नवीन लेखन...

बाणे ऑलिम्पिक

 

सुप्रसिद्ध दैनिक ‘रोजची पहाट’ चे संपादक सूर्याजीराव रविसांडे हे फार अस्वस्थ होते. ते विशेषांक सम्राट म्हणून ओळखले जातात. प्रत्येक आठवड्याला ‘रोजची पहाट’चा विशेषांक काढायचा हे त्यांचे वैशिष्ट्य आणि ज्यांच्या जीवावर हा त्यांचा विशेषांक सम्राटाचा डोलारा उभा होता त्या काका सरधोपटांचा गेले दोन दिवस झाले पत्ताच नव्हता. सूर्याजीरावांच्या अस्वस्थतेचे हेच कारण होते.

काका सरधोपट हा एक अवलिया पत्रकार. रोजची पहाटचा मुख्य बातमीदार, मुलाखत तज्ज्ञ. कोणाचीही मुलाखत दोन-चार मुद्याचे प्रश्न म्हणजे सोप्या भाषेत ‘लिडिंग क्वेश्चन’ विचारायचे आणि बाकी मुलाखत इतर भरमसाठ मजकुराने समजून मांडायची ही त्यांची खासियत. त्यामुळे एकेका दिवसात तीन-तीन, चार-चार मुलाखतीसुद्धा ते गुंडाळतात. या त्यांच्या विलक्षण झपाट्यामुळे रोजची पहाट दर आठवड्याला एक तरी विशेषांक काढायचाच. या त्यांच्या मुलाखतींना कसलेही वावडे नसायचे. भिकाऱ्यापासून पुढाऱ्यापर्यंत, दुकानदारापासून नोकरदारापर्यंत, खानावळल्यापासून पंचतारांकित हॉटेलवाल्यांपर्यंत, गुंडांपासून गावगुंडांपर्यंत, चोरांपासून भाईंपर्यंत समाजाचा आडवा-उभा छेद घेत, ज्याला सोप्या भाषेत, क्रॉस सेक्शन ऑफ सोसायटी म्हणतात, अशा सर्व स्तरातील व्यक्तींचा, उद्योगांचा त्यात समावेश असे. बस थांब्यावर वाट पाहत असता, त्या थांब्यातच आपले बिहाड थाटलेल्या एका गरीब भिकारी कुटुंबाची त्यांनी घेतलेली मुलाखत वाचून, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दयेचा जबरदस्त उमाळा आला आणि त्यांनी परिवहन विभागास असे उपयुक्त बस थांबे वाढवायचे आदेश दिले! अशीच त्यांची फुटपाथवरील विक्रेत्यांची कारुण्यपूर्व मुलाखत वाचून महापालिकेने एकावर एक चार-चार फूटपाथ बांधायची नवीन योजना आखून आपल्या महानगरात देशातील सर्व राज्यांतील उपऱ्या फेरीवाल्यांची सोय करण्याचे ठरवले.

सांगायचा मुद्दा हा की काका जो समोर दिसेल त्याची मुलाखत घ्यायला सदैव तत्पर असयाचे. तर असे हे हरहुन्नरी काका, का आले नाहीत म्हणून सूर्याजीरावांचा चेहरा सूर्यास्ता समयी निस्तेज होणाऱ्या सूर्यासारखा फिक्कट पडला होता.

सूर्याजीरावांचा सूर्य अस्ताला लागतो नाही तोच काका घाईघाईने आत शिरतात. त्यांना पाहताच सूर्याजीरावांचा चेहरा पूर्व तेजाने तळपू लागतो.

“या या काका, अहो दोन दिवस झाले कुठे गायब होतात? आपली आठवडी विशेषांकाची प्रथा भंग होते की काय, असे मला वाटू लागले होते.”

” “छे छे साहेब तसे कसे होईल? तुम्हाला तर माहीतच आहे की, माझ्या टेबलावर अजूनही न छापलेल्या छप्पन मुलाखती पडून आहेत त्यातली कोणतीही घ्यायची.”

“काका ते पुरवठ्याचे पोटभरी खाणे. पण आता दिवाळी अंकासाठी काहीतरी चमचमीत, चटकदार, पंचपक्वान्न हवीत ना?”

“साहेब तुम्हाला फक्त कामच दिसते का हो?” “म्हणजे? मग दुसरं काय दिसायचं?” “साहेब आज इतकी वर्षे झाली, मी सिनीयर सिटीझन झालो. शेकडो मुलाखतींचे आणि विशेषांकांचे काम केले, पण अजून मला पगारवाढ, दिवाळी बोनस काही कधी मिळाले नाही. दिवाळीला चमचमीत विशेषांक काढायचे लक्षात आहे. पण माझ्या पगारात काही वाढ देणार की नाही?”

