नवीन लेखन...

बॉलिवूडची ब्युटी क्वीन अभिनेत्री ऐश्वर्या राय

बॉलिवूडची ब्युटी क्वीन अभिनेत्री ऐश्वर्या रायचा जन्म १ नोव्हेबर १९७३ रोजी मंगळूर येथे झाला.

सौंदर्याचं दुसरं नाव ऐश्वर्या राय आहे. हे सौंदर्याचं ऐश्वर्य जन्माला आलं तेही एका दाक्षिणात्य कुटुंबातच. मूळची ती मल्याळम. पण तिचा जन्म कर्नाटकातील मंगळूरचा.

तिच्या जन्मानंतर राय कुटुंबीय मुंबईत आलं. तिचं बालपण मुंबईतंच गेलं. लहानपणापासून बहुभाषिक, बहुसांस्कृतिक वातावरणाचा संस्कार झालेल्या ऐश्वर्याचे व्यक्तिमत्वही म्हणूनच कॉस्मोपॉलिटिन वाटतं. दाक्षिणात्य ठसा तिच्यात नाही. त्याचप्रकारे ती कुठल्याही एका प्रांताची वाटत नाही. म्हणून जगातल्या दहा ऐश्वर्यवतींमध्ये ती शोभून दिसते. टाईमच्या मुखपृष्ठावरही झळकते. आणि कान्सच्या चित्रपट महोत्सवातही कॅमेऱ्याचे झोत आपल्यावर आकर्षून घेते.

ऐश्वर्याची आई वृंदा राय या लेखिका आहेत आणि वडील कृष्णराज चक्क समुद्र जीवशास्त्रज्ञ. तिचा धाकटा भाऊ मर्चंट नेव्हीत आहे. थोडक्यात तिची पार्श्वभूमी अगदी उच्चशिक्षित कुटुंबाची आहे.शिक्षण, संशोधन व साहित्य अशा संगतीत वाढलेल्या ऐश्वर्यावर हे संस्कार होणे अगदी सहाजिक होते. व्यक्तिमत्वातल्या सौंदर्याने ऐश्वर्याला जगाकडे बघण्याची सुंदर नजर दिली. म्हणूनच वास्तूत सौंदर्य कसे असावे हे सांगणाऱ्या आर्किटेक्चर अभ्यासक्रमाला तिने प्रवेश घेतला.

माटुंग्याच्या रूपारेल कॉलेजात शिक्षण घेणारी ऐश्वर्या पुढे आपसूकच मॉडेलिंगच्या क्षेत्रात कशी ओढली गेली ते तिला कळलेही नाही. मॉ़डेलिंगकडे वळविण्यासाठी तिला काही करण्याची गरजही कधी पडलीच नाही. कारण या मॉडेलिंग जगालाच या लोभस चेहऱ्याची गरज होती. मॉडेलिंगमध्ये आल्यानंतर पुढे सौंदर्यस्पर्धामध्ये भाग घेणंही आलंच. मिस इंडिया स्पर्धेत तिने भाग घेतला. पण सुश्मिता सेनच्या स्पर्धेत तिला दुसरा क्रमांक मिळाला. पुढे मिस वर्ल्ड स्पर्धेत भाग घेतल्यानंतर जगतसुंदरीचा मुकूटही तिच्या डोक्यावर चढला. या स्पर्धेत केवळ सौंदर्यच नव्हे तर तिची बुद्धिमत्ताही पणाला लागली होती. तिच्या चटपटीत, हजरजबाबी आणि बौद्धिक चातुर्याच्या उत्तरांनी परीक्षकांचंही मन जिंकलं. ऐश्वर्याने जगावर राज्य करायला सुरवात केली तो क्षण हाच. मिस इंडिया, मिस वर्ल्ड या स्पर्धांनंतर बॉलीवूडची वाट चालण्याची पूर्वापार प्रथा ऐश्वर्यानेही जपली. पण यापूर्वी आलेल्या ग्लॅमरस मॉडेल या चांगल्या अभिनेत्री कधी झाल्याच नाहीत. पण हे केवळं सौंदर्याचंच ऐश्वर्य नाही, अभिनयाचंही आहे, हे ऐश्वर्याने खर्या अर्थाने दाखवून दिलं.

