नवीन लेखन...

औचित्य जागतिक मराठी भाषा दिनाचे!

कविवर्य श्री विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस. हाच दिवस महाराष्ट्र शासनाने मराठी राजभाषा दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्याचे घोषित केले आणि जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेत हा दिवस आपण ‘जागतिक मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा करतो. समस्त मराठी जनांना ‘जागतिक मराठी भाषा दिवसाच्या’ हार्दिक शुभेच्छा..!

भाषेचा प्रश्न केवळ महाराष्ट्रालाच भेडसावतो आहे असे नाही. भारतातील सर्व भाषिक लोक या समस्येमुळे हवालदिल झाले आहेत. थोडी देशाबाहेर दृष्टी टाकली तर जगातील सर्वच लोकांना आपापली भाषा कशी वाचवायची आणि आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचे कसे रक्षण करायचे असा प्रश्न पडू लागला आहे. त्याला इंग्रजी भाषेची मायभूमी ब्रिटन आणि अमेरिका यांचाही अपवाद नाही. हजारो वर्षांत जगातील विविध भाषांचा एकमेकांशी जेवढा संपर्क आला नसेल तेवढा गेल्या शंभर-दीडशे वर्षात आला. पण गेल्या शंभर वर्षाच्या शेवटच्या दशकात डिजिटल क्रांतीने परस्पर संवादाचा वेग आणि आवाका प्रचंड प्रमाणावर वाढला. वाहतुकीची साधने आणि त्यांची गती वाढली तशी जगातील सर्वभाषिक लोकांचा विविध स्तरावर आणि क्षेत्रांत परस्परांशी इतका व्यापक आणि विस्तृत संपर्क व संवाद होऊ लागला आहे की त्याला मानवी इतिहासात तुलना नाही. अशा परिस्थितीत तंत्रज्ञान वाढीच्या गतीने वेग घेतला असताना करमणुकीपासून ते विज्ञान-तंत्रज्ञानांना पर्यंत बहुतेक विषय सर्वांना समजू शकतील अशी जागतिक भाषा उत्क्रांत होणे अपरिहार्य आहे. सर्वांना भीती तीच आहे. जागतिक सुपर-भाषेपुढे आपल्या संस्कृतीचा आणि भाषेचा कसा टिकाव लागणार? युरोपातील छोट्या देशांमधील भाषांनाच नव्हे तर सर्व देशातील भाषांप्रेमिकांपुढे हा प्रश्न पडला आहे. चिनी आणि रशियन भाषिकांनी जगाच्या बाजारात टिकाव धरण्यासाठी मोठ्या प्रमाणात इंग्रजी शिकायला सुरुवात केली आहे.

मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्याची जबाबदारी राज्यातील सर्व विद्यापीठांची आहे असे महाराष्ट्रातील विद्यापीठांसाठी असलेल्या १९९४च्या महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम कायद्यातील कलम ५ अन्वये दिसून येते. परंतु या तरतुदीचा राज्यातील विद्यापीठांनी योग्यतो विचार आणि वापर न केल्याने गेली पाच-सहा दशके मराठी भाषा उच्च शिक्षणाच्या सर्व शाखांमध्ये ज्ञानभाषा झालेली नाही.

मराठीला केवळ राजभाषा म्हणून मान्यता मिळून पुरेसे नाही. तिच्या विकासासाठी लोकभाषा आणि ज्ञानभाषा या दोन्ही पातळ्यांवर तिचे महत्त्व प्रस्थापित होणे आवश्यक आहे. प्रशासन, प्रसारमाध्यमे, उद्योगधंदे, विज्ञान-तंत्रज्ञान, विविध व्यवसाय या लोकव्यवहाराच्या सर्वच क्षेत्रात तिचा वापर वाढायला हवा. प्रसंगी त्यासाठी युक्ती, शक्ती, सक्ती, संधी आणि काही कठोर निर्णय घ्यावे लागल्यास घेणे जरुरीचे आहे. दाक्षिणात्य राज्यांना हे कसे जमले? असे विचारण्यापेक्षा आपण नेमके काय करायला पाहिजे याचे उत्तर शोधले तर मराठीची खरी अस्तीमिता आणि लाज राहील असे वाटते!

मुख्य मुद्दा आहे नेत्यांच्या इच्छाशक्तीचा आणि दूरदृष्टीचा. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार हा विदेशात व्हावा या उद्देशाने शिक्षणमंत्री श्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत राज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून इस्त्रायलमधील तेल-अविव या विद्यापीठाशी मराठी भाषा शिकविण्याचा अतिशय महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. विदेशात मराठी भाषेचा अभ्यासक्रम सुरु करण्याची ही बहुधा पहिलीच घटना असून नजीकच्या काळात अन्य देशांमध्येही मराठी भाषेसाठी सामंजस्य करार करण्यात येतील जेणेकरून मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार जगभरात होईल. हा योगायोग म्हणावा का जागतिक मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून हा योग जुळवून आणला.