“काका रागावू नका. अहो आपल्या रोजची पहाट’मध्ये संपादकां खालोखाल तुमचाच मान असतो ना?”

“साहेब नुसता मान घेऊन काय करू? आता दिवस ‘मनी’ चे आहेत ते तेवढे द्या मग ही मान तुम्ही कशीही मुरगळा.’

“बरं बरं, सूर्याजीरावांचा चेहरा काकांना पाहताच जो तेजाळला होता तो पगाराच्या मागणीने पुन्हा काजळला. काका या दिवाळीला बघतो. आधी सांगा कामाचे काय करताय?”

“साहेब इतर कुठल्याही दैनिकात आलेली नाही आणि येणारही नाही अशी एक अत्यंत खळबळजनक बातमी मला मिळाली आहे. शिवाय खास दिवाळी भेट म्हणून ती बातमी/मुलाखत आपल्या रोजची पहाट’मध्ये प्रथमच येईल अशी माझी खात्री आहे.”

“काय सांगता? काका तसे असेल तर मी तुमचा पगार आत्ताच दुप्पट करतो. सांगा काय आहे ही दिवाळी भेट?” असे म्हणून सूर्याजीरावांनी तिथल्या तिथे काकांच्या पगारवाढीचे पत्र काढले आणि काकांसाठी गरमागरम चहा आणि कांदा भजी मागवली.

“साहेब आपल्या बाणे शहरांत यापुढचे ऑलिम्पिक भरवायचे असे बाणे महानगरपालिकेने ठरवले आहे, अशी अगदी गुप्त बातमी मला लागली आणि मी लगोलग खात्री करण्यासाठी आयुक्तांची भेट घेतली. आधी ते काही सांगायलाच तयार होत नव्हते.

शेवटा रोजची पहाटमधून ही बातमी आम्ही, ‘असे कळते’, म्हणून छापू म्हणताच त्यांचे धाबे दणाणले आणि त्यांनी ऐवीतेवी या ना त्या कारणाने गुप्त बातमी फुटणारच आहे तर अधिकृतपणे द्यायला काय हरकत आहे, असा विचार केला आणि मला उद्या मुलाखतीला बोलावले आहे.”

“वा, वा, काका, अहो पण आपल्या एकाच वर्तमानपत्राला ते कशी काय मुलाखत देणार? येवढी मोठी योजना त्यांना पत्रकार परिषद घेऊनच जाहीर नाही का करावी लागणार?”

“साहेब, त्याची त्यांना पर्वा नाही. महापौर त्यांना पत्रकार परिषद इतक्यात घेऊ नका असे सांगत आहेत. पण आयुक्तांना या योजनेचे श्रेय दुसऱ्या कोणाला द्यायचे नाही. उद्या त्यांच्या सेवेचा शेवटचा दिवस आहे. पुढे काय होईल याची त्यांना पर्वा नाही.”

“वा, काका पण हे तुम्हाला कसे काय जमले?

“साहेब ते मी नंतर सांगेन. आता आधी ही भजी आणि चहा संपवतो. बाहेर मस्त पाऊसही पडतो आहे.”

बिलंदर काका काही थांगपत्ता लागू देणार नाहीत हे सूर्याजीरावांना ठाऊक होते. हातात खरोखर वाढलेला पगार पडत नाही तोपर्यंत हा वृद्धकपी तोंड उघडेल ते फक्त चहा आणि भजी चापण्यासाठी हे ते जाणून होते.

“ठीक आहे काका. जाताना वाढलेला पगार घेऊन जा आणि उद्या याल ते बाणे ऑलिम्पिकची स्टोरी घेऊनच या. चला लागा कामाला!” काकांनी पडत्या फळाची आज्ञा घेऊन काढता पाय घेतला.

दुसऱ्या दिवशी ठीक सकाळी दहा वाजता काका बाणे महानगरपालिका आयुक्तांच्या बंगल्यावर पोहोचले. ही मुलाखत अत्यंत गुप्त असल्यामुळे त्यांनी काकांना बंगल्यावरच बोलावले होते.

“या, काका. एकटेच आहात ना?”

“होय साहेब. पण बाहेर कम्पाऊंडमध्ये बरीच भटकी वाटणारी कुत्री दिसली. हे भटके कुत्रे आपल्या बंगल्याच्या कम्पाऊंडमध्ये काय करतात?”

“काका ती भटकी कुत्री हा तर माझ्या बाणे ऑलिम्पिकचा कळीचा एक्का आहे.”