ज्याच्या चित्रपटात काम मिळते याचा कलावंतांना अभिमान वाटतो, अशा मणिरत्नम यांच्या ‘इरूवर’ चित्रपटातून ऐश्वर्याच्या रूपेरी कारकीर्दीस सुरूवात झाली. बॉबी देवल सोबतचा ‘और प्यार हो गया’ हा तिचा पहिला हिंदी चित्रपट. ‍दक्षिणेतील दिग्दर्शक एस. शंकर यांचा ‘जीन्स’ या चित्रपटातून तिने बहुभाषक चित्रपटातून काम केले. तिला त्यासाठी अभिनयासाठी पुरस्कारही मिळाला.तिच्या सौंदर्यापेक्षाही अभिनयासाठी लक्षात राहिलेले चित्रपट आठवा. हम दिल दे चुके सनममध्ये ती अप्रतिम दिसली होतीच. पण अभिनयाच्या बाबतीतही कमालीची समज पहिल्यांदा दिसून आली. मग देवदास, ताल, चोखेर बाली, रेनकोट हे चित्रपट खास तिच्या अभिनयासाठी ओळखले जातात. याशिवाय अनेक टुकार चित्रपटही तिने केले. पण चांगले काय नि वाईट काय हे समजण्यासाठी अखेर काही चित्रपटांचे दान हे द्यावेच लागते. तिचा जोधा अकबर, सरकार राज हे महत्त्वाचे चित्रपट आहेत. मिसेस ऑफ स्पाईसेस, ब्राईड अँड प्रिजुडाईस, प्रोव्होक्ड, द लास्ट लिजन ह्या आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्येही तिने अभिनयगुणाची छाप सोडली. आर्थिक उदारीकरणाचा काळात भारत जागतिक पातळीवर जात असताना ऐश्वर्या हा भारताचा ब्रॅंड आहे हेही ठसायला सुरवात झाली आहे. म्हणूनच कान्सच्या चित्रपट महोत्सवात म्हणूनच ‘ज्युरी’ बनण्याचा मान मिळालेली ती एकमेव भारतीय अभिनेत्री आहे. ‘टाइम’ मॅगझिनने तिच्या कर्तृत्वाची दखल घेत आशिया खंडातील प्रभावशाली शंभर व्यक्तीमध्ये तिचा समावेश केला आहे. जगातील दहा सौंदर्यवतींमध्ये ती आहे. कॅमलिन पेन्सिलपासून सुरु झालेला मॉडेलिंगचा ऐश्वर्याचा प्रवास आजही यशस्वीपणे सुरु आहे. टाइटन वॉचेज, लॉन्जिस वॉचेज, लॉरियल, कोका-कोला, लॅक्मे कॉस्मेटिक्स, फिलिप्स, पामोलिव, लक्स, फूजी फिल्म्स, नक्षत्र डायमंड्स, कल्याण ज्वेलर्स, प्रेस्टीज यांसारख्या नावाजलेल्या ब्रॅण्ड्ससाठी ऐश्वर्याने काम केले आहे. लंडनमधील ‘वॅक्स म्युझियम’मध्ये तिचा मेणाचा पुतळा आहे. एकीकडे दिसामासी तिची कीर्ती वृद्धिंगत होत असताना दुसरीकडे बॉलीवूडमध्ये तिच्याविषयीची चर्चाही रंगात आली होती. गॉसिप तिला कधी चुकली नाहीत. सलमान खानबरोबर तिचे अफेअर हम दिल दे चुके सनमपासूनच जोडले गेले होते. पण दोघांमधील मतभेद व सलमानच्या विचित्र वागण्याच्या बातम्या एकामागोमाग आल्या. मधल्या काळात विवेक ओबेरॉय बरोबरही तिचे नाव जोडले गेले. सिनेमाच्या सेटवर झालेले प्रेम आणि डेटींगनंतर २० एप्रिल २००७ ला ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी लग्न केले. विशेष म्हणजे ऐश्वर्या अभिषेकपेक्षा 3 वर्षांनी मोठी आहे. आपल्या समूहातर्फे ऐश्वर्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

— संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..