच पाच रुपयात त्या पान फुलं देत होत्या. लाईन ला उभे राहिल्यावर वीस मिनिटात आम्हाला पादुकांचे दर्शन झाले.
दर्शनासाठी गर्दी वाढत होती, तंबूच्या समोरील एका मोठया मैदानात हजारो वारकरी बसले होते. कोणीतरी महाराज किर्तन करत होते. समोर बसलेले वारकरी तल्लीन होऊन त्यांचे किर्तन ऐकत होते.
कुठेही घाई गडबड नव्हती की रेटारेटी नव्हती. माऊली पुढे चला, माऊली इकडून चला, माऊली बाजूला व्हा. स्त्री, पुरुष , पोलिस , कार्यकर्ते आणि सेवेकरी सगळ्यांच्या तोंडी फक्त माऊली आणि माऊली.
जिकडे तिकडे जय जय राम कृष्ण हरी, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम असा जयघोष सुरू होता.
गरीब श्रीमंत , उच नीच सगळे एका लाईनीत दर्शनाला उभे होते आणि एका भक्तिभावाने आणि भक्तीरुपी शक्तीने वारीला आले होते.
डोक्यावर पांढरी टोपी, पांढरे कपडे , कोणाचे मळलेले तर कोणाचे स्वच्छ कोणाचे नवीन तर कोणाचे फाटलेले. परंतु सगळ्यांचे चेहरे मात्र उत्साहाने आणि समाधानाने आणि विठ्ठल भक्तीने भरलेले.
शेतकरी, कष्टकरी, कुठल्या जातीतला आणि कुठल्या मातीतला एकमेकांना माऊली माऊली म्हणून आनंदाने संबोधत होता.
दुःख वाटल्याने कमी होते आणि सुख वाटल्याने वाढतं.
वारीच्या निमित्ताने सगळे वारकरी सुख वाटायला आणि वाटता वाटता वाढवायला येतात आणि समाधानाने विठ्ठल चरणी नतमस्तक होतात. तेवढ्या गर्दीत एकही चेहरा त्रासलेला, चिडलेला किंवा दुःखी कष्टी दिसत नव्हता, नाचू कीर्तनाचे रंगी| ज्ञानदीप लावू जगी| अशी सगळ्यांची उत्साही व आनंदी अवस्था होती.
घरापासून आणि नातेवाईकांपासून लांब जहाजावर असताना कामाचा ताण तणाव वाढल्यावर पंडित भिमसेन जोशी यांचे भजन आणि प्रल्हाद शिंदे यांची विठ्ठल भक्ती गीते मी नेहमी ऐकायचो आणि रिलॅक्स व्हायचो.
नुसते नामस्मणाने ताण तणाव दूर होतात तर त्याच विठ्ठलाच्या दर्शनाने किती समाधान आणि आनंद मिळत असावा याची कल्पना या वारकऱ्यांना बघितल्यावर येते.
पाऊस पडल्यावर पेरणी झाल्यावर ओल्या मातीच्या कुशीत बियाणे रुजावे आणि त्यातुन अंकुर बाहेर पडावे आणि ते अंकुर सूर्यप्रकाशा कडे जसे ओढले जातात तसेच हे शेतकरी, कष्टकरी, वारकरी विठू माऊली कडे नित्यनेमाने ओढले जातात.
मला पंढरपूरच्या विठु माऊली पेक्षा या जिवंत चालत्या बोलत्या प्रत्येक वारकरी माऊलींच्यातच मूर्ती दिसते विठ्ठलाची.
विठु माउली तू माउली जगाची
माउलीत मूर्ती विठ्ठलाची.
–प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनिअर
B.E.(mech ), DME,DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
कॅप्टन वैभव दळवी आणि कविवर्य अरुण म्हात्रे यांच्या प्रस्तावना लभेलेली , संपादक गीतेश शिंदे यांच्या सृजन संवाद प्रकाशन ठाणे , यांच्याकडून मार्च २०२२ मध्ये माझी प्रकाशित झालेली पुस्तकं,
१) द फ्लोटिंग लाईफ इन मर्चंट नेव्ही
(₹ ३०० /- संकीर्ण , मर्चंट नेव्ही करिअर मार्गदर्शन , जहाजावरील कामाचे स्वरूप , माहिती व प्रवास वर्णने, )
२) सातासमुद्रापार
( ₹ २५० /- लालितलेख संग्रह ज्यामध्ये जहाजावरील व कौटुंबिक जीवन आणि जहाजावरील अनुभव यांवरील लेख )
दोन्ही पुस्तकांचा संच ,
( पोस्टेज सह, ₹ ४००/-)
संपर्क – mob. 8928050265.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 174 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..