“काय सांगता साहेब? भटक्या कुत्र्यांचा आणि ऑलिम्पिकचा काय संबंध?”

“काका सगळं सांगतो. ही ऑलिम्पिकची कल्पना मला या भटक्या कुत्र्यांच्या समस्येतून सुचली.”

“ती कशी साहेब?”

“काका मला पुरते बोलू द्या. कृपया मधे मधे बोलू नका.”

“ठीक आहे साहेब सांगा.”

“हां तर ही भटकी कुत्री हाच या अद्भुत संकल्पनेचा मूळ गाभा. बाण्यात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव फार वाढल्याच्या तक्रारी नागरिकांकडून यायला लागल्या. कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्यांना मारता येत नाही. त्यांचे निर्बीजीकरण व्यावहारिक नाही. अशा दुहेरी कात्रीत प्रशासन सापडले. माझ्या बंगल्याच्या बाहेरही अशा कुत्र्यांची सेना झपाट्याने वाढत होती. त्यातलेच एक कुत्रे पिसाळले आणि माझ्या बंगल्यात घुसले ! बंगल्याच्या माळ्यामागे लागले तसे तो माळी घाबरून पळू लागला! मी वर गॅलरीतून हा खेळ पहात होतो. दोघेही सैरावैरा पळत होते. शेवटी त्या रॅबीने म्हणजे पिसाळलेल्या कुत्र्याने माळ्याला पकडले आणि त्याला तो चावला. आता उलटा खेळ सुरू झाला. रॅबी पुढे आणि माळी मागे. शवेटी माळ्यानेही कुत्र्याला पकडले आणि तोही त्याला चावला. थोड्याच वेळात दोघेही दगावले.

“भयंकर फारच भयंकर! पण साहेब आपण लगेच त्या माळ्याला वाचवण्याचा प्रयत्न नाही केला?

“काका तो खेळच एवढा थरारक होता की भान हरपून पाहतच राहिलो आणि युरेका! युरेका! असे ओरडलो.”

“माझी बायको सुलेखा धावत आली. अहो काय झालं? का ओरडताय माझ्या नावाने?”

“अगं मी युरेका युरेका म्हणालो, सुलेखा सुलेखा नाही. ती तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत गेली.”

“सांगायचा मुद्दा म्हणजे, काका काही शोध हे असे अचानक ध्यानीमनी नसताना लागतात तसा हा ऑलिम्पिक खेळाचा मला शोध लागला. मी लगेच महापौरांना बोलावून एक बैठक घेतली आणि माझी संकल्पना त्यांच्यासमोर मांडली. त्यांना ती फार पसंत पडली. बाणे महापालिका दरवर्षी पावसाळी मॅरेथॉन घेतेच. त्याचा अनुभव आहे. मग त्याचप्रमाणे जागतिक ऑलिम्पिक स्पर्धाही बाण्याला का घेऊ नये हा माझा विचार त्यांना पटला. फक्त ही योजना तूर्तास गुप्त ठेवावी, पुढच्या निवडणुकीपर्यंत थांबावे आणि निवडणुकांच्या आधी ही योजना जाहीर करावी असे त्यांनी सांगितले. पण काका हे सर्व गुप्त असता तुम्हाला याची कुणकुण कशी लागली?”

“साहेब तो एक योगायोगच. मी राहतो त्या संत एकनाथ महाराज पथावर एक शंभर-दोनशे फुटाचे फुटपाथाचे काम चालू होते. बाकी सगळा रस्ता फुटपाथाविनाच आहे. आमच्या रस्त्याला पूर्वी बँक गल्ली म्हणायचे. त्यांचे नामांतर एकदम संत एकनाथ महाराज पथ’ असे दिल्लीच्या राजपथासारखे झाले. शिवाय गेल्या काही दिवसांत आमच्या या अर्धा-पाऊण किलोमीटरच्या रस्त्यावर एकदम नावाच्या बदलामागोमाग शंभर-दीडशे फुटाचे फुटपाथाचे बांधकाम होते काय आणि अचानक काही दिवसांतच या पथावर दहा-बारा भटक्या कुत्र्यांची टोळी प्रकट होते काय, यात मला काही तरी निश्चित योजना असावी असे वाटत होते. शिवाय ही आमची गल्ली पूर्वी मातीची होती. तिच्यावर खडी, मग डांबराचे पट्टे, तुकड्या तुकड्याने, मधेच लहान मोठे खड्डे असे सुशोभिकरण चाललेले. बाणे नगरपालिकेच्या डांबरट म्हणजे डांबराचे नमुनेदार काम करणारे अशा चांगल्या अर्थाने, नगरसेवकांचे हे प्रयत्न टप्प्याटप्प्याने का चालू आहेत याचा शोध घ्यावा असे मला वाटू लागले. शोधपत्रकारिता हा अलीकडचा नवा फंडा आहे. तसा मी प्रयत्न केला. जो दिसेल त्याची मुलाखत घ्यायची माझी पद्धत आहे. त्याप्रमाणे एकदा मी फुटपाथचे काम करणाऱ्या ठेकेदाराशी बोलत होतो. प्रथम तो बोलायचे टाळत होता. पण एक क्वार्टर दिल्यावर थोडा खुलला. पण यामागे बाणे महापालिकेची काहीतरी जबरदस्त योजना आहे यापलीकडे तो काहीच बोलला नाही. म्हणून मी आपली भेट घेतली. आपणही काही ताकास तूर लागू देत नव्हता म्हणून मी आपल्याला आपल्या ‘त्या’ भानगडीचा पडदाफाश करू का म्हणून आठवण करून दिली तेव्हा…