इस्त्रायलमधील तेलअविव विद्यापीठात मराठी भाषा शिकविण्यासाठी तेलअविव विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि राज्य मराठी विकास संस्था यामध्ये सामंजस्य करार पार पडला. मराठी भाषा भारताबाहेर अन्य देशांच्‍या विद्यापीठात शिकविण्याचा बहुधा हा पहिलाच प्रसंग असावा. इस्त्रालयमध्ये मराठी भाषिक लोकांची वस्ती अधिक आहे. त्यामुळे तेलअविव या विद्यापीठात सामंजस्य करारामुळे मराठी भाषा शिकता येणार आहे. देश विदेशात मराठी भाषेचा प्रसार करणे हे या करारामागील प्रमुख उद्देश आहे. या सामंजस्य कराराप्रसंगी शिक्षणमंत्री श्री विनोद तावडे, तेलअविव विद्यापीठाचे उपाध्यक्ष प्रा.रानान रैन, इस्त्रायलचे वाणिज्य दूत डेविड अकोव्ह, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.संजय देशमुख आणि राज्य मराठी विकास संस्थेचे आनंद काटीकर आदी उपस्थित होते. या महत्वपूर्ण करारासाठी वरील सर्व मान्यवरांचे अभिनंदन, शुभेच्छा आणि धन्यवाद..!

या सामंजस्य कराराची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे अनिवासी भारतीय तसेच भारताबाहेर स्थायिक झालेले भारतीय वंशाच्या लोकांशी सांस्कृतिक आदानप्रदान करून त्याचा उपयोग व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, कला याद्वारे परराष्ट्र संबंध मजबूत करण्याकडे केंद्रातील मोदी सरकारचा मानस आहे. त्याला अनुसरूनच देशोदेशी स्थायिक झालेल्या मराठी भाषिक लोकांच्यात महाराष्ट्राची भाषा, कला, संस्कृती जीवंत रहावी यासाठी महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक तसेच मराठी भाषा विभाग आग्रही आहे. भारताबाहेर मराठी भाषिक लोकांची जिथे अधिक वस्ती आहे, अशा ठिकाणच्या विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकण्याची सोय उपलब्ध केल्यास तेथील मातीत जन्मलेल्या मराठी पिढीची महाराष्ट्राशी असलेली आपली सांस्कृतिक नाळ अधिक घट्ट व्हावी हा उद्देश आहे.

इस्त्रायलमध्ये नियतकालिक प्रसिद्ध होतात. दरवर्षी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो, तसेच गाजलेल्या मराठी नाटकांचे प्रयोग तेथे आयोजित केले जातात. १९९६ साली जागतिक मराठी संमेलनाचे आयोजन इस्रायलमध्ये केले गेले होते. असे असले तरी, इस्रायलच्या मातीत जन्मलेल्या या लोकांच्या पुढच्या पिढ्या मातृभाषा म्हणून हिब्रू बोलतात. इस्रायली विद्यापीठांत संस्कृत, हिंदी तसेच मल्याळम भाषा शिकण्याची सोय असली तरी मराठी शिकण्याची सोय आजवर उपलब्ध नव्हती.

तेल-अवीव विद्यापीठ जे इस्रायलमधील सर्वात मोठे आणि जगातील आघाडीच्या १५० विद्यापीठांपैकी एक आहे, महाराष्ट्र शासनाच्या तसेच राज्यातील विद्यापीठांच्या मदतीने आपल्याकडे मराठीचा अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याची तयारी त्यांनी दर्शवली. देश-विदेशात मराठी भाषेचा प्रचार करणे हे राज्य मराठी विकास संस्थेच्या उद्दिष्टांपैकी एक असल्यामुळे संस्थेने मुंबई विद्यापीठ आणि तेल-अवीव विद्यापीठासह इस्रायलमध्ये प्रायोगिक तत्वावर एक महिन्याचा मराठी भाषेचा अभ्यास वर्ग उपलब्ध करून देण्याच्या प्रकल्पात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठी भाषेचा हा अभ्यासक्रम २०१६ पासून इस्त्रायलमध्ये सुरु करण्यात येईल. हा प्रयोग यशस्वी झाल्यास अन्य देशांतील ज्या शहरांमध्ये मराठी भाषिकांची संख्या लक्षणीय आहे, तेथेही अशा प्रकारचा अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.

— जगदीश पटवर्धन

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..