“बस्स… बस, काका समजले. जास्त खुलासा नको, हे जे संत एकनाथ महाराज पथाचे काम चालू आहे ना तो खरोखरच बाणे ऑलिम्पिकच्या तयारीचाच एक भाग आहे.”

“काय सांगता?”

“खरेच काका. त्या रस्त्याच्या एका तोंडाशी भद्रकाली शाळेचे मैदान आहे ना तेच बाणे ऑलिम्पिकसाठी निवडले आहे.’

“ते मैदान? ऑलिम्पिकसाठी?”

“होय काका, बाण्यात आता तेवढे एकच प्रचंड मैदान उरले आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने संत एकनाथ महाराज पथ आणि भद्रकाली शाळेच्या मैदानाची पाहणी केली आहे. एवढे प्रचंड मैदान आणि सुमारे दीड किलोमीटर लांबीचा प्रशस्त संत एकनाथ महाराज पथ त्यांना फारच पसंत पडला. शिवाय बाणे ऑलिम्पिकसाठी आम्ही दोन खास खेळ शोधून काढले आहेत ते ऐकून तर समितीचे लोक फारच खूष झाले. त्यांच्या मते ही प्रचंड जागा आणि हे अद्भूत खेळ यामुळे बाणे शहराचे नाव अजरामर होणार.”

“वा फारच छान ! काय आहेत हे अद्भुत खेळ?”

“काका ते माझं खास फाईंड म्हणजे शोध आहे. ऑलिम्पिक स्पर्धा ज्या रोमन खेळांच्या परंपरेतून सुरू झाल्या त्यांनाही मागे सारेल असे हे खेळ होतील.”

“काय सांगता? काय आहेत हे खेळ?”

“काका नमुन्यादाखल मी दोन खेळ सांगतो. सगळे खेळ एकदम उघड करणे योग्य होणार नाही. एका खेळाचे नाव आहे ‘रॅबिएटर’ आणि दुसरा रबीएटर मॅरेथॉन.”

“नावं तर फारच अफलातून आहेत. साहेब आपल्या कल्पना शक्तीची तारीफ करावीशी वाटते.”

“काका नुसती नावेच नाही तर हे खेळही फार थरारक, अगदी रोमन खेळांना मागे टाकतील असे आहेत.”

“त्यासाठी भद्रकाली मैदानावर काही विशेष तयारी करणार आहात का?”

“हो, काका भद्रकाली मैदानावर चारीबाजूने कचऱ्याचे ढिगारे टाकून स्टेडियम करण्यात येणार आहे. त्यावर प्रेक्षक बसतील. मधे सर्कसच्या पिंजऱ्यासारखा पिंजरा उभा करून आत दहा रॅबीएटर म्हणजे रोमन ग्लॅडिएटरसारखे योद्धे सोडण्यात येतील. त्यांच्या अंगावर दहा रॅबीज कुत्रे म्हणजे पिसाळलेले कुत्रे सोडण्यात येतील. त्यांची फायटिंग होईल. ते एकमेकांना चावायचा, पकडायचा खेळ खेळतील. एकमेकांचे जीव घेईपर्यंत हा खेळ चालेल. हे रॅबीज कुत्रे तयार करण्यासाठीच बाण्यात गल्लोगल्ली भटक कुत्री वाढवण्यात येत आहेत.

“भयंकर! फारच भयंकर! एवढा थरारक खेळ आजच्या जमान्यात शक्य आहे का?”

“काका त्यासाठी जागतिक ऑलिम्पिक समितीने विशेष परवानगी मिळविण्याचे मान्य केले आहे.”

“दुसरा खेळही असा थरारक आहे का?”

“हो तो यापेक्षाही थरारक. अगदी थरकाप उडवणारा असेल. त्यात शंभर रॅबीएटर बाणे ते पुणे अशा रॅबी मॅरेथॉनमध्ये धावतील. शंभर रॅबीएटरनी धावायला सुरुवात केल्यावर एका तासाने त्यांच्या मागे शंभर रॅबीज म्हणजे पिसाळलेले कुत्रे सोडले जातील. जो रॅबीएटर रॅबीकडून पकडला किंवा चावला, न जाता प्रथम पुण्यापर्यंत पोहोचेल त्याचा विजय होईल आणि पुण्याचे महापौर तिथेच त्याला “रॅबीएटर राजा, हा किताब देतील.”

“फारच थरारक! पण साहेब खरंच अशी शर्यत होऊ शकेल?”

“काका होऊ शकेल म्हणजे काय? अहो परवाच अत्यंत गुप्तपणे ट्रायल झाली. त्यात एकच रॅबीएटर पुण्यापर्यंत पोहोचला!”

“काय सांगता? आणि बाकीचे नव्याण्णव?”

“काका ते रस्त्यावरच्या खड्ड्यात गायब झाले आणि जो एकमेव रॅबीएटर पुण्याला पोहोचला त्याच्या मागोमाग पोहोचलेल्या रॅबीने त्या रॅबीएटरचा कडाडून चावा घेतला. एवढेच नाही तर सत्काराला आलेल्या महापौरांना तो रॅबीएटर चावला.”

“बापरे! मग?”

“मग काय काका अहो ते महापौरही लागले जोरात पळायला.”

“काय सांगता? कुठे गेले ते?”

“ते सरळ नाशिककडे पळाले. तिथल्या महापौरांना कडकडून भेटायला! हा! हा! हा!!”

“अजबच दिसते सगळे. बाणे शहराचे नाव ऑलिम्पिकच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल आणि या अफलातून खेळांचे जनक म्हणून आपलेही नाव अजरामर होईल ”

नाही साहेब?”

“काका माझ्या कल्पनेचा फायदा हे बाण्यचे महापौर घेऊ इच्छितात म्हणून मी तुम्हाला ही मुलाखत देऊन त्यांचा डाव हाणून पाडला आहे.”

काका लवकरात लवकर ही मुलाखत दणक्यात छापा. मी तर आता निवृत्तच होणार आहे. मग ते काय माझे वाकडे करणार? चला लागा कामाला, या.’

“धन्यवाद साहेब! आभारी आहे येतो.” काका ही गरमागरम मुलाखत आटोपून लगोलग रोजची पहाटच्या कार्यालयात पोहोचले. त्यांचा आनंदाने फुललेला चेहरा पाहून सूर्याजीरावांच्या चेहऱ्यावरही सहस्ररश्मींचे तेज पसरले.

“साहेब फारच सनसनाटी बातमी आहे.”

आपल्या रोजची पहाटच्या दिवाळी विशेषांकाच्या दहा लाख प्रतीसुद्धा हा हा म्हणता खपतील. हा पाहा ना मथळा ‘बाणे महानगरपालिकेचे भव्यदिव्य ऑलिम्पिक आयोजन! जगात झाले नाही, होणारही नाही असे ऐतिहासिक ऑलिम्पिक!!’

बाण्याच्या आयुक्तांची भन्नाट कल्पना!!

“वा! काका तुमचा पगार तर दुप्पट वाढवलाच आहे आता तुम्हाला दिवाळीचा घसघशीत बोनसही देईन. चला लागा कामाला.”

‘रोजची पहाट’चा दिवाळी विशेषांक प्रसिद्ध झाला आणि प्रचंड खळबळ उडाली.

इतर सर्व वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींनी बाण्याच्या आयुक्तांचे कार्यालय गाठून अशी मुलाखत एकट्या रोजची पहाटलाच कशी दिली यावर जोरदार निशर्दने केली.

नव्या आयुक्तांनी त्यांचे स्वागत केले आणि खुलासा केला की, पूर्वीचे रिटायर झालेले आयुक्त मानसिकपीडायुक्त होते त्यांना कालच बाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये  दाखल केले आहे.!!

-विनायक रा. अत्रे

विनायक रा अत्रे
About विनायक रा अत्रे 88 Articles
श्री विनायक अत्रे हे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य वास्तुविशारद (Retd Chief Architect) आहेत. हास्यनाटिका, कथासंग्रह, काव्यसंग्रह तसेच विविध मासिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी बालगोपालांसाठी अनेक पुस्तके, एकांकिका वगैरे लिहिल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..